घरफिचर्स‘मास्क अकाऊंट’चा भुयारी मार्ग !

‘मास्क अकाऊंट’चा भुयारी मार्ग !

Subscribe

पीएमसी घोटाळ्यामुळे पर्दाफाश

‘मास्क अकाऊंट’ हा नवा खाते प्रकार असून त्यातील व्यवहार अत्यंत गोपनीय ठेवले जातात. ही खाती बड्या उद्योगांसाठीच असतात. बँकेतील फक्त मोजक्या मंडळींना अशी खाती ऑपरेट करण्यासाठी आवश्यक असलेला ‘पासवर्ड’ दिला जातो. तो इतर कोणाकडे शेअर करण्याची मुभा नसते. या खास सिस्टीमचा नुकत्याच उघडकीस आलेल्या ‘पीएमसी’ घोटाळ्यामुळे पर्दाफाश झाला आहे. अशी स्पेशल व्यवस्था अजून कोणकोणत्या बँकांत चालू आहे, हे शोधण्याचे नवे काम रिझर्व्ह बँकेला करावे लागणार आहे. या भुयारी मार्गाचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

जगामध्ये बॅँकिंगचा शोध कोणी लावला? हा प्रश्न ‘केबीसी’मध्ये विचारला गेला तर कदाचित फिफ्टी फिफ्टी किंवा कम्प्युटरजी त्याचे योग्य उत्तर देतीलसुद्धा. पण आजच्या काळात आपल्या देशातील काही बँकिंग महर्षी नवनवीन शोध लावून मोठ्या ग्राहकांची कशी इमाने-इतबारे सेवा करीत आहेत. हे म्हणजे नोबेल पारितोषिक देण्यासारखे आंतरराष्ट्रीय कार्यच म्हणायला हवे. अशा महान व्यक्तींना आधुनिक बँकिंगचे शिल्पकार म्हणून घोषित केले पाहिजे व त्यांचा थेट लाल किल्ल्यावरून सत्कार केला पाहिजे. आजवर बनावट खाती उघडणे हा एक पराक्रम मानला जायचा. पण तोही उपक्रम शिळा वाटावा असे अतुलनीय कार्य ज्यांनी कोणी ‘मास्क अकाऊंट’ चा शोध लावला त्याने केले व भारतीय बँकिंगला जगातील बँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानावर बसवले असे म्हणायला पाहिजे. भारतीय बँकिंग सेवेत नवनवीन सोयी-सुविधेची भर टाकणारी नवीन स्कीम काय आहे? आजवर मास्किंग लावलेल्या खात्यांनी किती जणांचा करोडोने फायदा झाला, हेच आपण जाणून घेणार आहोत. हेही एक प्रकारचे आर्थिक साक्षरतेचे शिक्षणच म्हणायला हवे.

- Advertisement -

पार्श्वभूमी-आजवर आपल्याला दरोडे घालणारे दहशतवादी मंडळी खरा चेहरा लपवून मुखवटा घालतात आणि असे मास्कधारी समाजविघातक कृत्ये करून मनुष्य व जीवितहानी करतात, हे आपणास ठाऊक आहे. परंतु थेट बँक खात्याला असे ‘कव्हर’ घालून त्यांना ‘मास्क अकाऊंट’ असे छान नवे टोपडे चढवून हवी ती काळी कृत्ये करणे म्हणजे अनोखे, आधुनिक बँकिंग म्हणायला हवे. आपल्याला जर याची माहिती नसेल व उद्या अशी खाती उघडायची बुद्धी दुर्बुद्धी झाली तर नेमके काय करायचे ? म्हणून आपण थोडे जाणून घेऊया.

पारदर्शकता आणि बँकिंग व्यवसाय- आजवर बँकिंगकडे एक पारदर्शी व्यवहार करणारी आर्थिक संस्था म्हणून बघितले जायचे. अर्थात काही चलाख लोक आपले दोन नंबरचे पैसे घरात, बाथरूममध्ये दडवण्याऐवजी आपल्या परिचयाच्या व सोयीच्या बँकेत ठेवून बँकेचे व आपलेही भले करायचे. आणि अशारितीने काळ्याचे पांढरे करायचे. असे सगळे तेव्हढ्या पुरते पारदर्शी असायचे. पुढे आधार कार्ड, पॅन कार्ड असे लिंकिंग आले नि पैशाचा स्रोत शोधला जाऊ लागला. पाचशेच्या नोटा रद्द करून दडवलेला काळा पैसा एका रात्रीत रद्दी करण्याचे काम केले गेले. यापुढे बिझनेस करायचा तरी कसा? पण अडचणींवर तोडगा निघणार नाही तर काय? जसे सायबर दरोडा घालणारे हे सायबर कंपन्यांपेक्षा हुशार असतात, तसे बिझनेसला मदत करू पाहणारे बँकिंगमधले जाणकार अधिकारी, प्रशासन आणि कायद्याच्या चौकटीत राहून ‘आऊट ऑफ द बॉक्स ’ का काय म्हणतात, तसे आगाऊ थिंकिंग करून ‘अत्युच्च ग्राहक सेवा’ देण्याचा प्रयत्न करीत असतात. अशाच काही कर्तबगार मंडळींनी ‘मास्क खाती’ निर्माण करण्याचा शोध लावला व साध्यासुध्या बँकिंगला वेगवान, कर्तृत्ववान केले.
मास्क अकाऊंट म्हणजे काय?

- Advertisement -

एखाद्या मोठ्या कॉर्पोरेटला ‘फेवर’ करायचे म्हणून बँका कोणत्या व किती थराला जात असतील त्याची तुम्हाआम्हाला आणि बँकिंगमधील रथीमहारथींना अजिबात कल्पना येणार नाही. ग्राहक देव आहे हे तत्व सर्वसामान्य ग्राहकांच्याबाबत जितके वापरले जात नसेल, तितके ते धनिक खातेदार व मोठमोठ्या कंपन्या यांच्या भल्यासाठी वापरले जाते. मार्केटिंग व उत्तम ग्राहकांना टिकवून, उपकृत ठेवण्याची ही आधुनिक कार्यक्षमता महानच म्हणावी लागेल. मोठ्या लोकांना एकोमोडेट करण्यासाठी बँकिंगमधील कायदे कानून आणि आयटी यंत्रणा कुठे व कशी वाकवायची हे उपजत असते की, कोणी त्यांना यात पारंगत करते हे आपल्याला कसे कळणार? ही लवचिकता देशाच्या बँकिंग व एकूणच अर्थव्यवस्थेच्या कण्याला लाचार लवचिक करते, हे त्यांना कधीच कळणार नाही. तोवर अशीच परिस्थिती चालूच राहणार.

कोणीतरी ब्रेनी बँकरने ‘मास्क अकाऊंट’ हा नवा खाते प्रकार शोधला, म्हणजे काय? तर खाते तसे साधे कर्ज खाते असते. पण त्यातील व्यवहारांची गोपनीयता अतिशय महत्वाची असते. भारी कोर्पोरेट्ससाठीच तर अशी सिक्रेट सुविधा असते. बँकेतील फक्त मोजक्या मंडळींना अशी खाती ऑपरेट करण्यासाठी आवश्यक असलेला ‘पासवर्ड’ दिला जातो. तो इतर कोणाकडे शेअर करण्याची मुभा नसते. ही खास सिस्टीम नुकत्याच उघडकीस आलेल्या ‘पीएमसी’ घोटाळ्यातून बाहेर आलेली आहे. अशी स्पेशल व्यवस्था अजून कोणकोणत्या बँकांत चालू आहे, हे आता नवेच काम देशाच्या रिझर्व्ह बँकेला करावे लागणार आहे. ‘कोअर बँकिंग सोल्युशन’ हा आपल्या बँकिंगचा कारभाराचा महत्वाचा टप्पा, परंतु ‘मास्क खाती’ अशा व्यवस्थेला थेट बायपास करतात. आणि रिझर्व्ह बँक-ऑडिटर्स व अन्य नियंत्रक यांना जराही कळणार नाही अशी स्वयंचलित यंत्रणा विकसित करण्यात यशस्वी होतात. सीबीएसलाच फाट्यावर मारले की इतरांची फिकीर नको त्यांना परस्पर फाट्यावर मारण्याची बिल्ट इन सुविधा विकसित केलेली आहे. असे कौशल्य व संशोधन दहशतवादींना निधी पुरवणार्‍यांच्या विरोधात आणि मनी लॉण्डरिंग करणार्‍या विघातक प्रवृत्तींना जेरबंद करण्यासाठी का बरे वापरले जात नाही?

मोठ्या कॉर्पोरेट्सना लागेल तितके कर्ज द्यायचे, तेही रिझर्व्ह बँकेच्या नकळत, म्हणजे काहीतरी झोल केलाच पाहिजे. तोही कसा चलाख कोणाला, कोणाच्या बापालाही समजणार नाही असा! म्हणजे किती हुशारी लागेल? एरवीच्या कामात व ग्राहकसेवा देण्यात इतकी अक्कलहुशारी वापरता येत नाही. पण अशी नामी संधी मिळाली तर संचालक बडे अधिकारी एकदम आपला तल्लख मेंदू घेऊन कॉर्पोरेटच्या कल्याणास कसे सज्ज बिज्ज होतात. गरज ही शोधाची जणांनी असते ! याची जणू आपल्याला प्रचिती आणून देण्यासाठी अशी हिकमत लढवली जाते.

एकाच मोठ्या कंपनीला भलेमोठे कर्ज दिले तर सर्वांच्या नजरेत येईल, म्हणून नजर चुकवून की, नजरबंदी करून? वेगळीच खाते पद्धत शोधणे हीच तर खासियत आहे. मग अशी पाचपन्नास गुप्त खाती तयार केली जातात. ज्यांचा वापर करण्याचा अधिकार फक्त मर्जीतील अधिकार्‍यांना तेही कुठेच काही वाच्यता करायची नाही, असा सज्जड दम देऊन. मग तिथे अधिक रकमेचे कर्ज देऊन ग्राहक भलाईचा हेतू साध्य करायचा. कोणत्याही बँकेची ‘कोअर बँकिंग सिस्टीम’ ही त्या-त्या बँकेची जणू मेंदूइतकीच सक्षम, पण तिथेदेखील नोंद न करण्याची तुजवीज की खबरदारी ? विश्वासू बँक अधिकारी व व्यवस्थापन वर्ग व्यवस्थितपणे घेतो,अशा कार्यक्षमतेला काय म्हणावे? याबद्दल त्यांचा बँक क्षेत्रातला पुरस्कार तरी दिला जावा. अशी खास खाती बिनबोभाटपणे चालू ठेवणे, तेही नियंत्रकांना मागमूस न लागू देता, हे किती जोखमीचे काम आहे.

याहीव्यतिरिक हजारो खोटी खाती कर्ज खाती निर्माण करून आपल्या बड्या क्लायंटला त्याचा बिझनेस करण्यास की, बिझनेसव्यतिरिक्त पैसे हवा तसा उधळवण्यास मदत करणे हे आपल्या बँकेप्रती किती निष्ठापूर्वक कार्य म्हणावे लागेल. शिवाय ही कर्ज सिस्टीम अनेकवर्षे गुप्त पद्धतीने चालू ठेवणे हेदेखील कोणतेही शिक्षण-प्रशिक्षण न मिळता, कसे बरे शक्य होते ? गांधी, भगतसिंह अशा देशभक्तांच्या पवित्र देशात नीरव मोदी, मल्ल्या आणि एचडीआयएलचे वाधवान पिता-पुत्र जन्माला येतात, हे किती भाग्याचे आहे, नाही का? बँकांना मोठे करणारे कॉर्पोरेट्स आणि कॉर्पोरेट्सना मोठे करणारे बँकर ! असे साटेलोटे आणखीन कुठेच सापडणार नाही! इतके अलौकिक बँकिंग व उद्योग व्यवसाय आपल्याकडे आहेत.

केवळ छोट्या खाजगी आणि सहकारी बँका बुडीत कर्ज आणि मोठे कर्जदार यांच्या सापळ्यात अडकलेल्या असतात असे नाही, बहुतांश सरकारी बँकांना या अजगराने विळखा घातलेला दिसतो. तसेच अनेक मोठ्या खाजगी बँका मोठ्या कॉर्पोरेट्सना दिलेल्या महाकाय कर्ज बोझ्याखाली दडपलेल्या आढळतात. आयसीआयसीआय व्हिडीओकॉन शिवाय येस बँक, अ‍ॅक्सिस बँक अन्य मोठ्या बँकांनी मोठ्या कंपन्यांना बड्या बिझनेस हाऊस, मोठाली उद्योग घराणी यांना नियमाबाहेर जाऊन मोठी कर्जे दिली आहेत. त्यांच्यावर कृपा करताना, निधी मात्र सर्व प्रकारच्या खातेदार, ठेवीदारांचा वापरला गेला. मोठ्या नफ्याची हाव की, व्यक्तिगत महत्वाकांक्षा असे काहीही असले तरीदेखील बँक बुडाली किंवा कोलमडली तर पहिला फटका हा तुम्हा आम्हाला बसतो.

सरकार नियंत्रक ऑडिट असे सगळे फिल्टर्स असताना कायद्यातून फायद्याच्या पळवाटा काढल्या जातात हेच मास्क अकाऊंट तंत्राद्वारे सिद्ध होते. मोठे उद्योग आणि बँका बुडणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या हिताचे नक्कीच नाही. सरकार कोणाचे असले तरी कठोर उपाययोजना करून बिघडलेली गाडी रुळावर आणणे हे काम युद्धपातळीवर व्हायला अन्यथा जगातील महासत्ता बनू पाहणारा आपला देश जगातील ‘कंगाल देशाच्या काळ्या यादीत’ जायला वेळ लागणार नाही. दिवाळीचा नरकासूर वध व्हायला अजून वेळ आहे, त्याआधी बँकिंगमधील नतद्रष्टांना रोखले पाहिजे आणि कायमचे संपवले पाहिजे. त्यांचे बुरखे फाडले पाहिजेत, तरच ही अशी मास्क खाती बंद होतील, नेस्तनाबूत होतील !!

-राजीव जोशी -बँकिंग व अर्थ अभ्यासक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -