घरफिचर्सपुरुष फसतात तेव्हा...

पुरुष फसतात तेव्हा…

Subscribe

विवाहबाह्य संबंधांमुळे नेहमी महिलाच मानसिक, भावनिक, आर्थिकदृष्ठ्या भरडली जाते असे नाही तर पुरुषांनादेखील विवाहबाह्य संबंधांमधून अनेकदा मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. स्वतःचे कुटुंब उध्वस्त होणे, बायको मुलं दूर होणे या बरोबरच अपरिमित आर्थिक हानी पुरुषाचीदेखील झालेली दिसून येते. त्यामुळे अनैतिक संबंधांना आपल्या आयुष्यात स्थान देताना दहा वेळा विचार करणे आवश्यक आहे. कारण सुरुवातीला जरी ते मोहक वाटत असले तरी काही काळानंतर त्याचे दाहक चटके बसू लागतात आणि पुढे आयुष्याची होरपळ होते. मग तेलही गेले आणि तूपही गेले, हाती धुपाटणे राहिले अशी स्थिती येते.

संजय (काल्पनिक नावं ) याची बायको आणि एकुलता एक मुलगा मागील बारा वर्षांपासून लांब आहेत, बायको मुलाला घेऊन माहेरी राहते आहे. संजयने पाच-सहा वर्षांपूर्वी पत्नीला फारकतची कायदेशीर नोटीस पाठवली होती. परंतु पत्नी फारकत द्यायला नाही म्हटली आणि तो विषय तिथेच संपला. संजयची पत्नी स्वतः नोकरी करुन मुलाला शाळेत घालून मागील बारा वर्षांपासून माहेरीच स्थिरावली होती, परंतु तिने घटस्फोटाला स्पष्ट नकार दिला होता. पत्नी आणि मुलाला भेटायला मात्र संजय येत जात असे. त्यांना शक्य तेवढी आर्थिक मदतदेखील करीत असे. पत्नीनेदेखील संजयला तिच्या माहेरी यायला, त्याच्याशी बोलायला, फोन करायला, त्याच्यासोबत मुलाला घेऊन कुठेही बाहेर जायला यायला कधीही बंदी घातली नव्हती. परंतु संजयची पत्नी कायमस्वरूपी त्याच्या घरी येऊन राहायला किंवा मुलाला त्याच्याकडे पाठवायला अजिबात तयार नव्हती. संजयला पत्नी आणि मुलाने कायमस्वरूपी परत त्याच्याकडे येण्यासाठी काय प्रयत्न करावेत या संदर्भात मार्गदर्शन हवे होते.

समुपदेशनाला आलेला संजय आता अंदाजे चाळीस वर्षांचा होता आणि बारा वर्षांपासून त्याचा संसार पत्नी आणि मुलगा असूनदेखील झालेला नव्हता. लग्नानंतर दोनच वर्षात मुलगा अतिशय लहान असताना पत्नी त्याला घेऊन कायमची माहेरी निघून गेली होती आणि संजय आजमितीला खूपच खचलेल्या अवस्थेत दिसत होता. संजयची तब्येतदेखील अतिशय उतरलेली दिसत होती आणि आर्थिक अवस्था सुद्धा बिकट जाणवत होती. वास्तविक संजयचा व्यवसाय आणि करिअर पाहिलं तर ते अतिशय उच्च दर्जाचे, उच्च शिक्षित, बुद्धिमान व्यक्ती करु शकेल असे क्षेत्र होते. संजयने स्वतःच्या क्षेत्रात खूप मेहनत आणि प्रगती देखील केलेली होती. अनेक वर्षांचा अनुभव त्याच्या गाठी होता, मोठ नावं लौकिक त्याने सामाजिक स्तरावर कमावलेलं होत, परंतु वैवाहिक आणि आर्थिक बाबतीत मात्र संजय स्वतःला सपशेल अपयशी समजत होता. संजयने मागील बारा वर्षाचा प्रापंचिक आढावा जेव्हा थोडक्यात सांगितला तेव्हा त्याचा संसार उध्वस्त होण्यामागील कारण हे त्याचेच विवाहबाह्य संबंध होते. हे संबंध आता पूर्णपणे संपुष्टात आले होते परंतु संजय ला मोठ्या प्रमाणात उध्वस्त करुन गेले होते. झाले असे होते की बारा वर्षांपूर्वी संजयच्या आयुष्यात त्याच्याच कार्यालयात काम करणारी सोनी (काल्पनिक नावं )अविवाहित मुलगी आली होती. सोनी दुसर्‍या छोट्या शहरातून नोकरी निमित्ताने आलेली असल्यामुळे तिच्या राहण्याची, जेवण्याची व्यवस्था संजयने स्वतःच्याच एका छोट्या रूममध्ये केलेली होती. कार्यालयीन कामात हुशार असल्यामुळे, संजयच्या प्रगतीला अपेक्षित असा हातभार लावण्यामुळे सोनी अतिशय अल्पावधीत संजयसाठी महत्वाची बनली होती. सुशिक्षित असल्यामुळे सोनीने कामाच्या सर्व जबाबदार्‍या लीलया पेलल्या होत्या आणि संजयच आता तिच्याशिवाय पान हालत नव्हतं. साहजिकच दोघांमध्ये होत असलेली अती जवळीक संजयच्या पत्नीला खटकू लागली होती आणि दोघांमध्ये वादविवाद सुरु झाले होते.

- Advertisement -

संजयची पत्नीदेखील उच्च शिक्षित आणि मोठ्या सुशिक्षित घरातील असल्यामुळे तीदेखील संजयला व्यावसायिक कामात हातभार लावत होतीच. संजयला मात्र आता सोनी जास्त जवळची झाल्यामुळे तो कार्यालयीन कामकाजातदेखील पत्नीचा सतत अपमान करणे, तिला कमी लेखणे, तिच्या कामात चुका काढणे या पद्धतीने वागत होता तर प्रापंचिक आयुष्यात पत्नीला संजय अजिबात किंमत देत नव्हता, न तिच्याशी कोणतेही पती पत्नी चे संबंध ठेवत होता. तरी सातत्याने पडती भूमिका घेऊन पत्नी त्याला सोनीपासून लांब होण्याची विनंती करीत होती. आताशा संजयचे सोनीला ज्या ठिकाणी वास्तव्यास ठेवले होते त्याठिकाणी स्वतः मुक्कामी राहणे, तिला सातत्याने स्वतःच्या राहत्या घरी पत्नी नसताना अथवा असताना देखील वेगवेगळ्या कारणांनी आणणे, तिला स्वतःच्या घरात हक्काने वावरू देणे, प्रत्येक घरगुती विषयात, कार्यक्रमात सहभागी होऊ देणे खूप वाढले होते. संजयच्या पत्नीचा संयम दिवसेंदिवस संपत चालला होता. आपल्या डोळ्यासमोर पतीचे असे अनैतिक संबंध सहन करणे तिला अशक्य होत होते. अनेकदा अनेक ठिकाणी संजयच्या पत्नीला सोनी आणि संजयचे वागणे बोलणे खटकत होते, दोघांमधील शारीरिक संबंधांचे पुरावे पत्नीच्या हाती लागले होते. संजयला याचा जाब विचारला असता तो पत्नीशी प्रचंड भांडण करणे, त्रागा करणे, तिला घरातून चालती हो म्हणणे, घटस्फोट घे असे म्हणून मानसिक त्रास देत होता. काहीही झाले तरी सोनी ला सोडणार नाही वाटल्यास तू कायमची चालती हो हिच भाषा संजय ची वेळोवेळी होती. अखेर तिने मुलाला घेऊन घर सोडले होते.

आता तर संजय ला कोणतीही आडकाठी राहिली नव्हती. बायकोला परत आणण्यासाठी ना संजय ने काही प्रयत्न केले, ना झालेल्या प्रकरणाबाबत त्याला काही पच्छाताप होता. आता सोनीला संजय थेट आपल्या राहत्या घरी घेऊन आला आणि दोघेही पती-पत्नीसारखे राहू लागले. संजयचे राहाते घर भाड्याचे असल्यामुळे घर मालकांनी त्याला ते घर सोडायला सांगितले, कारण आजूबाजूच्या लोकांनी संजयने बाहेरची बाई घरात आणून ठेवली आहे अशी तक्रार केली होती. संजय सोनीला घेऊन परत दुसर्‍या भाड्याच्या घरात राहू लागला. कार्यालयीन कामकाज सांभाळून दोघेही अनैतिक संबंध ठेऊन उघड उघड एकत्र राहत होते. सोनी दुसर्‍या शहरातील असल्यामुळे तिच्या घरच्यांना या गोष्टीचा थांगपत्ता नव्हता. संजयने कुटुंबातील सर्वांशी कायमचे संबंध तोडून टाकले होते, कारण त्याला काहीही झाले तरी सोनीला सोडायचे नव्हते. समुपदेशनावेळी संजय सांगत होता की, त्यावेळी त्याला सोनीशिवाय काहीही महत्वाचे नव्हते. ती अविवाहित होती, तिला माझ्याशी लग्न करायचे होते, ती लग्नासाठी माझ्या खूप मागे लागली होती त्यामुळे मी मंदिरात तिच्याशी लग्न केलें. तसेच माझे नावं तिला वापरता यावे म्हणून मी तिची अनेक कागदपत्रे माझ्या नावाने बनवली. माझे सर्व आर्थिक व्यवहार मी सोनीच्या ताब्यात दिले. सोनी आता संपूर्ण घर, सर्व व्यवहार तिच्या ताब्यात असल्यामुळे हवा तसा पैसा वापरू शकत होती. तिला हवं ते खरेदी करणं, टूर्सला जाणं, हॉटेलिंग, तिच्या आई वडिलांना पैसे पुरवणं हे सर्व निर्णय तीच घेत होती. मला ती कामात पण मदत करीत असल्यामुळे मला या खर्चाच तेव्हा जास्त काही विशेष वाटतं नव्हतं. परंतु माझा एक रुपया पण बचत होत नव्हता. मला घरचे व्यवस्थित जेवण कधी मिळत नव्हते. घरात अमाप नासधूस उधळमाधळ सुरु होती जी माझ्या पत्नीच्या काळात मला कधीच दिसली नव्हती. सोनीसोबत एकत्र राहायला लागल्यापासून संजयचे खर्चावरील नियंत्रण कोलमडले होते. सोनीने प्रचंड अट्टाहास करुन त्याला देश विदेशातील पर्यटन करायला भाग पाडले होते. सातत्याने बाहेरील खाणे, वेळीअवेळी खाणे यातून संजयची प्रकृती बिघडत होती. यामुळे एक दोन वेळा संजयला गंभीर आजारांना सामोरं जावं लागलं होतं. व्यावसायिक कामासाठी वापरण्याचे पैसे अनेकदा सोनीच्या हट्टांवर खर्च होत होते आणि त्यातून संजय कर्जबाजारी होत होता. दरवेळी घर मालकांना हे पती पत्नी नाहीत, अनैतिक संबंध आहेत असे समजल्यामुळे दोघांची हकालपट्टी होत होती.

- Advertisement -

सातत्याने भाडयाने नवीन ठिकाणी नवीन घर शोधणे, त्यासाठी होणारी धावपळ, डिपॉजिट, एजन्टचे कमिशन, भाडे याचा खर्च, सामानाचे ट्रान्सपोर्ट हे अनाठायी खर्च वाढले होते. कोणत्याच ठिकाणी व्यवस्थित बस्तान बसत नव्हते. संजय च्या सांगण्यानुसार सोनी सोबत राहत असतानाच त्याला वडिलोपार्जित मालमत्तेमधील हिस्सा म्हणून अतिशय सुंदर आणि मोठा बंगला मागील चार वर्षांपूर्वी मिळाला होता. आता तरी कायमस्वरूपी राहायला हक्काचे घर मिळाले म्हणून संजय परत नवीन दमाने कामाला लागला होता. परंतु सोनी ने नवनवीन व्यावसायिक कल्पना राबविणेसाठी, आतापर्यंत झालेले कर्ज फेडणेसाठी संजय ला त्या घरावर मोठया रकमेचे कर्ज घ्यायला भाग पाडले होते. अजूनही सोनीच्या प्रेमात संजय इतका आंधळा होता की आपण स्वतःचे किती नुकसान करुन घेत आहोत याची त्याला अजिबात तमा नव्हती. या नवीन बंगल्यात तर सोनीच मालकीण बनून राहत होती. तिने भावनिक करुन, दडपण आणून संजयला त्याच्या पत्नीला फारकतीची नोटीस पाठवायला भाग पाडले होते. त्यामुळे संजयचे सासुरवाडीशी संबंध बिघडून गेले होते. एव्हाना सोनीच्या घरी हे प्रकरण माहिती झाले होते आणि मिळालेल्या नवीन बंगल्याच्या लालसेपोटी, संजय सर्वबाजूनी एकटा पडला आहे हे पाहून आता सोनीच्या घरचे संजयला धमकवायला लागले होते. आमची मुलगी काय अशीच वापरणार का, तिला असच ठेवणार का, तिच्याशी लग्न कर अन्यथा तुझी पोलीस तक्रार करु, तिला लग्नाचे आमिष दाखवून तू तिच्यावर अनेक वर्ष जबरदस्ती करीत आहेस, अशी तक्रार तुझ्यावर ठोकू, तुझं करिअर बरबाद करु यासारख्या धमक्या संजयला मिळायला लागल्या होत्या. एक दोन वर्षे संजय बंगल्यावर घेतलेल्या कर्जाचे हफ्ते नियमित न भरू शकल्यामुळे, हौसमौज, हिंडणे फिरणे, उधळपट्टी सोनीने अजिबात कमी न केल्यामुळे इतर उधारी मोठ्या प्रमाणात झाली होती. अखेरीस बँकेने कर्ज वसुलीसाठी प्रचंड तगादा लावल्यामुळे, तसेच इतर सर्व कर्ज, उधारी फेडणेसाठी संजयला आयता मिळालेला दीड कोटींचा बंगला विकून टाकावा लागला होता आणि तो हक्काची मालमत्ता गमावून बसला होता. या सर्व बारा वर्षाच्या कालावधीमधील अत्यंत महत्वाची गोष्ट जी संजयने सांगितली होती ती खूपच वेदनादायी होती.

संजयने सांगितलं दोघे एकत्र राहत असताना अनेकदा संजयने सोनीला इतर पुरुषाशी, मुलांशी बोलताना, मेसेज करताना, फोटो व्हिडिओ शेअर करताना पकडले होते. दरवेळी सोनी त्याला वेगवेगळी कारणे सांगून, त्याची माफी मागून, रडून परत त्याची सहानुभूती मिळवून स्वतःच्या प्रेमात ओढत होती. पाच सहा वेळा सोनीची प्रेमप्रकरणं पकडूनसुद्धा संजय कोणतीही कठोर भूमिका घेऊ शकला नव्हता. आता आपल्याशिवाय संजयला पर्याय नाही हे सोनीने ओळखले होते. समुपदेशनाला आलेला संजय सांगत होता, काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये मोठे भांडण झाले. सोनीने संजयला ऐकवले होते की, तुझ्यासाठी मी आयुष्यातील बारा वर्षे वाया घालवली, तू कायदेशीर लग्न तर केलं नाहीच पण माझा गैरफायदा घेतला, माझा फक्त कामापुरता वापर केलास. त्यानंतर सोनी संजयला सोडून निघून गेली होती. काही महिन्यांपूर्वी संजयला समजले की, सोनीने स्वतःचा नवाकोरा फ्लॅट घेतला आहे आणि तिथे ती दुसर्‍याच व्यक्तीसोबत राहते आहे. संजयला मागील बारा वर्षात पूर्णतः कौटुंबिक, आर्थिक, व्यावसायिक, भावनिक बाबतीत बरबाद करुन सोनी कायमची सोडून गेली होती आणि दुसर्‍याच व्यक्तीसोबत आता पुढील आयुष्य व्यतीत करणार होती.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -