घरफिचर्सस्त्रीचे आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचे

स्त्रीचे आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचे

Subscribe

गटचर्चामधून पत्नीला एकटं वाटू नये म्हणून काय केलं, घरात आणि घराबाहेर कोणती कामे करता, मूल होण्याचा निर्णय एकत्र घेतला का असे अनेक प्रश्न चर्चेला आले. प्रत्येक लग्नाची एक गोष्ट असते. ती गोष्ट पुढे आली. गटचर्चामधून बोलतं झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावर दिसत होता. मला जाणीव आहे की हा प्रयोग छोटासा आहे. पण या प्रयोगाचे परिणाम दिसतात

स्त्रियांमधल्या अर्थार्जनाला उतरती कळा लागल्याची चर्चा आपण केली. ही चर्चा करताना स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा,असं म्हटलं होतं. पण हे फारच मोघम विधान आहे नाही का? दृष्टीकोन बदलायचा म्हणजे करायचं काय? आपण पाहिलं असेल की चर्चा बलात्कारावर असो की कौटुंबिक हिंसाचारावर, स्त्रियांच्या शिक्षणावर किंवा त्यांच्या राजकारणातल्या सहभागाबद्दल..चर्चेची गाडी हमखास दृष्टीकोन बदलण्याच्या मुद्यावर येतेच येते. नेमकं करायचं काय हे कळत नसल्यानं ऐकणार्‍याचा गोंधळ उडून जातो.

पण अनेक कार्यकर्ते विचारवंत या प्रश्नाचा विचार सातत्यानं करत आहेत. १९७५ नंतर स्त्रीमुक्ती चळवळ रुजायला लागली. त्या नंतरच्या चार दशकांत खूप पाणी पुलाखालून वाहून गेलं. कुटुंबसंस्थेला नामशेष करणारी, घराघरात कलह तयार करणारी, स्वैराचाराचा पुरस्कार करणारी ही चळवळ नाही हे समंजस लोक समजून चुकले आहेत. उलट ही स्त्रियांची तशीच पुरुषांचीसुद्धा चळवळ आहे, स्वतःशी संवाद स्त्रियांबरोबरीनं आपणही करायचा आहे, एकमेकांशीसुद्धा संवाद करायचा आहे, ही जाणीव अंकुरते आहे. स्त्रियांच्या चळवळीत पुरुषांचंही परिवर्तन अभिप्रेत आहे हे काही समंजस पुरुष मान्य करतात. हीच तर दृष्टीकोनातल्या बदलाची सुरुवात असते नाही का?

- Advertisement -

याच परिवर्तनाच्या पालखीत सामील झालेल्या एका प्रयोगाची नव्हे प्रकल्पाची माहिती मला सांगायची आहे. या प्रकल्पाचं नाव आहे समजदार जोडीदार प्रकल्प. ‘सेंटर फॉर हेल्थ अँड सोशल जस्टीस’ या दिल्लीस्थित संस्थेच्या अखत्यारित हा प्रकल्प सुरु झाला. या प्रकल्पाचं संयोजन अगदी वास्तववादी केलं होतं. मानसिकतेच्या बदलाची सुरुवात जनमानसातूनच व्हायला हवी हे नक्की होतं. प्रकल्पात महाराष्ट्रातली १०० गावं घेण्यात आली. या गावातून काम करणार्‍या, आपल्या कामातून गावकर्‍यांचा विश्वास संपादन केलेल्या पाच संघटनांची निवड करण्यात आली. पुण्याजवळ काम करणारी नारी समता मंच, सोलापूर जिल्ह्यात अणदूरला वैद्यकीय काम करणारी हॅलो मेडिकल फाऊंडेशन या त्यातल्याच दोन संघटना. पुरुषप्रधानता आपल्या हाडामाशी रुळली असली, तरी प्रत्येक गावात एखादा तरी संवेदनाक्षम पुरुष या प्रधानतेपलिकडे जाऊन विचार करू शकतो, असा ठाम विश्वास या संघटनेच्या कार्यकर्त्यांना होता. त्या विश्वासाच्या बळावर त्यांनी प्रत्येक गावातून एकाची प्रेरक म्हणून निवड केली.

गावागावात या प्रेरकांच्या मदतीनं गट तयार झाले. बघता बघता २०० गट तयार झाले. प्रत्येक गटात २० सदस्य. याचा अर्थ असा की ग्रामीण भागातले चार हजार पुरुष संवादासाठी तयार झाले. निवडलेल्या प्रेरकांचं प्रशिक्षण घेण्यात आलं. आरोग्यविषयक शैक्षणिक प्रश्न कौटुंबिक हिंसाचार याबद्दल त्यांच्याशी वेळोवेळी संवाद करून त्यांना खर्‍या अर्थानं प्रेरक करण्यात आलं. त्या त्या भागातल्या संघटनांचा या प्रशिक्षणात, गटचर्चामध्ये सहभाग होताच. त्या त्या गावातले प्रश्न या गटांमधून ऐरणीवर आले. चर्चा आणि संवाद या माध्यमातून मानसिकता बदलायला लागली. या बदललेल्या मानसिकतेचा प्रत्यक्ष वागण्यात परिणाम झाला. २०१० ते २०१५ या काळात राबवलेल्या या प्रकल्पात गावातला कौटुंबिक हिंसाचार कमी झाला. पुरुष घरकामात, बालसंगोपनात अधिक सहभाग घेऊ लागले. आपल्या पत्नीला घराबाहेर जाऊन काम करायला प्रोत्साहन देऊ लागले. कमी वयात गावात लग्न होत असेल तर गावकरीच विरोध करायला लागले. हुंडा देण्याघेण्याला विरोध होऊ लागला. विशेष म्हणजे आरोग्याच्या प्रश्नातली पुरुषांची गुंतवणूक वाढली तर स्त्रियांच्या ग्रामसभा स्थापन होऊन गावाच्या कामांमध्ये स्त्रिया अधिक कृतीशील झाल्या. मुख्य म्हणजे पुरुषपणाचे निकष बदलताना दिसले. अगदी सुरुवातीला आपण दृष्टिकोनातला बदल म्हणत होतो तो हाच नाही का?

- Advertisement -

या प्रकल्पात सामील झालेल्या हॅलो मेडिकल फाऊंडेशनने बनवलेली आपल्या गावपातळीवर काम करणार्‍या कार्यकर्त्यांसाठीची पुस्तिका माझ्या वाचनात आली. त्यात हिंसा म्हणजे काय, हिंसेचे प्रकार कोणते, वयोमानानुसार होणारी हिंसा कोणती, हे हिंसेचं चक्र आपण कसे थांबवू शकतो अशा विविध प्रश्नांचा सांगोपांग विचार केला आहे. हिंसाचाराच्या घटना घडल्या तर मदत करणार्‍या संस्था आणि संघटनांची माहिती दिली आहे. गावाच्या पातळीवरच्या प्रश्नाचं संशोधन कसं करावं याची माहिती दिली आहे. इतकं बैजवार काम केल्यावर का नाही त्याचे परिणाम दिसून येणार? आणि परिणाम दिसायला लागले आहेत. गेल्या वर्षी अणदूरला हॅलो मेडिकल फाऊंडेशनच्या जानकी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात समजदार जोडीदारांचा मोठा मेळावा झाला. लोहारा आणि तुळजापूर तालुक्यातल्या चाळीस गावांमधून २०० जोडपी या मेळाव्याला आली होती. प्रसन्न वातावरणात हा मेळावा झाला.

पुरुष जोडीदारानं स्त्री जोडीदाराला गजरा माळून आणि स्त्रीने पुरुषाला गुलाबाचं फूल देऊन वातावरण रोमँटिक केलं. गटचर्चामधून पत्नीला एकटं वाटू नये म्हणून काय केलं, घरात आणि घराबाहेर कोणती कामे करता, मूल होण्याचा निर्णय एकत्र घेतला का असे अनेक प्रश्न चर्चेला आले. प्रत्येक लग्नाची एक गोष्ट असते. ती गोष्ट पुढे आली. गटचर्चामधून बोलतं झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावर दिसत होता. मला जाणीव आहे की हा प्रयोग छोटासा आहे. पण या प्रयोगाचे परिणाम दिसतात. स्त्रिया अधिक सक्षम होऊन, त्यांचा आत्मविश्वास वाढून समाजकारणात गावाच्या कामांमध्ये भाग घेताना दिसतात. स्त्रियांचे प्रश्न म्हणजे रडारड असा समज झाला आहे. पण या रडारडीला आपणही कळत-नकळत खतपाणी घालतो ना?याची जाणीव झाली तर चित्र किती बदलू शकतं ते बघा.


-सरिता आवाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -