Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सामाजिक इभ्रतीचा बागुलबुवा

सामाजिक इभ्रतीचा बागुलबुवा

महाराष्ट्र देशीच्या सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना यापुढे सिलिकॉन व्हॅलीतच नोकरी करावयास पाठवायचे असे निश्चित केल्यामुळे इंग्रजी माध्यमांशिवाय गत्यंतर उरले नाही. जगभरातील विद्वान शिक्षणतज्ज्ञ प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच द्या, असे म्हणत असले तरीयंत्र निर्मितीचे हे कारखाने गावोगाव पोहचल्यामुळे ते आता शक्य नाही. मुलांचा भावनिक,मानसिक आणि सामाजिक विकास होईल अथवा नाही. फार तर तो आईचा खून करेल अथवा चिल्लर पार्टी ला जाईल फरक तो काय पडतो? पण तो आमच्या सामाजिक इभ्रतीसाठी यापुढे इंग्रजी शाळेतच गेला पाहिजे!

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाने पटसंख्या कमी असलेल्या तेराशे मराठी शाळांना कुलूप ठोकले. त्यावर राज्यात गरम चर्चा झाली, तेव्हा राजकारण तापले; परंतु, पुढे घडले काहीच नाही. परिस्थिती जैसे थे राहिली . मुळात आमची भाषिक अस्मिता तकलादू आणि बेगडी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.आपले सरकार भाषिकदृष्टया गंभीरपणे विचार करून काही उत्तम कृती करते असे अनेक वर्षांत दिसले नाही.

सत्तेत येण्यापूर्वी यांची मातृसंस्था आणि रामदेव बाबा वगैरे ही मंडळी मातृभाषा,देशीभाषेतून शिक्षण पद्धती विकसित करण्याच्या बाता झोडत होते.आज त्याचा त्यांना विसर पडला. त्या उलट मराठी माध्यमांच्या शाळांना कुलूप लावण्याचे त्यांचे मनसुबे उघडे पडले. मातृभाषेतून शिक्षणासाठी राज्यात सर्वंकष धोरणात्मक निर्णय घेण्याऐवजी ते फक्त इव्हेंट साजरे करतात. मराठी शाळांनी प्रवेशोत्सव साजरा करावा हा असाच एक सरकारी आदेश. मूळ विषय मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याचा आहे.तो अशा इव्हेंटने सुटणार आहे का? परंतु आम्ही वरवर समाधान शोधू पाहणारी माणसं याचा गंभीरपणे विचार करीत नाही हे सत्यच. त्यात असे प्रवेशोत्सव मराठी शाळेतील शिक्षकांसाठी काही आनंदाचा भाग नाही. परंतु, प्रश्न पोटाचा आहे. म्हणून ते साजरे करावे लागतात.

- Advertisement -

तर दुसरीकडे इंग्रजी शाळांत प्रवेशासाठी पालकांची दमछाक होते,हे चित्र.हा विरोधाभास लक्षात कोण घेतो? मूलतःदुखणे वेगळे आहे, पण ते आम्हाला समजावून घ्यायचे नाही.जि.प.,म.न.पा.च्या मराठी शाळांची दुरवस्था,भौतिक सुविधांची वानवा,शिक्षकांचे वर्तन व गुणवत्ता या विषयी चर्चा होऊ शकते. पण मातृभाषेतून शिक्षणच नको यासाठी प्रामुख्याने समाजमनावरील इंग्रजी भाषेचे गारुड कारणीभूत आहे.भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर खाऊजा चे आगमन झाले.भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदारांचे हित महत्वाचे असते. मग भांडवली हितसंबधाच्या आड येणार्‍या गोष्टी नेस्तनाबूत करीत जगाला एक खुली बाजारपेठ करणे हे या व्यवस्थेचे सूत्र. म्हणून जगात जेव्हा जागतिकीरणाचा वारु चौफेर उधळला तेव्हा असंख्य छोट्या भाषा,संस्कृती त्याच्या वरवंट्याखाली नेस्तनाबूत झाल्या.जगात एक भाषा व संस्कृती अस्तित्वात आली तर भांडवलदारांना ते अधिक सुलभ होते.

या भांडवली गणिताचा भाग बनून खाऊजासोबत इंग्रजी भाषा व पाश्चात्य संस्कृतीचा प्रचार व प्रसार वेगात सुरू झाला.भांडवली व्यवस्थेचे राजकीय हितसंबध लक्षात घेता कोणी सत्ताधारी ऐतद्देशीय भाषेसाठी हे भाषिक आक्रमण थोपविण्याचे प्रयत्न करतील हे शक्य नव्हते.अपवाद भाषिक अस्मिता जपणार्‍या राष्ट्रांचा त्यांनी आपल्या देशात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा आग्रह कायम ठेवला. इंग्रजी ज्ञान,विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा असली तरी तिच्यातील नावीन्यपूर्ण ज्ञानाचा,माहितीचा अनुवाद करून त्यांनी मातृभाषेत विद्यार्थ्यांना उपल्बध करून दिला.मातृभाषेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला.नवनवीन शोध लागले.जागतिक दर्जाचे संशोधन झाले.तंत्रज्ञानात क्रांती झाली.या देशांची अतुलनीय उन्नती झाली. ते देश आज विकसित राष्ट्र हे बिरुद अभिमानाने मिरवत आहेत.

- Advertisement -

आम्ही मात्र प्रचंड उदारमतवादी त्यामुळे जगभरातील शिक्षण तज्ज्ञांच्या प्राथमिक शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे या मताकडे सहेतूक दुर्लक्ष करून परकीय भाषेच्या आहारी गेलो.शासन पातळीवरून परभाषेला पायघड्या घातल्या गेल्या.नवीन मराठी शाळांना परवानगी बंद आणि मागेल त्याला इंग्रजी शाळा या न्यायाने मराठीची गळचेपी केली गेली.त्यामुळे पूर्वी फक्त मोठ्या शहरात असणार्‍या इंग्रजी शाळांचे दशकभरात इतके पेव फुटले आहे की, पावसाळ्यात कुत्र्यांच्या छत्र्या उगवाव्यात तशा इंग्रजी माध्यमांच्या शाळा गल्लीबोळात दिसू लागल्या. त्यात आपला समाज कायमच अनुकरणावर भर देणारा आहे.विशिष्ट गोष्टीकडे आकर्षित झाला की कोणत्याही परिणामांची पर्वा न करता त्यामागे जातो.हे असंख्य बाबतीत सिद्ध झाले आहे.तेच इंग्रजी माध्यमांच्या बाबतीत होते आहे.

त्यातून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण हे फॅशन झाले आहे.पोरगा इंग्रजी शाळेत जातो हे पालकांसाठी प्रतिष्ठेचे ठरते. पालकांच्या या मानसिकतेचा आणि भावनिक गुंतागुंतीचा फायदा घेण्यासाठी अनेक लोकांनी व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून शाळा काढल्या आहेत.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्या दोन दशकात उपेक्षित,वंचित, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून अनेक समाज धुरिणांनी पदरमोड करून शाळा उभ्या केल्या.गावोगाव पसा पसा ज्वारी-बाजरी गोळा करून वसतिगृह चालवलीत.आज काय परिस्थिती आहे.

महाराष्ट्रात किती इंग्रजी शाळा अशा उदात्त ध्येयवादी माणसांनी झपाटलेपणातून उभ्या केल्या आहेत? काही नक्की अपवाद असतील तर त्यांचे स्वागत.मात्र, आज मोठे,मध्यम शहर,तालुका,गाव कोणत्याही गल्लीबोळात तुम्हाला किराणा दुकानाप्रमाणे इंग्रजी शाळांची दुकानं दिसतील.होय दुकानंच.कारण हा फक्त नफेखोरीचा व्यवसाय झाला आहे.कुठे चार दहा पत्रे टाकून,जुन्या पुराण्या ओस पडलेल्या पूर्वीच्या इमारतींचा वापर करीन,डाक बंगल्यात,लॉजवर जिकडे पहावे तिकडे इंग्रजी शाळांचे पीक जोमात आहे.येणारा भविष्यकाळ हा फक्त इंग्रजी माध्यमांतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या पिढीचाच असेल असा सार्वत्रिक भ्रम पैदा केल्यामुळे कालाय तस्मै नमः म्हणत पालक इंग्रजीकडे सुसाट धावत सुटले आहेत.संभ्रम अवस्था,भावनिक गुंता आणि प्रतिष्ठा हे यातील यक्ष प्रश्न आहेत.सुजाण पालकत्वही काळाची गरज आहे.मात्रसुजाणनेमके कोण? हा प्रश्नच आहे.

साधारणतःसुशिक्षित, उच्च विद्याविभूषित व्यक्ती आजच्या समाजात शहाणा,सूज्ञ समजला जातो,तो नेमका आहे काय?पाश्चात्यांचे सर्व अनुकरण केले म्हणजे शहाणा सुज्ञ ठरतो काय? वगैरे प्रश्नच आहेत.परंतु, हा वर्ग कसा वागतो,त्याचे अनुकरण नवमध्यम वर्ग करीत असतो व मध्यम वर्गाचे अनुकरण हा गरीब,सामान्य माणूस करण्याच्या भानगडीत पडतो. इंग्रजी माध्यमांच्या बाबतीत तेच झाले उच्चभ्रूंची असणारी ही फॅशन आज मध्यम व सामान्य वर्गात इतकी लोकप्रिय झाली की माणूस थोडा फार बरा कमवता झाला की त्याचे मूलं हे इंग्रजी शाळेतच गेले पाहिजे हा शिरस्ता पडला आहे. बाकी भाषिक कारणमीमांसा माध्यम निवडीमागे कोणी करीत नाही.तर आर्थिक सधनता हे यामागील गणित बनले आहे.हे गणित डोक्यात ठेवून व नवमध्यमवर्गाची वाढती संख्या लक्षात घेवून काही व्यावसायिक व्यवसाय म्हणून इंग्रजी शाळांच्या माध्यमातून गुंतवणूक करीत आहेत.

चांगल्या भौतिक सोयी सुविधा उभ्या केल्या म्हणजे ज्ञानप्राप्ती व बुध्यांकाचा विकास’आपोआप होतो हे गृहितक निश्चित करून अनेकांनी या व्यवसायात उडी घेतली आहे. वैद्यकीय शाखेत पहिल्या वर्षाला शासकीय शुल्क आज जितके आकारले जात नसेल तितके भरमसाठ शुल्क पूर्वप्राथमिक वर्गासाठी अनेक इंग्रजी शाळा आकारतात अशी सार्वत्रिक चर्चा आहे. त्यासह त्यांनी स्वतंत्र एक मार्केटींग व्यवस्था सुद्धा निर्माण केली आहे.

शाळेत जाण्यासाठी बस, भोजन,विविध उपक्रम,स्नेहसंमेलन, सहल,फोटो या सर्वांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते व वर्षभर पालकांचा खिसा रिकामा करण्याचे उद्योग चालतात.पुन्हा बॅग,सॉक्स,बूट,टीफीन,पाण्याची बॉटल,कपडे यासारखे शै.साहित्याचे ठोक विक्रतेही तेच झाले आहेत.हा सेवाभाव वाखणण्याजोगा आहे. या शाळा अक्षरक्ष: पालकांना लुटत आहेत पण तिकडे कोणाचे लक्ष नाही,ना कोणी त्याची दखल घेत.त्यावर कोणाचे नियंत्रण नाही.

हम करेसो कायदा या न्यायाने या शाळांचे चालले आहे.अप्रशिक्षित शिक्षकांची भरती करायची तुटपुंज्या मानधनावर त्यांना राबवून घ्यायचे भौतिक सुविधांचा भपका उभा करायचा व पालकांना आकर्षित करायचे.हेच सूत्र फलद्रुप ठरते आहे.त्यापलिकडे या तथाकथित शिक्षण सम्राटांचा विद्यार्थ्यांची गुणवत्ता,आकलन क्षमता,विश्लेषण क्षमता,जीवनकौशल्ये, सामाजिक,भावनिक,मानसिक,शारीरिक विकास यांच्याशी सुतराम संबध नाही. परंतु, महाराष्ट्र देशीच्या सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना यापुढे सिलिकॉन व्हॅलीतच नोकरी करावयास पाठवायचे असे निश्चित केल्यामुळे इंग्रजी माध्यमांशिवाय गत्यंतर उरले नाही. जगभरातील विद्वान शिक्षणतज्ज्ञ प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच द्या, असे म्हणत असले तरीयंत्र निर्मितीचे हे कारखाने गावोगाव पोहचल्यामुळे ते आता शक्य नाही. मुलांचा भावनिक,मानसिक आणि सामाजिक विकास होईल अथवा नाही. फार तर तो आईचा खून करेल अथवा चिल्लर पार्टी ला जाईल फरक तो काय पडतो? पण तो आमच्या सामाजिक इभ्रतीसाठी यापुढे इंग्रजी शाळेतच गेला पाहिजे!


डॉ. गणेश मोहिते

(लेखक प्राध्यापक आहेत )

- Advertisement -