घरफिचर्सशिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ

शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ

Subscribe

स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृतिदिन. स्वामी रामानंद तीर्थ म्हणजे हैदराबाद (दक्षिण) स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९०३ रोजी कर्नाटकातील सिंदगी (जिल्हा विजापूर) येथे ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते. जन्मगावी प्राथमिक शिक्षण घेऊन स्वामी रामानंद तीर्थ सोलापूरच्या नॉर्थकोट हायस्कूलमध्ये दाखल झाले. तिथे मॅट्रिकला असताना गांधी टोपी घातली म्हणून स्वामीजींना छड्या खाव्या लागल्या, पण टोपी काढण्याचा हुकूम त्यांनी पाळला नाही. त्यांना शाळेतून बहिष्कृत केले गेले. तेव्हा त्यांनी एका राष्ट्रीय विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा दिली आणि पुढे अमळनेर व पुणे येथील महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांसह बी.ए. व ‘लोकशाहीचा विकास’ हा प्रबंध लिहून एम. ए. पदवी संपादन केली. त्यानंतर १९२६ मध्ये ना. म. जोशी यांच्या स्वीय साहाय्यकपदी ते रुजू झाले. त्यानंतर गिरणी कामगारांच्या लढ्यात ते सक्रिय सहभागी झाले. तत्पूर्वी, लोकमान्य टिळकांच्या निधनाने ते अतीव दुःखी झाले. त्यांनी त्या वेळी ‘या क्षणापासून माझे सर्व उर्वरित जीवन मी मातृभूमीच्या चरणी वाहत आहे, सर्व सुखांचा त्याग करून मी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीन’, अशी प्रतिज्ञा केली आणि आयुष्यभर तिचे पालन केले.

ना. म. जोशींनी स्वामीजींना कामगारविषयक विधेयकाची माहिती घेण्यासाठी ऐन हिवाळ्यात दिल्लीला पाठविले. दिल्लीच्या थंड हवामानामुळे त्यांना पक्षाघाताचा झटका आला व त्यात त्यांचे दीड वर्ष वाया गेले. नंतर त्यांनी अध्यात्माची कास धरली आणि १४ जानेवारी १९३० रोजी आपल्या जन्मनावाचा त्याग करून भिक्षुकी अंगीकारली. त्यानंतर १४ जानेवारी १९३२ रोजी हिप्परगा (तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद) येथे लखनौस्थित स्वामी नारायण यांच्याकडून संन्यासदीक्षा घेऊन ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. त्यांनी हिप्परगा येथे तत्पूर्वीच १९३० मध्ये राष्ट्रीय विचारांच्या प्रचारार्थ शिक्षण संस्था काढली. सहा-सात वर्षे राष्ट्रीय बाण्याने हे कार्य केल्यानंतर ते १९३५ मध्ये सक्रिय राजकारणात सहभागी झाले आणि याच सुमारास आंबेजोगाई येथे योगेश्वरी नूतन विद्यालयात शिक्षकाची नोकरी धरली.

- Advertisement -

पुढे ते मुख्याध्यापकही झाले. याच काळात आ. कृ. वाघमारे आणि अनंतराव कुलकर्णी यांनी हैदराबाद संस्थानच्या जुलूमजबरदस्तीला शह देण्यासाठी हैदराबाद संस्थान महाराष्ट्र संघाची स्थापना केली. १९३१ मध्ये केशवराव कोरटकर आणि धर्मवीर वामनराव नाईक यांच्या प्रेरणेने आर्य समाजाची स्थापना झाली होती. परभणी जिल्ह्यातील परतूर येथे १ जून १९३७ रोजी हैदराबाद संस्थान महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन गोविंदराव नानल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यानंतर हैदराबादमधील जनता शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात स्वामीजींनी मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीवर घणाघाती टीका केली. या भाषणानंतर सर्व सहकार्‍यांनी स्वामीजींना हैदराबाद संस्थानातील असंतुष्टांचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. त्याच सुमारास स्वामीजींनी आपल्या असंख्य अनुयायांसह आंबेजोगाई सोडून हैदराबादला प्रयाण केले.

स्वामी रामानंदांनी ९ जून १९३८ पासून हैदराबाद शहरात कायमचे वास्तव्य केले. त्या वेळी हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये सधन व मवाळ पंथीय कार्यकर्त्यांचे प्राबल्य होते. ते स्वामीजींच्या क्रांतिकारक चळवळीपासून दूर राहिले. स्वामीजींनी गोविंदभाई श्रॉफ, आ. कृ. वाघमारे, बाबासाहेब परांजपे, शंकरराव चव्हाण, दिगंबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी यांसारख्या निष्ठावान मित्रांच्या सहकार्याने काँग्रेसांतर्गत स्वतंत्र संघटना स्थापन केली आणि निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आंदोलन छेडले. अशा या थोर शिक्षणतज्ज्ञाचे 2२ जानेवारी १९७२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -