धमक आणि धडक!

Subscribe

एका साध्या शाखाप्रमुखापासून एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. कठोर मेहनत, धडाडीचे नेतृत्व, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला अखेरपर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज शिवसेना नेतेपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे. त्यांच्या वाटचालीचा घेतलेला आढावा…

कुटुंबाच्या बेताच्या परिस्थितीत एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मात्र आयुष्यात स्थैर्य आल्यानंतर त्यांनी ते पूर्ण केले. याचदरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांचा आणि ओजस्वी वाणीने प्रभावित होऊन त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणात प्रवेश केला. अन्यायाच्या विरूद्ध लढणारी, आवाज उठवणारी आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेची ओळख होती. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या शब्दाखातर वाटेल ते करण्याची तयारी ठेवणार्‍या शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन समाजकार्याला स्वतःला वाहून घेतले. रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला आधार देणार्‍या आणि बाकीचा वेळ समाजासाठी देणार्‍या शिंदे यांच्यातील तडफ पाहून दिवंगत आनंद दिघे यांनी १९८४ साली ठाण्याच्या किसननगरचे शाखाप्रमुख म्हणून शिंदे यांची नियुक्ती केली. शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पाच वर्षात दिघे यांच्या नेतृत्वाखाली बर्‍याच आंदोलनांमध्ये शिंदे सहभागी झाले. यावेळी गरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार-प्रशासनाविरोधात केल्या जाणार्‍या अनेक आंदोलनात त्यांचा पुढाकार असायचा. १९८६ साली झालेल्या सीमाप्रश्नी आंदोलनात सेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह सहभागी झाले असताना शिंदेंना बेल्लारी येथील तुरुंगात ४० दिवस कारावासही झाला होता. त्या बळावर ठाणे मनपात नगरसेवक, सभागृह नेते आणि ठाणे विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुखही बनले. ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता आणण्याची किमया त्यांनी करून दाखवली.

- Advertisement -

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत १९९७ साली त्यांना नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली आणि ते विजयी झाले. २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. दरम्यान २००१ ते २००४ ही सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. या तीन वर्षातील काळात फक्त स्वतःचा प्रभाग, महापालिका हद्दीपुरते मर्यादित न रहता संपूर्ण जिल्हा पाहिल्याने सर्वच कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आले. बाळासाहेब ठाकरे यांनी २००४ साली विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून त्यांना प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याने त्याच्या पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते सेनेतील पहिलेच होते. जनतेचे प्रश्न, समस्यांवर लक्ष देत त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत राहिल्याने २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना विधानसभेवर पाठवले.

२०१४ च्या निवडणुकांनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा शिंदे विरोधी पक्षनेतेपदासाठी निवडून देखील आले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री, ठाण्याचे पालकमंत्री बनले. तसेच जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंबकल्याण अशी खाती देण्यात आली. मितभाषी आणि संयमी राजकीय नेते अशी ख्याती असलेल्या शिंदे यांच्या शब्दाला शिवसेनेत वजन आहे. विशेष म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता अशी त्यांची सर्वसामान्यांमध्ये ओळख आहे. पक्षाचा एक शाखाप्रमुख त्याच पक्षाचा विधिमंडळातील पक्षनेता बनतो ही अपवादाने घडणारी गोष्ट एकनाथ शिंदेंच्या रूपाने महाराष्ट्राला अनुभवायला मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -