झुंजार कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस

सहा भावंडांमध्ये जॉर्ज सर्वात मोठे होते. त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांना रोमन कॅथॉलिक धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले, मात्र जॉर्ज यांनी ते पूर्ण करण्याऐवजी, वयाच्या १९ व्या वर्षी मंगलोरमधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचे काम केले.

जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस हे कामगार नेते, पत्रकार आणि संसदपटू, भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्वाचे नेते, तसेच जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला. त्यांचा जन्म ३ जून १९३० रोजी जॉन जोसेफ फर्नांडिस आणि एलिस मार्था फर्नांडिस या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे वडील एका खासगी विमा कंपनीत अधिकारी होते.

सहा भावंडांमध्ये जॉर्ज सर्वात मोठे होते. त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांना रोमन कॅथॉलिक धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले, मात्र जॉर्ज यांनी ते पूर्ण करण्याऐवजी, वयाच्या १९ व्या वर्षी मंगलोरमधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचे काम केले. ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होती. १९४९ मध्ये जॉर्ज नोकरीच्या शोधात मुंबईत आले. त्यावेळी सुरुवातीचे त्यांचे दिवस फार खडतर होते, पण त्यांची चिकाटी यावेळी उपयोगी पडली.

त्यांनी सर्वप्रथम १९६७ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स.का.पाटील यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी १९७४ मध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. १९७७ मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम पाहिले. १९९४ मध्ये बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांनी समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले. अशा या महान कामगार नेत्याचे २९ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले.