घरफिचर्ससंपादकीय:अविवेकी आचरटपणा !

संपादकीय:अविवेकी आचरटपणा !

Subscribe

विवेक ओबेरॉयच्या ‘त्या’ ट्विटनंतर त्याने माफी मागितली खरी, पण या माफीमध्येही त्याने दुसरा आचरटपणा केलाच. माझ्या ट्विटने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. मात्र, मी काय चूक केली? असा मुर्खासारखा प्रश्न त्याने साळसूदपणे विचारला आहे. पहिली चूक ही होती की, त्याने ऐश्वर्या रॉयच्या छायाचित्राचा वापर करून आपली महिलांविषयीच्या जाणीवेची घसरलेली पातळी दाखवली, दुसरी चूक ही होती की, एखाद्या व्यक्तीच्या खासगी जीवनाचा आपल्या अविवेकी आनंदासाठी खिल्ली उडवण्याचा आपल्याला अधिकार कधीच नसतो, हे तो विसरला.

हा प्रकार लोकनिंदेला आमंत्रण देणाराच ठरतो, तिसरी चूक ही होती की, माफी मागताना आपण कोणत्या गोष्टीसाठी माफी मागतो हेच जर आपल्याला ज्ञात नसेल तर आपल्याच चुकीचा पश्चाताप करून आपण आपल्यावर झालेल्या टीकेतून सुटका करण्यासाठी माफीचा केवळ बनाव करत असतो, हेही स्पष्ट होते. या चुकांच्या मालिकांचे एपिसोड या‘अविवेका’कडून समोर येत गेले. समाजमाध्यमांवरील या गदारोळात या ‘अविवेकाचे’ कान खेचण्याचे काम अमिताभ बच्चन यांनी केले, ते योग्यच होते. अमिताभ यांनी त्याला ट्विटरमधूनच मोलाचा सल्ला दिला की, मत व्यक्त करताना भान बाळगणे गरजेचे आहे. त्यावेळी या महानायकाची भाषा सौजन्यपूर्ण अशीच होती, त्यात कुठेही द्वेष, राग, व्यक्तिगत निंदा किंवा सूडाची भावना नव्हती.

- Advertisement -

जी भाषा अविवेकाने ऐश्वर्याविषयी वापरली त्यातून त्याची महिलांविषयीची मानसिकताच उघडी पडली. शिवाय सलमान खानसोबत आठ दहा वर्षांपूर्वी त्याच्या झालेल्या वादाचा वचपाही त्याने या निमित्ताने काढण्याचा प्रयत्न केला. अभिनेता सलमान खान आणि विवेक ऑबेरॉय यांच्यात फोनवरून झालेले वाकयुद्ध हिंदी चित्रपटसृष्टीत त्या वेळी गाजले होते. सलमानने आपल्याला फोनवरून आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप विवेक ओबेरॉयने केला होता. त्यावेळीही त्याने सलमानला प्रत्युत्तर देताना हातापायीची भाषा वापरली होती. ते सलमानच्या हाणामारीच्या धमकीला दिलेले प्रत्युत्तर असल्याचे त्याने माध्यमांना बोलावून सांगितले होते. हे प्रकरण गरजेनुसार माध्यमांनी संपूर्ण दिवस रवंथ केल्यासारखे चघळले होते.

त्यानंतर विवेकचे वडील ज्येष्ठ अभिनेते सुरेश ऑबेरॉय यांनी विवेकला समज देऊन फोनवर आपसात झालेला वाद चव्हाट्यावर का आणला? म्हणून त्याचे कान उपटले होते. यामागे सलमानचे वडील सलीम खान यांनी सुरेश ओबेरॉय यांच्याकडे तक्रार केल्याने त्यांनी विवेकला फैलावर घेतल्याची चर्चा होती. सलमानने चूक केली होतीच, मात्र विवेकने ही बाब माध्यमांपुढे सांगून बॉलिवूडमधले ‘उसूल’ तोडल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर सलमान आणि विवेकमध्ये झालेले शत्रुत्व सर्वश्रूत होते. यात सलमानची चूक नव्हती असे नाही, मात्र, विवेकाने विवेक सोडल्यावर त्याचा परिणाम सलमानपेक्षा विवेकला भोगावा लागला होता. त्यातूनही त्याने धडा घेतला नाही.

- Advertisement -

आता केलेल्या चुकीत विवेकने तीन छायाचित्रे ट्टिट केली. त्यात निवडणूक निकालाचे अंदाज बांधण्याच्या माध्यमांच्या अहमहमिकेवर बोट ठेवण्यासाठी त्याने ऐश्वर्या रॉयच्या छायाचित्रांचा वापर केला. यातील एका छायाचित्रात तो स्वतः या अभिनेत्रीसोबत असल्याचे दिसले. त्यामुळे त्याला ट्रोल केले जाणार होतेच. ही त्याची घोडचूक नव्हती, ती जाणीवपूर्वक केलेली चूक होती, कधीकाळी ऐश्वर्यासोबत असलेल्या मैत्रीचा विसर त्याला या आनंदोन्मादत पडला होता. यातून महिलांना सोयीनुसार उपयोगात आणण्याची पुरुषप्रधान मानसिकताचा या ‘अविवेका’ने समोर आणली होती. राजकीय भूमिका, मत, विचार व्यक्त करणे चुकीचे नाही, लोकशाही मार्गाने केलेले समर्थन किंवा टीकेचे लोकशाहीत स्वागतच असते. मात्र, माणसाच्या आनंदाच्या उन्मादात बुद्धी काम करेनाशी झाल्यावर त्याचा पहिला बळी विवेकाचाच जातो, हे या अविवेकाने पुरेसे स्पष्ट केले.

नावाजलेले अभिनेते म्हणून नावलौकिक मिळवलेल्या सुरेश ऑबेरॉय यांचा मुलगा असल्याचेही हा अविवेक या उन्मादात विसरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा एका चित्रपटासाठी साकारल्यानंतर आपण अभिनयात हिमालयाची उंची गाठल्याचा त्याला साक्षात्कार झाला असावा. पंतप्रधानांची व्यक्तिरेखा साकारली म्हणून त्या तोडीचा होत नसतो. अविवेकी व्यक्तिलाच तो भास होऊ शकतो. भ्रमातून निर्माण झालेला हा अविवेकी अहंकार दुसर्‍यांना कमी लेखणाराच असतो. या अहंकाराचा परिणाम म्हणजेच त्याचे हे ट्विट होते. माध्यमांनी भाजप आणि मोदी सरकारच्या बाजूने बांधलेल्या अंदाजात किती तथ्य आहे हे २३ तारखेला स्पष्ट होईलच. पण त्याआधीचे हे असे अविवेकी वागणे त्याच्या अंगाशी येणारच होते. आपण राजकीय भाष्यकार आहोत की अभिनेता या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्यानेच शोधायला हवे.

काँग्रेस किंवा भाजप तसेच इतर पक्षांचे समर्थक असलेले असंख्य अभिनेतेही आहेत. ते कधी असल्या वरवरच्या यशावर कधी वाहत गेले नाहीत की कथित विजयाच्या आनंदी उन्मादात किंवा पराभवाच्या दुःखात आपले संतुलनही त्यांनी ढळू दिले नाही. आपले संतुलन ढळलेले आहे. हे समजल्यावर थेट माफी मागून मोकळे व्हावे, असेही या अविवेकाला वाटले. माफीतही त्याचे अविवेकी राजकारण केले. ‘गिरे तो भी टांग उपर’ असाच या माफीचा अविर्भाव होता. यामुळेच विवेकाने मागितलेली माफीही त्याच्या चुकीपेक्षा मोठी ठरली.

मला असे म्हणायचे नव्हते, माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, चुकीचा अर्थ काढला गेला, आदी विधाने राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या तोंडून ऐकण्याची सवय इथल्या जनतेला आहे, असा साळसूदपणाचा आव आणणार्‍या अभिनेत्यांच्या विधानांची लोकांना सवय नाही. त्यातही लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आवश्यक अभिनयाची उंची, प्रगल्भता निर्माण होण्यासाठी जनमानसात तशी प्रतिमा बनवावी लागते, त्यासाठी आपल्या कामातून विश्वास संपादन करावा लागतो, मग तो नेता असो की अभिनेता. अन्यथा अंहकाराची बाधा होऊन आपल्यापेक्षा इतरांना दुय्यम समजणार्‍यांचे कान उपटण्याचे काम इथले लोकंच करतात, हे लक्षात यायला या अविवेकाला वेळ लागणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -