घरफिचर्सवरून कीर्तन...

वरून कीर्तन…

Subscribe

कीर्तनाने समाज सुधारत नसतो आणि तमाशाने बिघडत नसतो, असं अभिनेेते निळू फुले यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. वरतून कीर्तन आतून तमाशा...अशी काही वाक्येही आपण ऐकलेली असतात. मराठी कीर्तनकारांच्या परंपरेचं आपल्याला कौतुक असतं. कीर्तनाने दंग झालेल्या मराठी समाजाचे आपण शालेय पाठ्यपुस्तकातून गोडवे गायलले असतात. कीर्तनाच्या लोकपरंपरेची आपल्याला माहिती असते. गाडगे महाराजांचा आपल्याला अभिमान असतो. त्यांनी केवळ गावांची झाडलोट करून मोठे स्वच्छता मिशन राबवले. गढूळलेले आचारविचार, वैचारिक प्रदूषणाच्या स्वच्छतेचा विषय आपल्या गावीही नसतो. कीर्तनात प्रबोधन असावे की केवळ भक्ती असावी, या विषयावर कीर्तनकारांच्या वाणीचा बांध आता फुटलेला दिसतो...

आपली संत संस्कृती आणि कीर्तन परंपरा ही आजच्या काळालाही कशी साजेशी आहे. त्यात तत्कालीन आणि समकालीन, भविष्यकालीन अशा कुठल्याही काळाची मर्यादा या संत, कीर्तनकारांच्या विचारांना नाही, असे आपण छातीठोकपणे ठिकठिकाणच्या साहित्य किंवा संतसंमेलनात स्वतःसह इतरांनाही बजावत असतो. संत ज्ञानेश्वर, गाडगे महाराज आणि संत तुकाराम यांनी अभंग आणि कीर्तनाने महाराष्ट्राच्या मराठी भाषा, संस्कृतीमध्ये घातलेली मोलाची भर आपल्याला आठवत असते. वगनाट्य, भारूड अशी लोककला जपली गेली पाहिले, त्याविषयी पोटतिडकीने लिहिलेले लेख विविध वर्तमानपत्रातूनही वाचत असतो.

आपल्याला प्राचीन संस्कृतीचा अभिमान असायलाच हवा, आधुनिक विज्ञानाचीही नोंद आमच्या तेव्हाच्या संतसाहित्यात कशी आढळते, यावर आपली चर्चासत्रे झडत असतात. मागील आठवड्यात अशाच एका कीर्तनाने किती मोठं वादळ सामाजिक क्षेत्रातल्या आपल्या समाज माध्यमांवर घोंघावलं होतं. तुकाराम महाराजांना नेण्यासाठी ज्यावेळी वैकुंठावरून विमान या भूतलावर अवतरंलं त्यावेळीही असाच धुरळा उडाला होता. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले त्यावेळीही असाच गहजब करण्यात आला होता…देहसुखात रमलेल्या या पामरांना अध्यात्मातील सुख काय ठावे…उगाच कोणत्याही विषयाला आ़़डवे जाण्याची खोड बरी नव्हे…काय तर म्हणे रेडा प्राचीन भाषा शब्द म्हणेलच कसा…वाक्यरचना करण्याची आणि शब्दाला शब्द जोडून एखाद्या भाषेत मांडण्याची बुद्धी रेड्यामध्ये विकसित झाली असेल का…असे नतद्रष्ट प्रश्न आपल्याला पडू लागतात. काय हा आपल्या संस्कृतीचा उपमर्द आपण याची देही, याची डोळा पाहात असतो, ऐकत असतो. हा आरोप होत असताना गावातल्या कीर्तनकारांचे डोळेही लालबुंद झालेले असतात.

- Advertisement -

तुम्ही पाहता, आम्ही पाहतो…इथं जमलेले सर्व नागरिकही मराठी संस्कृतीचा हा उपमर्द दशकानुदशके पाहात आलेले आहेत…हे बोलताना आता कीर्तनकारांच्या वक्तृत्त्वाला धार आलेली असते, त्यात आवेश असतो, विषयच तसा गहन असतो. नागरिकत्वाचा विषय निघाल्यावर कीर्तनकार समान नागरी कायदा, नागरिकत्व सुधारणा विधेयकावर थेट भक्तीमार्ग आणि नागरिकत्व यातील फरक स्पष्ट करून सांगू लागतात. नागरिकत्व, राज्यघटना आणि लोकशाही या दुय्यम गोष्टी आहेत. कायद्याचे राज्य नावाची संकल्पनाच चुकीची आहे. असं ते कीर्तनातून पटवून देत असतात…असा भक्तीमार्ग सोडूनिया आपण लोकशाहीच्या मार्गाने जाऊन कशी चूक केली हे ते भारताच्या फाळणीतील इतिहासाचा दाखला देऊन पटवून देत असतात, आता पाकिस्तानमुळे बॅरिस्टर जिनांचा उल्लेखही निघालेला असतो..हळूहळू विषय धर्माकडे वळतो. इथंही फरक स्पष्ट असतो. हिंदू आणि मुसलमान…मुसलमान नावाचा शब्द आल्यावर शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा विषय टाळता येणारा नसतो, शिवाजी महाराज हिंदवीतून प्रवचनात ठाम हिंदुत्ववादी झालेले असतात…इतिहासातील खानाचा कोथळा याहीवेळेस त्वेषाने बाहेर आलेला असतो…स्वराज्याची शपथ आणि भवानी तलवारीचा विषय सुरू होणार असतानाच आपण शाहिरांच्या भूमिकेत नकळत शिरल्याचे कीर्तनकारांच्या अचानक लक्षात येते.

आता पुन्हा खर्‍याखुर्‍या महाराजांवर बोलून झाल्यावर हे (महाराज) कीर्तनाकडे वळलेले असतात, तर ज्ञानियाने चालवलेली भिंत, या विषयावर आपले अत्याधुनिक तंत्रविज्ञान त्या काळात किती पुढारलेेले होते, या विषयी कीर्तनातून सांगितले जात असताना न्यूटन, गॅलेलियोपासून ते राईट बंधूंपासून बिल गेट्स व्हाया झुकरबर्गच्या फेसबूकपर्यंत कीर्तनकार आलेले असतात. माऊलींनी चालवलेली भिंत पाहायला तुमच्याकडे माऊलींचे डोळे आहेत का…असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारलेला असतो. लोकांनी माना डोलावून त्याला नकार दिलेला असतो. वाघावर बसून आलेल्या चांगदेवाची माऊलींनी भिंत चालवून कशी जिरवली… या रसाळ वर्णनावर टाळ मृदुंगाच्या साथीने भारलेली डोकी डोलू लागतात. असा चमत्कार तोच करू शकतो, ज्याचे कूळ आणि मूळ शुद्ध बिजाचे असेल, असा निर्वाळा त्या महाराजांनी दिलेला असतो. मग मूळ शु्द्ध होण्यासाठी कॅलेंडरच्या तारखांचे दाखले दिले जातात. आता हा विषय पूर्णपणे बदलून गेलेला असतो. स्त्री जन्म आणि पुरुष जन्माचे गणित मांडण्यापर्यंत पुढे गेलेला असतो. लिंग निदान कायद्याला बगल देऊन होणार्‍या बेकायदा सोनोग्राफीची वेळच येता कामा नये…यासाठी जन्मनिदानातून मुलगाच कसा जन्माला आणता येईल, याचे रसाळ वर्णन प्राचीन ऋषी आणि राजा महाराजांच्या नावाने ऐकवले जात असते. त्यासाठी फळांचा राजा आंबा हा तत्कालीन प्राचीन राजांच्या मदतीला कसा धावून आला, या आंबा महात्म्यावर एक पूर्ण कीर्तनाचा एपिसोड रंगवलेला असतो. आपण जगाला भक्तीरूपी चमत्कार कसा शिकवला हे सांगितले जात असताना विषय मासिक धर्माकडे येऊन वळतो, महिलांच्या वागणुकीची यथेच्छ खिल्ली उडवून कीर्तनकार महाराज आता महिला कशा अपवित्र असतात, महावारीच्या काळात एखाद्या महिलेेने बनवलेले अन्न खाल्ल्यावर माणसाचा पुढच्या जन्मात कसा बैल होतो, हे त्यांनी प्राचीन काळातील गोष्टीतून पटवून दिलेले असते…टाळ मृदंगाचा ताल कानी पडतो, माना डोलू लागतात.

- Advertisement -

आता बैलाचा विषय निघाल्यावर महाराजांना बायकोचा बैल म्हणजे काय, हे सांगण्याची अचानक तीव्र इच्छा होते. रामायणात कैकयीचं ऐकून रामाला वनवासाला धाडणारा राजा दशरथ कसा बायकोचा बैल होता. हे महाराज सांगू लागतात. आता बैलाचा विषय निघाल्यावर गायीचा विषय अपरिहार्य असतो. हा विषय गोवंशाचा असल्याने त्याचे महत्त्व या विषयावरही रसाळ वाणी पाझरू लागते. आता कीर्तनकार महाराज सत्संगात शिरलेले असतात. अचानक कीर्तनकार असल्याचे आठवून भानावर येतात…तर गाय माता आणि भारतमाता यातील फरक स्पष्ट केल्यावर महाराज, गाय कशी पवित्र आणि विटाळलेली महिला कशी अपवित्र असते, यातील फरक स्पष्ट करून सांगतात…कुठल्याही दोन गोष्टींतील फरक आणि भेद सांगण्याची कीर्तनकार महाराजांना तीव्र इच्छा असे. महिलांचा उल्लेख कायम, बाई, ही, बया, असा करण्यात त्यांना विशेष आनंद मिळत असतो. आपल्या कीर्तनावर महिलाही खळखळून हसतात म्हटल्यावर आपण त्रिकालाबाधित सत्य सांगत असल्याचा भास त्यांना होतो. कीर्तन रंगलेलं असतानाच शेवट मात्र भगवंतांच्या वाणीने व्हावा, अशी त्यांची इच्छा उचंबळते, मग कर्मण्येवाधिकारस्तेचा सुबोध अर्थ कीर्तनातून सांगितला जातो. कर्माने जो रस्त्यावर आलेला असेल, त्याने कुणाशीही वाद घालायचा नसतो…असे वचनाचे सुबोध अर्थांतर केले जाते. कर्म महत्त्वाचे, कर्म शुद्ध होण्यासाठी कूळ शुद्ध असावे, या वचनावर आता कीर्तनकार येतात. शुद्धता किती महत्त्वाची आहे. यावर पुढच्या कीर्तनात बोध दिला जाईल…असे बोलून महाराजांची रसाळ ओघवती वाणी थांबलेली असते…तोवर पुंडलिक वरदे हरीविठ्ठलचा जयघोष सुरू झालेला असतो आणि डोलणारी डोकी जागेवरून हललेली असतात…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -