घरनवरात्रौत्सव 2022जातीव्यवस्थेला मूठमाती देणारी दुर्गा!

जातीव्यवस्थेला मूठमाती देणारी दुर्गा!

Subscribe

जातपंचायतीच्या विरोधात यशस्वी लढा देणारी कार्यकर्ती म्हणून दुर्गा गुडिलू आता अनेकांना परिचित आहे. जातपंचायत आणि त्यांच्या तुघलकी फतव्यांची चर्चा मुंबईत फारशी होत नसते. मात्र मुंबईच्या उपनगरातच अशा जात पंचायती कार्यरत होत्या, असे सांगितले तर कोणाला विश्वास बसला नसता. मुंबईत जात पंचायत राबवणारा वैदू समाज यापैकीच एक. वैदू नावावरुनच वैद्य किंवा औषधोपचार वगैरेशी संबंधित असलेला समाज हे कळून येतं. त्याप्रमाणेच हा समाज पारंपरिक पद्धतीचा जडीबुटीचा व्यवसाय करणारा समाज आहे. अंधश्रद्धा, बालविवाह, अशिक्षितपणा, व्यसनाधीनता, गरिबी, गुन्हेगारी आदी नकारात्मक घटकही या समुदायात होते. काही प्रमाणात आजही आहेत. दुर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे तिने फक्त वैदू समाजाच्या जातपंचायतीला मूठमाती दिली नाही, तर समाजाच्या अधोगतीला कारणीभूत असणार्‍या घटकांवर देखील काम सुरू केले आहे.

अशी झाली जातपंचायती विरोधात लढ्याला सुरुवात

एका कौटुंबिक वादातून 2013 साली सुरू झालेला दुर्गाचा संघर्ष जातपंचायतीला मूठमाती देण्यापर्यंत येऊन पोहोचला. समाजात पहिली पदवीधर म्हणून दुर्गाची मोठी बहीण गोविंदीने बहुमान मिळवला होता. तरीही जुनाट आणि बाष्फळ कल्पनांना बळी पडलेल्या समाजाने तिचे लग्न व्यसनाधीन असलेल्या मामाशी लावून देण्याचे ठरवले होते. कारण काय तर, गोविंदी पोटात असताना तिच्या आईनेच तसं वचन दिलं होतं. काळ बदललाय हे आईला उमगलं होतं, तरीही समाजापुढे काही चालेना. याविरोधात दुर्गाने आवाज उठवला आणि ती यशस्वी झाली.

- Advertisement -

हा लढा आणि दुर्गाचा त्यातील प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अगदी जीवावर बेतेल असे अनेक प्रसंग तिच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यात या लढ्यादरम्यान आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच काळात जात पंचायतीविरोधात लढा सुरू केला होता. अंनिसची साथ दुर्गाला मिळाली. त्यानंतर समाजातील प्रगतीशील विचार असलेल्या लोकांच्या मदतीने दुर्गाने एक एक करत वैदू समाजातील सर्व जातपंचायती बंद पाडल्या आहेत.

जातपंचायतीला तिलांजली देण्यापर्यंतच दुर्गाचा लढा सिमित नाहीये. अखेर पाच वर्षांनंतर 2018 साली गोविंदी गुडिलूचे आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न झाले आहे. वैदू समाजात अशाप्रकारचे लग्न होण्याची ही पहिलीच घटना होती.

- Advertisement -

जातीव्यवस्था नष्ट व्हावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित जातींना शहरात येऊन वसण्यास सांगितले होते. मात्र वैदू समाजासारख्या अनेक जाती शहरात येऊन देखील आपल्या जातीलाच कवटाळून बसल्या होत्या. नुसत्याच कवटाळून नाही. तर जात राबवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची त्यांची तयारी होती. दुर्गाने हा जात राबवण्याचा अन्याय सहन केलाय. समाजातील जात अस्मितेची टोकाची भावना नष्ट करायची असेल तर जातपंचायतीवर वैचारिक हल्ला चढवला पाहिजे, हा विचार तिच्या मनात आला.

हा विचार एकाएकी आला का? तर अजिबात नाही. या विचारामागे होता दुर्गाचा अभ्यास. दुर्गा फक्त चार भिंतींच्या शाळेत शिकलेली नव्हती. तिचं सामाजिक शिक्षणही चांगलंच झालं होतं. लहानपणापासून ‘युवा’ या एनजीओशी निगडीत असल्यामुळे दुर्गाला आंबेडकरवादी, समाजवादी, सेक्युलर, गांधीवादी अशा अनेक लोकांशी संवाद साधता आला. यातूनच राजमाता जिजाऊ, क्रांतीसूर्य जोतीराव फुले, ज्ञानजोती सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांशी, साहित्याशी तिचे नाते निर्माण झाले. या महापुरूषांच्या विचारातूनच आपण या व्यवस्थेविरोधात लढलं पाहिजे, हा दृढनिश्चय तिला करता आला.

 

जातपंचायत बंद झाल्यानंतर काय?

वैदू समाजातील जातपंचायती बंद झाल्या असल्या तरी इतर प्रश्न संपलेले नाहीत. महाराष्ट्रात 4 जुलै 2017 रोजी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम 2016 हा कायदा लागू झाला. सामाजिक बहिष्कार घालणार्‍या व्यक्तींना तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपये शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. जातपंचायत बसवून दंड करणे, वाळीत टाकणे अथवा मानवी हक्कांचे उल्लंघन करणे हा दखलपात्र आणि जामीनपात्र गुन्हा ठरेल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे.

कायदा झाला असला तरी वैदू आणि इतर भटक्या व विमुक्त जातीतील लोकांना विशेषतः महिलांना या कायद्याची कल्पना नाही. जातपंचायतीला सर्वात जास्त बळी पडणार्‍या या महिलाच आहेत. त्यामुळे दुर्गाने महिलांच्या जनजागृतीची मोहीम हाती घेतली. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या, घटस्फोटीत आणि परितक्त्या महिलांसाठी जोगेश्वरी येथील वस्तीत ‘स्वधार’ची शाखा उघडण्याचा निर्णय घेतलाय. ‘स्वधार’ हा सेवा दलाचा उपक्रम असून पीडित महिलांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम स्वधारमार्फत केले जाते. जोगेश्वरी येथे उघडण्यात आलेल्या या ‘महिला आधार केंद्रात कायदेशीर सल्ला, समुपदेशन यासारख्या सुविधा महिलांना मोफत पुरवल्या जाणार आहेत.

शाळाबाह्य मुलांना शाळेत पुन्हा केले दाखल

गरिबी आणि मोठ्या कुटुंबामुळे अनेक मुलांना शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागते. याबद्दल दुर्गाने काम सुरू केले. 2016 साली 128, 2017 साली 312 आणि यावर्षी 409 शाळाबाह्य मुलांना दुर्गाने पुन्हा शाळेत दाखल केलंय. काही मुलांना इगतपुरी येथील भटक्या विमुक्त मुलांसाठी असलेल्या आश्रमशाळेत दाखल करुन त्यांचे शिक्षण सुरू केले आहे.

महिला आणि शिक्षण या आघाड्यावर काम करत असताना आता वैदू आणि भटक्या-विमुक्त जातीतील युवकांच्या आर्थिक उन्नतीसाठी भटके-विमुक्तांचे राज्यव्यापी संघटन बनवण्याचा विचार दुर्गाने सुरू केला आहे. चळवळीत कार्यरत असलेल्या दुर्गाला राज्यव्यापी बिगर राजकीय संघटन स्थापन करुन समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर काम करायचे आहे.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -