ख्यातनाम कादंबरीकार शिवाजी सावंत

शिवाजी सावंत यांचा आज स्मृतिदिन. ते ख्यातनाम मराठी कादंबरीकार होते. त्यांचे संपूर्ण नाव शिवाजी गोविंदराव सावंत. त्यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजर्‍यालाच झाले. प्रथम वर्ष बी. ए. पर्यंत शिक्षण घेऊन पुढे वाणिज्य शाखेतून पदविका घेतली. त्यानंतर कोल्हापूरच्या ‘राजाराम प्रशाले’त त्यांनी अध्यापन केले (१९६२-७४). १९७४ मध्ये ते पुण्यास स्थायिक झाले. तेथे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याच्या लोकशिक्षण या मासिकाचे संपादक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९८३ मध्ये या मासिकाच्या संपादक पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

शिवाजी सावंत ‘राजाराम प्रशाले’त अध्यापन करीत असतानाच त्यांनी मृत्युंजय (१९६७) ही आपली पहिली कादंबरी लिहिली. या कादंबरीत कर्णाच्या अंतरंगात शिरून त्याच्या मनोविश्वाचा शोध घेण्याचा प्रगल्भ प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या ह्या पहिल्याच कादंबरीने प्रभावी कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली. ‘छावा’(१९७९) आणि ‘युगंधर’(२०००) या त्यांच्या त्यानंतरच्या कादंबर्‍या. छावा ही संभाजी महाराजांच्या जीवनावरची, तर युगंधर ही भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरची कादंबरी आहे. जीवनमूल्य नष्ट होत असताना आणि त्यामुळे सामाजिक विघटनाचा अनुभव येत असताना भारतीय मिथकांचा आणि इतिहासाचा आधार घेऊन मानवी जीवनातील आत्मिक शक्तींचा त्यांनी आपल्या कादंबर्‍यांतून पुरस्कार केला. ‘मृत्युंजय’ आणि ‘छावा’ या कादंबर्‍यांची नाट्यरूपेही त्यांनी निर्माण केली.

या साहित्यकृतींच्या व्यतिरिक्त सावंत यांनी जे लेखन केले, त्यांत ‘लढत’(दोन भाग-१९८६) आणि ‘संघर्ष’(१९९५) या दोन जीवनकहाण्यांचा अंतर्भाव होतो. ‘लढत’ ही सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे-पाटील यांची, तर ‘संघर्ष’ ही प्रसिद्घ कामगारनेते मनोहर कोतवाल यांची जीवनकहाणी. आपल्या जीवनात हाती घेतलेल्या कामासाठी ध्यास घेऊन काम करणारी ही माणसे त्यांना चरित्रकथनासाठी योग्य वाटली. ‘अशी मने असे नमुने’(१९७५) आणि ‘मोरावळा’(१९९८) मध्ये त्यांनी वेगवेगळ्या माणसांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. अशी मने असे नमुनेमध्ये त्यांच्या जीवनाशी एकरूप झालेली, त्यांच्यावर प्रेम करणारी, निर्मळ मनाची माणसे त्यांनी रंगविलेली आहेत, तर मोरावळामध्ये त्यांना भेटलेली शिक्षण, समाजकारण, राजकारण, प्रकाशन, साहित्य अशा क्षेत्रांतील कर्तृत्ववान माणसे त्यांनी शब्दचित्रित केली आहेत.

सावंत यांना अनेक साहित्य पुरस्कार आणि सन्मान मिळाले. मृत्युंजयला मिळालेले काही निवडक पुरस्कार असे: महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७), न. चिं. केळकर पुरस्कार (१९७२), भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ (१९९५), फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९६), आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (१९९८). छावालाही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला (१९८०). बडोदे येथे १९८३ मध्ये भरलेल्या ‘बडोदे मराठी साहित्यसंमेलना’चे ते अध्यक्ष होते. १९९७ मध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. कोल्हापूर येथे १९९८ मध्ये भरलेल्या सातव्या कामगार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अशा या महान साहित्यिकाचे १८ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.