घरफिचर्सलोकनाट्य कलाकार शाहीर साबळे

लोकनाट्य कलाकार शाहीर साबळे

Subscribe

शाहीर साबळे हे ख्यातकीर्त मराठी शाहीर व लोकनाट्य कलाकार. त्यांचे पूर्ण नाव कृष्णराव गणपतराव साबळे. परंतु शाहीर साबळे या नावानेच ते परिचित आहेत. त्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 रोजी सातारा जिल्ह्यातील पसरणी (तालुका वाई) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील माळकरी होते. वारकरी पंथाचे भजन-कीर्तन ते करीत असत. त्यांची आई निरक्षर पण जात्यावर दळताना ओव्या रचणारी व गाणारी होती. त्यामुळे गायकीचा वारसा शाहिरांना आई वडिलांकडून मिळाला. गावच्या भजनी मंडळात ते गात असत. बालवयात त्यांना बासरीवादनाचाही छंद जडला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन पुढे ते त्यांच्या मामांकडे अमळनेरला गेले. तेथे सातवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली. मात्र, अमळनेरला त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला.

गुरुजींकडून प्रखर राष्ट्रवाद आणि निर्व्याज देशभक्तीचे बाळकडू त्यांनी आत्मसात केले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत जनजागृती करण्यासाठी गुरुजींबरोबर ते दौरे करू लागले. तसेच राजकीय-सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी माध्यमाचा उपयोग करून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुढे ‘जागृती शाहीर मंडळ’ त्यांनी काढले. धुळ्याचे शाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे यांचा आदर्श त्यांनी स्वतःसमोर ठेवला होता. पुढे १९४२ साली शाहीर शंकरराव निकम यांच्या प्रभावाखाली ते आले. निकमांकडूनच त्यांनी शाहिरी कलेचे प्रत्यक्ष धडे घेतले. हैदराबाद मुक्तिसंग्रामातही त्यांनी प्रचाराचे रान उठवले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी ‘जातीयवाद की समाजवाद’ (१९४७) हा पहिला पोवाडा लिहिला. स्वतंत्र भारतात नव्याने सुरू झालेल्या राजकारणाचा संदर्भ या पोवाड्याला होता. त्यांचा विशेष उल्लेखनीय पोवाडा म्हणजे आधुनिक मानवाची कहाणी हा होता.

- Advertisement -

स्वातंत्र्योत्तर काळात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश द्यावा, म्हणून साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषण आरंभिले होते. त्या वेळी शाहिरांनी आपल्या पथकासह या मंदिर प्रवेशासाठी महाराष्ट्रभर प्रचार करून अनुकूल वातावरण निर्माण केले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवामुक्ती आंदोलन यांतही जनजागृतीसाठी त्यांनी प्रभावी शाहिराची भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर कवी राजा बढे यांनी रचलेले आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्घ केलेले ‘गर्जा महाराष्ट्र माझा ‘हे गीत शाहिरांनी गायिले.

आंधळं दळतंय पूर्वी त्यांनी अनेक प्रहसने रंगभूमीवर आणली होती. त्याचप्रमाणे यमराज्यात एक रात्र या मुक्तनाट्याचा बंदिस्त नाट्यगृहात प्रयोग करून (१६जानेवारी १९६०) व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी पहिले पाऊल टाकले. त्यानंतर माकडाला चढली भांग (१९६९, चिं. त्र्यं. खानोलकर), शेतात मोती, हातात माती (१९६९), फुटपायरीचा सम्राट (१९७०, विजय तेंडुलकर ), एक तमाशा सुंदरसा (१९७१, सई परांजपे), कोंडू हवालदार (१९७६, पां. तु. पाटणकर) यांसारखी मुक्तनाट्ये सादर केली. त्यांची एकूण १४ मुक्तनाट्ये असून त्यांतील नऊ त्यांनी, तर पाच इतर लेखकांनी लिहिली आहेत. शाहिरांनी त्यांच्या सर्व मुक्तनाट्यांतून समाजप्रबोधनाला योग्य असे विषय प्रभावीपणे सादर केले. अशा या महान शाहिराचे 20 मार्च 2015 रोजी निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -