घरफिचर्सगुंतवणूक वाढीचेही ‘उडाण’

गुंतवणूक वाढीचेही ‘उडाण’

Subscribe

नाशिकमध्ये राजधानी एक्स्प्रेसला थांबा मिळाला आहे. उडाण योजनेंतर्गत नवीन सहा प्रमुख शहरांशी विमानसेवेने जोडले जाणार आहे. मुंबईला जोडण्यासाठी आता लोकल ट्रेनचीही चाचणी घेण्यात येणार आहे. नागपूरला जोडल्या जाणार्‍या समृद्धी महामार्गाचेही काम नाशिकमध्ये आता सुरू झाले आहे. गुजरातला जोडल्या जाणार्‍या सुरत-हैदराबाद आठ पदरी महामार्गासाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ७० गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षणही पूर्णत्वास आले आहे. या सर्व बाबी नाशिकच्या गुंतवणूक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

सुमारे अडीचशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या नाशिकने मागील दशकभरात केलेली प्रगती अचंबित करणारी आहे. १९८२ मध्ये महापालिका स्थापनेवेळी चार लाख असलेली लोकसंख्या सद्य:स्थितीत २० लाखांच्या घरात गेली आहे. महामार्ग, रेल्वेमार्ग आणि आता हवाई वाहतुकीसाठी सुरू असलेले जोरदार प्रयत्न यामुळे नाशिक शहर हे नगरी मुंबई, पुणे, ठाण्यासह गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांसाठीही महत्त्वपूर्ण ठरू लागले आहे. नाशिकचे वाढते महत्त्व गुंतवणुकीसाठी बेरजेचे कारण ठरू शकते. आजवर नाशिककरांसह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना दिल्ली गाठण्यासाठी राजधानी एक्स्प्रेस उपलब्ध नव्हती. ही गाडी पकडण्यासाठी नाशिककरांना प्रथम मुंबई गाठावी लागत असे. ही अडचण ओळखून खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिकमार्गे नुकतीच राजधानी एक्स्प्रेस सुरू झाली आहे. नाशिकमार्गे दिल्लीसाठी राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याची नाशिककरांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. त्यामुळे ऑक्टोबर २०१३ मध्ये तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी शरद पवार यांच्या माध्यमातून तत्कालीन रेल्वेमंत्र्यांकडे नाशिककरांची ही मागणी मांडून पाठपुरावाही केला होता.

- Advertisement -

त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर लोकमान्य टिळक टर्मिनस हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस ही गाडी सुरू करण्यात आली होती. या गाडीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याने ती रेल्वे मंत्रालयाने पुढे कायम केली. गेल्या साडेपाच वर्षांपासून ही गाडी प्रवाशांना चांगली सेवा देत आहे. या गाडीलाही राजधानीचेच डबे आहेत. नव्याने नाशिकमार्गे सुरू झालेल्या राजधानी एक्स्प्रेसप्रमाणेच या गाडीलाही वेळ लागतो. केवळ जळगावऐवजी भुसावळला या जुन्या गाडीला थांबा आहे. त्यामुळे या गाडीलाही राजधानीचा दर्जा दिल्यास उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना दिल्ली गाठण्यासाठी दोन राजधानी एक्स्प्रेसची सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे कसारा ते नाशिकरोड दरम्यानच्या लोहमार्गावर लवकरच लोकलची चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर नाशिक आणि मुंबईला लोकलने जोडण्याचे नाशिककरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

लोकलच्या चाचणीसंदर्भात मध्य रेल्वेने जोरदार तयारी सुरू केली आहे. पुढच्या 15 दिवसांत ही चाचणी घेतली जाणार आहे. तसेच राजनाधी एक्स्प्रेसदेखील मनमाडमार्गे वळवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. कल्याण ते नाशिक रोड लोकलची येत्या १५ दिवसांत चाचणी घेतली जाणार आहे. नाशिककरांसाठी ही आनंदाची वार्ता असून, अनेक वर्षांपासूनची नाशिककरांची ही मागणी अखेर पूर्ण होताना दिसत आहे. मध्य रेल्वेकडून याची तयारी सुरू असून, नाशिकहून जे लोक नोकरीसाठी दररोज मुंबईला ये-जा करतात त्यांच्यासाठी ही मोठी सोय होणार आहे. त्याचबरोबर, राजधानी एक्स्प्रेस मनमाडमार्गे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचीही चाचणी येत्या १५ दिवसांत घेतली जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. रेल्वेच्या या निर्णयामुळे दररोज नाशिक-मुंबई दरम्यान प्रवास करणार्‍या चाकरमान्यांमध्ये आनंदाची लहर पसरलेली पहावयास मिळत आहे. नाशिक-मुंबई दरम्यान लोकल सेवा सुरू व्हावी अशी मागणी अनेक वर्षांपासून नाशिककरांनी लावून धरली होती. ही चाचणी यशस्वी झाली तर नाशिक आणि मुंबईला लोकलने जोडण्याचे नाशिककरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

- Advertisement -

विमानसेवेचाही फायदा
विमानसेवेचे ‘उडाण’ ही योजना नाशिकसाठी आशादायी ठरली आहे. केंद्र सरकारच्या उडाण योजनेंतर्गत नवीन वर्षात नाशिकला देशातील सहा प्रमुख शहरांशी विमानसेवेने जोडले जाणार आहे. आता अहमदाबाद, गोवा, हैदराबाद, बेंगळुरू, भोपाळ, हिंदण या प्रमुख शहरांसाठी नाशिककरांना सेवा मिळणार आहे. जेट एअरवेज कंपनीने नाशिक-दिल्ली-नाशिक ही सेवा १५ जूनपासून सुरू केली आहे. त्यास मोठा प्रतिसाद आहे. जेटने यापूर्वीच नाशिक अहमदाबादसाठी १३ फेब्रुवारीपासून सेवा देण्याचे घोषित केले. त्यानंतर आता अलायन्स एअरनेही नाशिक – अहमदाबाद -हैदराबाद या शहरांसाठी हॉपिंग फ्लाईट सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार कंपनीने या सेवेसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे काम सुरू केले आहे. बुकिंग काऊंटर, स्टाफ यासह विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधांसाठी कंपनीने नियोजन सुरू केले आहे. लवकरच इतरही शहरे नाशिकशी जोडली जातील.

दळणवळण विकासाचा रिअल इस्टेटला फायदा
समृद्धी महामार्गाचे काम नाशिकमध्ये सुरू झाले आहे. याशिवाय सुरत-हैदराबाद महामार्ग हा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर या सहा तालुक्यांतून जाणार आहे. या सर्व बाबी नाशिकच्या गुंतवणूक क्षेत्राला विशेषत: रिअल इस्टेट क्षेत्राला ‘बुस्ट’ देणार्‍या ठरणार आहेत. मुंबईसह अन्य प्रमुख शहरातील लोकांना नाशिक शहर कमी अवधीत गाठता आल्यास त्यातून भविष्य निश्चितच आशादायी असेल.

गुंतवणूक वाढीचेही ‘उडाण’
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -