घरफिचर्सMy Mahanagar Exclusive : समाजाकडून मानसन्मानाची अपेक्षा - सोनाली दळवी

My Mahanagar Exclusive : समाजाकडून मानसन्मानाची अपेक्षा – सोनाली दळवी

Subscribe

बोल्ड, बिनधास आणि हाय प्रोफाईल समाजात सहज वावरणारी ती आजही आपल्या हक्कांसाठी लढत आहे. पुरुष आणि स्त्री यापैकी कोणीही नाही. पण समाजाचा एक महत्त्वाचं आणि दुर्लक्षित करता येणार नाही, असा एक घटक ती आहे. तृतीयपंथी असतानाच आम्हालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे ठापपणे सांगणारी ती, आज समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी मोठा लढा देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नाकारलेपणाची, वेगळेपणाची वागणूक मिळालेल्या ती ने न खचता खंबीरपणे समाजाने दिलेल्या प्रत्येक घावाला झेलत चोख प्रत्युत्तर दिले आहे. सामाजिक कार्यकर्त्या, तृतीयपंथी सोनाली दळवी यांनी माय महानगरच्या माध्यमातून आपल्या समाजाबाबतचे समज-गैरसमज दूर केले आहेत.

पुण्याच्या केएम हॉस्पिटलमध्ये जन्मलेली मी पुढे आपल्या कुटुबियांसोबत नवी मुंबईतील तुर्भेला वास्तव्यासाठी आले. तेथील वाशी, सेक्टर 9 मधील आयसीएल हायस्कूलमध्ये शिकू लागले. मी एक तृतीयपंथी आहे हे माझ्या घरच्यांना नंतर समजण्यापूर्वी माझ्या शिक्षकांना समजलं. त्यांनी ही बाब खूपच सकारात्मक दृष्टीकोनातून घेतली. मी सिनिअर केजीमध्ये असताना माझ्या शिक्षकांनी मला मुलींची वेशभूषा करून स्टेजवर डान्स करायची संधी दिली. माझे शिक्षक, प्राध्यापक यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. मी जन्मतःच फेमीना आहे. हा काही माझा दोष नाही.

निसर्गानेच मला असं बनवलं आहे. परंतू समाजाने हे सहजासहजी कधीच स्वीकारलं नाही. माझ्या नातेवाईकांनी मला डिवचण्यास सुरुवात केली. मला बायल्या म्हणून संबोधलं. माझ्या आई वडिलांनाही माझ्यातील बदलाबाबत भडकवलं. अशाने व्यथीत झालेल्या माझ्या वडिलांनी मी चौथीत असताना समाजाच्या दबावाखाली येऊन डॉक्टर्स, तांत्रिक-मांत्रिक यांच्याकडे मला घेऊन गेले. मला मुलांसारख वागवण्यासाठी मारझोडही केली. मात्र मी त्यांना स्पष्ट म्हणाले, तुम्ही माझे पालक आहात, मालक नाही. मला तुम्ही विष द्या, पण अशी वागणूक देऊ नका. तुम्हीही जगा आणि मलाही जगू द्या. माझ्या जन्मदात्या आईच्या निधनानंतर मी पुढे होऊन माझ्या वडिलांचं दुसरं लग्न लावूने दिलं. माझ्या आईने माझी मानसिकता समजून घेतली. माझ्या वडिलांनाही समजावलं. त्यानंतरपासून ते माझे चांगले मित्र बनले. माझ्या पालकांशी मी सर्व विषयांवर बोलते, सगळ काही शेअर करते.

- Advertisement -

वयाच्या 10 व्या वर्षी मी आमच्या कम्युनिटीमध्ये सामील झाले. घरातील लोकांनी सुरुवातील पाठींबा दिला नाही. त्यांना भीती होती की मी त्यांच्यापासून तोडली जाईन. पण तसं काही झालं नाही. आमची कम्युनिटी कोणालाही त्यांच्या कुटु्ंबियांपासून तोडत नाही. आजही माझ्या कुटुंबासोबत मी राहते.

आम्हाला वेगळी वागणूक का देतात? हा प्रश्न मला नेहमीच पडतो. कधी कोणी तृतीयपंथी दहशतवादी असल्याचा, बलात्कारी असल्याच ऐकलयं का. नोकरी देताना आमची कामं बघा ना, तुम्ही जेंडर का बघता, हा माझा प्रश्न आहे.
एलजीबीटी कम्युनिटीच्या माध्यमातून आमच्या समाजासाठी काम करण्याची संधी मला मिळाली. तेथे येणार्‍या मुलांचे त्यांच्या पालकांचे मी समुपदेशन करते. मुला-मुलींना शिकण्याचा सल्ला देते. सध्या वयोवृद्ध तृतीयपंथींसाठी काम करत असून त्यांना तीन वेळच्या जेवणाची व्यवस्था करत आहे.

- Advertisement -

समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपण मुलांना लहानपणापासूनच समानतेचे धडे देणं गरजेच आहे. मी जन्मले तेव्हा माझे जेनेटीक्स बघून डॉक्टरांनी मला मुलगा हे टॅग दिलं. पण माझं मन, मेंदू, आत्मा हे मुलीचं होतं. तुम्ही कोणाच मन, मेंदू, आत्मा कसं बदलू शकता. मी कधीच मुलगा नव्हते. आपल्याला लहानपणापासून मनात हे बिंबवल जात की हे तृतीयपंथी खतरनाक असतात, ते त्रास देतात, श्राप देतात, पण आपण मुलांना हे का नाही शिकवत की तीही माणसं असतात. त्यांनाही मनं असतं. त्यांना शिक्षण देत नाही, मानवी समानता शिकवत नाही. याची सुरुवात तिथूनच होते. मग त्यांच लहानपण हरवून जातं. तिच्या किंवा त्याच्यातील द्वंद्व सुरू होतं. बालपणातील हा सगळ्यात मोठा खडतर प्रवास होता.

माझ्या आयुष्यात कधीच मला असे दुजाभावचे अनुभव आले नाहीत. पण माझ्या घराच नूतनीकरण सुरू असताना मला रेंटवर घर घ्यायच होतं. मला कुणी रेंटवर घरही देत नव्हतं. मी त्यांना सांगायचे मी एकटी राहत नाही, माझे आई, वडिल, बहिण, भाऊ सोबत राहणार आहेत. तरीही ते तयार झाले नाहीत. मला का राहू दिलं नाही. माझ्या बाबांना आजही त्या गोष्टीची खंत आहे. त्यांच्या नजरेत मी एक राणी सारखी राहणारी, ग्लॅमरस दिसणारी अशी होती. पण त्यांना त्यावेळी ही जाणीव झाली की मला आतून लोकं किती दुःख देतात. मी खूप नशीबवान आहे की आज माझ्या पालकांनी मला सपोर्ट केला, फ्रेंड्सनी, शिक्षकांनी सपोर्ट केला, मला आयुष्यात चांगली लोकं मिळाली म्हणून मी पुढे जाऊ शकले. पण ज्यांना सपोर्ट मिळत नाही त्यांच काय.

सुप्रीम कोर्टाने आम्हाला जो न्याय दिला आहे. तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा काळ आहे. या निर्णयासाठी आम्ही खूप मोठा लढा दिला आहे. एलजीबीटी कम्युनिटीसाठी आम्ही दरवर्षी चळवळ करत होतो. कलम 377 हा अ‍ॅक्ट फक्त एलजीबीटी कम्युनिटीलाच लागू होत नव्हता. माणूस म्हणून हा माझा समानतेचा हक्क आहे, तो मला मिळायलाच हवा. तो आज मिळाला आहे. मला एवढच म्हणायचं आहे. माझ्या बेडरुममध्ये मी काय करतेय यात लोकांना काय करायच आहे. हा माझा अधिकार आहे. माय बॉडी माय राईट्स माय चॉईस, यासाठीच आमचा हा लढा होता.

लोकांनी आम्हाला एक माणूस म्हणून वागणूक द्यावी ही माफक अपेक्षा आहे. आमच्या कम्युनिटीमध्ये जात-पात धर्म भेदभाव हे काहीच नाही. हे समाजानी आमच्याकडून शिकण्यासारखं आहे. आमच्यामध्ये सगळे सण साजरे करतो. ईद, दिवाळी, ख्रिसमस साजरी करतो. ही गोष्ट आमच्याकडून इतरांनी शिकण्यासारखी आहे. एक लढा जिंकला असला तरीही भविष्यात खूप अधिकारांसाठी लढायचं आहे. हॉस्पिटल वॉर्ड हवे आहेत, स्वच्छता गृह हवे आहेत, सेक्शन 376 बलात्कारासाठीचा गुन्हा तृतीयपंथींसाठी लागू होत नाही. कायद्याने आमचं अस्तित्वच मिटवलं. त्यासाठी न्याय हवा आहे. हे पहिलं पाऊल आहे. अजून मोठ्ठा पल्ला गाठायचा आहे.

महानगराने मला कणखर बनवलं

या महानगरने मला कणखर बनवलं, धाडसी बनवलं, माझी इच्छाशक्ती वाढवली, आमचं म्हणणं सांगण्यासाठी एक तसंच एक मोठं व्यासपीठ या महानगराने मला दिलं आहे. मला या महानगराला भरभरून प्रेम परतफेडीत द्यायचं आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -