घरफिचर्सफिल्म दीवाने क्रिकेट मैदानावर

फिल्म दीवाने क्रिकेट मैदानावर

Subscribe

दिग्दर्शक मनमोहन देसाई आयुष्यभर गिरगावातील खेतवाडीत 'प्रताप निवास'मध्ये राहिले. म्ही गिरगावकर हक्काने आणि हट्टाने त्यांना 'मनजी' म्हणत असू आणि चित्रपटसृष्टीतही ते त्याच नावाने परिचित होते. सर्वसामान्य गिरगावकराप्रमाणेच त्यांनाही क्रिकेटचे भारी  वेड! 

लेखासोबतचे छायाचित्र पाहिलेत? एखाद्या खूप जुन्या फलकाबाबत इथं कौतुकानं लिहिण्याचं कारण काय असं वाटलं ना? तर  ऐका,

जी. टी. क्रिकेट क्लब म्हणजे, गिल्डर टँक क्रिकेट क्लब. हा फलक आहे दक्षिण मुंबईतल्या डॉ. भडकमकर मार्गावर. हा पूर्वीचा लँमिग्टन रोड. इंग्रजांच्या काळात लँमिंग्टन नावाचे सिनेमा थिएटर होते, म्हणून त्या नावाने हा रस्ता ओळखला जाई. ते पाडून ‘अप्सरा थिएटर’ उभे राहिले आणि १९६४ साली ‘संगम ‘ चित्रपटाने त्याचे उदघाटन झाले. दशकभरापूर्वी तेही पाडून नवीन इमारत उभी राहिलीय. त्याच्या साधारण समोर हा फलक आहे आणि या प्रवासात हा फलक मात्र १९६० सालापासून त्या जागी कायम उभा आहे.

- Advertisement -

एव्हाना तुमच्या मनात आले असेल की एका क्रिकेट क्लबचा तर तो फलक आहे असे मनात आले असेलही. काहींनी मात्र एव्हाना त्यावरील नावे वाचली असतील आणि निर्माता आणि दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचे नाव वाचून त्यांचेही कुतुहल वाढले असणार. आम्ही गिरगावकर हक्काने आणि हट्टाने त्यांना ‘मनजी’ म्हणत असू आणि चित्रपटसृष्टीतही ते त्याच नावाने परिचित होते. त्यांचे अफाट-भन्नाट क्रिकेटप्रेम कायमच सगळ्यांच्या कौतुकाचा विषय राहिले.

मनजी आयुष्यभर गिरगावातील खेतवाडीत ‘प्रताप निवास’मध्ये राहिले. आणि सर्वसामान्य गिरगावकराप्रमाणेच त्यांनाही क्रिकेटचे भारी  वेड! तेवढ्यावरच थांबतील ते मनजी कसले? त्यांच्या मसालेदार चित्रपटासारखा सगळ्या गोष्टींचा समरसून आनंद घ्यायचा त्यांचा स्वभाव होता. ते मराठीही उत्तमच बोलत.

- Advertisement -

जी. टी. क्रिकेट क्लबच्या फलकावरील आणखी दोन गोष्टी बघा. एक म्हणजे मनजींचे नाव ‘मॅनेजमेंट’ म्हणून दिलेय. म्हणजेच या क्लबची व्यवस्था ते पाहत असत. या फलकावर कोपर्‍यात या क्लबची स्थापना १९६० साली झाल्याचे स्पष्ट दिसेल. मनजींचा दिग्दर्शकानातील पहिला चित्रपट ‘छलियाँ’० १९६० चाच आहे. म्हणजेच मनजींचे दिग्दर्शन आणि क्रिकेट प्रेम एकदमच फुलायला सुरुवात झाली. मनजींनी ब्लफमास्टर, सच्चा झूठा, रामपूर का लक्ष्मण, रोटी, अमर अकबर अँन्थनी, परवरीश, धरमवीर, नसीब, कुली, मर्द इत्यादी सुपरहिट चित्रपट दिले हे सर्वांनाच माहिती आहे. पण या सगळ्या प्रवासात ते जेव्हा-जेव्हा शक्य असेल तेव्ह ते गिल्डन टँकच्या मैदानावर हमखास क्रिकेट खेळताना दिसत. मनसोक्त फटकेबाजी हा त्यांचा सर्वात आवडता गुण. अगदी न कंटाळता बराच वेळ खेळत. पांढरे शुभ्र कपडे हा त्यांचा जणू ड्रेस कोड!

ऐंशीच्या दशकात सिनेपत्रकार म्हणून त्यांच्या काही चित्रपटांच्या सेटवर जाण्याचा योग आला. तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात येई, की नेमक्या त्याच दिवशी आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा जगभरात कुठेही सामना असेल तर त्यांनी सेटवर तो सामना पाहण्यासाठी दूरदर्शन संचाची व्यवस्था केलीय. अधेमधे मॅच पाहूनच त्याना उर्जा मिळतेय हे लक्षात यायचे.’ ‘गंगा जमुना सरस्वती ‘च्या नटराज स्टुडिओतील सेटवर तर मी त्यांची क्रिकेट प्रेमावरच मनसोक्त मनमुराद मुलाखत घेतलेली आठवते. मनजी स्पष्ट आणि सडेतोड बोलत. त्यांची क्रिकेटची समज उत्तम होती.

मनजी गेले तो दिवस होता १ मार्च १९९४. या गोष्टीलाही २४ वर्षे झाली, तरीही हा फलक तेथे कायम आहे हे विशेष! त्यांनी दिलेल्या अद्भुत कलाकृतींच्या रूपात त्यांची स्मृती कायम आहेच, पण या फलकाने त्यांचे क्रिकेट प्रेमही कायम आहे! काही फिल्मवाल्यांचे पडद्यापलिकडील विश्वातही शाश्वत अस्तित्व असते ते हे असे….


–   दिलीप ठाकूर

(लेखक ज्येष्ठ सिने पत्रकार आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -