घरफिचर्सदिल्ली जात्यात, आपण सुपात

दिल्ली जात्यात, आपण सुपात

Subscribe

जगात तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी लढले जाणार, असे कालपरवापर्यंत सांगितले जात होते. मात्र, सध्या परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, हे तिसरे महायुद्ध लढण्यासाठी या पृथ्वीतलावर खरंच कोणी शिल्लक राहील का? त्या अगोदर वायू प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढीने जगभरातील सजीवसृष्टीचा घास तर घेतला नसेल ना? आतापर्यंत जागतिक तापमान वाढ आणि वायू प्रदूषणाकडे फारसे गंभीररित्या पाहिले गेलेले नाही. दुष्काळ पडला, पूर आला, पाऊस लांबला की त्याची जबाबदारी जागतिक तापमानवाढीवर सोपवून मानवजात नामानिराळी राहात होती. वायू प्रदूषणाची जबाबदारी मात्र जगभरातील विकसित आणि विकसनशील राष्ट्रे टाळत होती, पण या वायू प्रदूषणाने किती भयानक स्वरूप धारण केले आहे याची प्रचिती आज प्रत्येक दिल्लीकर घेत आहे. दिल्लीतील हवा इतकी प्रदूषित झाली आहे की, तोंडावर मास्क बांधल्याशिवाय दिल्लीकराला घराबाहेर पडणे शक्य होईनासे झालेले आहे. येथील परिस्थिती इतकी भयानक आहे की, दिल्लीतील सर्व शाळा-महाविद्यालये ४ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. आज दिल्ली या परिस्थितीतून जात असताना देशातील इतर मेगासिटींची परिस्थितीही वेगळी नाही. हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे हवेतील प्रदूषकांचे संघननीकरण होऊन ते जीवसृष्टीला घातक ठरू लागतात. आज दिल्लीतील हवा ही अशाप्रकारेच जगण्यासाठी घातक झालेली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीने दिल्ली आणि एनसीआर भागात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी लागू केली आहे. तेथील इमारतींची बांधकामे येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत तातडीने थांबवण्यात आली आहेत. दिल्लीतील प्रदूषण हे लाल रंगाच्या निशाणाची पातळी ओलांडून पुढे गेले आहे. हिवाळ्यात दिल्ली आणि परिसरात फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या वायू प्रदूषणाचा मोठा फटका दिल्ली आणि परिसरातील लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेतली जात आहे. आता हे का झाले, असा प्रश्न उपस्थित होणे सहाजिकच आहे. हे वायू प्रदूषण कशामुळे झाले आणि त्याला जबाबदार कोण? आम्हा भारतीयांची एक सवय आहे, परिस्थिती हाताबाहेर जात नाही तोपर्यंत देशात कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. एकदा का परिस्थिती हाताबाहेर गेली की मग त्यासाठी जबाबदार कोण, या एकमेव प्रश्नाचे उत्तर शोधले जाते. वायू प्रदूषण हा केवळ एका व्यक्ती, समाजाचा, जातीचा, धर्माचा, शहराचा, राज्याचा प्रश्न नाही. तो अखंड देशाचा प्रश्न आहे आणि त्याचे परिणाम हे प्रत्येक देशवासीयाला भोगावे लागणार आहेत. त्यामुळे त्याला जबाबदार कोण, याचा विचार करण्यापेक्षा हे का होतेय याचा विचार आधी व्हायला हवा.
आपल्याला औद्योगिकरण जगवते की पृथ्वी, निसर्ग, चैतन्य तत्व, ईश्वर, हे मानवजातीने एकदाच धसाला लावावे. खरेतर आपला श्वास, आपल्या हृदयाची धडधड, आपली इंद्रिये कोण चालवतो याचा साधा विचार जरी केला तरी निष्कर्ष कठीण नाही. एसीत बसणारे पोटातील पाणी हलू न देता पुन्हा पुन्हा प्रकल्प आणणार. पिके कापणीसाठी तयार आहेत. आज १८ ऑक्टोबर आहे आणि मुंबई व इतरत्र अवकाळी पाऊस पडत आहे. तुम्ही जे अन्न खाता व जिवंत राहता ते अशा परिस्थितीत मिळणार नाही. ही अवकाळी व इतर दुर्घटना हवामान बदल व तापमानवाढीमुळे होत आहेत व याला तुमचे औद्योगिकरण जबाबदार आहे. पाच वर्षांत एक अंश सेल्सिअसने वाढत चाललेले पृथ्वीचे सरासरी तापमान तुम्हाला फक्त तीन-साडेतीन दशकांत नष्ट करणार आहे. ती प्रक्रिया सुरू झाली आहे. जगभर डोंगर खचत आहेत. याचे कारण, रस्ते व बांधकामासाठी दगड, लाद्या, ग्रॅनाईट, मार्बल, लाकुड इ., सिमेंट निर्मितीसाठी चुनखडी, मोटार व इतर वस्तुनिर्मितीसाठी लोखंड, तांबे, अ‍ॅल्युमिनियम इ. धातूंसाठी खाण करून झालेली डोंगर व जंगलाची तोड आहे. तज्ज्ञ सांगतात की, अवैज्ञानिक पद्धतीने डोंगर तोडले, अनधिकृत बांधकामे केली म्हणून महापूर आले. यामुळे असा गैरसमज पसरतो की, वैज्ञानिक पद्धतीने डोंगर तोडता येतात व बांधकाम अधिकृत हवे मग पूर येत नाही. औद्योगिकरण व शहरीकरण चालवण्यासाठी पृथ्वीचे लचके तोडणार्‍या या गोष्टी केल्या जात आहेत. ती कृती वैज्ञानिक व अधिकृत असणे म्हणजे काय? त्यामुळे दुर्घटना कशी टाळणार? खरेतर, या महापुराला, अनेक डोंगर व जंगलांचे अस्तित्व मिटवले जाणे हे कारण आहे. ते वैज्ञानिक की अवैज्ञानिक, कायदेशीर की बेकायदेशीर हा प्रश्न नाही. डोंगर व जंगल तर आता दिसत नाही, पण त्यांच्या न दिसण्यानेच बुडवणारा महापूर आला. पर्यावरणाचे रक्षण करणे हा आता प्रत्येक मनुष्याच्या अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे. तो केवळ आंदोलन, निदर्शने करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. कारण पर्यावरण वाचले तर मनुष्य प्राणी वाचणार आहे. मात्र, त्याबाबत ढोंगीपणा नसावा. पर्यावरणावर बोलणारे, आंदोलने, निदर्शने करणारे हे बर्‍याचदा स्वत:च्या खासगी वाहनांतून फिरतात. त्यांच्या घरात दोन-तीन एसी असतात. एका बाजूला पर्यावरणावर बोलायचे आणि दुसर्‍या बाजूला मात्र पर्यावरणाला हानी पोहचवणार्‍या गोष्टींचा सातत्याने वापर करायचा, हे आता कुठेतरी थांबायला हवे. दिल्लीसारख्या ठिकाणी तर प्रचंड वाहन कोंडी होत असते. या वाहन कोंडीमुळे निर्माण होणारा कार्बनडायऑक्साईड वायू वातावरणातच राहतो. दिल्ली आणि एनसीआरच्या विकासासाठी तेथील झाडांची मोठी कत्तल करण्यात आली आहे. एका बाजूला कार्बनडायऑक्साईड शोषून घेणारी झाडे नाहीत, तर दुसर्‍या बाजूला वातावरणातील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. केवळ दिल्लीच नाहीतर मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांमध्येही कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. फक्त दिल्ली जात्यात आहे तर इतर शहरे सुपात. यातून बाहेर पडायचे असेल तर काही गोष्टी युद्धपातळीवर होणे आवश्यक आहे. सर्वात पहिले म्हणजे विजेचा कमीत कमी वापर करायला हवा. वीजनिर्मितीसाठी कोळसा जाळला जातो. त्यातून मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कार्बनडायऑक्साईड पर्यावरणाची हानी करत असतो. त्यामुळे वीज कमीत कमी जाळली तर कोळसा जाळण्याचे प्रमाण कमी होईल. घरातील एअर कंडिशनर हाही पर्यावरणावर परिणाम करणारा घटक आहे. त्यातूनही मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असते. रस्त्यावर धावणारे प्रत्येक वाहन हे वायू प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात चालना देत असते. त्यामुळे वैयक्तिक वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहनांचा वापर करणे हेच पर्यावरणाच्यादृष्टीने योग्य ठरू शकते. झाडे लावणे आणि ती जगवणे, हेही तितकेच महत्त्वाचे. आज दिल्ली आणि एनसीआरवर वायू प्रदूषणामुळे आणीबाणीची परिस्थिती झालेली आहे. उद्या आपले शहर, जिल्ह्यात तीच परिस्थिती उद्भवू शकते. आता त्यात भर घालायची की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारायचा याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -