घरताज्या घडामोडीये मंजिले हैं कौनसी...न वो समज सके न हम...!

ये मंजिले हैं कौनसी…न वो समज सके न हम…!

Subscribe

लतादीदींच्या आवाजाचे हे गर्भित रहस्य म्हणावे लागेल की, त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून मधुबाला, तनुजापासून ते अगदी काजोल, माधुरी, श्रीदेवी अशा आताच्या तरुण पिढीतील अभिनेत्रींनाही आपल्या जादुई सुरांनी आवाज देत अवघ्या संगीत विश्वावर अक्षरशः मोहिनी घातली. चार-पाच पिढ्यांसाठी एकाच सुरात गाणार्‍या आणि ते सूर संगीत जगतात अजरामर करून सोडणार्‍या त्या भारतीय संगीत विश्वातील एकमेव गायिका आहेत. लतादीदींच्या जाण्याने गानकोकिळेचे स्वर आज कायमचे विसावले आहेत. सरस्वतीची वीणा आणि श्रीकृष्णाची बासरी आज शांत झाली आहे.

केवळ भारतीय संगीतातीलच नव्हे तर जागतिक संगीतातील विश्वातील जादुई सूर आज गानकोकिळा लतादीदी यांच्या निधनाने अक्षरशः पोरके झाले आहेत. गेली तब्बल सहा ते सात दशके भारतीय मनोरंजन क्षेत्रावर आणि त्यातील गायकीवर स्वतःच्या एकमुखी आवाजाचे अधिराज्य गाजवणार्‍या लता मंगेशकर खरोखरच या भूतलावरील एक दैवी चमत्कार होता असेच म्हणावे लागेल. बालपणापासूनच कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडल्यामुळे प्रचंड संघर्ष करत आयुष्याचा मार्ग शोधता शोधता सुरांच्या जगतात स्वतःचे अढळ स्थान अल्पावधीत निर्माण करणे आणि ते अखेरच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवणे यासाठी जे एक अलौकिक सामर्थ्य अंगी असावे लागते ते लतादीदींच्या डीएनएमध्येच होते. त्यामुळेच गेल्या सहा-सात दशकांच्या या मंतरलेल्या लतापर्वात त्या मराठी हिंदीसह अन्य 36 भाषांमध्ये तब्बल पन्नास हजाराहून अधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा जागतिक विक्रम करू शकल्या. गानसरस्वती, गानकोकिळा अशा विविध उपाधी त्यांनी स्वतःच्या अफाट कर्तृत्वाने सार्थ करून दाखवल्या.

- Advertisement -

प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ग्रामीण ढंगातील आशयगर्भ कविता या नेहमीच वाचकाला जीवनातील अनुभवांबाबत अंतर्मुख करत असतात. त्यांची मृत्यूवर अशीच एक गाजलेली कविता लोकप्रिय आहे.
जीव देवानं धाडला जल्म म्हणे ‘आला आला’
जव्हा आलं बोलावणं मौत म्हणे ‘गेला गेला’,…
आला सास, गेला सास जीव तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!….
जग जग माझ्या जीवा असा जगणं तोलाचं
उच्च गगनासारखं धरीत्रीच्या रे मोलाचं….
आजच्या दिवशी बहिणाबाईंची ही कविता लताबाईंच्या आपल्यातून जाण्याचे अत्यंत यथार्थ वर्णन करते.
लतादीदी यांनी त्यांच्या सहा-सात दशकांच्या हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अजरामर कारकिर्दीत विविध अशा 36 भाषांमधून 50 हजारांहून अधिक गाणी गायली. 28 सप्टेंबर 1929 ते ६ फेब्रुवारी २०२२ असा त्यांचा 93 वर्षांचा प्रदीर्घ जीवनाचा प्रवास आहे. लतादीदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडूनच लतादीदींनी संगीताचे पायाभूत धडे गिरवले. त्या अर्थाने लतादीदींचे गुरू हे त्यांचे वडील मास्टर दीनानाथ हेच होते. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली.

मात्र त्यात 13 वर्षांच्या असतानाच त्यांच्यावरील पितृछत्र हरपले आणि चार भावंडांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची अत्यंत अवघड जबाबदारी अवघ्या तेराव्या वर्षीच त्यांच्या खांद्यावर घेऊन पडली. अर्थात लतादीदींचे धैर्य धाडस आणि खडतर परिस्थितीवर मात करत यशाचा झेंडा रोवण्याचा जो अत्यंत दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्या नसानसामध्ये भिनलेला होता तो या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील अधिक प्रकर्षाने उजळून निघाला. त्यांनी गाणे हेच त्यांचे आयुष्यातील एकमेव उद्दिष्ट ठरवले आणि वयाच्या तेराव्या वर्षापासून ते अगदी अखेरचा श्वास घेण्याच्या म्हणजेच वयाच्या 93 व्या वर्षापर्यंत त्या केवळ गातच राहिल्या.

- Advertisement -

लतादीदींच्या आवाजाचे हे गर्भित रहस्य म्हणावे लागेल की त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून मधुबाला, तनुजापासून ते अगदी काजोल,माधुरी,श्रीदेवी अशा आताच्या तरुण पिढीतील अभिनेत्रींनाही आपल्या जादुई सुरांनी आवाज देत अवघ्या संगीत विश्वावर अक्षरशः मोहिनी घातली. चार-पाच पिढ्यांसाठी एकाच सुरात गाणार्‍या आणि ते सूर संगीत जगतात अजरामर करून सोडणार्‍या त्या भारतीय संगीत विश्वातील एकमेव गायिका आहेत.

लतादीदींच्या जाण्याने गानकोकिळेचे स्वर आज कायमचे विसावले आहेत. सरस्वतीची वीणा आणि श्रीकृष्णाची बासरी आज शांत झाली आहे. लता दीदींच्या गाण्यांमध्ये कमालीचे वात्सल्य आहे. लतादीदींनी बालगीते गायिली, भक्ती गीते, प्रेमगीते आणि देशभक्तीपर गीतेही गायली. त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख मे भरलो पानी, जो शहीद हुँए है उनकी जरा याद करो कुर्बानी… या अजरामर गीताने 1962 साली चीनकडून झालेल्या भारताच्या पराभवानंतर देखील भारतीय सैन्यामध्ये आणि त्याचबरोबर प्रत्येक भारतीयांमध्ये देशप्रेमाची प्रचंड ऊर्जा निर्माण केली. आपल्या प्रेमळ स्वरांनी जवाहरलाल पंडित नेहरूंच्याही डोळ्यात अश्रू आणण्याचे सामर्थ्य त्यांच्या गाण्यात होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत दीदींना विशेष आस्था होती. त्यामुळेच त्यांनी ‘सागरा प्राण तळमळला’, हे शिवसेना प्रमुखांच्या उपस्थितीत गायलेले गीत अजरामर झाले आहे. त्यांच्या सुरांची ही ताकद होती की लतादीदींनी देशभक्तीपर गाणी म्हटली की संपूर्ण देशात तरुणांपासून ते ज्येष्ठ वृद्धांपर्यंत सर्वांच्या धमन्यांमध्ये देशभक्ती उसळी घेत असे.

लतादीदींच्या आवाजात आपले गाणे स्वरबद्ध केले जावे, अशी प्रत्येक संगीतकाराची मनोमन इच्छा असायची. आणि याचे प्रमुख कारण म्हणजे संपूर्ण गाणे केवळ आपल्या जादुई सुरांच्या क्षमतेवर अजरामर करण्याची क्षमता ही केवळ लतादीदीमध्ये होती. लतादीदींनी ज्याप्रमाणे देशभक्तीपर गीते अजरामर केली त्याचबरोबर प्रेमगीते, विरह गीतेदेखील तरुण पिढीमध्ये अजरामर झाली आहेत. त्यांच्या प्रेमगीत आणि विरह गीतांचे वैशिष्ठ्य म्हणजे तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच लतादीदींचं गाणं हे त्यांचं स्वतःचं वाटतं. गेली साठ ते सत्तर वर्षं एका गायिकेने तीन-चार पिढ्यांवर आपल्या सुरांनी अशाप्रकारे हुकमी अधिराज्य गाजवणारे ही संगीत विश्वातील एक अभूतपूर्व घटना म्हणावी लागेल. प्रेमगीत गाताना लतादीदींचा आवाज हा तरुणांचा आवाज व्हायचा तर आशयपूर्ण गर्भित गाणी गाताना त्यांचे सूर हे आपोआप गाण्याच्या परिस्थितीशी अनुकूल व्हायचे. त्यामुळेच त्यांची गाणी ही लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत ते वृद्धांपर्यंत सार्‍यांच्याच ओठांवर सतत गुणगुणत राहतात. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव हे त्यांचे गाणे ऐकताना श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा आल्याचं पाहिजेत एवढे कारुण्य लतादीदींच्या या गाण्यांमध्ये आहे.

दीदी या केवळ गायक म्हणूनच महान नव्हत्या तर त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. दीदी या क्रिकेटच्या निस्सीम चाहत्या होत्या. परदेशात गेलेल्या आणि जर तिथे भारतीय क्रिकेटचे सामने सुरू असले तर दीदी आवर्जून सामन्यांचा आस्वाद घेण्याकरता तिथे पोचत असत. प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी दीदींवर लिहिलेल्या लेखामध्ये त्या म्हणतात, लता मंगेशकर हे नावच इतकं जादूमय आहे की त्यांच्या सोबतच्या प्रत्येक आठवणी प्रत्येक क्षण मला अलिबाबाच्या गुहेत घेऊन जातात. दीदींनी माझं धुंद मंद गणं ऐकून मला सही सकट भेट दिलेल्या एलपी रेकॉर्ड मी जपून ठेवल्या आहेत. ‘निवडुंग’ चित्रपटासाठी केव्हा तरी पहाटे तसेच लव लव करी पात, ही गाणी बाळासाहेबांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाऊन घेऊन दीदींनी मला तिच्याकडून गाऊन घ्यायचेय, हा शब्दही पुरा केला.

दीदी या अस्सल पट्टीच्या खवय्या होत्या. त्यांना दादरच्या पुरोहितांचे पांढरे बारीक साखर पेरलेले पेढे खूप आवडायचे. भरलेली वांगी करावीत तर ती लतादीदींनी. पूर्वतयारी म्हणून कढईत तेल, मसाले, बारीक चिरलेला कांदा, छोटे-छोटे काप असलेली वांगी अशी सारी काही तयारी या आधीच करून ठेवायाच्या. प्रभूकुंजमधील आपल्या रूममध्ये टीव्हीवर त्या मिकी माऊसचे कार्टून पाहताना खळखळून हसायच्या. त्यांच्या स्वतःमध्ये त्यांनी एक लहान मुल जपले होते. दीदी या उत्तम नकलाकारदेखील होत्या. त्या खासगीमध्ये अन्य गायकांच्या नकला करून दाखवत असत.

त्यामुळेच ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर सांगतात त्याप्रमाणे भारतातील अनेक पिढ्यांना चांगले दर्जेदार संगीत काय असतं हे सर्वात प्रथम लतादीदींनी शिकवलं. त्यांनी चांगलं-वाईट जाणण्याची नीरक्षीर विवेकबुद्धी दिली. हिंदुस्तानी संगीतातला लखलखता जरतारी उत्तुंग स्वर म्हणजे मास्टर दीनानाथ. या ओजस्वी आणि तेजस्वी दीनानाथांचे तेज त्यांच्या कन्येमध्ये उतरले नसते तरच नवल. आचार्य अत्रे यांनी म्हटल्याप्रमाणे लोण्यात केशर विरघळावे तसा दीदींचा आवाज. सर्व रसिकांना दीदींच्या स्वरांनी धर्म, भाषा जात-पात देश खंड उपखंड अशा सर्व सीमा पार करून एकछत्री अंमलाखाली आणले. अनेक वर्षं संगीत विश्वावर अधिराज्य गाजवलं. कधी दूर दूरच्या प्रवासात एकटे असताना दीदींचे गाणे कानावर पडले तर केवढा मोठा आधार वाटतो. कुठे कसं गावं, कुठे कसा उच्चार करावा, तलमपणे व तरलपणे भावना कशा व्यक्त कराव्यात, कुठे श्वास घ्यावा, कुठे हरकती मुरक्या घ्याव्यात आणि कुठे घेऊ नयेत तसेच चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेला साजेसा आवाजात गाणं कसं म्हणावं, अशा अनेक अमाप गोष्टींच्या अचूकतेचा वस्तुपाठ म्हणजे साक्षात लतादीदी. तो एखाद्या विद्यापीठात ही शिकायला मिळणार नाही, असा कंठ हृदय आणि बुद्धीचा संगम लतादीदींच्या व्यक्तीमत्वात दिसून येतो. झपाटून टाकणार्‍या त्यांच्या स्वरांचा रोज अभ्यास केला तरी तो कमीच आहे.

लतादीदींच्या जाण्याने संगीत विश्वातील अजरामर सुवर्ण युगाचा आज अस्त झाला आहे. लतादीदींच्या रुपात साक्षात सरस्वतीच भूतलावर अवतरली होती. अर्थात, लतादीदी जरी शरीराने या भूतलावरून गेल्या असल्या तरी त्यांची जादुई सुरांची अजरामर गाणी यापुढेदेखील शतकानुशतके संगीत विश्वावर अधिराज्य गाजवत राहतील यात शंकाच नाही.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -