सोमय्यांचा ड्रामा आणि सरकारी भंबेरी

kirit Somaiya slams ajit pawar netflix web series on Ajit Pawar
अजित पवारांवर वेब सीरिज केल्यास ३०० कोटी रॉयल्टी मिळेल, सोमय्यांची खोचक टीका

शिवसेनेनं हट्टानं ज्या किरीट सोमय्या यांचं लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट कापलं, त्यामुळे दुखावलेल्या सोमय्या यांनी तेव्हापासूनच मातोश्री आणि शिवसेनेला आपल्या रडारवर घेतलंय. याआधी त्यांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मिलिंद नार्वेकर, रवींद्र वायकर आणि अनिल परब अशा शिवसेनेच्या महत्वाच्या मंडळींना भंडावून सोडलंय. आता त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांच्यानंतर हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. लवकरच ते काँग्रेस नेत्यांना रडारवर घेणार आहेत.

सोमय्या कोल्हापूरच्या वाटेवर असतानाच त्यांना अडवण्यात आलं. राष्ट्रवादीचे पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कागलमध्ये फौजदारी तक्रार दाखल करायला ते जात होते. मात्र त्यांना रस्त्यातच अडवून पुन्हा मुंबईच्या दिशेने पाठवण्यात आल्यामुळे मुंबईत त्यांचं एखाद्या योध्यासारखं स्वागत करण्यासाठी भाजपचे नेते आणि मुलुंडमधील काही सोमय्या समर्थक एकवटले होते. या मंडळींनी सोमय्या यांना उचलून खांद्यावर घेतलं, गळ्यात पुष्पहार घातले आणि टाकाऊ सोमय्या टिकाऊ आहेत याची खात्री पटवून घेतली. किरीट यांना कराडमध्ये रोखल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हसन मुश्रीफ यांच्याकडून आणि त्यांच्या जावयाकडून झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. अवघ्या तासाभराने हसन मुश्रीफ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत हे सगळे आरोप फेटाळून लावले. किरीट सोमय्या हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक घोटाळे,त्यातून होणारा भ्रष्टाचार, आयकर, प्राप्तीकर, हवाला याबद्दल उत्तम जाण आहे.

एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन त्याचा पाठपुरावा करणं हा त्यांचा स्वभाव आहे. मग उपनगरीय रेल्वेतून पडून हात गमावलेल्या मोनिका मोरेसारख्या तरुणीला पुन्हा कृत्रिम हात लावून सन्मानानं जगायला उद्युक्त करणारे सोमय्या किंवा मुंबईच्या उपनगरीय प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करणारे सोमय्या हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आपल्याला पाहायला मिळतो. पण हे करत असताना प्लॅटफॉर्मची उंची मोजण्यासाठी स्वतः मोजपट्टी हातात घेऊन प्रसारमाध्यमांमधून ते फोटो छापून आणणारे सोमय्या किंवा ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून घेतल्या जाणार्‍या क्रीडा स्पर्धांच्या वेळी एखाद्या गल्लीत जाऊन लहान मुलांमध्ये खेळताना फोटो काढून पब्लिसिटी मिळवणारे सोमय्या हे भ्रष्टाचाराविरुद्धच्या मोहिमेतला आपला गंभीर चेहरा गमावतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळतेय, हे अधिक गंभीर आहे. सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांची शिवसेना आणि ठाकरे यांचे सध्या राजकीय हनुमान म्हणून वावरणारे अनिल परब यांची पुरती दमछाक झालेली आहे. असाच अनुभव माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सध्या येत आहे. तीन पक्षांच्या एकत्रिकरणातून साकार झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्यांच्या आरोपांचा अविरत वर्षाव करणार्‍या किरीट सोमय्या यांना रोखताना ठाकरे सरकारची भंबेरी उडत आहे.

सोमय्या यांना झेड सिक्युरिटी असताना त्यांना कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेले असते तर तिथे जनक्षोभाला सामोरे जावं लागू शकतं, असं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं होंतं. हसन मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते आहेत, ही बाब जरी मान्य केली तरी ते काही राम रहीम किंवा आसाराम बापू नाहीत की ज्यांचा भक्तगण आक्रमक होईल. जेव्हा राम रहीम किंवा आसाराम बापू यांच्यासारख्या स्वतःला संत म्हणवणार्‍या मंडळींवर कारवाई करण्याची वेळ आली त्यावेळी त्या त्या भागातील जिल्हा प्रशासनाने आणि पोलिस दलाने खमकेपणा दाखवल्याशिवाय त्यांच्यावरची कारवाई शक्य झाली नसती. मग तीच गोष्ट राज्य प्रशासनाला का करता आली नाही? हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. सोमय्यांच्या बाबत जे घडलं त्याच्याशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नसल्याचं शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात आलं. तर दुसर्‍या बाजूला तिन्ही पक्षांतील नेत्यांनी मिळून सोमय्यांसारख्या व्यक्तीचा इलाज शोधायला हवा, अशा स्वरूपाचं वक्तव्य मुश्रीफ यांनी केलं आहे.

शिवसेनेकडून मुख्यमंत्री कार्यालयाचा सोमय्या यांच्यावरील कारवाईशी संबंध नसल्याचं ठळकपणे नमूद केलं जातं, याचा अर्थ सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही हे स्पष्ट झालेलं आहे. उपमुख्यमंत्रीपदी असले तरी मुख्यमंत्र्यांच्या शैलीत कामकाज करणारे अजित पवार यांना मंत्रालयाच्या लॉबीतच प्रसारमाध्यमांच्या मंडळींनी गाठण्याचा प्रयत्न केला. न थांबताच, रोज काहीतरी बोलले जाईल त्यावर रोज काहीतरी सांगायलाच हवं का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर त्यांनी उपस्थित केला. अजित पवार यांचं हे प्रसारमाध्यमांना उद्देशून केलेलं विधान काहीसं अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे. विशेषतः भाजपची नेते मंडळी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि संपादक. कारण किरीट सोमय्या हे वेगवेगळ्या नेत्यांवर ज्या पद्धतीने आरोप करत आहेत किंवा घोटाळेबाज म्हणून लेबलं लावताहेत ते पाहिल्यावर अजित पवारांचं विधान गंभीरपणे घ्यावं असंच आहे.

सोमय्यांच्या मागे वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने धावाधाव करून या सगळ्या गोष्टी कॅमेर्‍यात कैद करतायत ते पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की किरीट सोमय्या यांच्यासारख्या राजकीयदृष्ठ्या घरी बसलेल्या पण तरीही पुन्हा उठण्याची उमेद असलेल्या नेत्याला प्रसिद्धीचा जेवढा सोस आहे त्यापेक्षा कैक पटीने हा हव्यास चॅनेलच्या संपादकांना आणि मालकांनाही आहे. आपल्या प्रेक्षकांना थेट दृश्ये दाखवून खिळवून ठेवणं हा चॅनेलच्या धंद्याचा एक भाग आहे. तर दुसरीकडे राजकारणात वावरताना अनेक घोटाळे करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचंच कल्याण करणं हादेखील सध्या राजकीय बिरादरी मधल्या बहुतेकांचा एक महत्वाचा धंदा झालेला आहे. त्यासाठी बुडीत निघालेल्या बँका, साखर कारखान्यांची खरेदी करण्यापासून ते शिक्षण संस्थांच्या नावाखाली भूखंड लाटण्यासारखे, कर्जबुडवेपणा असे अनेक उद्योग सुरू आहेत. मुख्य राजकीय प्रवाहापासून किंवा डॉक्टर, इंजिनिअर, वकिलीसारख्या क्षेत्रात अपयशी ठरल्यावर स्वतःसहित आपल्या दुसर्‍या पिढीची तजवीज करण्याकरता ब्लॅकमेलिंग करणार्‍यांची संख्यादेखील समाजात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेय. एकूणच काय तर सगळ्यांनाच आपापल्या धंद्यांची पडलेली आहे.

या सगळ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या धुळवडीत कोणत्याही पक्षाच्या मोठ्या राजकीय नेत्यांना सामान्य जनतेची भ्रांत पडल्याचे दिसत नाही. मग ते रस्त्यावरचे खड्डे असुद्या, इंधनाचे दिवसागणिक वाढणारे दर असुद्यात, शिक्षणाच्या समस्या असुद्यात किंवा बेरोजगारीचे संकट असुद्यात. त्यामुळेच सामान्य माणसाला मुश्रीफ, सोमय्या, परब, देशमुख यांच्यापेक्षा आपल्या कुटुंबाचा गुजारा कसा करायचा या समस्येनं भंडावलंय. राजकारण्यांना भेडसावणारी समस्या असते ती म्हणजे सत्तेची खुर्ची. सत्तेची खुर्ची कायम राहावी यासाठी समन्वयाच्या नावाने एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर करण्यात आली. त्यात भाजप आणि किरीट सोमय्या यांना कसं निपटायचं याचं मंथन करण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना सनदी अधिकार्‍यांची लॉबी सांभाळता येत नाहीये हे पुन्हा एकदा सोमय्या प्रकरणावरून स्पष्ट झालेला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने गृहमंत्रालयाला दूर लोटून स्वतःचे हात झटकले आहेत. कोणी सांगावं उद्या मुख्यमंत्री कार्यालय किंवा मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांपैकी कोणी अडचणीत आलं तर गृहमंत्रालय कानावर हात घेऊन डोळे मिटून शांत बसलेलं असेल. त्यावेळेला या सरकारने आणि सरकारमधल्या मुखीयांनी मोठी किंमत चुकवलेली असेल.