घरफिचर्सअभिनेता लोकेश गुप्तेचा 'दिग्दर्शकीय' पैलू

अभिनेता लोकेश गुप्तेचा ‘दिग्दर्शकीय’ पैलू

Subscribe

वादळवाट, बेधुंद मनाची लहर, जुळून येती रेशीम गाठी आणि खुलता खळी खुलेना अशा अनेक मालिकांमधून घराघरांत पोहचलेला अभिनेता लोकेश गुप्ते याने माय महानगरशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. माय महानगरच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सहभागी होत लोकेशने अभिनय क्षेत्रातील त्याचे अनुभव शेअर केले.

आजवर एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरुन प्रेम केलं आहे. माझ्या भूमिकांचं कौतुक केलं आहे. मात्र, आता मराठी चित्रपटसृष्टीत मी एक दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. ‘एक सांगायचंय…Unsaid Harmony’ या आगामी मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन मी केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्याचा माझा विचार होता. मात्र मी एका चांगल्या कथानकाच्या प्रतिक्षेत होतो. ‘एक सांगायचंय…Unsaid Harmony’ हा तोच चित्रपट आहे असं मला मनापासून वाटलं. आजची तरुण पिढी आणि पालक यांच्यामधील हरवलेल्या संवादावर हा चित्रपट भाष्य करतो. आपल्या आजूबाजूच्या अनेक घरांमधून खरोखरंच हा संवाद हरवला असल्याची जाणीव मला झाली. आजच्या काळात भेडसावणारी ही गंभीर समस्या, हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याची गरज आहे असं मला वाटलं आणि म्हणून याच सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करायचं असं मी ठरवलं.

चित्रपटात माझी तिहेरी भूमिका

या चित्रपटात मी स्वत: अभिनय करत नसलो तरी यामध्ये तिहेरी भूमिका साकारली आहे. ‘एक सांगायचंय..’ चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच मी त्याचं लेखन आणि संकलन अर्थात एडिटिंगसुद्धा केलं आहे. त्यामुळे मी लेखक, एडिटर आणि दिग्दर्शक अशा ३ भूमिका बजावल्या आहेत. चित्रपटाची कथा लिहीणं हे खूप मोठं चॅलेंज होतं. चित्रपटातील कथेचा विषय खूप वास्तवादी आहे. त्यामुळे याविषयाषी निगडीत माझ्या पाहण्यात, ऐकण्यात किंवा वाचण्यात जे काही येईल ते मला लिखाणात उतरवायचं होतं. त्यातही कथानकाचं संतुलन बिघडू न देण्याचं मोठं आव्हान माझ्यापुढे होतं. आजची तरुण मुलं आणि पालक दोघांच्या बाजू तोलून-मोलून मांडायच्या होत्या. कथेत कुणावरही अन्याय होऊ द्यायचा नव्हता. या चित्रपटाची कथा लिहायला मला एक ते सव्वा वर्षाचा काळ लागला.

- Advertisement -

कॅरेक्टरसाठी कलाकार निवडतना…

चित्रपटाची कथा, कथेतील गांभीर्य समजून घेतील तसंच कथेसाठी आवश्यक असलेला वेळ देऊ शकतील आणि कॅरेक्टरला पडद्यावर प्रामाणिकपणे साकारु शकतील असे कलाकार मला हवे होते. अभिनेते के.के.मेनन यांचं एखाद्या भूमिकेमध्ये जीव ओतून काम करणं सर्वांनाचा ठाऊक आहे. अनेक हिंदी चित्रपटांमधून आपण त्यांचा दमदार अभिनय पाहिला आहे. या कारणामुळेच मी चित्रपटासाठी त्यांची निवड केली. चित्रपटाचा विषय आवडल्यामुळे ‘के.के.’नी काही मिनिटातंच होकार दिला. त्यांनी चित्रपटासाठी अपेक्षित असेलला पूर्ण वेळही दिला. त्यांना मराठीची उत्तम जाण आहे. महाराष्ट्रात वाढल्यामुळे त्यांची मराठी उच्चारांवर छान पकड आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मराठीमध्ये संवाद बोलून घेणं मला सोपं गेलं. के.के. सर शूटिंगनंतर दररोज सकाळी डबिंगसाठी स्टुडिओमध्ये यायचे. डबिंगसाठी व्यवस्थीत वेळ घेऊन, घाईघाई न करता ते आपलं काम पूर्ण करायचे. स्वत:सोबतच ते इतरांचं डबिंग ऐकायलाही थांबायचे. इतरांच्या डबिंगमध्ये काही त्रुटी आढळल्यास ते आवर्जून सांगायचे. मला वाटतं यातूनच ते किती मोठे कलाकार आहेत हे दिसून येतं.

अभिनेत्री राजेश्वरी सचदेवची निवडही मी विचारपूर्वक केली. राजेश्वरी हा एक सिंपल चेहरा आहे, त्यामुळे चित्रपटाचा विषय ती स्क्रिनवर प्रभावीपणे मांडू शकेल याची मला खात्री होती. तसंच राजश्री आणि केके मेनन यांची जोडी छान जमून असंही कुठेतरी मला वाटतं होतं. चित्रपटामध्ये खरंच ही जोडी जमून आली आहे. चित्रपटामध्ये अससेल्या लहान मुलांच्या कॅरेक्टर्ससाठी मला मुद्दाम नवीन आणि रॉ चेहरे हवे होते. फेमस नसलेल्या आणि रॉ अवस्थेतील कलाकारांवर काम करणं आणि त्यांना घडवणं हे तुलनेने सोपं असतं. याशिवाय त्यांच्याकडून नॅचरल काम मिळतं.

- Advertisement -

मुलीचीही ऑडिशन घेतली 

‘एक सांगायचंय..’ या चित्रपटांत माधी मुलगी शुभवी गुप्तेसुद्धा अभिनय करत आहे. यानिमित्ताने ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे. चित्रपटाचं लिखाण करतानाच ‘इरा’ या कॅरेक्टरसाठी माझ्या मनात शुभवीचं नाव आलं होतं. शुभवीलाही याची थोडीफार कल्पना होती. ज्यावेळी ‘इरा’साठी शुभवीचं नाव नक्की करण्यात आलं त्यावेळी मी तिची रितसर ऑडिशन घेतली. मोबाईल कॅमेरावर मी तिची ऑडिशन घेतली आणि त्यानंतरच तिची निवड केली. माझी पत्नी चैत्राली गुप्ते हिने चित्रपटाचा कपडेपट सांभाळला आहे. चैत्रालीमध्ये असलेली कला यानिमित्ताने सर्वांसमोर येणार याचा मला आनंद आहे.

मालिकांनी घराघरांत पोहोचवलं

‘वादळवाट’ मालिकेने एक कालाकार म्हणून मला खूप काही दिलं. मालिकेतील समर अजिंक्य या पात्राने अभिनेता म्हणून मला नवी ओळख दिली. वादळवाट मालिका माझ्या आयुष्यातलं महत्वाचं वळण ठरलं. कारण मध्यंतरीचा काही काळ मी पूर्णत: एडिटींग क्षेत्रामध्ये होतो. मात्र, ज्यावेळी मी पुन्हा अभिनय क्षेत्रात यायचं ठरवलं त्यावेळी वादळवाटने मला नवा चेहरा दिला. जुळून येती रेशीमगाठी आणि खुलता कळी खुलेना या मालिकांमध्ये काम करण्याचा अनुभवही खूप समाधानकारक होता. जुळून येती… मध्ये आमचं खरंच एक कुटुंबं तयार झालं होतं. आजही आम्ही सगळे कलाकार एकमेकांच्या संपर्कात आहोत. मालिकेत मी अभिनेता ललित प्रभाकरच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. आजही मी आणि ललित भावंडांसारखेच वागतो.

शिस्तीचं महत्व कळलं

अकिरा हा हिंदी चित्रपट करत असताना मला शिस्तीचं महत्व कळलं. अकिरासाठी शूट करत असताना प्रत्येक छोट्यात छोट्या डिपार्टमेंटध्ये शिस्त पाहायला मिळाली. स्पॉट बॉयपासून सुपरस्टार सोनाक्षी सिन्हापर्यंत प्रत्येकाचा प्रामाणिकपणा, मेहनत आणि शिस्त या गोष्टी वाखाणण्याजोग्या होत्या. स्वत: स्टार असूनही सोनाक्षी सकाळी ७ च्या कॉलटाईमला ६:३० पासूनच सेटवर हजर असायची. हिंदीमध्ये काम करताना तुम्ही खूप गोष्टी नव्याने शिकता. प्रत्येक कलाकाराने विविध भाषांमध्ये काम केलं पाहिजे. मला स्वत:ला वेगवेगळ्या भाषेत काम करुन पाहायची इच्छा आहे. एक कलाकार म्हणून तुमचं काम बोललं पाहिजे. मराठी चित्रपट असो वा हिंदी असो कलाकाराने त्याची भूमिका उत्तम वठवली पाहिजे. मला नाही वाटत की कलाकाराला भाषेचं बंधन असतं. मला साऊथ इंडस्ट्रीमध्येसुद्धा काम करण्याची इच्छा आहे.

जे चुकीचं ते थांबायला हवं

सध्या सुरु असलेल्या मीटू प्रकरणामध्ये कोण खरं कोण खोटं याविषयी मी सांगू शकत नाही. मात्र, जे चुकीचं आहे ते थांबायला हवं असं माझं मत आहे. कुठलेही आरोप खरे आहेत की नाही हे पडताळून पाहायला हवं. कुणावरही आरोप लावण्याआधी किंवा लावलेल्या आरोपांवर बोलण्याआधी सत्याची पडताळणी झाली पाहिजे. एखाद्यावर खोटे आरोप करणं जसं चुकीचं आहे त्याप्रमाणे अशाप्रकारे अत्याचार होणंही चुकीचं आहे. जे चुकीचं आहे ते वेळीच थांबायला हवं.

खरंच अभिनय करायचाय का? विचार करा

या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्याला खरंच अभिनय करायचा आहे की निव्वळ प्रसिद्धीसाठी आपण या क्षेत्रात जात आहोत, याचा विचार करायला हवा. केवळ फेम आणि पैसा मिळवण्यासाठी या क्षेत्रात येत असाल दर दहावेळा विचार करा. कारण इथे खूप मेहनत आहे. अभिनय करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही. अभिनय करणं ही एक कला आहे. उद्या एखाद्याला वाटलं म्हणून तो डॉक्टर बनू शकत नाही, डॉक्टर बनून ऑपरेशन करु शकत नाही. त्यासाठी खूप अभ्यासाची आणि परिश्रमाची गरज असते. अभिनय क्षेत्राचंही असंच आहे.

…तर मराठी चित्रपटांना थिएटर मिळेल

मराठी चित्रपटांसाठी थिएटर मिळत नाही अशी ओरड होते पण मराठी प्रेक्षकांनीही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायला हवा. मराठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाण्याची गरज आहे. मराठी प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला तर कोणतंच थिएटर मराठी चित्रपटांना स्क्रीन देण्यापासून अडवू शकत नाही. याशिवाय अन्य राज्यांप्रमाणे आपल्याकडे मराठी भाषेतल्या चित्रपटांना अधिक प्राधान्य देण्याचीही गरज आहे. तसंच मराठी प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्यासाठी दर्जेदार कलाकृती देणं ही सिनेसृष्टीची जबाबदारी आहे

महानगराने काय दिलं?

‘मुंबई मेरी जान है’.  महानगराने मला काय दिलं हे शब्दांमध्ये मांडणं कठीण आहे. कारण आज लोकेश गुप्ते म्हणून मी जो काही आहे तो या महानगरामुळे आहे. या गोष्टीची जाणीव माझ्या मनात कायम राहील. मी जे शिकलो घडलो ते याच महानगरात. मुंबईने मला माझी ओळख दिली. एक अभिनेता म्हणून नावारुपाला आणलं. या सगळ्याच्या बदल्यात मी या महानगरला परत काही देऊ शकेन असं मला वाटत नाही. या गोष्टीची परतफेड करु शकेन या योग्यतेला मी अजून आलो आहे असं मला वाटत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -