Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स डॉ.नारळीकरांच्या हस्ताक्षरातील अमूल्य पत्र

डॉ.नारळीकरांच्या हस्ताक्षरातील अमूल्य पत्र

आपल्या आदर्श व्यक्तीला, प्रेरणास्थानाला प्रत्यक्ष भेटता येणे यासारखी दुसरी गोष्ट नाही. माझ्या बाबतीत तसा योग जुळून आला आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. ते उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे थोर खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

Related Story

- Advertisement -

आपल्या आदर्श व्यक्तीला, प्रेरणास्थानाला प्रत्यक्ष भेटता येणे यासारखी दुसरी गोष्ट नाही. माझ्या बाबतीत तसा योग जुळून आला आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. ते उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे थोर खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर ! डॉ. नारळीकरांची प्रेषित, व्हायरस’ आणि यक्षांची देणगी ही तीन पुस्तके वाचल्यापासूनच या थोर शास्त्रज्ञाला भेटण्याचे स्वप्न मी पाहिले होते. माझे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची नामी संधी विवेकानंद व्याख्यानमाले’च्या रुपाने मिळाली आणि ती सुवर्णसंधी मी दवडली नाही.

विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आयोजित विवेकानंद व्याख्यानमाले त ३० नोव्हेंबर २०१७ रोजी डॉ. जयंत नारळीकर यांचे वेध अंतराळाचा या विषयावर व्याख्यान होते. त्या व्याख्यानाला मी आवर्जून हजेरी लावली.व्याख्यान संपल्यानंतर ते श्रोत्यांच्या प्रश्नांचे, शंकांचे निरसन करू लागले. मलाही त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. एका मोठ्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधायचा असल्यामुळे थोडेसे दडपण आले होते. त्या अवस्थेतच मी त्यांना प्रश्न विचारला, ” इस्रो या संस्थेतर्फे साधारणपणे कोणत्या सालापर्यंत अंतराळवीर अवकाशात पाठवण्यात येईल?”. माझ्या प्रश्नाला उत्तर देताना नारळीकर म्हणाले, ” इस्रो ज्याक्षणी अंतराळवीर सुरक्षितररित्या माघारी आणण्याची क्षमता प्राप्त करेल त्याक्षणी अंतराळवीर नक्कीच पाठवेल.” त्यांच्याबरोबरच्या प्रत्यक्ष संवादाचे ते क्षण माझ्यासाठी मंतरलेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मान्यवर कक्षात त्यांना भेटण्यासाठी एकच गर्दी झाली.

- Advertisement -

त्या गर्दीतच त्यांच्यासोबत खास आठवण म्हणून फोटो काढून घेतला. परंतु, त्यांची स्वाक्षरी मात्र घेता आली नाही. कारण त्यांच्या एखाद्या पुस्तकावरच स्वाक्षरी देण्याचा त्यांचा दंडक आहे आणि त्याक्षणी माझ्याकडे त्यांचे पुस्तक नव्हते. परंतु, त्यांना पत्र पाठवून एखादा प्रश्न विचारल्यास ते उत्तरादाखल स्वहस्ताक्षरातील पत्र पाठवून सोबत स्वाक्षरीही देतात असे कळले.
नंतर मी चारच दिवसात गुरुत्वीय लहरीच्या संशोधनाविषयीचा एक प्रश्न लिहून पत्र पाठवले. साधारण महिना उलटून गेला तरी पत्राचे उत्तर न आल्यामुळे मी थोडी साशंक झाले. पत्र पोहोचले असेल का? अशी शंका मनात आली. परत एकदा पत्र लिहून पाठवण्याचा विचार मनात आला. परंतु २० जानेवारी २०१८ रोजी डॉ. नारळीकरांच्या हस्ताक्षरातील पत्र मिळाले आणि मला गगन ठेंगणे झाले. १८ जानेवारीला माझा वाढदिवस असतो. दोनच दिवसांनी मिळालेले डॉ. नारळीकरांचे पत्र माझ्यासाठी वाढदिवसाची खास भेटवस्तूच ठरले. हा अमूल्य ठेवा मी कायमस्वरुपी जपून ठेवणार हे नक्की!


-तन्वी गुंडये

- Advertisement -