घरक्रीडाअ‍ॅटॅकला अटकाव समतोल पाण्याचा !

अ‍ॅटॅकला अटकाव समतोल पाण्याचा !

Subscribe

काही दिवसांपूर्वीच भिवंडी येथील ३५ वर्षीय नामांकित शरीरसौष्ठवपटू रवी सावंत याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जानेवारीत नवी मुंबईतील घणसोली येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात गोलंदाजी केल्यानंतर संदीप म्हात्रे या तरुणाच्या छातीत दुखायला लागले आणि तो घरी जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांमध्ये खेळत असताना किंवा व्यायाम करताना युवकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. मात्र, असे का होते ? असे होण्याला काही शास्त्रीय कारणे आहेत. यातील सर्वात मुख्य कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता. शरीरातील पाण्याचा समतोल राखल्यास अ‍ॅटॅकला अटकाव करता येईल.

हल्ली पिळदार शरीर, सिक्स पॅक्सचा जमाना आहे. अनेक युवकांना आपले शरीर पिळदार आणि आकर्षक दिसावे असे वाटत असते. त्यामुळे ते रोज जीमला जाऊन भरपूर व्यायाम करत असतात. जिमसोबतच डायटलाही आता एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. युवकच नाही तर सर्वच वयोगटातील लोक आपल्या खाण्या-पिण्याकडे बारकाईने लक्ष देतात. जिम, डायट या गोष्टींचे महत्त्व वाढत आहे. शरीर आकर्षक दिसण्यासाठी घेण्यात येणार्‍या मेहनतीमुळेच शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकाराला एक विशेष लोकप्रियता मिळाली आहे. या खेळाकडे बरेच युवक करियर म्हणून पाहायला लागले आहेत. मग, फिट राहण्यासाठी, पिळदार शरीर बनवण्यासाठी, योग्य वजनी गटात बसण्यासाठी या शरीरसौष्ठवपटूंची धडपड सुरू असते. जर आपण आपल्याला हव्या असलेल्या वजनी गटात बसत नसू, तर आहार कमी करणे, पाणी कमी पिणे या गोष्टी हे खेळाडू करू लागतात आणि यातूनच विपरीत गोष्टी घडतात. प्रसंगी त्यात जीवही गमवावा लागतो.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच भिवंडी येथील ३५ वर्षीय नामांकित शरीरसौष्ठवपटू रवी सावंत याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जानेवारीत नवी मुंबईतील घणसोली येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात गोलंदाजी केल्यानंतर संदीप म्हात्रे या तरुणाच्या छातीत दुखायला लागले आणि तो घरी जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मागील काही काळात खेळत असताना किंवा व्यायाम करताना युवकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बरीच उदाहरणे समोर येत आहेत. मात्र, असे का होते ? तर असे होण्याला काही शास्त्रीय कारणे आहेत. यातील सर्वात मुख्य कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता. आपल्या रक्तामध्ये साधारणत: ९२ टक्के पाणी असते. रक्तातील पाणी कमी झाले तर रक्त घट्ट होते. असे झाल्यास रक्त धमन्यांमधून नीट वाहत नाही. त्यामुळे हृदयाला आपले काम जास्त जोरात करावे लागते. त्यामुळे आधी रक्तदाब वाढतो आणि तो नंतर हळूहळू कमी व्हायला लागतो. हे झाल्यामुळे रक्तामध्ये गुठळी (क्लॉट) होऊ शकते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

माणसाच्या शरीरात ६०-७० टक्के पाणी असते. आपला मेंदू ७५ टक्के पाण्यापासून बनला आहे. आपल्या हाडांमध्ये साधारण २२ टक्के, तर स्नायूंमध्ये साधारण ७५ टक्के पाणी असते. यातूनच मानवी शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे, हे आपल्याला समजू शकते. मात्र, काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. तसेच आपण गरजेपेक्षा जास्त किंवा कमी पाणी प्यायलो, तर त्याचे काय फायदे-तोटे असतात याची अनेकांना कल्पना नसते. परिणामी शरीराचे ‘डिहायड्रेशन’ (निर्जलीकरण) होते. पाण्याच्या कमतरतेमुळे कित्येक मुलांची वाढ खुंटते, मात्र या गोष्टीची माहिती फार कमी लोकांना असते. याची माहिती करून घ्यायची असेल तर आधी डिहायड्रेशन म्हणजे काय आणि त्याचे परिणाम समजून घ्यायला हवेत.

- Advertisement -

डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे. आपल्या शरीरातील बर्‍याच प्रक्रिया या पाण्यावर अवलंबून असतात आणि जर शरीरात पुरेसे पाणी नसेल, तर या प्रक्रिया बिघडू शकतात. डिहायड्रेशनमुळे थकवा जाणवणे, एकाग्रता कमी होणे, विचार करण्याची क्षमता कमी होणे अशा गोष्टी होऊ शकतात. हे झाले फक्त मेंदूशी निगडित परिणाम. पाणी कमी झाल्यामुळे शरीरात जास्त कोलेस्ट्रॉलची निर्मिती होते. तसेच अस्थमा, अ‍ॅलर्जी, रक्तदाब वाढणे, त्वचेचे विकार होऊ शकतात. शरीरातील विषारीद्रव्ये शरीराबाहेर पडत नाहीत, परिणामी त्वचेचे विकार होतात. त्याचप्रमाणे शरीरामध्ये अ‍ॅसिड, विषारीद्रव्यांचे प्रमाण वाढते. ज्याच्यामुळे जीवाणूंचा संसर्ग होतो. असे झाल्यास मूत्राशयाचे आजार होऊ शकतात.

शरीरात पाणी आणि खनिज कमी झाल्यास पचनशक्ती बिघडते. त्यामुळे अल्सर, अ‍ॅसिडिटी यासारखे आजार उद्भवतात. तसेच शरीराला पाणी कमी मिळाल्यामुळे शरीरात तयार होणारी घाण किंवा अन्नातील चोथा आपल्या आतड्यांमधून नीट पुढे सरकत नाही. त्याच्यामुळे बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते. सांधे आणि त्यांच्यामध्ये असलेली गादी (कार्टिलेज) पाण्यापासून बनलेली असते. शरीरातून पाणी कमी झाल्यामुळे ही गादी कमकुवत होऊ शकते. तसेच पाणी कमी असल्यास आपले शरीर तयार होणारी विषारीद्रव्ये बाहेर टाकू शकत नाही. ती बाहेर टाकण्याच्या वेळी जर शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असेल, तर चरबी सुद्धा साठून राहते. त्यामुळे वजन वाढते. आपली त्वचा हे आपल्या शरीराचे आवरण असते. ती आपल्याला अनेक आजारांची पूर्वसूचना देत असते. आपल्या शरीरातील पाणी दीर्घ काळ कमी होत असल्यास त्वचेला भेगा किंवा सुरकुत्या पडतात.

पाणी कमी होण्याची कारणे काय ? त्याचे मुख्य कारण म्हणजे शरीराची पाण्याची गरज पूर्ण न होणे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर, खूप ऊन असल्यास भरपूर घाम येतो. तेव्हा पाणी कमी प्यायल्यास किंवा बिलकूल न प्यायल्यास आपल्या शरीराचे निर्जलीकरण होण्यास सुरुवात होते. जर शरीराचे १ टक्का निर्जलीकरण झाले तर त्याचे कार्य खालावते, ४ टक्के झाले तर स्नायू कमकुवत होतात, ५ टक्के झाले तर थकवा जाणवतो, ७ टक्के झाले तर भास निर्माण होतात आणि १० टक्के झाले तर उष्माघात होऊ शकतो. पाणी न प्यायल्यामुळेच मॅरेथॉनमध्ये धावताना किंवा उन्हामध्ये खूप वेळ असताना हृदयविकाराचा झटका आल्याची काही उदाहरणे आहेत. त्यामुळे अधिकाधिक पाणी पिणे गरजेचे आहे.

पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत. शरीराचे स्नायू, हाडे, अस्थिबंध यांच्या वाढीसाठी आणि तंदुरुस्तीसाठी पाणी खूप उपयोगी ठरते. पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते. आपल्या शरीराचे तापमान नियमित राहते. शरीरात होणार्‍या पुष्कळ रासायनिक प्रक्रियांसाठी पाणी माध्यम म्हणून काम करते. पाण्यामुळे शरीरात तयार होणारी घातक विषारीद्रव्ये बाहेर फेकली जाण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठीही पाण्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे एकाग्रता वाढणे, डोकेदुखी कमी होणे या गोष्टीही योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे होतात. मात्र, हे योग्य प्रमाण म्हणजे तरी किती ?

दिवसात सहा ते आठ ग्लास पाणी प्यायलेच पाहिजे अशी समजूत आहे. मात्र, ही समजूत एकदमच चुकीची आहे. किती पाणी प्यायला पाहिजे यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हवामान. हवा थंड-गरम, जास्त उंचीवरील ठिकाण या घटकांचा किती पाणी प्यायला पाहिजे यावर फरक पडतो. व्यायाम करताना घाम येतो. त्यामुळे जेवढा जास्त घाम येईल, तेवढे जास्त पाणी प्यायला पाहिजे. तसेच जर व्यक्तीला काही आजार असेल किंवा काही औषधे चालू असतील तर त्यानुसारच पाणी प्यायले पाहिजे आणि त्यासाठी डॉक्टरचा सल्ला घेणे सगळ्यात महत्त्वाचे असते. तसेच गर्भधारणा आणि स्तनपानाच्या काळात महिलांना पाण्याची जास्त गरज असते. त्यावेळीही डॉक्टरला विचारणे खूप महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या प्रकारचा आहारही तुम्हाला किती पाणी लागणार हे ठरवतो. कॉफी प्यायल्याने शरीरातील पाणी बाहेर टाकले जाते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि शरीरातील पाण्याची गरज वाढते.

पाणी हे मानवी शरीरासाठी महत्त्वाचे असले तरी पाण्याबाबत काही चुकीच्या समजुतीही आहेत. यापैकी एक समजूत आहे की तुम्ही खूप पाणी पिऊ शकता. खूप पाणी पिणे हे नक्कीच शक्य आहे. मात्र, अती पाणी तुमच्यासाठी हानिकारकही ठरू शकते. गरजेपेक्षा जास्त पाण्याचे सेवन केल्यास पाण्याच्या विषबाधेसारखा आजार संभवतो. त्यामुळे दररोज किती पाणी प्यावे हे एखाद्या तज्ज्ञाकडून समजून घेण्याची गरज असते. तसेच काहींचा असा समज आहे की जास्त पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते. मात्र, हा समज चुकीचा आहे. पाणी प्यायल्यामुळे पोट भरते ही गोष्ट खरी असली, तरी जास्त पाणी प्यायल्यामुळे लोक कमी जेवतात, ज्याच्यामुळे वजन कमी होते, पण चरबी कमी होत नाही. बर्‍याच लोकांना तहान आणि भूक या दोन गोष्टींतील फरक कळत नाही. असे लोक तहान लागल्यानंतर थोडी भूक लागली या गैरसमजुतीने थोडे (ते जंक फूडही असू शकते) खातात. त्यामुळे वजन वाढते. तसेच काही लोक सांगतात की दिवसाला आठ ग्लास पाणी प्यायला पाहिजे. पण, आठ ग्लास पाणी म्हणजे २०० मिली x ८ ग्लास = १६०० मिली ! मुंबईसारख्या ठिकाणी जिथे खूप घाम येतो, तिथे फक्त १६०० मिली पाणी पुरेसे नसते. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच पाण्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येकाने आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे, ही गैरसमजूत आहे.

त्याचप्रमाणे शरीरातल्या पाण्याची पातळी राखण्यासाठी फक्त साधे पाणीच प्यायला हवे ही समजूतही चुकीची आहे. पाणी हे शरीरासाठी आवश्यक आणि चांगले असले तरी पाण्यामध्ये कॅलरीज नसतात. पाण्याला दूध, ज्यूस यांसारखे पर्याय आहेत. पण, या गोष्टी पिताना त्यांच्यातील साखरेचे प्रमाण आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम याचाही विचार करणे आवश्यक आहे. तसेच खेळण्याच्या आधी किंवा खेळताना पाणी प्यायचे नसते, त्यामुळे पोट दुखू शकते असे काहींना वाटते. मात्र, पाणी प्यायल्यामुळे पोटात दुखत नाही, तर उलट पाणी न प्यायल्यामुळे पोटात दुखते. निर्जलीकरण झाल्यामुळे खेळाडूंचे प्रदर्शनही खालावते. मात्र, पाण्यासारखीच काही अजूनही अशी द्रव्ये आहेत, जी मानवी शरीरासाठी लाभदायक असू शकतात.

पाणी हे मोफत किंवा स्वस्त मिळते आणि ते सर्वत्र उपलब्ध असले तरी त्याला चव नसते. त्यात खनिजे, कॅलरीज नसतात. त्यामुळे खेळाडूंसाठी किंवा सामान्य माणसांसाठीही स्पोर्ट्स ड्रिंक उपयुक्त ठरू शकतात. स्पोर्ट्स ड्रिंक चविष्ट असतात. त्यात असणार्‍या कर्बोदकांमुळे आपले शरीर पाणी चांगल्याप्रकारे शोषून घेते. मात्र, पाण्याच्या तुलनेत त्यांची किंमत खूप जास्त असते. तसेच नारळाचे पाणीही शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. चांगल्या नारळामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्याचा शरीराला फायदा होऊ शकतो. कर्बोदके, इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्वे, खनिजे यांचे प्रमाण जास्त असलेले ज्यूसही शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. मात्र, ज्यूसमध्ये फलशर्करा जास्त प्रमाणात असल्याने ते शरीराची पाण्याची गरज लगेच भरून काढू शकत नाहीत. कोल्ड-ड्रिंकमुळेही ऊर्जा मिळते. परंतु, ती शरीरासाठी चांगली नसतात.

कोल्डड्रिंकमुळे हाडे ठिसूळ बनू शकतात आणि त्यामुळे वजनही वाढू शकते. चहा आणि कॉफी ही द्रव्येही चवीला चांगली असतात. मात्र, दोन्ही पदार्थांत डीयूरेटिक्स असल्यामुळे शरीरातील पाणी बाहेर फेकले जाते. त्याच्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे कोणते द्रव्य प्यायचे आणि कोणते नाही, याचा नीट विचार करणे आवश्यक आहे.

एकूणच फिट राहण्यासाठी, पिळदार शरीर बनवण्यासाठी जितके डायट पाळणे आवश्यक आहे, तितकेच योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करणे गरजेचे आहे. कोणीतरी म्हणूनच ठेवले आहे पाणी हेच जीवन !

– डॉ. चैतन्य बढे

-(लेखक क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञ आहेत.)

-(शब्दांकन – अन्वय सावंत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -