घरफिचर्सलाजीम है की हम भी देखेंगे

लाजीम है की हम भी देखेंगे

Subscribe

सत्य घटनांवर आधारित सिनेमांमध्ये सर्वाधिक प्रभाव टाकणार्‍या सिनेमांच्या यादीत ‘काश्मीर फाईल्स’ हा पहिल्या दोन ते तीन सिनेमात येईल, असं मला वाटतं. याची सर्वात जमेची बाजू आहे दिग्दर्शकाने अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आपला विषय आणि ते मांडताना त्याला आलेलं यश. आपल्याला प्रेक्षकांना काय दाखवायचं आहे हे दिग्दर्शकाला स्पष्ट असेल तर सिनेमा अधिक प्रभावी बनतो, पण जेव्हा ऐतिहासिक घटनांवर आधारित सिनेमांचा विषय येतो, तेव्हा एक बाजू घेणं तितकं सोपं नसतं म्हणून दरवेळी ऐतिहासिक सिनेमांमध्ये बचावात्मक पवित्रा घेतला जातो. काश्मीर फाईल्समध्ये असं घडत नाही तिथे दिग्दर्शकाने सरळ सरळ एक बाजू मांडण्याचा विचार केलाय आणि तीच बाजू अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे.

इतिहास हा गावाकडं अनेक वर्षांपासून चालत आलेल्या म्हातारा आणि भुताच्या गोष्टीसारखा असतो, कुठल्याही गावात जा तिथं एकतरी म्हातारा असतो ज्याच्याकडे भुतानं बिडी मागितलेली असते आणि त्याने त्या बिडीने भुताला चटका दिलेला असतो. आता कोणत्याही गावात आपल्याला असा एक म्हातारा तर नक्की मिळेल, पण सगळ्या कथांमध्ये आपल्याला त्याच म्हातार्‍याची गोष्ट खरी वाटते, जो ती रंगवून आणि प्रभावीपणे मांडतो. इतिहासाबद्दलसुद्धा असंच आहे, ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून ज्याचा त्याचा इतिहास आपण आजवर वाचलाय आणि गेल्या काही काळापासून पाहायला सुरुवात केलीये, यात खरा इतिहास कोणता? याची मानके जरी तथ्य असली तरी गेल्या काही दिवसात इतिहासाची विश्वासार्हता त्याच्या सादरीकरणावर जास्त ठरवली जात आहे. पुस्तकं वाचायला वेळ नसलेल्या काळात पडद्यावर जे काही दिसतंय त्यालाच सत्य मानून आपले दृष्टिकोन तयार केले जात आहेत. सत्य घटनांवर आधारित सिनेमा बनवताना सगळ्यात मोठी भूमिका असते सिनेमॅटिक लिबर्टीची ज्याच्या नावाखाली तुम्ही काहीही विकू शकता, सत्य घटनांवर आधारित सिनेमे आजवर अनेक बनले आणि बनतीलदेखील, पण त्यापैकी सामान्य माणसांवर प्रभाव पाडणारे सिनेमे बोटावर मोजण्याइतके नाहीत. सोशल मीडियाच्या काळात जिथे सिनेमाच्या प्रचारासाठी अनेक माध्यमं प्रभावीपणे काम करताय, त्याकाळात थेट पंतप्रधानांनी नाव घेतलेल्या सिनेमाबद्दल उत्सुकता असणे साहजिक आहे.

काश्मिरी पंडितांवर नव्वदच्या दशकात झालेल्या अत्याचारांवर आधारित विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ नुकताच रिलीज झाला. सिनेमाबद्दल जितक्या सकारात्मक प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या तितक्याच नकारात्मक प्रतिक्रियादेखील पाहायला मिळाल्या. सत्य घटनांवर आधारित सिनेमांमध्ये सर्वाधिक प्रभाव टाकणार्‍या सिनेमांच्या यादीत ‘काश्मीर फाईल्स’ हा पहिल्या दोन ते तीन सिनेमात येईल, असं मला वाटतं. याची सर्वात जमेची बाजू आहे दिग्दर्शकाने अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आपला विषय आणि ते मांडताना त्याला आलेलं यश. आपल्याला प्रेक्षकांना काय दाखवायचं आहे हे दिग्दर्शकाला स्पष्ट असेल तर सिनेमा अधिक प्रभावी बनतो, पण जेव्हा ऐतिहासिक घटनांवर आधारित सिनेमांचा विषय येतो, तेव्हा एक बाजू घेणं तितकं सोपं नसतं म्हणून दरवेळी ऐतिहासिक सिनेमांमध्ये बचावात्मक पवित्रा घेतला जातो. काश्मीर फाईल्समध्ये असं घडत नाही तिथे दिग्दर्शकाने सरळ सरळ एक बाजू मांडण्याचा विचार केलाय आणि तीच बाजू अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे.

- Advertisement -

इतिहासात अनेक अशा घटना घडल्या ज्यांची फार वाच्यता आपल्याकडे आजवर झाली नाही, जितक्या मोठ्या प्रमाणात शीखदंगल, बाबरी मस्जिदीचा विषय आपल्याकडे चघळला जातो तितका विषय काश्मिरी पंडितांचा का अधोरेखित केला जात नाही? हा सिनेमाद्वारे दिग्दर्शकाचा प्रश्न आहे, म्हणून सिनेमात एकही पात्र ग्रे नाहीये, सिनेमात एक तर नायक दिसेल किंवा खलनायक, यात असं एकही पात्र नाही जे आधी खलनायक होतं आणि नंतर नायक बनत किंवा आधी नायक होतं आणि नंतर खलनायक… म्हणून सुरुवातीपासूनच आपल्याला सिनेमात काय पाहायला मिळेल याचा अंदाज येऊन जातो. 1990 च्या दशकातील ही कथा आहे ज्याच्या केंद्रस्थानी दोन पात्र आहेत, एक म्हणजे पुष्करनाथ पंडित (अनुपम खेर) आणि दुसरं म्हणजे त्यांचा नातू कृष्णा पंडित (दर्शन कुमार), काश्मीरमध्ये 1990 मध्ये हिंदूंसोबत जे घडलं त्याचे व्हिक्टीम आहेत पुष्करनाथ आणि त्यांचा नातू कृष्णा पंडित. एकाचवेळी वर्तमान आणि भूतकाळात ही कथा घडते आहे, जिथं पुष्करनाथ यांची अस्थी घेऊन कृष्णा पंडित 25 वर्षांनी काश्मीरमध्ये आलाय आणि 1990 मध्ये आपल्या कुटुंबासोबत काय घडलं होतं याचा शोध तो घेतो आहे. काश्मीरमध्ये त्याची भेट होते आपल्या आजोबांचे जुने मित्र असलेल्या आयएएस अधिकारी ब्रह्म दत्त (मिथुन चक्रवर्ती), डॉक्टर महेश कुमार ( प्रकाश बेलवाडी), डीजीपी हरी नारायण (पुनीत इस्सार) आणि पत्रकार विष्णू राम (अतुल श्रीवास्तव ) यांच्यासोबत जे त्याला भूतकाळातील घटनांची माहिती देतात. कृष्णा पंडित हा दिल्लीतील एका विद्यापीठात शिक्षण घेतो आहे, ज्याचं नाव जेएनयु टाईप आहे आणि तिथल्या एक प्राध्यापिका राधिका मेनन (पल्लवी जोशी) काश्मीर प्रश्नी मुलांना भडकावतायत. काश्मीरमधला एक दहशतवादीदेखील आहे ज्याचं नाव फारूक मलिक बिट्टा (चिन्मय मांडलेकर) जो सिनेमात मुख्य खलनायक म्हणून दिसतो. विद्यापीठात काश्मीरबद्दल आधीच एक विचारधारा ऐकून आणि तीच विचारधारा डोक्यात ठेऊन, जेव्हा कृष्णा पंडित काश्मीरमध्ये परततो तेव्हा त्याचा दृष्टिकोन बदलतो का ? आणि सिनेमात पुढे काय घडतं यासाठी सिनेमा पाहावा लागेल.

कुठलाही सिनेमा प्रभावी बनतो तो त्यात वापरलेल्या योग्य सिनेमॅटिक टूल्समुळे, काश्मीर फाईल्समध्ये अशाच टूल्सचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना अनेक दृश्यांमध्ये स्तब्ध करतो आणि तीन तासांच्या कालावधीत रटाळ बनत नाही, वेळोवेळी कथेत आवश्यक असणारी दृश्ये येतात आणि कथा पुढे सरकत जाते. सिनेमातले संवाद अत्यंत विचार करून लिहिले आहेत, ज्याचा वेगळा प्रभाव सिनेमा संपल्यावर आपल्यावर राहील, सिनेमा संपल्यावर अनेकजण स्तब्ध होतात, असं तुम्ही ऐकलं असेल किंवा अनुभवलं असेल याला कारण आहे क्लायमॅक्समधील एक दृश्य, ज्यात सिनेमॅटिक टूलचा वापर करण्यात आलाय, एक एक गनशॉट क्लियर ऐकू यावा आणि त्याला अनुरूप असे दृश्य पडद्यावर दिसावे जेणेकरून त्या सीनची भयावहता प्रेक्षक अनुभवू शकेल, हा दिग्दर्शकाचा उद्देश तिथे साध्य होतो. ‘द काश्मीर फाईल्स’ संपूर्ण इतिहास मांडत नाही. तो केवळ अशी बाजू मांडतो ज्याला आधी कोणी स्पर्श केलेला नाही, यात राजकीय प्रोपगंडा आहेच. अनेक अशी वाक्ये आहेत आणि ऐतिहासिक चुका आहेत ज्या जाणून बुजून केलेल्या वाटतात. डावे आणि काँग्रेसी असो किंवा कट्टरपंथी इस्लामी प्रत्येकाला यात ग्रे शेड नव्हे तर खलनायक म्हणून दाखवलंय, पण याचा अर्थ असा मुळीच नाही की, हा एक साधारण सिनेमा आहे, दिग्दर्शकाला त्याची विचारधारा असते आणि त्याला ती मांडण्याचा अधिकार असतोच. विवेक अग्निहोत्रीची विचारधारा काय आहे? हे वेगळं सांगण्याची गरज नाही आणि संपूर्ण इतिहास केवळ या सिनेमातून समजून घेण्याची गरज नाही. या सिनेमाला होणारा विरोध याच्या दर्जात दडलेला आहे, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विवेक ओबेरॉयने एक सिनेमा बनवला होता, पण त्याची साधी चर्चाही झाली नाही, कारण तो सिनेमा म्हणून परिपूर्ण नव्हता. याउलट ‘द काश्मीर फाईल्स’ तुम्हाला एका परिपूर्ण सिनेमाचा अनुभव देतो, म्हणून लाजीम है की हम भी देखेंगे, असा हा सिनेमा आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -