घरफिचर्सचित्रांच्या चष्म्यातून

चित्रांच्या चष्म्यातून

Subscribe

समाज चित्रकारांकडे एका विशिष्ट चष्म्यातून पाहतो. काही प्रतिष्ठित, ज्येष्ठ चित्रकार सोडले तर मध्यम दर्जाचे, फारसे माहीत नसणारे चित्रकार नुसतंच काहीतरी सुमार काम करतात, त्यांना आयुष्य जगण्यासाठी फार कष्ट उपसावे लागतात, चित्रकारांना पैसे द्यायचे नसतात, त्यांनी फुकटात काम केलं पाहिजे, अशी सहसा समजूत असते.

अगदी शाळकरी वयातच मला पक्कं वाटू लागलं की मला चित्रकार व्हायचंय. त्यासाठी चित्रकला महाविद्यालयात शिक्षण घेण्याव्यतिरिक्त काय करावं लागेल, हे घरच्यांनाही माहीत नव्हतं आणि मीही शोधलं नव्हतं. कलामहाविद्यालयातून शिक्षण पूर्ण होता होता समजलं की वैचारिक प्रगल्भता आणि प्रयोग करण्याचं धारिष्ठ्य आल्याशिवाय चित्र काढण्याला फार अर्थ नाही. चित्राचा विचार करायचा कसा, हे कोणीच शिकवलं नाही. वास्तववादी चित्रात प्राविण्य मिळवणं ही एक पायरी पार केल्यावर, केवळ कठपुतळीप्रमाणे कौतुक मिळवायला, लोकांवर प्रभाव पाडायला चित्र काढत राहायची की चित्रामधील भावाभिव्यक्ती समजून ती उतरवण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वतःच्या आतलं काहीतरी खास बाहेर येऊ द्यायचं, हे द्वंद्व सुरु झालं. याच सुमारास मी शास्त्रीय नृत्य व संगीत शिकत-शिकवत होते, सादर करत होते, थोडं लिहितही होते. अभिव्यक्ती अशी सर्वार्थानं अनुभवत होते. या सर्व कलांचा तुलनात्मक अभ्यास करण्याची इच्छा होती. पण विषयांचे कप्पे केलेल्या शिक्षण व्यवस्थेने चित्र, नृत्य, संगीत यांना एकत्र करण्यासाठी तेव्हा कुठलेही मार्ग दाखवले नाहीत.

मनातून बंडखोर वृत्ती असल्यामुळे पारंपरिक आशय नाकारत, अभिव्यक्तीचे जास्तीत जास्त मार्ग खुले ठेवणार्‍या चित्रकलेशी मैत्री कधी तोडायची नाही असा निर्णय नकळत घेतला आणि चित्र व लेखन शिल्लक ठेवून नृत्य, संगीताकडे पाठ फिरवली. चित्राचा पाया पक्का करण्यासाठी अमेरिकेत उत्तम शिक्षकांकडून फिगर ड्रॉईंग, पोर्ट्रेट, स्केचिंग, कला इतिहास, अभिजात कला यांचे धडे घेतले. विविध देश हिंडून असंख्य चित्रकार, कला दालने, चित्र संस्कृती पाहून पुन्हा मायदेशी परतल्यावर चित्रांचा नवा प्रवास सुरू झाला. एव्हाना मी आई झाले होते. स्वतःचं मूल चित्र काढायला लागणं आणि ते जवळून निरखता येणं, यातून चित्रकलेचा जन्म कसा होतो हेच अनुभवता आलं. बालचित्रकलेचं विश्लेषण करता आलं. चित्रकार व्हायचं असेल तर लहानपणापासून कोणकोणत्या संधी मिळायला हव्यात याची समज यायला लागली. लहान मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून आदराने वाढवणं म्हणजे काय, याचं बाळकडू घरी आईकडून (शोभा भागवत) मिळालं. बालभवनात, शाळेत, चित्र कार्यशाळांत मुलांना चित्रकला शिकवताना त्यांची प्रतिभा शाबूत कशी ठेवावी, कशी खुलवावी यातील प्रयोग करू लागले. मुलांच्या असंख्य क्षमतांना वाव मिळेल अशी भित्तीचित्र मुलांबरोबर करू लागले. पारंपरिक पद्धती, ठोकळेबाज विषय, चित्रांबाबतचा बंदिस्त विचार, कच्चा प्रेक्षक, कलेतील राजकारण या सर्वांमुळे कासावीस वाटत होतं. आपल्या बाजूला नकळत विणलं गेलेलं रिती-रिवाज, सोयीस्करपणा, अहंकार, स्वार्थ यांचं जाळं तोडणं सोपं नसलं तरी ते आपल्यापुरतं तोडणं आवश्यक वाटू लागलं.

- Advertisement -

यातूनच नवे प्रयोग करायचं धैर्य आलं. घरातल्या भिंती मुलांच्या चित्रांनी सजू लागल्या. पाहुण्यांनी कितीही नावं ठेवली तरी; माझ्या मुलांची अभिव्यक्ती खुलायला हवी असेल तर त्यांना भिंती मोकळ्या करून देण्याचं महत्त्व काय आहे हे शोधण्यासाठी; घरातील सर्व भिंती, छत, फर्निचर, जमीन रंगवण्याकरता खुली करून दिली. छोटंसं बाळ असल्यापासून कितीतरी मोठं होईपर्यंत केवढ्या वैविध्यपूर्ण विषयांवर लहान मूल चित्र काढू शकतं हे मला पुस्तकं वाचून कळणार नव्हतं. यासाठी घराची प्रयोगशाळा करणं हेच एक उत्तर होतं. नवर्‍याची त्याला पूर्ण सहमती होती, ही एक जमेची बाजू. हा घरचा अभ्यास मला माझे विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, सहभागी मुलं-माणसं यांचे प्रश्न आणि क्षमता समजून घ्यायला उपयोगी पडू लागला. नुसतंच अधूनमधून भित्तीचित्र रंगवून चालत नाही, त्याचा विचार, अभ्यास, पैलू समजून घेणं हे पार्श्वभूमीला सातत्यानं चालू ठेवावं लागतं. लहान मुलांबरोबर चित्र काढायची तर मूल समजून घेता येणं आणि चित्रंही समजणं या दोन्हीची सांगड घालता यावी लागते.

स्वतःतील चित्रकाराला रियाज देता देता आजूबाजूच्या असंख्य लहान-थोरांना चित्र प्रक्रियेत सामावून घेत, सहकार्य चित्रांच्या (कोलॅबोरेटिव्ह पेंटिंग) अनेक संधी चालून आल्या. शहरी घरांच्या भिंती, ग्रामीण शाळांच्या भिंती, कुठे संस्थेतील दर्शनी भिंती तर कुठे रस्त्यावरील लांबच लांब भिंती रंगवत रंगवत जवळ जवळ दीडशे भिंती रंगवल्या. ‘मला चित्र काढायला खूप आवडतं’ असं म्हणणार्‍यांपासून, ‘मला अजिबात चित्र काढता येत नाहीत’ किंवा ‘शिक्षकांनी अपमान केल्यामुळे चित्रकलेची भीती मनात बसलेली आहे’ असं म्हणणार्‍यांपर्यंत असंख्य ग्रामीण, शहरी, लहान, मोठे, गरीब, श्रीमंत, सामान्य, असामान्य, विशेष गरजा असणारी माणसं, मुलं अशा अनेकांना चित्रांत सहभागी करून घेतलं, घेते आहे. चित्रकारांमध्ये न सापडलेली चित्रकलेची जादू मला सामान्य माणसांत, लहान मुलांत दिसते आणि चित्रकला समजून घ्यायला आयुष्य अपुरं आहे असं वाटत राहतं. चित्र काढताना तुम्ही सर्व भौतिक गोष्टी विसरून फक्त रंगांशी संवाद साधता, तुमचं चित्त स्थिर होतं, मजा येते, मनावरचे ताण कमी होतात, कोणालातरी इतर कुठल्याही माध्यमातून व्यक्त न करता येणारी एखादी गोष्ट चित्र काढताना व्यक्त करता येते. एका मोठ्या चित्रात खारीचा वाटा उचलता आल्याची भावना आणि त्यातून सौंदर्य निर्मितीचा मिळालेला आनंद या गोष्टी कायम लक्षात राहतात.

- Advertisement -

गेल्या काही दशकांनी पाडलेल्या पायंड्याप्रमाणे, तुम्ही चित्रकार असाल तर काही गोष्टी तुम्ही सातत्यानं कराव्या लागतात. जसं कलाकारांच्या वलयामध्ये उठबस, स्वतःची चित्र प्रदर्शनं, माध्यमांतून प्रसिद्धी, प्रतिष्ठित कला शिबिरांतून, स्पर्धांतून सहभाग, स्वतःचा स्टुडिओ वगैरे. या सर्वांमध्ये समृद्ध नक्कीच आहे, परंतु सर्वसामान्य घरातील, तिच्यावर अवलंबून असणार्‍या लहान मुलांची आई असणार्‍या चित्रकर्तीला स्थल, काल, अर्थ यांची गणितं जुळवून फ्री-लान्स चित्रकार म्हणून काम करणं हे मानसिक, शारीरिक दृष्ठ्या अतिशय श्रमाचं होत असतं. तरीही सर्व अडचणींवर मात करून चित्र काढण्याची ताकद कुठून येते कोण जाणे! समाज चित्रकारांकडे एका विशिष्ट चष्म्यातून पाहतो. काही प्रतिष्ठित, ज्येष्ठ चित्रकार सोडले तर मध्यम दर्जाचे, फारसे माहीत नसणारे चित्रकार नुसतंच काहीतरी सुमार काम करतात, त्यांना आयुष्य जगण्यासाठी फार कष्ट उपसावे लागतात, चित्रकारांना पैसे द्यायचे नसतात, त्यांनी फुकटात काम केलं पाहिजे, अशी सहसा समजूत असते. तरीही, एकदा तुम्ही स्वतःचं शंभर टक्के योगदान देऊन कोणतंही काम करू लागलात की संधी चालून येतात. तुमच्यातला कलाकार ओळखणारी, सामाजिक भान असणारी, कलागुणांना वाव देणारी, चित्रांचं चीज करणारी, मूल्य समजणारी मोजकी माणसं आजूबाजूला आहेत. काहीवेळा उगाचच शंका येते की संधी देण्यासाठी माणसं आपल्याला काम देत असतील का? की खरंच आपण काहीतरी चांगलं काम करतोय, चांगली चित्र काढतोय, बरं लिहितोय?

प्रत्येक कलाकाराची स्वतःला नाकारण्याची आणि स्वीकारण्याची खेचाखेच अखंड चालू असावी. समाज चित्रकारांना काही निकषांनी समजून घेत असतो, ज्यातून चित्रकाराचा स्वीकार अथवा अस्वीकार ठरतो. आणि चित्रकार अतिशय वेगळे निकष लावून स्वतःला समजून घेत असते किंवा असतो. कलाकार म्हणून तुमचा अंतर्गत प्रवास जेवढा खोल आणि समृद्ध असतो, त्या तुलनेत बाहेरून दिसणारा, कलाकृतींचा प्रवास हा फार छोटा आणि अपुरा असतो. कलेमुळे तुमच्या आयुष्यातील अंतरप्रवासाला गहनता येत जाते.

आपण चित्रकार व्हायचंय याव्यतिरिक्त यातील कुठलीही गोष्ट मी आधीपासून ठरवलेली नव्हती. इट जस्ट हॅपन्ड टू मी! असं म्हणतात की, तुम्ही इतर गोष्टींचं नियोजन करता करता जे घडतं, तेच आयुष्य असतं. चित्र हे माझं आयुष्य आहे. चित्रांच्या चष्म्यातून जग बघण्याचं धारिष्ठ्य मी केलं आहे. करियर प्लॅन न करता येणार्‍या काही क्षेत्रांपैकी चित्रकला हे एक क्षेत्र वाटतं. तुमच्या हातात असलेल्या कलेला मेहनत आणि विचारांची जोड देऊ शकलात तर समाजहितासाठी तुमच्या हातून थोडं भरीव काम होऊ शकेल. चित्रकलेची मर्यादा जशी मला समजते तशीच तिची ताकदही समजते. वैविध्यपूर्ण माध्यमांतून ती अजून अजमावता येईल आणि आयुष्यभर चित्रकार म्हणून प्रगल्भ होता येईल, अशी खात्री वाटते.


-आभा भागवत

(लेखिका चित्रकार आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -