घरफिचर्सशिवसेनेला जीवदान ही फडणवीसांची चूक

शिवसेनेला जीवदान ही फडणवीसांची चूक

Subscribe

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे लाड पुरवले. स्वतःला त्रास घेऊन शिवसेना पक्षप्रमुखांचे लाड पुरवले. २०१४ रोजी देखील भगवा लखोटा घेऊन हे काँग्रेसच्या तिरंग्या समोर गेले होते. शिवसेनेचा नकाब उतरवण्याचे काम मला दिले गेले आहे. ते मी करत आहे, अशी टीका महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री, आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी माय महानगरच्या ‘खुल्लमखुल्ला’ फेसबुक लाईव्ह दरम्यान भूमिका मांडली. २०१७ रोजी भाजपने मुंबई महानगरपालिकेत घवघवीत यश मिळवून देखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला पालिकेत सत्ता स्थापन करु दिली, ही आमची सर्वात मोठी चूक होती. महापालिकेत आम्ही तहात शिवसेनेची सुटका केली. पण ते मैत्रीच्या लायकीचे नाहीत, हे त्यांनी दाखवून दिले, अशी घणघाती टीका शेलार यांनी केली.२३ नोव्हेंबर रोजी आम्ही गनिमी कावा केला होता, मात्र तो अपयशी झाला. आता सांगायला हरकत नाही की, हा गनिमी कावा राष्ट्रवादीच्या संमतीने झाला होता. त्याचे उत्तर कालांतराने शरद पवार देतीलच. मात्र आता जे सरकार आले आहे, ते नैसर्गिक नसून अनैसर्गिक आहे आणि अनैसर्गिक गोष्टी जास्त दिवस टिकत नाहीत, असेही शेलार म्हणाले.

राज ठाकरेंकडे धडाडी, तर उद्धव ठाकरेंकडे चिकाटी
महाराष्ट्राच्या लोकशाहीचे तामिळनाडूमधील राजकारण व्हायला नको. महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद असायला हवा. मी देखील शरद पवारांकडे जातो. राज ठाकरे यांच्यासोबत माझी मैत्री आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे त्यांनी काम करावे, अशी अपेक्षा ठेवतो. राज ठाकरेंनी आजपासून नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. मनसेने पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत. आता भविष्यात धडाडी जिंकतेय की चिकाटी जिंकते हे पहावे लागेल. एका बाजुला धडाकेबाज राज ठाकरे आहेत, तर दुसर्‍या बाजुला चिकाटीबाज उद्धव ठाकरे आहेत. मी भाजपचा नेता असलो तरी एक राजकीय विश्लेषक या नात्याने माझे हे मत मांडतोय. “एकाकडे शैली आहे, तर दुसर्‍याकडे शिलता आहे. एकाकडे करिष्मा आहे, तर दुसर्‍याकडे कर्तुत्व आहे. त्यामुळे हा ‘धडाडी, शैली, करिष्मा आणि चिकाटी, शिलता, कर्तुत्व’ असा सामना आहे. यामध्ये कोण जिंकणार हे आगामी मुंबई महानगरपालिकेत ठरणार आहे. मात्र या दोघांपेक्षाही जास्त जागा भाजप जिंकून आणेल, हे देखील आजच सांगतो.

२०१३-१९ राज ठाकरेंचा बॅडपॅच
२०१३ ते २०१९ हा राज ठाकरेंचा बॅडपॅच होता, मला हे मान्य आहे. त्याचे विश्लेेषण ते स्वतः किंवा पत्रकारांनी करावे. पण मला असं वाटतं की राज ठाकरेंसारख्या नेत्याने राजकीय अडगळीत पडू नये. नेता म्हणून त्यांचे कर्तृत्व आहेच. त्यांच्याकडे एक दृष्टी आहे, पुढे येऊन धडाडीने नेतृत्व करण्याची क्षमता आहे, स्वतःचे हात उंचावण्याची धमक आहे, तसेच खिशात हात घालण्याची दानत आहे. या कौशल्याचा उपयोग त्यांच्या पक्षाला आणि राज्याला व्हावा. राज ठाकरे राजकीय अडगळीतून बाहेर येऊन मुख्य प्रवाहात यावेत, असे मला मनोमन वाटते.

- Advertisement -

हेडगेवार, गोळवलकर मराठीच होते
राज ठाकरे आता मराठीवरुन हिंदुत्वाच्या लाईनवर येत आहेत. मात्र हे दोन्ही विचार काही वेगळे नाहीत. शिवरायांनी मराठी असून जगावर छाप पाडणारे कर्तृत्व सिद्ध केले. आधुनिक भारतात हेडगेवार, सदाशिव गोळवलकर यांनी विश्व स्तरावरचे संघटन स्थापन करुन ते चालवून दाखवले, हे दोन्ही नेते मराठीच आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील हिंदुत्व देशभरात नेले. राज ठाकरे जर हिंदुत्वाकडे येत असतील तर त्यांचे आम्ही स्वागतच करु. मात्र आजच्या तारखेला आमची युती नाही किंवा ते भविष्यात आमच्यासोबत येतील का? हे देखील आज सांगता येत नाही.

भाजपमधील आयारामामुळे आमचे नुकसान झाले नाही, असे शेलार यांनी सांगितले. मुंबईत प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यामुळे पक्षाला फायदाच झाला आहे. दरेकर यांच्यामुळे मुंबै बँकेत विजय मिळवला. त्यामुळे हे दोन्ही नेते आगामी महानगरपालिकेत पक्षाच्या कामी येतील, अशी भावना शेलार यांनी व्यक्त केली. तरीही भाजपने जे इनकमिंग केले, त्यावर भाजपच्या निष्ठावान टीका केलेली आहे. ही टीका आम्ही आमच्यावरचा आशीर्वाद समजतो. मोठं राजकारण करण्यासाठी सबका साथ, सबका विकास हे तत्त्व धरुन चालावे लागते.

- Advertisement -

मला भाजपने दुर्लक्षित केले नाही

मला भाजपने कोणतेही पद दिले तरी मी आनंदाने तिथे काम करेल. भाजपने माझा अश्वत्थामा केलेला नाही. विधानसभेतील पहिलीच टर्म असलेला तरीही कॅबिनेट पद दिलेला एकही मंत्री भाजपमध्ये नाही. दिल्ली विधानसभेतील दहा मतदारसंघाचा प्रमुख मला केलेले आहे. गुजरात, कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा सहप्रमुख मला केले गेले आहे. चार महिने जे मंत्रिपद दिले, त्यातही मी चांगले काम करुन दाखवले. असेही मी लहानपणापासून संघशाखेत वावरल्यामुळे मंत्रीपद किंवा सत्तापद मला महत्त्वाचे वाटत नाही. ‘असू आम्ही पत्थर पायाचे, मंदिर होणे, हेच आमचे ध्येय’ हे ध्येय ठेवून आम्ही करतो. पायाचा पत्थर झालो तरी मंदिर बनले पाहिजे.

सरकारचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओकवर
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे एमएमआरडीएचे अध्यक्ष झालेले नाहीत. आता युडी ३ (नगर विकास ३) ची चर्चा सुरु झाली आहे. आतापर्यंत एमएमआरडीए आणि सिडकोचा अध्यक्ष नगर विकास मंत्री राहिलेला आहे. पण या सरकारमध्ये तसे झाले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवलेली नाहीत. ही त्यांची दिलदारी नसून भीती आहे. कारण सरकारचा रिमोट कंट्रोल मातोश्रीवर नाही तर सिल्व्हर ओकवर आहे. जर खाते घेतले तर फाईलवर वेळेत सही करावी लागेल. सही करण्यासाठी अभ्यास लागेल, निर्णय घेण्याची धमक लागेल. नाहीतर हाताला लकवा मारला काय? अशी टीका सिल्व्हर ओकवरुन होऊ शकते. मग आपण अडचणीत येण्यापेक्षा ठाण्यातील नेता अडचणीत आला तर काहीही फरक पडणार नाही, म्हणून नगर विकास एकनाथ शिंदेंकडे देण्यात आले. एकनाथ शिंदेवर अन्याय झाला आहे. मी आज सागंतो एमएमआरडी, सिडकोचे अध्यक्ष आदित्य ठाकरे होतील. हा निर्णय झाल्यानंतर आम्ही हा प्रश्न विचारू.

शिवसेना सूडाचे राजकारण करतेय
शिवसेनेने मागची पाच वर्ष भाजपबरोबर सत्तेत घालवली. मात्र त्याच सरकारचे निर्णय बदलण्याचे काम आता केले जात आहे. ज्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन भूमिपूजनाचे काम केले, त्या प्रकल्पाचे काम बंद केले जात आहे. शिवसेनेचे नेते निर्लज्जपणा करत आहेत. शॉर्टटम गेनमध्ये शिवसेनेचा लाँग टर्म प्लॅन भरकटला आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच. मात्र त्यांनी सूडाचे राजकारण करु नये. मेट्रो कारशेड बदलून मुंबईवर सूड घेतला जात नाही का? विरोधी नेत्यांची सुरक्षा काढून घेणे, नगर विकास आणि ग्रामविकासाचा निधी लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात वापरला जात होता, तो थांबविण्यात आला आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍याला दिलेला मतदारांना अधिकार बदलून पुन्हा आडते, दलालाकडे देण्यात आला आहे, हे सूडाचे राजकारण आहे. तुम्हाला सत्ता मिळाली आहे, ती लखलाख पण सुडाचे राजकारण करु नको.

फडणवीस ‘सिंह’ तर उद्धव ठाकरे ‘हरीण’
देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना करायची झाल्यास मी प्राण्यांचे उदाहरण देऊन तुलना करेन. देवेंद्र फडणवीस हे सिंह तर उद्धव ठाकरे हे हरीण आहेत. फडणवीस सिंहासारखे वागले. मुंबई -दिल्ली कॉरिडोर, मेट्रो, सर्वसमावेश निर्णय घेण्याची धडाडी त्यांच्यात आहे. सिंहाची चाल जशी असते तसे फडणवीस यांनी काम केले. दुसरीकडे ठाकरे आहेत. इकडून कोण टीका करेल, तिकडून अडचण होईल म्हणून महत्त्वाची जबाबदारी दुसर्‍याला दिली. भाषण करताना मी नम्र आहे असे सांगून जबाबदारी टाळणे हे हरणाचे गुण आहेत. सिंह आज वाट पाहतोय. सत्तेच्या जंगलात जे काही खेळ चाललेत, ते तो पाहतोय. योग्य वेळ आल्यावर सिंह शिकार करेल.

शब्दांकन – किशोर गायकवाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -