घरफिचर्सफॅशन स्ट्रीट

फॅशन स्ट्रीट

Subscribe

वेगवेगळे फॅशनेबल कपडे, पादत्राणे, आभूषणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात, त्या दुकानाच्या तुलनेत स्वस्त मिळत असतात. जीन्स, टॉप असे कपडेही चांगले मिळतात; पण कुठल्याही ब्रँडेड वस्तू अथवा कपडे येथे मिळत नाहीत. मात्र ब्रँडेड वस्तू आणि कपड्यांची हुबेहूब नक्कल मात्र येथे नक्कीच मिळते.

गरज ही अविष्काराची जननी आहे असे म्हणतात. विशेषतः जेव्हा पोटाची खळगी भरायची असते तेव्हा या अविष्काराला एक वेगळाच आयाम प्राप्त होतो. मुंबईच्या बहुसंख्य बाजाराबाबत हे सूत्र १०० टक्के लागू पडते. मुंबईचे अनेक बाजार हे अशाच गरजेतून निर्माण झाले आणि आता जागतिक स्तरावर पोहचले आहेत. फॅशन स्ट्रीट मार्केट हे असेच निर्माण झाले आणि आता जागतिक स्तरावर पोहचले आहे. मुंबईत येणारे विदेशी पर्यटक किंवा देशी भटकंते हे फॅशन स्ट्रीटवर हमखास जातात, मग त्यांना खरेदी करायचे असो किंवा नाही.

ऐंशीच्या दशकात चर्चगेट स्टेशनबाहेर फेरीवाले बसायचे. हे फेरीवाले प्रामुख्याने कपडे, आभूषणे, पुस्तके आणि चप्पल, बूट विकायचे. त्यांनी संपूर्ण ओव्हल मैदान व्यापले होते. इतकेच नव्हेतर हे फेरीवाले फाऊंटनपासून ते थेट रिगल सिनेमापर्यंत पसरले होते. त्यांच्याकडे खरेदीला कॉलेजची मुले, मुली आणि चर्चगेट, फोर्ट परिसरातील नोकरदार यायचे. त्यातून या फेरीवाल्यांचा खूप धंदा व्हायचा. त्यामुळे येथील फेरीवाले दिवसेंदिवस वाढत होते. त्याचा परिणाम असा झाला की, चर्चगेट आणि फोर्ट या मुंबईच्या हेरिटेज भाग बकाल झाला होता. चर्चगेटमधील पारशी विहीर, इंग्रजांच्या काळात बांधलेल्या इमारती या फेरीवाल्यांच्या ताडपत्रीने झाकून गेल्या होत्या. ओव्हल, क्रॉस, आझाद मैदानाची रया गेली होती. नंतर नंतर तर पोलीस आणि महापालिका अधिकार्‍यांना लाच देऊन हे फेरीवाले सर्वसामान्यांवर दादागिरी करू लागले होते. त्यामुळे या फेरीवाल्यांच्या तक्रारी वाढल्या. पण मतांचे राजकारण आणि लाच यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. शेवटी जागतिक हेरिटेज कमिटीने मुंबईतील या पुरातन भागातील वारसा जपण्याची सूचना सरकारला केली आणि या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू झाली. हे फेरीवाले अनधिकृत होते. पण त्याचे कायदेशीर पुनर्वसन करावे आणि त्यातून आपल्या काही नेत्यांची, कार्यकर्त्यांची सोय व्हावी या हेतूने या फेरीवाल्यांना एम. जी. मार्गावर, ओव्हल क्रॉस मैदान, vsnl बिल्डिंग समोरच्या फुटपाथवर थेट मेट्रो येथील एअरफोर्स बिल्डिंगपर्यंत वसवण्याचा निर्णय झाला. अशा तर्‍हेने साधारण ८९-९० साली हा फॅशन स्ट्रीट बाजार अस्तित्वात आला.

- Advertisement -

हा बाजार म्हणजेच सोय होती. राजकारण्यांनी मतांची आणि कार्यकर्त्यांची केलेली सोय, पोलीस आणि महापालिका अधिकार्‍यांनी आपल्या हप्त्याची केलेली सोय, फेरीवाल्यांच्या पोटापाण्याची सोय आणि ग्राहकांना दुकानापेक्षा कमी किमतीत फॅशन करण्याची सोय. पण गेली दोन दशके हा बाजार नावारूपाला आला. येथे वेगवेगळे फॅशनेबल कपडे, पादत्राणे, आभूषणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात, त्या दुकानाच्या तुलनेत स्वस्त मिळत असतात. जीन्स, टॉप असे कपडेही चांगले मिळतात; पण कुठल्याही ब्रँडेड वस्तू अथवा कपडे येथे मिळत नाहीत. मात्र ब्रँडेड वस्तू आणि कपड्यांची हुबेहूब नक्कल मात्र येथे नक्कीच मिळते. त्यामुळेच येथे अनेकांची झुंबड उडालेली असते. येथील कपडे आणि वस्तू किती टिकाऊ असतात हा वादाचा मुद्दा आहे. पण त्या आकर्षक असतात इतके नक्की. येथे खरेदी करताना केवळ फॅशन इतकेच लक्षात ठेवायचे. त्या पलीकडे जाऊन जास्त विचार करायचा नाही. येथे खरेदी केलेले कपडे चारपाच वेळा वापरले की घरात घालायला नाहीतर पायपुसणे म्हणून कामाला येतात. घड्याळ आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तुंचेही तसेच, ते एकदा बिघडले की फेकून द्यायचे. नाहीतरी आताचा जमाना हा वापरा आणि फेकून द्या असाच आहे, त्यामुळे ज्यांना कमी पैशात फॅशन करायची आहे त्यांच्यासाठी हे मार्केट परफेक्ट आहे. येथे खरेदी करताना मात्र घासघीस करावी लागते.

प्रत्येक गाळ्यात एकच भाव अशी पाटी असली तरी बार्गेनिंग करावी. हे फेरीवाले जो भाव सांगतात त्यापेक्षा ३० ते ४० टक्केे कमी भावात ते माल विकतात, त्यामुळे किंमत ठरवतानाच ती मुळात ५० टक्के कमी भावात ठरवावी. पण त्याचाही एक नियम आहे. तुम्ही ज्या गाळ्यात खरेदीसाठी उभे आहात तेथे जर परदेशी किंवा मुंबई बाहेरील पर्यटक आले असतील तर तो फेरीवाला तुमच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही त्यामुळे अशा परिस्थितीत एकतर तेथून निघून अन्य गाळ्यात जावे किंवा ते पर्यटक जाईपर्यंत वाट पाहावी. येथे खरेदी केलेले कपडे बदलून दिले जातात; पण ते फक्त दुपारच्या वेळी. तशा सूचना हे फेरीवाले देतात. आता राहिला प्रश्न पैशाचा. तर येथे तुमच्या भावात खरेदी करायची असेल तर सर्वात चांगली वेळ ही सकाळची. ज्यावेळी हे फेरीवाले धंदा सुरू करतात ती. ती वेळ या फेरीवाल्यांच्या बोहणीची असते, बोहणी चांगली व्हावी, उगाच कटकट नको म्हणून हे फेरीवाले कमी किमतीत ही वस्तू विकायला तयार होतात.

- Advertisement -

येथे विकले जाणारे बहुसंख्य कपडे हे उल्हासनगर येथे तयार होतात. काही प्रमाणात इमामवाडा, मोहम्मद अली रोड, धारावी येथे तयार झालेले कपडे येथे विकले जातात, दादरच्या मार्केटमधूनही डिफेक्टेड माल येथे येतो. हे फेरीवाले हा माल घाऊक विकत घेत असल्यामुळे त्यांना तो स्वस्तात मिळतो, त्यामुळे तो ते स्वस्तात विकतात. मात्र येथील घड्याळे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू हा चायनीज माल असतो तो मनीष मार्केटच्या आजूबाजूला नव्याने तयार झालेल्या चायनीज मार्केटमधून येतो.

फॅशन स्ट्रीटवर फिरताना मात्र एक गोष्ट प्रकर्षाने खटकते ती म्हणजे या बाजारात मराठी तरुण कुठे आहे? फॅशन स्ट्रीटवर ३५७ पेक्षा जास्त गाळे आहेत. पण हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या गाळ्यातही मराठी तरुण नाही. तुम्हाला दिसतात ते युपी, बिहारचे भैया आणि तेथीलच मुस्लीम तरुण. मुंबईतील बहुसंख्य रस्त्यावरील बाजार आता मुस्लीम तरुणांनी व्यापले आहेत, फॅशन स्ट्रीट त्याला अपवाद नाही. मराठी तरुण फॅशन स्ट्रीटवर विक्रेता का नाही याचा शोध घेतला तर कळले की येथील बहुसंख्य गाळे हे मराठी राजकीय कार्यकर्ते आणि लहान नेत्यांचे आहेत, त्यांनी ते बक्कळ भाड्याने परप्रातीयांना चालवायला दिलेले आहेत. पण मराठी माणसाला मात्र नाही. अनेक वर्षे महापालिकेत सत्ता भोगणार्‍यांनी मराठी तरुणाच्या हातात झेंडे, दगड दिले; पण फॅशन स्ट्रीटवरील गाळे काही दिले नाहीत.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -