Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स निवडणुका जवळ आल्या... चला, चला राममंदिर बांधू!

निवडणुका जवळ आल्या… चला, चला राममंदिर बांधू!

सार्वत्रिक निवडणुकांना जेमतेम सात महिन्यांचा कालावधी उरला असताना भागवत यांच्या या विधानामुळे भाजपचे पुढील राजकारण हे कोणत्या दिशेने असेल हे नव्याने सांगण्याची आता गरज उरलेली नाही. संवादाने असो किंवा अध्यादेशाने कोणत्याही मार्गाने का होईना अयोध्येत राममंदिर बांधले गेले पाहिजे, असे बिगुल भागवत यांनी दिल्लीत वाजवले. 2014 साली आणि त्याआधी प्रत्येक निवडणुकीत राममंदिर दाखवून भाजपने हिंदूंचा मेंदू ताब्यात घेतला होता... हाच खेळ आता 2019 साली खेळण्यासाठी शिट्टी वाजली आहे.

Related Story

- Advertisement -

लोकशाही देश असलेल्या भारताची मोठी गंमत आहे. नाव संसदीय लोकशाहीचे, पण येथे धर्माचे, जातीपातीचे, झुंडशाहीचे, निवडणुकांमध्ये पैसे वाटणार्‍यांचे आणि पाचशे हजार रुपये घेऊन स्वतःला विकणार्‍या मतदारांचा हा देश आता बनत चालला आहे. कोणालाच कशाची लाज लज्जा राहिलेली नाही. जशी प्रजा, तसा राजा… माजलेल्या सत्ताधार्‍यांना धडा शिकवण्याची 5 वर्षांनंतर एकमेव संधी मिळत असताना भारतीय मतदार धर्म, जातीपाती आणि पैशांनी विकले जाणार… आणि मतदारांची ही नाडी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी अचूक ओळखली आहे. यात सध्या भाजप एक नंबरवर आहे! विरोधी पक्ष महाआघाडीचे स्वप्न रात्री बघून दिवसा विसरत असताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा भाजपची निवडणुकांची तयारी केव्हाचीच सुरू झाली आहे. विश्वास बसत नसेल तर शिवसेनेला विचारा… अन्यथा गेली चार वर्षे सेनेला हिंग लावून न विचारणार्‍या अमित शहा यांच्या मातोश्रीवर बंद दाराआड चर्चा झाल्या नसत्या. सगळे ठरलेले आहे. फक्त बिगुल वाजायचा बाकी राहिला होता… तो भाजपची मातृसंस्था असणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाजवून निवडणुकांच्या हाका दिल्या आहेत. अयोध्येत तात्काळ राममंदिर बांधण्याचा शंख सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाजवून निवडणुका जवळ आल्याची वर्दी दिली आहे…तर चला मग राममंदिर बांधण्याचा संघ आणि भाजपचा खेळ बघू!

सार्वत्रिक निवडणुकांना जेमतेम सात महिन्यांचा कालावधी उरला असताना भागवत यांच्या या विधानामुळे भाजपचे पुढील राजकारण हे कोणत्या दिशेने असेल हे नव्याने सांगण्याची आता गरज उरलेली नाही. संवादाने असो किंवा अध्यादेशाने कोणत्याही मार्गाने का होईना अयोध्येत राममंदिर बांधले गेले पाहिजे, असे बिगुल भागवत यांनी दिल्लीत वाजवले. 2014 साली आणि त्याआधी प्रत्येक निवडणुकीत राममंदिर दाखवून भाजपने हिंदूंचा मेंदू ताब्यात घेतला होता… हाच खेळ आता 2019 साली खेळण्यासाठी शिट्टी वाजली आहे. चार वर्षांपूर्वी बहुमताने सत्ता आल्यानंतर भाजपला राममंदिर बांधता आले असते, त्यांचे हात कोणी धरले नव्हते. पण, राममंदिर वही बनाऐंगे, हे बोलणे सोपे वाटते तेवढे ते नक्की नाही आणि याची पुरेपूर कल्पना संघ तसेच भाजपला आहे… फक्त लोकांना वेडे करून कमळावर शिक्का मारण्यासाठी भावूक करायचे. आहे की नाही, लोकशाहीची गंमत…वाजवा टाळ्या!

- Advertisement -

mohan-bhagwat

आठवून बघा 1992 चा राममंदिर बांधण्याचा भाजपचा अट्टाहास. आधी लालकृष्ण अडवाणी यांना पुढे करत रथयात्रा काढून देशात वातावरण निर्मिती केली गेली आणि अपेक्षेप्रमाणे कारसेवकांनी बाबरी मशीद उध्वस्त केल्यानंतर देशात उसळलेली धार्मिक दंगल आणि बॉम्बस्फोट! सर्वच अतिशय भयानक होते… लोकशाहीच्या आणि सर्वसामान्य माणसांच्या चिंधड्या उडवल्या गेल्या आणि त्या रक्तरंजित इतिहासाला साक्ष ठेवून नंतर भाजप सत्तेवर आली! या सार्‍या घटनांना दोन तपे उलटून गेली असताना आणि राममंदिराची एकही वीट बांधली गेली नसताना भागवत यांनी दिलेला नारा म्हणजे पुन्हा एकदा याच विषयावर हिंदूंची माथी भडकवून त्यावर भाजपच्या सत्तेची पोळी भाजण्याचा हा प्रकार आहे, हे उघड सत्य आहे.

- Advertisement -

गेली साडे चार वर्षे मोदी सरकारने धर्म आणि जातीपातीचे राजकारण न करता विकासाचा मार्ग धरला आहे, असा भाजप दावा करत आहे. मग, भागवत यांना अचानक राममंदिर आठवावे, म्हणजे कमाल झाली, असे म्हणायला हवे… पण, ग्यानबाची मेख काही वेगळीच आहे. फसलेली नोटबंदी, जीएसटीचा मार, रोजगाराचा अभाव, घसरलेला रुपया, पेट्रोल डिझेलचे वाढत चाललेले भाव आणि महागाईचा उडालेला भडका यामुळे जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. सत्ताधार्‍यांविरोधात नाराजीचे वातावरण गडद होत असून त्याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये भाजपला बसणार असे चित्र दिसत असल्यामुळे राममंदिराचे हुकमी अस्त्र बाहेर काढण्यात आले आहे. गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाही तर मोडून काढली! त्या सत्यवचनी रामालाही माहीत नसेल आपल्या नावाचा ब्रँड बनून तो दर पाच वर्षांनी असा विकला जाणार असेल. प्रभू रामचंद्र की जय!

2014 च्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश, बिहारमधून मुस्लीम समाजाने भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. मात्र,आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. गोहत्या झाली किंवा अमूक घरातील मांस गोवंशीय प्राण्याचे आहे, अशा नुसत्या बातम्यांवर विश्वास ठेवून काही मुस्लीम लोकांचे खून झाले. हे प्रमाण उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. ही बाब मुस्लीम समाज किंवा एकूणच देशाच्या परिस्थितीकडे तटस्थपणे पाहणार्‍या भारतीयांना अस्वस्थ करणारी आहे. ते भाजपला 2019 ला भाजपला पुन्हा मतदान करतील,अशी आता खात्री वाटत नसल्याने संघाने भाजपला वाचवण्यासाठी राममंदिरचे हुकमी अस्त्र बाहेर काढले आहे. दिल्लीतील तीन दिवसांच्या ‘भविष्यातील भारत’, या व्याख्यानमालेत भागवत यांनी आधी हिंदूत्व, हिंदू राष्ट्र, जातीभेद, आध्यात्मिक उन्नती, स्वदेशी जागरण, गोसंरक्षण, गोसंवर्धन, समान नागरिक कायदा, संसदीय लोकशाही असे नमन गायले आणि शेवटच्या तिसर्‍या दिवशी समारोप करताना राममंदिर तात्काळ बांधले पाहिजेची भैरवी गायली…संघ कुठलीही गोष्ट चिंतन केल्याशिवाय बोलत नाही, हे भागवत यांनी दाखवून दिले ते एका अर्थी बरे झाले. मूह में राम, बगल में छुरी, असे उगाचच लोकांना बोलायची संधी ठेवली नाही… छान झाले!

amit shah and mohan bhagwat
मोहन भागवत – अमित शाह (फाईल फोटो)

‘सूचना मिळाली की विचार बंद’, असे संघात होते, हे खरे आहे, पण सूचना मिळण्याआधी विचारमंथन होत असते.अशीही संघाची भूमिका भागवत यांनी मांडली ती आणखी बरी केली. त्या निमित्ताने संघाचा हुकुमशाही ब्राम्हणी चेहरा ठळकपणे दिसला. भले भागवत संघात पूर्वी फक्त ब्राम्हण होते आणि आज प्रांत स्तरावर सर्व जातींचा समावेश आहे, अशी सारवासारव करत असले तरी आजही आणि पुढेही शंभर वर्षांनंतर संघ ब्राम्हणच चालवणार आहेत… त्यांनी हुकूमशाही आदेश द्यायचे आणि प्रमुख पदावर तोंडी लावण्यापुरते बहुजन असणार्‍यांनी आणि गावोगावी शाखा चालवणार्‍या साळी, माळी, तेली, तांबोळी, कोळी, कोष्ठी यांनी फक्त संघ दक्ष म्हणत… त्यांचे आदेश पाळायचे आहेत. आहे की नाही गंमत! संघासाठी आणि सरसंघचालकांसाठी टाळ्या वाजल्याच पाहिजेत.

राममंदिर बांधण्याचे भाजपला आदेश देण्याआधी भागवत यांनी ‘हिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशकता’, असे सांगत हिंदू राष्ट्राची संघाची संकल्पना स्पष्ट करून सांगितली. हे पाहून डोळे भरून आले आणि गळा दाटून आला… हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लिमांना जागा नाही, असा अर्थ होत नाही. जर आपण मुस्लिमांना आपण स्वीकारत नसू तर ते हिंदुत्व नाही! हिंदुत्व असा शब्द वापरायचा नसेल तर नको वापरू, ’भारतीय’ म्हणा अशी मुभाही त्यांनी दिली आहे. याचबरोबर संसदीय लोकशाहीचे महत्व पटवून देताना त्यांनी देशाच्या घटना सर्वात उच्च स्थानी असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक भारतीय हा घटनेशी बांधला गेला असून संघसुद्धा राज्य घटनेला श्रेष्ठ मानतो आणि त्याच्या चौकटीत राहूनच काम करतो… भागवत यांचे हे व्याख्यानमालेतील उच्च विचार पाहून आधीचे दोन दिवस तनामनावर गारुड झाले होते. निवडणुका तोंडावर आल्या आहेत, असा यातून अर्थ निघत असताना संघीय संमोहनातून मन बाहेर पडत नव्हते आणि शेवटच्या तिसर्‍या दिवशी राममंदिराचे हुकमी अस्त्र बाहेर काढल्यानंतर ब्रम्हानंदी लागलेल्या समाधीतून खडबडून जाग येत निवडणुका ‘आल्या रे आल्या’चा शंखनाद कानी स्पष्ट ऐकू आला…

बाबरी मशीद पडल्यानंतर देशभर झालेल्या दंगली झाल्या. या घटनेच्या बरोबर दहा वर्षांनंतर युनिक फिचर्सने एक सर्वेक्षण केले होते. यानुसार हा प्रश्न म्हणजे देशाला नव्या संकटात ढकलून देण्यासारखे असल्याचे मत 78 टक्के लोकांनी दिले होते. याचवेळी राममंदिराच्या प्रश्नावरून आज जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याला कोण जबाबदार आहे असे तुम्हाला वाटते? या प्रश्नावर 11 टक्के लोकांना भाजप, 36 टक्के लोकांना विश्व हिंदू परिषद आणि 24 टक्के लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वाटत होते. याचवेळी 8 टक्के लोकांनी मुस्लीम, 7 टक्के काँग्रेस, 2 टक्के पाकिस्तानची आयएसआय या गुप्तचर संस्थेला, 12 टक्के लोक ही परिस्थिती निर्माण व्हायला सर्वच पक्ष जबाबदार असल्याचे म्हणत होते. या आकडेवारी वरून एक ठळक निष्कर्ष पुढे आला होता. भारतातला कोणताही प्रश्न निर्माण होण्याला किंवा चिघळण्याला लोक काँग्रेसला जबाबदार धरत असत. अगदी रामजन्मभूमीचा प्रश्न निर्माण होण्यासाठी सुरुवातीला काँग्रेसलाच जबाबदार धरले गेले. बाबरी मशिदीला ठोकलेले टाळे राजीव गांधी पंतप्रधान असताना उघडले गेले, म्हणून हा प्रश्न वादग्रस्त बनला, असे अजूनही म्हटले जाते. शिवाय अल्पसंख्याक समाजाची मते मिळावीत, यासाठी काँग्रेसने अनुनयाचे राजकारण केले आणि हिंदूंच्या भावनांकडे लक्ष दिले नाही, असाही आरोप काँग्रेसवर होत असतो. पण, युनिक फिचर्सच्या सर्वेक्षणामध्ये फक्त 7 टक्के लोकांनी काँग्रेसला जबाबदार धरले. मात्र ज्याला संघ परिवार म्हटले जाते त्याला प्रचंड प्रमाणात जबाबदार धरले गेले. भाजप 11, विश्व हिंदू परिषद 36 आणि राष्ट्रीय स्वयंसेवक 24 असे एकूण 71 टक्के लोक असे मानतात की संघ परिवारामुळे ही परिस्थिती उद्भभवली होती.

2002 चे हे सर्वेक्षण आजही तंतोतंत लागू पडते. कारण कुठेही राममंदिराचा आसभास नसताना सरसंघचालक मोहन भागवत यांना ते उभारावे वाटते याचा अर्थ एकच आहे की मंदिराच्या तुपावर सत्तेची पोळी भाजण्याचा संघ परिवाराचा जुना गोरखधंदा आता नव्याने सुरू झाला आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर दोन तपांपेक्षा अधिक काळ उलटून गेला असताना आणि जगातील सर्वाधिक तरुणांचा देश असलेल्या भारताचे प्रश्न नव्याने शोधून त्यावर मार्ग काढणे गरजेचे असताना भागवत पुन्हा या देशाला 26 वर्षे मागे ढकलत आहेत. भविष्यातील भारत या संमेलनाचा समारोप करताना भागवत यांनी 1940 ते 73 असे सर्वाधिक काळ संघाचे सरसंचालक राहिलेल्या गोळवलकर गुरुजींनी ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकातून मांडलेले संघाचे विचार कालबाह्य झाल्याचे म्हटले आहे. संघ परिवारासाठी महत्त्वाचा दस्तावेज असलेले गोळवलकर गुरुजींचे विचार भागवत यांना काळाच्या ओघात दूर करावेसे वाटतात, मग राममंदिर या विषयावरही त्यांना पाणी सोडावेसे का वाटत नाही? कारण याचा एकच अर्थ आहे आणि तो म्हणजे राममंदिरावरून देशात पुन्हा एकदा अराजकता निर्माण करून भाजपला त्यांना पुन्हा सत्तेवर बसवायचे आहे.

- Advertisement -