घरफिचर्सएक्झिट पोल चावडीवरून लाईव्ह

एक्झिट पोल चावडीवरून लाईव्ह

Subscribe

पारवाडीच्या चावडीशेजारीच शाम्याचं चहा आणि भजीचं हॉटेल होतं. ऐनवेळी जरी फारसं तेजीत चाललं नाही तरी निवडणुकांच्या हंगामात शाम्याचा गल्ला चांगला जमायचा. एकंदरित इलेक्शनचे लाभार्थी निवडून आलेले आमदार आणि हॉटेलवाल्या शाम्या होता. एकदा काय इलेक्शन कमिशनने तारीख जाहीर केली की, हॉटेलच्या बाजूला असलेल्या चावडीवर सकाळ संध्याकाळ चर्चा झडायच्या, त्या पंतप्रधानांनी काय केलं पाहिजे, आपल्या सायबांनी कोणाशी युती केली पाहिजे किंवा कोणाशी आघाडी केली पाहिजे, ते अगदी या नेत्याने यावेळी हे केले पायजे, ते केले पायजे, असे एक ना अनेक सल्ले हॉटेलच्या बाजूला असलेल्या चावडीवर विना कन्सल्टन्सी फी दिले द्यायचे.

प्रत्येक सल्ल्यानंतर शाम्याच्या पोरग्याला एक प्लेट भजी आणि चहाची ऑर्डर दिली जायची. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत चावडीवरील चर्चासत्रात सहभागी झालेला शाम्याचा पोरगा पण आता राजकीय तज्ज्ञ झाल्यासारखा सर्वांना आपले सल्ले रेटायचा. प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात रामू, गण्या, मन्या आणि संतू या चार जणांची चौकडी या चर्चासत्राच्या संसदेत प्रमुख होती. जसजसा प्रचाराचा जोर चढला, तसा चर्चांना पण जोर चढत होता. दर दिवशीच्या सभा आणि त्यावर चर्चासत्र हा नेहमीचा दिनक्रम झाला होता. अखेर निवडणूक झाली आणि आता नेमकं कोणाचं सरकार येणार? कोण कोणाला पाडणार? मुख्यमंत्री कोणाचा होणार? आणि आपल्या मतदारसंघात कोण कोणाला टक्कर देणार? अशा विषयांवर चर्चा झडल्या जावू लागल्या.

- Advertisement -

गड्यांनो….तुमाला काय वाटतं? सायबांनी युती केली पायजे हुती का? नायं त्या अ‍ॅक्झिट पोलमदी ती कमी जागा दाखवत्यात, रामूने चिंता व्यक्त केली. अरे, पण चिंता कसली, त्यांची म्हायुती काय म्हणत्यात ते हाय ना, गण्याने नेहमीप्रमाणे धीर दिला. अरे…हौ बाब्बाओ… पन समोरच्या पार्टीला त्यांचा मुख्यमंत्री बसवायचा हाय, तो त्येंचा नेता जोरात वरडत असायचा, म्याच पुन्हा येनार, म्याच पुन्हा येनार….असलं काय तरी? रामूने पुन्हा चिंता व्यक्त केली. गड्या तू घाबरू नको, ते करतील काय तरी, गण्याने पुन्हा दिलासा दिला. मन्या आणि संतू मात्र चिंतेत होते. काय रे बाब्बाओ काय झालं, असे कावल्यावानी काय बसलाय आज, निवडणुकीत ऐन पावसात लय जोश चढला हुता तुम्हाला, आता काय झालं? मन्याने आपल्या चावडीवरील विरोधकांना विचारलं.

काही नाही रे बाबा, पावसानं इथपर्यंत साथ दिलीये, आता हातानं हात दिला तर सत्ता आमचीचं असणार… बघच तू, विरोधी बाकावरचा संतू फुल कॉन्फिडन्सने बोलला.(रामू आणि गण्या हसत)अरे, बाबा पण त्या एक्झिट पोलमंदी तुमच्या कमी सिटा दाखवत्यात, ते काय ते बघा. सर्वांची ही जुगलबंदी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत जमली. तोपर्यंत 5 प्लेट भजी आणि 10 कप च्या…त्यांनी रिचवली होती. निकालाला अजून चोवीस तास बाकी होते. तरीही एक्झिट पोलचा अ‍ॅक्झॅक्ट अर्थ चावडीवर अजून एक संध्याकाळ तरी लावला जाणार होता….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -