घरफिचर्सवो जो हममें तुममें करार था...

वो जो हममें तुममें करार था…

Subscribe

.संगीत मदन मोहनंच असतं, आवाज लता मंगेशकरांचा, ब्लॅक अँड व्हाईट पडद्यावर एक नायिका उमरावांसमोर गजल सादर करतेय आणि परिस्थितीनं गांजलेला हतबल विमनस्क संजीव कुमार ती ऐकतोय. हा चित्रपट १९७० मध्ये आलेला दस्तक असतो. हे गाणं रात्रीची निरव शांतता कापत जाणारं असतं. गुलशन बावराचे तुम्हे याद होगा, कभी हम मिले थे.. कापत जाणारे शब्द असतात.

हम है मताए कुचा ओ बाजार की तरह
उठती है हर निगाह खरीदार की तरह
…संगीत मदन मोहनंच असतं, आवाज लता मंगेशकरांचा, ब्लॅक अँड व्हाईट पडद्यावर एक नायिका उमरावांसमोर गजल सादर करतेय आणि परिस्थितीनं गांजलेला हतबल विमनस्क संजीव कुमार ती ऐकतोय. हा चित्रपट १९७० मध्ये आलेला दस्तक असतो. हे गाणं रात्रीची निरव शांतता कापत जाणारं असतं. गुलशन बावराचे तुम्हे याद होगा, कभी हम मिले थे.. कापत जाणारे शब्द असतात. त्यात जोड म्हणून हेमंत कुमारचा कातर थरथरणारा आवाज असतो नायिकेचा विरह लताच्या आवाजात असतो. ब्लॅक अँड व्हाईट पडद्यावर नटश्रेष्ठ बलराज साहनी, ट्रॅडेडी क्विन मीना कुमारी असते. चित्रपट सत्ता बाजार (१९६९) असतो. विरह वेदना, हतबलता, निर्व्याज प्रेम, सोसलेपण, आसक्ती व्यक्त करायला गझलेचा हात धरावाच लागतो. हिंदी पडद्यावरही तो सातत्याने धरला गेला. गझलेचा प्रत्येक शेर स्वतंत्र्य अभिव्यक्ती असते, त्यामुळे गझल कवितेसारखी उलगडत जात नाही, असा गझलेचा धडा कवीवर्य सुरेश भट यांनीच घालून दिला आहे. या हळूवार गझलेचा हात धरायला आता आयटम साँगचे फास्टफूड सिनेमे बनवणार्‍या अलिकडच्या बॉलिवूडकरांना बिल्कूल वेळ नाही.
गाणीवजा गझलंच हिंदी आणि मराठी पडद्यावरून दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे सुरेश भटांनी शिकवलेल्या गझलेचा शोध हा पुढचा टप्पा आहे. नगमा ओ शेर की, सौगात किसे पेश करू…मोत्यांची माळ ओठांत हलकेच दाबून…लखनवी अदबीनं दर्दी मैफिलीतल्या रसिकांची गायकीला परवानगी मागणारी मीना कुमारी हिंदी पडद्यावर आता नसते. त्यामुळे पाणावलेल्या सुनील दत्तच्या डोळ्यांतून, रंग और नूर की बारात किसे पेश करू…असं तिला पुन्हा साहीरच्या आवाजात विचारणारा रफीही नाही. केवळ गझलेला वाहिलेला गजल (१९६४) हा हिंदी पडद्यावरचा पहिला चित्रपट, यात लताची गझल लाडीक, थोडी खट्याळ, तरल, अलवार परिणाम करणारी, जसं पहाटेच्या गार धुक्यात लपलेली गर्द हिरवाई.. तर रफीची गझल अमावस्येच्या चांदण्यातला निबिड काळोख.

रस्म-ए-उल्फ़त को निभाएं तो निभाएं कैसे
हर तरफ़ आग है दामन को बचाएं कैसे

- Advertisement -

बोझ होता जो ग़मों का तो उठा भी लेते
ज़िंदगी बोझ बनी हो तो उठाएं कैसे

नक्श लायलपुरींच्या लेखणीतून उतरलेली ही वेदनेची गझल, संगीत मदन मोहनचं..साठचं दशक हा हिंदी पडद्यावरच्या उर्दू हिंदी गझलेचा सुवर्णकाळ गझलेवर निस्सीम प्रेम करणारे दर्दी रसिकांच्या हक्काचा होता. त्यावेळी चित्रपटांत ठुमरी, दादरा ऐकणं वर्ज्य नव्हतं. बेगम अख्तर हे नाव त्यात आघाडीवर होतं. पाकिजा, दस्तकमध्ये शमा जलाकर होणार्‍या या गझलेच्या मैफिली पडद्यावर खूप रंगवण्यात आल्या. ऐंशीच्या दशकांत गझल काहीशी रोमँटीक होत गेली. रजिया सुलतान आठवतो? हेमा मालिनी ऐ दिले नादाँ…आरजू क्या है, जुस्तजू क्या है? मनात उतरलेला हा गोड हळवा अनुभव काय आहे? असं ती मनालाच विचारतेय…खय्याम साहेबांनी संगीतसाज दिलेलं हे गाणं लता मंगेशकर यांचं आवडतं असल्याचं त्यांनी जावेद अख्तर यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. गंमत म्हणजे जावेदचे पिता जाँनिसार अख्तर यांनी ही रचना कागदावर उतरवली होती. त्या पुढचा काळ गुलाम अली, जगजीत, चित्रा सिंग, भुपेंद्र, पंकज, हेमलता, परवीन सुलताना ही मंडळीची गझल या काळातंच बहरली. साथ साथ (१९८२) यू जिंदगी की राह में मजबूर हो गये…दिप्ती नवल आणि फारुख शेख यांच्यातील विरह असतो. जावेद अख्तरची लेखणी असते आणि चित्रा सिंगचा आवाज असतो. त्याच वर्षात सागर सरहदींचा बाजार येतो. हा संपूर्ण गझलपट असतो. दिखाई दिये यूं के बेखूद किया, फिर छिडी रात बात फुलों की, करोगे याद तो…हर बात याद आयेगी जगजित सिंग, भुपेंद्र, लता, आशा यांच्या आवाजामुळे या गझलेच्या बाजारात दर्दी रसिक आजही गूम होऊन जातात. हमें तुमचे प्यार कितना म्हटलं की किशोर कुदरतमधला राजेश खन्ना आणि आवाजातला किशोर आठवतो, पण यातल्या याच शब्दांच्या याच सिनेमातल्या गायलेल्या ठुमरीसाठी परवीन सुलतानाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पंचमचं संगीत होतं.  मुज्जफर अलीच्या दिग्दर्शनातून ऐंशीच्या दशकात गमन पडद्यावर येतो. गावातलं घरातली चूल पेटावी म्हणून मुंबईसारख्या गर्दीत गूम झालेल्या टॅक्सी चालवणार्‍या फारुख शेख या श्रमिकाचा हतबल संघर्ष या चित्रपटांत असतो. यात नायकाच्या सीने में जलन असते…सुरेश वाडकरांनी प्लेबॅक सिंगर म्हणून करिअरला सुरुवात केली ती हीच गझल.

- Advertisement -

आपकी याद आती रही रातभर.
चष्मे नम मुस्कुराती रही रातभर
गावाकडच्या झोपडीवजा घरात चूलीवरचा अंगार फुलवणार्‍या स्मिता पाटीलचा छाया गांगुलीच्या आवाजातला हा गजल विरह कमालीचा वेदनादायक होतो. हे एकाकीपण अंगावर येणारं असतं, ते या गझलेतून समोर येतं. ऐंशीच्या दशकांत अनेक गझलपट हिंदी पडद्यावर आले. १९८१ मध्ये आहिस्ता आहिस्ता रिलिज होतो. कभी किसी को मुक्कम्मल जहाँ नही मिलता…ही गझल महत्वाची असते. खय्याम साहेबांनी हिंदी पडद्यावरच्या गझलेला आणखी सुंदर केलं. ऐंशीच्याच दशकातला उमराव जान यात मैलाचा दगड, इन आँखो की मस्ती के…मस्ताने हजारो है किंवा जुस्तजू जिसकी की उसको तो पाया हमनें या विरहवेदनेचे हे ऐंशीचे दशक कधीचेच मागे पडले आहे. गुलजारांची कविता हळूवार होती. त्यांनी स्वच्छ सुंदर आकृतीबंधातली गझल लिहली का? हा वादाचा विषय होता. इजाजत (१९८७) मध्ये खाली हात शाम आई है….अनुराधा पटेल आणि नसिरच्या विरहाचं हे गाणं आहे की गझल हा विषय त्यावेळी वादाचा होता. कतरा कतरा मिलती है आणि मेरे कुछ सामान याबाबतही हेच झालं.

चुपके चुपके रात दिन आसूँ बहाना याद है…जगण्यातून निसटलेला काळ आठवत गुलाम अलींची रेकॉर्डवरची गझल ऐकत सलमाच्या विरहात डोळे पुसणारा पश्चातापदग्ध दिपक पराशर आठवतो. ऐंशीचं दशक हे खर्‍या अर्थानं गझलपटांचं दशक होतं. नव्वदच्या दशक नव्या दमाच्या गझलकार आणि गायकांनी गाजवलं. आज कल याद कुछ और रहता नही…या ऋषी, श्रीदेवीच्या पडद्यावरील गाण्यानं आपल्याला फिल्म इंडस्ट्रीत मोठी इज्जत मिळाली. असं शब्बीर कुमारनं सांगितलं होतं. चमकते चाँद को टूटा हुवा तारा बना डाला (आवारगी १९८७) ही गुलाम अलींची गझल म्हणजे एकटेपणाच्या वेदनेचा कळस आहे. त्याआधी किसी नजर को तेरा इंतजार आज भी है (ऐतबार १९८५) भूपेंद्र सिंग आणि आशा या जोडीनं गाजवला. पंकज उधास आणि चंदन दास, अनुप जलोटा यांनीही आवर्जून गझल गायली. अलिकडच्या काळात २००३ मध्ये आलेला अनंत बालानींचा जॉगर्स पार्क हा अखेरचा गझलपट असावा. जगजीत सिंग यांची आठवणीतली गझल याच अखेरच्या काळातली. बडी नाजूक है..मंझिल मोहब्बत का सफर है…इश्क होता नही सबके लिए…अदनान सामीची ही गाणी कायम लक्षात राहाणारी. होश वालों को खबर क्या… गझल निदा फाजली यांची. आपल्याकडे मराठीत सुरेश भट यांनी जी सामाजिक आशयाची गझल लिहली तेच सूत्र निदा फाजली यांच्याही गजलेचं आहे. अशोक पत्कींच्या संगितात भुपेंद्र सिंग यांनी हसलीस एकदा..भिजल्या शारद राती, ही गझल मराठीत गायली. गझलेची भाषा बदलते पण तिची नजाकत, शिस्त आणि सौंदर्य, कायम राहतं. गालिबच्या भाषेत, हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहीश में दम निकले…अखेरचा श्वास, दम निघून जाईल पण गझल समजण्याची ती उलगडण्याची ही ख्वाहिश कधीच पूर्ण होत नाही, हीच उत्सुकता आणि कुतूहल कायम राहातं, हेच गझलेचं गमक….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -