घरफिचर्सकोकणातील गणेशोत्सव

कोकणातील गणेशोत्सव

Subscribe

गणेशोत्सव! कोकणातील प्रमुख सण. वर्षभर या सणांची तयारी मुंबईतील चाकरमानी करत असतो. अगदी खरं सांगायचं झालं तर, तुम्हाला गणेशोत्सव कसा असतो हे अनुभवायचं असेल तर एकदा कोकणात नक्की या!

‘अरे, सुट्टीच मिळत नाही. मग, आता? गावी तर जाणार. नोकरीचं बघू आल्यावर.’कामानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या प्रत्येक कोकणी माणसाच्या तोंडचं हे वाक्य. जर सुट्टी मिळाली तर मात्र आमचे पाय जमिनीला लागत नाहीत. हे देखील तितकंच खरं! त्यानंतर सुरू होते ती गणपतीची तयारी. तिकीट काढ. गणपतीसाठी लागणारे सामान घे. अगदी आरती, भजनांची देखील तयारी ही या धावपळीमध्ये सुरू होते. मनात अनेक आखाडे बांधत कोकणी माणूस हा गणपतीला कोकणात जातोच. यावेळी सर्व ऑफिस ओसाड पडल्याचं एक चित्र दिसतं. सर्वत्र शांतता.

गणेशोत्सव! कोकणातील प्रमुख सण. वर्षभर या सणांची तयारी मुंबईतील चाकरमानी करत असतो. अगदी खरं सांगायचं झालं तर, तुम्हाला गणेशोत्सव कसा असतो हे अनुभवायचं असेल तर एकदा कोकणात नक्की या! मुंबई, मराठी माणसं आणि मराठी सण याचं एक अनोखं नातं. हे कुणीही नाकारत नाही. पण कोकणतील गणेशोत्सव पाहिला तर तुम्ही दरवर्षी याल हेदेखील तितकंच खरं. लाल मातीचा सुगंध,पारंपरिक ढोल – ताशांचा गजर, गुलालाची उधळण, बाप्पाच्या नामाचा जयघोष आणि बेफाम होऊन थिरकणारी पावलं याची मजा काही औरच. तुमच्या डीजेला देखील त्याची सर यायची नाही. घरोघरी होणारी आरती, रात्रभर चालणारी भजनं. तौशी (काकड्या), चिबुड चोरताना उडणारी धांदल आणि मग कानावर पडणार्‍या अस्सल कोकणी मातीतल्या प्रेमळ शिव्या! सारा वेगळाचा माहोल. विसर्जनाच्या निमित्तानं नदी, ओहोळांवर होणारी गर्दी. लाडक्या गणरायाला निरोप देताना दाटून येणारं मन, पाणावलेले डोळे आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा होणार जयघोष. हिरवा शालू नेसलेल्या निसर्गाच्या साथीनं भाद्रपद महिन्यामध्ये कोकणातील गणेशोत्सव आयुष्यात एकदा नक्की अनुभवा. कोण जाणे कदाचित तुम्ही कोकणातील होऊन जाल!

- Advertisement -

सध्या मुंबई, ठाणे, पुण्यातील गणपती पहायाला अगदी परदेशातून पर्यटक येतात. राज्याच्या विविध भागातील लोक मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गर्दी करतात. पण, कोकणातील गणेशोत्सव केव्हा पाहिलाय? अनुभवलाय? एकदा नक्की या. कदाचित मित्रांच्या पाहुण्यांच्या मागे लागून दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात येण्याचा हट्ट कराल! दोन दिवस सुट्टी मिळाल्यानंतर तुम्ही ‘फुल टू एन्जॉय’ म्हणून कोकणातील समुद्र किनार्‍यांना भेटी देता. कोकणातील निसर्ग सौदर्य अनुभवता. ते क्षण भरभरून जगता. असेच काही सुवर्ण क्षण जगायचे असतील, अनुभवायचे असतील तर एकदा ‘बॅग भरा’ आणि कोकणातील गणेशोत्सव अनुभवा. पर्यटक म्हणून या आणि कोकणी संस्कृती अनुभवा. फुगडी, झाकडी, नमन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह भजनांची देखील मजा घ्या! अगदी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये टप्प्याटप्यांनी बदलत जाणार्‍या गणेशोत्सवाची मजा काही औरच! तर मग आता वाट कसली पाहताय? येताय ना? यावर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी नक्की या. कारण कोकण आपलाच असा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -