वृक्षारोपणातील देशीवाद

झाडे लावताना कोणतीही झाडे, ती देशी असोत की विदेशी ते मोठ्या संख्येत लाऊ नये. मोठ्या संख्येत म्हणजे आपण निवडलेल्या परिसराच्या तुलनेत एकाच प्रकारची झाडे बहुसंख्येत नसावीत. देशी झाडांच्या आग्रहात नेमकी हीच बाब दुर्लक्षिली जाते. पुणे परिसरातील अनेक टेकड्यांवर वड व पिंपळ यांचे जंगल उभारले जाणे ही पर्यावरणीय दृष्ठ्या घातक बाब आहे. एकसुरी झाडे लावण्याचे प्रकार टाळावे.

Plantation

झाडं लावणं, हे पर्यावरणाचे सर्वात महत्वपूर्ण काम समजले जाते. पाच जूनचा पर्यवरण दिवस एकदा का आला,की झाडे लावण्याचे संकल्प सुरु होतात, सोसियल मीडियावरून झाडं लावण्यासाठी आव्हान करणारे मेसेजस फिरू लागतात. झाडे लावल्याच्या बातम्या येऊ लागतात. झाडासोबत सेल्फी फिरू लागतात. खरं तर झाडे लावायला हवीत याची जाणीव मे महिन्यातील भाजून काढणार्‍या उन्हातूनच झालेली असते. उन्हाळ्यात आणखी एका गोष्टीमुळे, आपल्या आजूबाजूला झाडे असायला हवीत याची जाणीव होते, ती म्हणजे गाडी पार्क करण्यासाठी सावलीची जागा. मग व्हॉट्सअ‍ॅपवर एक दोन विशिष्ट प्रकारचे फोटो फिरू लागतात. ज्यामध्ये एकाच मोठ्या झाडाखाली साठ सत्तर दुचाकी पार्क केलेल्या असतात. झाडाचे महत्व सांगून ती लावावीत अशी शपथ घातली जाते.

दर वर्षी अधूनमधून एक विवाद सुरू असतो. झाडं लावताना ती फक्त देशीच असली पाहिजेत, देशी झाडे ही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतात, असा एक मत प्रवाह असतो. दुसरं मत हे अगदी या विरोधी असते. देशी विदेशी असे भेद वनस्पतीला नसतात. झाडे लावण्याबद्दलचा हा देशीवाद अशास्त्रीय आहे. आपापली मते पटवून देण्यासाठी अनेक युक्तिवाद करतात. जसे, अगदी आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या वनस्पतींचे मूळ उगमस्थान शोधून काढून, ज्वारी पूर्व आफ्रिकेतून आली. मिरची मेक्सिको मध्य अमेरिकेतून आली. भुईमुग दक्षिण अमेरिकेतून आली. ही सर्व बाहेरच्या देशातून आलेल्या वनस्पती, पिके आपण लावतोच की नाही. मग झाडांच्या बाबतीत असे देशीविदेशी वाद कशासाठी. वनस्पतींना देशी आणि विदेशी अशी सरसकट विशेषणे लावणे बरोबर नव्हे. वनस्पतींना देशसीमा नाहीत. अनुकूल हवामान, पाण्याची उपलब्धता अशा अनेक गोष्टींनी आपोआप किंवा मानवी हस्तक्षेपाने त्यांचे स्थलांतर अविरत चालू असते व आहे. आपल्या परिसरात नैसर्गिक रीतीने वाढत असलेले वृक्ष हे आपले वृक्ष हे मान्य करायला हवे.

देशी वृक्ष लावण्याची अतिरेकी भूमिका घेणारे अगदी वेद काळात, कोणत्या ग्रंथात ही यादी दिली आहे, तीच लावली पाहिजेत असी भूमिका घेतात. काहींना तर फक्त वड आणि पिंपळ ही दोनच झाडे म्हणजे देशी झाडे वाटतात. थोडे पुढे जाऊन उंबर एक नाव त्यांच्या देशी वृक्षाच्या यादीत जोडलं जातं. मग प्रत्येक गावात किमान शंभर उंबर लावावेत. शंभर वड लावावेत. असे स्वत:च धर्मादेश किंवा फतवे सोडत असतात. फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप ही माध्यमे या मतांच्या प्रचारासाठी उपयोगी ठरतात. अनेकजण थोडाही विचार न करतात अशा पहिल्या किंवा दुसर्‍या मताला बळी पडतात. जमेल तसे, तितके व ती झाडे लावून आपल्या पर्यावरणीय जबाबदारीतून मुक्त होतात. झाडे लावणे ही विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे काही महत्वपूर्ण बाबी ध्यानात घ्यायला हव्यात.

झाडे लावण्यापूर्वी प्राधान्याने लक्षात घ्यावयाच्या गोष्टी:

आपली गरज निश्चिती
झाडे लावण्यापूर्वी आपली नेमकी गरज काय आहे हे निश्चित करायला हवं. सावली हवीय का? शोभेची झाडे हवीत का? फळझाडे हवी आहेत का? बांधकाम योग्य लाकूड हवं असेल किंवा जळतनासाठी लाकूडफाटा हवा असेल. शेतीभवती किंवा इतर जागेला नैसर्गिक कुंपण करायचे असेल. अशा वेगवेगळ्या गरजेसाठी वेगवेगळी झाडे प्रजाती निवडावी लागतात.

परिसराबद्दल समज
एकदा का आपली गरज निश्चित झाली. आपली गरज पूर्ण करण्यासाठी वनस्पती, झाडे आपल्या परिसरात टिकाव धरू शकतील का? आपण लावलेली झाडे परिसरातील जैवविविधतेला मारक तर नाही ना याबद्दल समज येण्यासाठी तो परिसर समजून घ्यायला हवा. ज्या परिसरात, जागेवर झाडे लावायची आहेत त्या जागेचा अभ्यास करायला हवा. या अभ्यासामध्ये त्या परिसरातील माती कशी आहे. खडक किती खोलवर आहे. तेथील सरासरी पाऊस किती आहे. त्या परिसरात निसर्गतः कोणती झाडे आहेत. झाडा शिवाय इतर गवत, तन, झुडूप कोणकोणती आहेत. येथील पक्षी, फुलपाखरे, जंगली प्राणी कोणती आढळतात. या सर्वांची सरासरी प्रमाण किती आहे. या बाबी समजून घेतल्या पाहिजेत. हा अभ्यास अगदीच काटेकोर मोजमापांनी केला पाहिजे असे काही नाही. तसे केले तर चांगलीच बाब आहे. परिसर समजून घेतल्यानंतर आपण लावलेली झाडे ही त्या परिसरातील झाडाच्या स्वरूपाच्या अगदीच विपरीत असू नये.

लावलेल्या झाडाची काळजी घेण्याची क्षमता
आपण एक किंवा काही संख्येत झाडे लावणार असू तर त्या झाडांना किमान दोन ते चार वर्षे (झाडाच्या प्रकारानुसार) जतन करणार आहोत का. यासाठीची व्यवस्था लावणे आपल्याला शक्य आहे का? वेळेवर पाणी उपलब्ध करून देणे, मोकाट जनावरांपासून त्याला संरक्षण देऊ शकतो का, याचा विचार झाडे लावण्यापूर्वी किंवा लावल्यानंतर तरी करून तशी व्यवस्था लावायला हवी.

शाळेतील वृक्षारोपण
शाळेतील वृक्षारोपण कार्यक्रम ही रोपे विकत आणून लावण्यापेक्षा, शाळेत मुलांच्या सहभागाने बिया गोळा करणे, त्यापासून रोपे बनविणे व वृक्षारोपण करणे अशी प्रक्रिया करायला हवी. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रत्येक टप्प्यातील शिकण्यावर भर दिला पाहिजे. बियांची रचना कशी असते. त्यानुसार त्या बिया निसर्गत: कशा अंकुरत असतील. त्यावर कोणत्या प्रक्रिया कराव्या लागतील. बियातून किती दिवसांनी रोपे अंकुरतात. लहानसे रोप कसे दिसते. त्याची वाढ कशी होते, या सर्व बाबी आनंददायी व शिकणं शिकविणे समृद्ध करणारी असतात. विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या बियातून तयार झालेली रोपे पाहून नवनिर्मितीचा आनंद मिळतो.

कटाक्षाने टाळाव्यात अशा काही बाबी
झाडे लावताना कोणतीही झाडे, ती देशी असोत की विदेशी ते मोठ्या संख्येत लाऊ नये. मोठ्या संख्येत म्हणजे आपण निवडलेल्या परिसराच्या तुलनेत एकाच प्रकारची झाडे बहुसंख्येत नसावीत. देशी झाडांच्या आग्रहात नेमकी हीच बाब दुर्लक्षिली जाते. पुणे परिसरातील अनेक टेकड्यांवर वड व पिंपळ यांचे जंगल उभारले जाणे ही पर्यावरणीय दृष्ठ्या घातक बाब आहे. एकसुरी झाडे लावण्याचे प्रकार टाळावे.

सहज उपलब्ध होतात म्हणून अनेकदा सुबाबुळ, इंग्रजी चिंच, गुलमोहर यांच्या मोठ्या संख्येत बिया गोळा करून जंगलात फेकली जातात. रोपे करून लोकांना लावण्यासाठी वाटली जातात. ही बाब टाळायला हवीय. काही शाळेतील शिक्षक त्यांच्या आवारात कोणती झाडे लावावीत याबद्दल सल्ला विचारतात. तेव्हा त्यांचे परिसर ध्यानात घेऊन जर आंबा, पेरू, बोरं अशी फळझाडे सुचवल्यास ते म्हणतात, फळझाडे नोकोत सर, गावतील लोक ठेवत नाहीत. मुलं दगड मारतात. ही असली भूमिका केवळ शाळेतील शिक्षकांतच आहे असे नाही. अनेक शेतकरी आपल्या बांधावर झाडे लावताना लोकांचा उपद्रव नको म्हणून फळझाडे लावण्याचे टाळत आहेत. यातून आपल्या गावशिवारातील फळझाडे मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. जशी जशी फळझाडे कमी होत जातील तसे तसे उरलेल्या कमी संख्येतील फळझाडावर ताण येईल.

अलीकडे सार्वजनिक ठिकाणावरील फळझाडे कमालीची कमी झाली आहेत. साधारण दहा वर्षांपूर्वी जी कुणा एकाची नाहीत, अशी सार्वजनिक जागेवरील आंबा, बोरं, चिंच अशी खाउची झाडे संपत जात आहेत. झाडे लावताना या सर्व बाबी ध्यानात घेऊन ती लावली गेली पाहिजेत. नुसतेच टोकाचे देशी विदेशी वाद करत बसणे निरर्थक आहे. आपला परिसर हा झाडांच्या विविधतेने संपन्न व्हायला हवा. मग ही संपन्नता आपल्या जीवनात येऊ लागते.