घरफिचर्सजिंदादिल डॉ.नितू मांडके !

जिंदादिल डॉ.नितू मांडके !

Subscribe

20 मार्च 1987. मुंबई जसलोक हॉस्पिटलमध्ये जिवलग मित्र विकास मयेकरची पहिली ओपन हार्ट सर्जरी झाली. सर्जरी करणारे होते जगविख्यात ह्दयशस्त्रक्रियातज्ञ डॉ.नितू मांडके. तेव्हा जसलोक हॉस्पिटल पहिल्यांदा पहिलं साधारण ऑपरेशन झाल्यावर पाचवा – सहावा दिवस असावा. मी हॉस्पिटलमध्ये विकासला भेटायला गेलो. पहातो तर हॉस्पिटलमधल्या डॉक्टरच्या वेशातली एक व्यक्ति चक्क विकासचा हात धरुन त्याला कॉरीडॉर मधून चालवत होते. आणि तेही छान गप्पा मारत. पेशंटच मनोधैर्य वाढावं म्हणून काहीच झाल नाही, काहीच होत नाही आणि काहीही होणार नाही, अर्थात काळजी घेऊन बिनधास्त रहायच अस पेशंटला आपुलकीच्या मायेने सांगणारी ती व्यक्ति होती, डॉ.नितू मांडके तिथंच विकासने माझी ओळख करुन दिली. डॉक्टरांचा पहिला प्रश्न ‘‘काय करतोस‘‘?. उत्तर दिल्यावर म्हणाले ’’प्रामाणिकपणे झोकून देऊन काम कर, नोकरीसाठी नोकरी या सूत्राने प्रसारमाध्यमात किंबहुना कुठेही काम करुन चालत नाही‘‘.

डॉक्टरांची ती पहिली भेट. कुणालाही आवडावे असे त्याचे व्यक्तिमत्व. पुढे संपर्कात राहिलो. कुणाही माणसांन पहिल्या भेटीतच डॉक्टरांच्या प्रेमात पडावं, मैत्री व्हावी असे हे जिंदादिल व्यक्तिमत्व पिळदार मिशितला हा दिलदार माणूस बोलायला लागला की बिनधास्त बोलायचा. आपुलकीने, घरच्या मायेने, कौटुंबिक प्रेमाने काही विशेषण (ठेवणीतले शब्द) लावून ही बोलायचा अर्थात ते ही सर्वांना आवडायचं. पुढे माझ्या दूरदर्शनच्या धावपळीच्या कामातून मी अधूनमधून डॉक्टरांची आठवण झाली की, फोन करायचो. अर्थात बहुतांश वेळा ते ऑपरेशन थिएटर मध्ये असायचे. मी त्यांच्या पीएकडे निरोप ठेवायचो. मात्र व्यस्तता संपल्यावर डॉक्टर आठवणीने फोन करायचे. पुढे 14 वर्षांनी 2001 साली विकास मयेकरची दुसरी सर्जरी करायची वेळ आली – डीव्हीआर (डबल वॉल्व्ह रिपलेसमेंट) सर्जरी – विकास तेव्हा रत्नागिरी सेल्स टॅक्समध्ये विक्री कर अधिकारी म्हणून कार्यरत होता. राजय शासनाच्या अधिकृत हॉस्पिटलमध्ये मुंबईत पॅनलवर एकमेव बॉम्बे हॉस्पिटल होते. तिथं सर्जरी झाली तर शासकीय आर्थिक मदत त्याच्या कार्यालयाकडून त्याला मिळणार होती. अन्यथा एवढ्या मोठ्या ऑपरेशनचा खर्च म्हणजे मोठा प्रश्न होता. डॉक्टर तेव्हा लिलावती हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. मी लिलावतीत डॉक्टरांना भेटायला गेलो. विकासच्या ऑपरेशनचा विषय काढला. ’’तुम्हीच ऑपरेशन करायचं‘‘ डॉक्टर म्हणाले, ‘‘बॉम्बे हॉस्पिटल सोडून दुसरं कोणतही हॉस्पिटल सांग.‘‘ मी त्यांना विकास राज्य शासन अधिकारी-राज्यशासन मान्यता प्राप्त हॉस्पिटल सर्व अडचण सांगितली आणि लिलावतीमधून बाहेर पडलो.

- Advertisement -

आठ-दहा दिवसांनी पुन्हा लिलावती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटायला गेलो. सोबत विकासचे भाओजी केरकर होते. ’’डॉक्टर तुम्हीच ऑपरेश करायचे अशी पेशंटची इच्छा आहे आणि ते ही बॉम्बे हॉस्पिटलला. माझं बोलण झाल्यावर दुस-या सेकांदाला डॉक्टर हसत म्हणाले, विकासला ताबडतोब बोलावून घे. 13 जुलै ला बॉम्बे हॉस्पिटला ऑपरेश होईल. मी काही कारणांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जात नव्हतो. मात्र विकासच ऑपरेशन करण्यासाठी मी बॉम्बे हॉस्पिटला येईन‘‘. पेशंटच्या व्यथा, वेदना, अडचणी, समस्या यांना प्राधान्य देणारे डॉक्टर होते. मी आनंदाने लिलावतीमधून बाहेर पडलो. पुढच्या पंधरा-वीस दिवसांत 13 जुलै 2001 ला मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये विकास मयेकरची पुन्हा एकदा ओपन हार्ट सर्जरी झाली (डीव्हीआर)-(डबल वॉल्व्ह रिपलेसमेंट) ऑपरेशन झाल्यावर वेटींग रुममध्ये डॉक्टरांनी येऊन सांगितले ऑपरेशन छान झालं काळजी करु नका. सगळे निश्चिंत झाले. अचानक त्याच रात्री विकासची प्रकृती गंभीर झाली. रात्री एक वाजता डॉ.नितू मांडके बॉम्बे हॉस्पिटल आले. त्याला पुन्हा ऑपरेशन थिएटर मध्ये नेऊन ऑपरेट करावं लागलं. विकास मयेकरच्या आयुष्यातला तो पुर्नजन्माचा दिवस होता. दुस-या दिवशी डॉक्टरांची भेट झाली म्हणाले, पेशंट चार-पाच दिवसांत स्वत: चालू लागेल. तसंच घडलं. गेली दोन तीन वर्ष काही कारणांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये न येणारे डॉ.नितू मांडके पुन्हा बॉम्बे हॉस्पिटला ऑपरेशनसाठी आले तो पेशंट कोण या कुतहलापोटी बॉम्बे हॉस्पिटलामधला प्रत्येकजण (डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आणि इतर स्टाफ) विकास मयेकर पेशंटला पाहायला येत होते. जाज्वल्य आत्मविश्वास, प्रचंड चिकाटी, अविरत काम करण्याची अतुलनीय जिद्द ही डॉक्टरांची गुण वैशिष्टय होती.

राज्याच्या, देशाच्या कानाकोप-यांतून जगाच्या विविध देशातून डॉक्टरांकडे पेशंट यायचे. मुंबईतल्या नेपियनसी रोडवरच्या त्यांच्या कन्स्ल्टींग क्लिनिकच्या बाहेर पेशंटच्या रांगा लागायच्या. मात्र पेशंटच्या बाबतीत डॉक्टरांनी गरीब – श्रीमंत असा भेद कधीच केला नाही. येणारा रुग्ण डॉक्टर म्हणून आपल्याकडे विश्वासाने येतो म्हणूनच तो लवकर बरा व्हायला हवा या वैद्यकीय सूत्राचे डॉक्टर आग्रही होते. कमवायचं म्हणचे चौफेर कुठेही कसेही फावडे मारायचे ही त्यांची वृत्ती नव्हती. त्यांच्याबद्दलची ही व्यक्तिपूजा नाही. माझा व्यक्तिगत अनुभव ही डॉक्टरांची एक अमूल्य आठवण आहे. जी जन्मभर मला जपून ठेवायची आहे. तपशील असा – 1997 च्या डिसेंबरमध्ये माझ्या वडीलांना हार्टचा त्रास सुरु झाला. रत्नागिरीत डॉ.पाटीलांची ट्रिटमेंट सुरु होती. डॉ.पाटीलांनी सांगितले, ऑपरेशन करावं लागले. त्या दिवसात डॉ.नितू मांडके हे नाव देशभर सर्वाच्या तोंडावर होतं. चर्चेत होतं. कारण त्याआधी आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर डॉक्टरांनी यशस्वी ह्दयशस्त्रक्रिया केली होती. त्यामुळे तर अवघ्या महाराष्ट्रात डॉक्टरांच नांव घराघरात दुमदुमत होतं. माझ्या वडिलांनी – ती.आप्पांनी – सांगितलं ‘‘डॉ.नितू मांडके ऑपरेशन करणार असतील तरंच माझं ऑपरेशन होईल अन्यथा ऑपरेशन हा विषय चर्चा करायचा नाही. मी स्वभावानुसार आणि पितृप्रेमाने बोलून गेलो ‘‘डॉ.नितू मांडकेच तुमचं ऑपरेशन करतील‘‘ अर्थात नंतर मी भानावर आलो. आपण डॉक्टरांना न विचारताच केवळ वडिलांना बर वाटावं म्हणून भावनेच्या भरात बोललो. काळजीत पडलो. तातडीने मुंबईत आलो डॉक्टरांना फोन केला. वस्तुस्थिती सांगितली. वडिलांची इच्छाही बोललो. ते म्हणाले, वडिलांना घेऊन नेपियनसी रोड वरच्या क्लिनिकमध्ये ताबडतोब ये. रत्नागिरीत आप्पांना फोन करुन सांगितले. डॉ.मांडके आपलं ऑपरेशन करणार या आनंदाने त्यांच अर्ध अधिक दुखणं बंद झालं. सगळ्याा वाडीत गावात डॉ.नितू मांडके माझं ऑपरेशन करणार हे सांगत. ते ठाण्यात पोहचले. डॉक्टरांची भेट झाली. त्यांनी तपासलं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना अ‍ॅडमिट केलं. दोन – चार दिवसांत ऑपरेशन झालं. ऑपरेशनच्या दिवशी संध्याकाळी ठरल्याप्रमाणे डॉक्टरांची व्यक्तिगत फी द्यायला मी नेपियनसी रोडवरच्या त्यांच्या क्लिनिकला पोहोचलो.सोबत मोठा भाऊ राजू होता. पीएकडून चिठ्ठी पाठवली. डॉक्टरांनी बोलावलं. केबिनमध्ये शिरताच त्यांच्या आवडीची साईबाबांची गाणी ऐकू येत होती. डॉक्टरांचा तो आवडता छंद होता. मी म्हटलं, डॉक्टर तुमच्या फीचे पैसे घेवून आलोय. माझ्याकडे रोखून बघत करड्या आवाजात डॉक्टर म्हणाले, कुठल्या दरवाज्याने आत आलास‘‘ मी मागच्या दरवाजाकडे खूण केली. डॉक्टर परत म्हणाले, जसा आलास तसा बाहेर पड, वडिलांची काळजी घे. चांगली सेवा कर, हीच वेळ वडिलांची सेवा करण्याची. माझ्या फीचे पैसे त्यांच्यासाठी, त्यांच्या औषोधोपचारासाठी खर्च कर. जगात आई-वडिलांपेक्षा श्रेष्ठ नाही.‘‘ डॉक्टरांच बोलणं संपल मी हातातलं पैशाचं पाकीट घेऊन बाहेर पडलो. जगविख्यात ह्दयशस्त्रक्रिया शल्यविशारद डॉ.नितू मांडकेंनी व्यक्तिगत फीचा एक रुपया सुध्दा घेतला नाही. अशी अनेक ऑपरेशनस डॉक्टरांनी केली. त्यांनी केलेली मदत (डाव्या हाताने) त्यांच्या उजव्या हाताला ही कळत नसे. हजारो किचकट ह्दयशस्त्रक्रिया लिलया सफाईदारपणे करणा-या या जिंदादिल डॉक्टर अवलियाला मात्र हार्ट अ‍ॅटकनेच अवेळी घेऊन जावं हा मोठा दैवदुर्विलास होता. नियतीचा अजब न्याय होता.

- Advertisement -

माझ्या दूरदर्शन नोकरीच्या वाटचालीत दोन वर्षे पुणे दूरदर्शन केंद्रात माझी बदली झाली. तिथून मी पुन्हा मुंबई दूरदर्शनला रुजू झालो. आणि लोकप्रिय कोर्टमार्शल या मुलाखत मालिकेची निर्मितीची जबाबदारी माझ्यावर आली. समाजातल्या विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तिींच्या मुलाखती असं त्या कार्यक्रमांच स्वरुप होतं. मुलाखतकार, सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे. वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉक्टर म्हणून डॉ.नितू मांडकेच्या मुलाखतीच रेकॉडिंग झालं. रेकॉडिग संपल्यावर स्टुडिओत सेट वरुन निघताना डॉक्टरांनी विचारलं. अरे नाना (पाटेकर) या कार्यक्रमात येवून गेला का. मी नाही म्हटलं. डॉक्टरांनी तिथूनंच मोबाईलवरुन अभिनेता नानाला फोन लावला. ’’नाना तुला कोर्ट मार्शल कार्यक्रमात यायंचयं’’. मी सुखावलो. बेधडकपणा बिनधास्तपणा तातडीने निर्णय हा त्याचा स्वभाव होता. मराठी महाराष्ट्र हा त्यांचा स्वाभिमान होता. त्याचबरोबर डॉक्टर राष्ट्राभिमानी होत्या. आपण भारतीय आहोत याचा सार्थ अभिमान होता. जावल्य राष्ट्रप्रेम हा त्यांचा विचार पिंड होता. जे करायचं ते भव्य उदात्त ही त्यांची संस्कारधारा होती. आपण समाजाचे आहोत या सूत्रावर ते प्रेम करणारे होते. याच संस्कारातून आपल्या आईवडीलांच्या नावाने ट्रस्ट स्थापन करुन अंधेरीत लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये भव्यदिव्य भलं मोठं हॉस्पिटल उभारायचं हे त्यांच स्वप्न होतं. हॉस्पिटलच्या गच्चीवर एअर अ‍ॅम्ब्युलन्स हवी ही दूरदृष्टी होती. त्या हॉस्पिटलचा झालेला भूमीपूजन सभारंभही स्मरणीय होता. मला निमंत्रण होतं. दूरदर्शनच्या मिटींग निमित्ताने मला दिल्लीला जावं लागलं. पत्नी सौ.पद्मा त्या कार्यक्रमाला गेली होती. तेवढ्याही सभारंभ धावपळीत त्यांनी तिची अगत्यान चौकशी केली. पुढे काळाच्या ओघात मोठ्या हॉस्पिटल उभारणीचं आर्थिक गणित मोठ होत गेलं. डॉक्टरांपुढे ते आव्हान होतं. प्रवाहाविरुध्द पोहायचं हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे त्यांनी त्या आव्हानांची चिंता त्यांनी चेह-यावर कधीही दाखवली नाही.

एकदा लिलावतीमध्ये असाच डॉक्टरांना भेटायला गेलो समोर त्यांच्या पत्नी डॉ.अलका मांडके होत्या. आम्ही प्रत्यक्ष कधीही भेटालो नव्हतो . डॉक्टरांनी ओळख करुन दिली. ‘‘सौ.अलका मांडके . मी नमस्कार केला, डॉक्टरांच पुढचं वाक्य होतं. वेळी अवेळी बेधडकपणे फोन करणारा हाच तो आगावू माणूस जयू भाटकर.‘‘ त्यांच्या प्रत्येक शब्दांत आपुलकीचा गंध होता. त्यांच्या प्रत्येक वाक्यात मैत्रीचा ऋणानुबंध होता. काही वेळा विशिष्ट विशेषणांचा शब्द वापर करुन हाक मारण्याच्या त्यांच्या मांडके स्टाईल मागे एक आंतरिक जिव्हाळा होता. आज हे सार आठवण्याच कारण म्हणजे डॉ.नितू मांडके यांचा आज 18 वा स्मृतीदिन. 22 मे 2003. डॉक्टर गेले तो दिवस. विलेपार्ले त्यांच्या घरापासून निघालेली त्यांची अंत्ययात्रा त्यांचा तो अखेरचा प्रवास आजही आठवतो. डॉक्टर अवेळी अकाली गेले. एक पर्व संपले. डॉक्टरांच्या दूरदृष्टीतल्या भव्य हॉस्पिटलवर अंबानी कुटूंबियांची नाममुद्रा झळकली. आज आपल्यात डॉक्टर नाहीत. पण त्यांच्या आठवणी सतत रुंजी घालतात. काही माणसं आपल्या जीवनात अशी भेटतात की जीव लावून जातात. त्याच पैकीच एक जिंदादिल डॉ.नितू मांडके. डॉक्टर तुम्हांला विन्रम अभिवादन.


जयु भाटकर

लेखक हे मुंबई दूरदर्शनचे निवृत्त कार्यक्रम निर्माते आहेत.


 

Jayu Bhatkarhttps://www.mymahanagar.com/author/jayu-bhatkar/
लेखक हे मुंबई दूरदर्शनचे निवृत्त कार्यक्रम निर्माते आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -