इतिहासकार माऊंट एल्फिन्स्टन

Former Governor of Bombay Presidency Mountstuart Elphinstone death anniversary

माऊंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन यांचा आज स्मृतिदिन. माऊंट एल्फिन्स्टन हे ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. ते कार्यक्षम प्रशासक, मुत्सद्दी व इतिहासकार होते. त्यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1779 रोजी डंबार्टनशर (स्कॉटलंड) येथे एका उमराव घराण्यात झाला. त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या मुलकी सेवेत कोलकाता येथे नोकरी धरली (१७९६). डेव्हिज हा त्यांचा अधिकारी संस्कृतचा जाणकार होता. त्यामुळे त्यांस वाचन-अध्ययनाची गोडी लागली. पुढे त्यांची नेमणूक दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या पुणे दरबारात १८०१ मध्ये रेसिडेंट बॅरी क्लोजचा सहाय्यक म्हणून झाली.

पुण्यात आल्यानंतर एक वर्षातच दुसरे इंग्रज-मराठे युद्ध सुरू झाले. यात त्यांनी जनरल वेलस्लीचा परिसहायक म्हणून काम केले. याशिवाय त्यांना मराठी, फार्सी इ. भाषा येत असल्यामुळे त्यांनी दुभाषाचेही काम केले. हे काम त्यांनी इतके चोखपणे बजावले की, त्यांना लवकरच बढती मिळाली. वयाच्या चोवीसाव्या वर्षी एल्फिन्स्टन यांची नागपूर येथे भोसल्यांच्या दरबारात रेसिडेंट म्हणून नेमणूक झाली (१८०४-१८०७). दरबारातील बारीकसारीक गोष्टींची माहिती काढण्याचे काम त्यांच्याकडे होते. १८१९ मध्ये त्यांना मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले. सुमारे आठ वर्षांच्या (१८१९-२७) कारकीर्दीत एल्फिन्स्टन यांनी मुंबई प्रांतातील एकूण सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यामुळे तत्कालीन ब्रिटिश राज्यात मुंबई प्रांतास एक पुढारलेला प्रांत म्हणून लवकरच नावलौकिक प्राप्त झाला. प्रथम एल्फिन्स्टन यांनी सातार्‍याच्या गादीवर प्रतापसिंहास बसविले व ते इंग्रजांचे मांडलिक संस्थान केले. मुंबई प्रांताच्या बंदोबस्तासाठी त्यांनी कॉर्नवॉलिसने अंमलात आणलेली इंग्रजी-पद्धत स्वीकारली नाही, तर राज्यव्यवस्थेची पूर्वापार चालत आलेली व्यवस्थाच चालू ठेवली. इंग्रजी न्याय, कायदा व शिक्षणपद्धती इथे एकदम चालू करू नयेत, असे त्यांचे प्रांजल मत होते. म्हणून त्यांनी सर्व कारभाराची माहिती मिळवली; प्रजेच्या हिताची अनेक कामे हाती घेतली. शेतकर्‍यांना वसुलाच्या वेळी त्यांच्या अधिकार्‍यांकडून होणारा त्रास कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मध्यस्थ काढून शेतकर्‍यांना सरकारकडे परस्पर सारा भरण्याची सोय केली.

हिंदी लोकांना उच्च पदाच्या जागा द्याव्यात, ते सुशिक्षित होऊन आपणास आपले बस्तान आवरावे लागले, तरी हरकत नाही; अशा मताचे एल्फिन्स्टन हे एक होते. त्यांनी येथील शिक्षणपद्धतीतील दोष पाहून अनेक टिपणे लिहून ठेवली. मातृभाषा आणि इंग्रजी भाषा यांच्या शिक्षणपद्धतीचा त्यांना संस्थापक मानण्यात येते. या पद्धतीचा अवलंब मुंबई प्रांतात त्यांनी प्रथम केला. पेशवे काळात विद्वान ब्राह्मणांना दक्षिणा वाटण्याची पद्धत प्रचलित होती, ती त्यांनी बंद केली. मुंबई इलाख्यातील एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट किंवा हायस्कूल आणि एल्फिन्स्टन कॉलेज या संस्था त्यांच्या स्मरणार्थ काढण्यात आल्या. अशा या कार्यक्षम प्रशासकाचे २० नोव्हेंबर १८५९ रोजी निधन झाले.