घरफिचर्सन बसणारी माणसं

न बसणारी माणसं

Subscribe

त्याच्या रिकाम्या झालेल्या चौथ्या सीटकडे पाहून मला आयत्या मिळालेल्या माझ्या विंडोसीटचा पश्चाताप वाटत होता, एखादा गुन्हा करून हताश मनाने गाडीतून उतरल्यासारखा मी पुढे बदलापूरला नेहमीसारखा उतरलो

मुंबईत येणार्‍या चाकरमान्यांचा लोकल प्रवास हा कायम चर्चेचा विषय. गर्दी, राजकीय चर्चा, भजनं, एकमेकांना समजून सांभाळून घेणं हा इथं रोजच्या जगण्याचा भाग असतो. रोजची गर्दी, रोजची घुसमटस रोजचंच ऑफीस आणि काम आणि रोज त्याच गर्दीत स्वतःला गुंडाळून परतीची लोकल. त्या दिवशी संध्याकाळी अशीच गर्दी होती. कर्जत फास्ट लोकलमध्ये. ऑफीस संध्याकाळी ८ वाजता सुटलं. मी दादरहून पावणे नऊची गाडी पकडली. माझा नेहमीचा ठरलेला डबा आणि ठरलेला ग्रूप असतो.

फलाटावरून लोकलच्या घुसमटीचा भाग झाल्यावर थोडी वाट काढत आत गेलो. त्यावेळी माझ्या लोकल डब्यातल्या मित्रांनी माझ्यासाठी जागा ठेवली होती. लोकल प्रवासाचा एक अलिखित नियम असतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून जे प्रवासी बसलेले असतात. त्यांना ठाणं आल्यावर उठावं लागतं, त्यानंतर दोन सीट्सच्या मधोमध असलेल्या जागेवर दुसरे प्रवासी बसतात. असंच वेस्टर्न ेरेल्वेतही होतं. इथं चर्चगेटला बसलेले बोरिवली आलं की उठतात. त्यावेळी मुंबई सेंट्रल आणि दादरला चढलेल्या प्रवाशांना बसायला मिळतं. त्या दिवशीही मी दादरला गाडी पकडल्यावर माझ्या ठरलेल्या सीटजवळ गेलो. तर त्या ठिकाणी आधीपासून तीन ते चार जण दोन सीट्सच्या मधोमध स्वतःला सांभाळत तग धरून उभे होते. आता मीसुद्धा त्यांच्या रांगेत होतो. माझा नंबर पाचवा असावा. ठाण्यापर्यंत जागा मिळण्याची काहीही शक्यता नव्हती.

- Advertisement -

कारण कर्जत गाडीमध्ये कल्याण, डोंबिवलीकरांचा भरणाही होत असतो. त्यामुळे कर्जत किंवा कसार्‍यातील प्रवाशांसोबत त्यांचे वाद नेहमीच होतात. तुम लोगोको कल्याण, डोंबिवलीका इतका गाडी होनेके बाद भी इधर कायको, मरने को आताय..अशी प्रश्नवजा खंत विचारली जाते. हे नेहमीच शब्द कानी पडले. पण माझ्या बसण्याच्या जागेची मला चिंता नव्हती. माझ्या ग्रुपमधलं कुणीही ठाण्याला उठणार आणि मला बसायला मिळेल, याची खात्री होती. त्यामुळे आता फक्त दोन सीट्सच्या मधोमध उभं राहाण्याची हक्काची जागा मिळवण्याचं आव्हान माझ्यापुढे होतं. राखीव जागेचा हा प्रश्न मी माझ्यापुरता सोडवला आणि रॅकच्या खाली असलेल्या खिडकीजवळच्या जागेत पुढे जाऊन उभा राहिलो. माझ्या पुढेही काही लोक होते. पण माझा ग्रुप मोठा असल्यानं कुणी आगे क्यूं घुसा…असं म्हणण्याची हिंमत करणार नाही. या भ्रमात मी होतो. हा भ्रमाचा भोपळा त्यानंतर फुटला.

घाटकोपरला गाडीचा वेग वाढतो. फास्ट गाडी अजूनच फास्ट होते. बाहेर पाऊस जिवाच्या आकांतानं कोसळंत होता. गाड्या लेट करणं हा रेल्वेचा मूलभूत अधिकार असल्याचं सर्वच प्रवाशांनी मान्य केल्यानं मीही बंड करण्याचा विचार सोडून देतो. रेल्वेला चारपाच शिव्या घातल्यावर राजकारण, समाजकारणावर चर्चा करणं मला आवडत नाही. कानात चुंबकाची मोबाईलची बोंडं टाकून आरडीच्या सांगितातला किशोर ऐकण्यात मला जास्त इंटरेस्ट असतो. मी तस्सच करतो. तोपर्यंत ठाणं आलेलं असत. मी मागून येऊनही माझ्यासाठी जागा बनवण्यात पटाईत असलेले माझे लोकलमित्र मला जागा करतात. अरे ये…कोपर्‍यातून आत ये. इथं जागा आहे. असं बोलल्यावर हा खोचक इशारा असतो जे छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून बसलेले असतात त्यांच्यासाठीचा, मी त्या जागेवर जाऊन बसणार असतो तेवढ्यात एक ४५ वर्षाचा साधारण कपडे असलेला माणूस माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहतो. माझा ग्रुप असल्यानं मी त्याकडे लक्ष देत नाही आणि मित्रानं मिळवलेल्या जागेवर निर्विकार चेहरा घेऊन बसतो. त्याचं म्हणणं मला ऐकू जात नाही. मी कानातून चुंबकाची बोंड काढतो आणि भाईगिरीच्या सुरात विचारतो. क्या भाई क्या प्रॉब्लेम है…तो सांगतो साब…८ घंटा लिफ्टमें खडा होकर ड्युटी करताय. इधर थोडा बैठने को दो, भायखला में चढा मै आपले पहले. तो मला आप म्हणत असतो आणि मी सुरुवातच तू..तेरी अशी केलेली असते. मला आता वाईट वाटलेलं असतं. मी खजिल होऊन त्याला जागा रिकामी करतो. तो सांगत असतो, भायखळ्यातल्या एका कंपनीत तो लिफ्टमन असतो. त्याला त्याच्या व्यवस्थापन कंपनीने सांगितलेलं असतं की लिफ्टमध्ये बसायचं नाही. आठ तासांची ड्युटी, कुणी अचानक दांडी मारलीच तर डबल ड्युटी आणि बसायचं नसतं.

- Advertisement -

लिफ्टही पायर्‍यांच्या त्रासापासून सुटका करून देणारी विज्ञानाची सोय असते. पायर्‍या चालणार्‍या दुखणार्‍या पायांना पर्याय असलेली ही विज्ञानाची ही सोय त्याच्यासाठी त्रासदायक असते. परेललमधल्या जुन्या चाळींच्या जागेवर उभारलेल्या चकाकत्या इमारतींमध्ये मी काही काळ नोकरी केली होती. तिथंही लिफ्टमन बसत नव्हता. तो का बसत नाही, असा प्रश्न तेव्हा रोजच्या नोकरीच्या धावपळीत मला कधी पडला नव्हता. आता हा प्रश्न पुन्हा समोर आला. कायको बैठनेको नई देता तुम लोगोंको, तर तो म्हणाला..हम बैठ गया तो वो सेट लोग कंप्लेट करते हे..नौकरी जाती है. केवळ बसल्यानं नोकरी जाऊ शकते, हे भयंकर जीवघेणं वास्तव माझ्या मनाचा ताबा घेतं. एसी ऑफिसात खुर्चीवर आरामात बसून काम करणारा मी त्याच्या उत्तरानं चपापतो. फस्ट क्लासमध्ये असली भानगड नसते. तिथं स्पंजच्या सीटवर बसणारे बहुतेक बसून काम करणारेच असतात. तर बसून खाणं म्हणजे ऐतखाऊ..अशी व्याख्या मला शिकवलेली असते. त्यावेळी त्या लिफ्टमनच्या तुलनेत मी ऐतखाऊच असतो, आपला हक्क नसतानाही लोकल सीटवर हक्क सांगणारा संधीसाधू, मी त्याला बसायला देतो. त्यावेळी ठाणे -डोंबिवलीच्या बोगद्यात गाडी असते. तो सांगतो. मेरा बेटा है अभी मॅट्रीक में उसको ९२ पर्संट मिला. एक बेटी है शादी करनी है उसकी, हम लोगोंमे बहुत दहेज मांगताय, तो कमाना पडताय वो भी काम पे जाती है. उल्हासनगरमें जिन्स कारखाने में कपडे को बटन लगाती है..मला त्याच्या बायकोविषयी विचारण्याचा धीर नसतो. पण तो सांगतो, उसकी माँ दो साल पहले मर डॉक्टर बोले गुर्दा खराब हो गया था…जितना था उतना पैसा डाला लेकीन बची नही, अब कर्जा है वो भर रहा हूँ…असं बोलताना त्याचा चेहरा शून्यात गेला…विठ्ठलवाडी जवळ येत होतं पण तो शून्यातंच होता. आता लोकल बर्‍यापैकी रिकामी झाली होती, पण तो चौथ्या सीटवरून विंडोसीटकडे थोडासाही सरकला नाही आणि उल्हासनगर आल्यावर उतरला. त्याच्या रिकाम्या झालेल्या चौथ्या सीटकडे पाहून मला आयत्या मिळालेल्या माझ्या विंडोसीटचा पश्चाताप वाटत होता, एखादा गुन्हा करून हताश मनाने गाडीतून उतरल्यासारखा मी पुढे बदलापूरला नेहमीसारखा उतरलो, आता आयत्या जागेवर डल्ला मारायचं मी सोडलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -