Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स ममतांच्या विजयावर राष्ट्रीय सुभेदार !

ममतांच्या विजयावर राष्ट्रीय सुभेदार !

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात महाराष्ट्र म्हणजेच राज्य सरकार करत असलेल्या कामाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केल्यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अंगात नवे बळ संचारले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांची नवी आघाडी तयार करण्याची गरज आहे, असा विचार व्यक्त केला आहे. अर्थात, राष्ट्रीय पातळीवरील तिसरी किंवा नवी आघाडी निर्माण करायला हवी, हा त्यांनी नव्याने व्यक्त केलेला विचार आहे, अशातला भाग नाही. महाराष्ट्रात २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर ज्या काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अकल्पितपणे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले तेव्हापासून संजय राऊत हे राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याविषयी बोलत आहेत. खरे तर या तिसर्‍या आघाडीबाबतची त्यांची चाचपणी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसांनी शिवसेना भाजपसोबत राज्यात सत्तेत सहभागी झाली, त्यानंतर त्यांचे नाराजीपर्व सुरू झाले. तेव्हाच सुरू झाली होती. म्हणजे शिवसेनेचे मंत्री म्हणत आमच्या खिशात राजीनामे आहेत, आम्ही वेळ पडल्यावर बाहेर काढू, पण सत्तेची पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांनी ते राजीनामे बाहेर काढले नाहीत. शेवटी २०१९ ला विधानसभा निवडणूक झाली, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री बसावा ही त्यांची इच्छा कायम होती, ती त्यांनी राष्ट्रवादीचा हात पकडून पूर्ण केली. पण भाजपविषयी त्यांच्या मनात प्रचंड राग आहे. त्यामुळेच राज्यातील भाजपची सत्ता संपवण्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. इतकेच नव्हे तर भाजपचे शक्तीस्थान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून हटवण्यासाठी शिवसेना काहीही करायला तयार आहे. जसे त्यांनी महाराष्ट्रात अकल्पित गणित जमवले, तसेच ते राष्ट्रीय पातळीवर जमवावे, असा विचार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मनात तीव्रतेने घोळू लागला आहे. या विचाराला अधिक जोर मिळण्याचे आणखी एक कारण नुकतेच घडले आहे, ते म्हणजे शिवसेनेला अतिशय जिव्हाळा असलेल्या ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत विजय झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा यावेळी पराभव करण्यासाठी भाजपने केंद्रीय पातळीवरील आणि विविध राज्यांमधील मुख्यमंत्री आणि नेते निवडणूक प्रचारासाठी बोलवले होेते. स्वत: नरेंद्र मोदी अत्यंत ताकदीने मैदानात उतरले होते, पण इतके करूनही ममता बॅनर्जींचा भाजपला पराभव करता आला नाही. अनेक राजकीय विश्लेषकांना असे वाटत होते की, यावेळी ममतांच्या विरोधात अन्टी इन्कंबन्सी फॅक्टर म्हणजे सत्ताधार्‍यांच्या विरोधातील जनतेचा रोष हा घटक काम करेल, त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे, राम मंदिराची पायभरणी या गोष्टींचा परिणाम पश्चिम बंगालमधील जनमतावर होईल, तसेच बांगलादेशामधून होणारी घुसखोरी, ममता बॅनर्जी यांचे मुस्लीम लांगुलचालन, त्यासाठी हिंदूंची होत असलेली मुस्कटदाबी, अशा अनेक गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडतील आणि पश्चिम बंगाल काबीज करण्यात भाजपला यश येईल, असे वाटत होते. पण प्रत्यक्ष तसे झाले नाही. निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा भाजपचा प्रचंड अपेक्षाभंग झाला. त्यातल्या त्यात भाजपसाठी समाधानाची बाब इतकीच होती की, ममता बॅनर्जींंनी ज्या नंदिग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवली तिथे त्यांचा पराभव झाला. खरे तर ममता बॅनर्जी यांनी ती जोखीम पत्करली होती. आता ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पोटनिवडणुकीतून त्या निवडून येऊ शकतात. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींचे अभिनंदन केले. कारण तो औपचारिकतेचा भाग असतो.
ममता बॅनर्जी यांच्या या विजयामुळे आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवामुळे सगळ्यात जास्त जर का कुणाला आनंद झाला असेल तर तो शिवसेनेला. कारण कुठल्याही परिस्थितीत भाजपचा पराभव व्हायला हवा,अशी त्यांची इच्छा असते. त्यांना माहीत असते की, महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांमधील विधानसभा निवडणुका लढवून आपले उमेदवार निवडून येणार नाहीत, तरीही ते तिथे भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करतात. अगदी काही हजार मते ते उमेदवार भाजपची मते खातात, त्याचा फारसा काही परिणाम होत नाही, तरीही शिवसेनेला त्यात समाधान वाटते. आपल्या उमेदवारांची डिपॉझिट्स जप्त होण्याची नामुष्की ते विनातक्रार स्वीकारतात, पण आम्ही तिथे जाऊन भाजपला शह दिला त्यात ते आनंद मानतात. महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांमध्ये शिरकाव करण्याचा शिवसेनेने फार पूर्वीपासून प्रयत्न चालवलेला आहे, पण त्यात त्यांना यश येत नाही. कारण शिवसेनेसारखे भूमीपुत्रांसाठी लढणारे पक्ष अन्य राज्यांमधेही आहेत. शिवसेनेला त्यांची जागा घ्यायची आहे. अगदी नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालमध्येही विधानसभा निवडणुकीत शिवेसना उमेदवार उतरवणार अशी चर्चा सुरुवातीला होती, पण ममता दीदींना आपल्यापासून काही त्रास होऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अन्य भाजपशासित राज्यांच्या नेत्यांसह पश्चिम बंगालमध्ये उतरूनही ममता बॅनर्जी यांचा पराभव करणे शक्य झाले नाही. इतक्या मोठ्या ताकदीला ममता पुरून उरल्या, त्यामुळे आता देशातील प्रादेशिक पक्ष ममता बॅनर्जी यांच्याकडे आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून पाहू लागले आहेत. संजय राऊत यांनी राष्ट्रीय पातळीवरील नव्या आघाडीचा जो विचार मांडला आहे, ते यातूनच पुढे आलेला आहे. संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली देशातील विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे वाटते, पण त्यासाठी काँग्रेस तयार नाही. कारण काँग्रेसला राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. यापूर्वीही तिसर्‍या आघाडीसाठी प्रत्यक्ष शरद पवार यांनी बरेचदा प्रयत्न केले, पण ते यशस्वी ठरले नाहीत. संजय राऊत यांचे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्राचे कोरोना लढ्याचे मॉडेल हे इतर राज्यांसाठी आदर्श ठरणार आहे, मोदींनी त्याचे कौतुक केले आहे. तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सत्तेचे मॉडेल हे राष्ट्रीय पातळीवर राबवता येईल. पण त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, या मॉडेलमध्ये काँग्रेस सहभागी झाली नसती तर ते अस्तित्वात आले नसते, पण केंद्रात नरेंद्र मोदींना शह देऊन भाजपकडून महाराष्ट्रासारखे महत्वाचे राज्य काढून घेण्यासाठी शरद पवारांनी महाराष्ट्रात काँग्रेसचा पाठिंबा मिळवला, पण असाच पाठिंबा काँग्रेस तिसर्‍या आघाडीला राष्ट्रीय पातळीवर देईल याची शक्यता नाही. कारण युपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, म्हणजेच अप्रत्यक्षपणे पवार हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार होतात. पण त्यासाठी काँग्रेसने कधीही अनुकूलता दर्शवलेली नाही. केंद्रात तिसर्‍या आघाडीचे सरकार सत्तेत यायचे असेल तर त्याला भाजप किंवा काँग्रेस या मोठ्या पक्षांचा पाठिंबा किंवा सहभाग लागतो. त्यात पुन्हा नरेंद्र मोदींना पुरून उरलेल्या ममता बॅनर्जी शरद पवारांना संभाव्य पंतप्रधानपदासाठी किती वाव देतील, हेदेखील गूढ आहे. त्यात पुन्हा पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी साडेतीन वर्षे अजून बाकी आहेत. पण राऊत या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला तयार आहेत का? ते तर ममतादीदींच्या विजयावर राष्ट्रीय सुभेदार होऊ पाहत आहेत.

- Advertisement -