घरगणपती उत्सव बातम्यागणपतीची वाजणारी गाणारी गाणी!

गणपतीची वाजणारी गाणारी गाणी!

Subscribe

आज मात्र गणेशोत्सवाचा बर्‍याच अंशी इव्हेंट झाला आहे आणि त्याबरहुकूम गणपतीची गाणी वाजू लागली आहेत. गणपतीच्या मंडपात डीजे शिरल्यापासून आधीच्या शांत, संथ सुरातली भक्ती वजा होऊन फक्त दणदणाट सुरू झाला आहे. हा दणदणाट नेमका सुरू झाला तो ‘नायक नही, गणनायक हूँ मैं’, या गाण्यापासून. अर्थात, मधल्या काळात ‘देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया’ हे गाणं ‘आभाळाची छाया तुझी समिंदराची माया’सारख्या शब्दात भक्तीची पाखर घालून गेलं.

आजच्या गणेशोत्सवात ते गाणं सर्वात पहिलं वाजतंच की नाही ते माहीत नाही, पण गणेशोत्सवाचा अजून इव्हेंट झाला नव्हता तेव्हा ते गाणं सर्वात पहिलं वाजलं जायचं-’गणराज रंगी नाचतो.’ शांत असलेल्या वातावरणात या गाण्याचे सूर तरळले की गणेशोत्सव सुरू झाला याची पोचपावती मिळायची. लता मंगेशकरांचा एक बहरलेला काळ होता, त्या काळातलं हे गाणं. शब्द – शांता शेळके, संगीत – हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर – लता मंगेशकर, अशा सर्वांगसंपन्न त्रिकुटाचा तो एक काळ अवतरून गेला त्या काळातलं हे अजोड, अनुपम गाणं. हृदयनाथ मंगेशकरांसारख्या प्रतिभावंत संगीतकाराने हे गाणं करताना एक गोष्ट कटाक्षाने पाळली ती म्हणजे या गाण्यात काटेकोरपणे भारतीय वाद्यांचा वापर केला, एकाही विदेशी वाद्याचा औषधालाही वापर केला नाही.

गाणं सुरू होण्याच्या आधी जो घुंगरांचा मंजुळ आवाज कानाला मधूर स्पर्श करून जातो तिथूनच या गाण्याच्या इथल्या मातीतल्या नखशिखांत अस्सलपणाची सुरुवात होते. आज गाण्याच्या सीडीज्, पेन ड्राइव्ह उपलब्ध असतात, त्याआधी कॅसेटमध्ये गाणी कैद करून ठेवली जायची. त्याच्याही आधी गाणं ऐकण्यासाठी ध्वनीमुद्रिका वाजवल्या जायच्या. तेव्हाच्या त्या काळात खास गणपतीसाठी तयार केल्या गेलेल्या त्या ध्वनीमुद्रिकेतलं हे गाणं. याच ध्वनीमुद्रिकेत याच गाण्याच्या पाठोपाठ वाजवलं जाणारं गाणं होतं ते म्हणजे ‘गजानना श्रीगणराया, आधी वंदू तूज मोरया.’ लतादीदींनीच गायलेलं. त्यातही जाणीवपूर्वक सगळी अस्सल भारतीय वाद्यं वाजवलेली…आणि याच ध्वनीमुद्रिकेच्या पुढच्या बाजूला होती लतादीदींच्या आवाजातली ती गणपतीची आरती – ‘सुखकर्ता दु:खहर्ता, वार्ता विघ्नाची’…आणि त्यापुढे होते देवळाच्या गाभार्‍यात घुमल्यासारखे ते मंत्रपुष्पांजलीचे धीरगंभीर सूर! तेव्हाच्या त्या ध्वनीमुद्रिकेसाठी केलेला गणपतीच्या भक्तीसंगिताचा तो ऐवज आजच्या आणि यापुढच्या गणेशोत्सवांसाठीही अनमोल ठेवा ठरला आहे, ठरणार आहे.

- Advertisement -

त्यानंतरच्या काळातच फक्त गणपतीच्या गाण्यांसाठी एक नवं त्रिकुट आलं. ते होतं शब्द – वसंत बापट, संगीत – यशवंत देव आणि स्वर – उषा मंगेशकर. त्यांनी अष्टविनायकांची गाणी केली. ‘रमामाधवांचे जिथे चित्त लागे, जिथे सत्यचिंतामणी नित्य जागे, तया थेऊराला चला जाऊया, गणेशाप्रति आरती गाऊया’; ‘सा रे ग म प, म प ध नि सा, झणाणत उठले स्वरझंकार’; ‘रांजणगावाला गावाला गावाला, महागणपती नांदला’; ‘झुळझुळ वाहे पुण्यजळाचा निर्झर हो’, अशी एकाहून सरस गाणी या त्रिकुटाने लोकांसमोर आणली. ही गाणीही आजच्या गणेशोत्सवात हमखास कानावर पडत असतात आणि आजच्या गणेशोत्सवासाठी तीही गाणी एक अनमोल ठेवा ठरली आहेत. याच पंक्तीतली वर्षानुवर्षे अजरामर गाणी ठरलेली आहेत ती प्रल्हाद शिंदेंचं ‘तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा’; वसंतराव देशपांडेंचं ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा’, आशालता वाबगावकरांचं ‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया’ वगैरे वगैरे.

आज मात्र गणेशोत्सवाचा बर्‍याच अंशी इव्हेंट झाला आहे आणि त्याबरहुकूम गणपतीची गाणी वाजू लागली आहेत. गणपतीच्या मंडपात डीजे शिरल्यापासून आधीच्या शांत, संथ सुरातली भक्ती वजा होऊन फक्त दणदणाट सुरू झाला आहे. हा दणदणाट नेमका सुरू झाला तो ‘नायक नही, गणनायक हूँ मैं’, या गाण्यापासून. अर्थात, मधल्या काळात ‘देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया’ हे गाणं ‘आभाळाची छाया तुझी समिंदराची माया’सारख्या शब्दात भक्तीची पाखर घालून गेलं. ‘गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमही’ या शंकर महादेवनने गायलेल्या गाण्यानेही याच काळात लक्ष वेधून घेतलं. ‘पार्वतीच्या बाळा, तुच्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा’ या गाण्याने डीजेचा कब्जा घेतला खरा, पण त्या गाण्याने गणेशभक्तांना थिरकवायला लावलं. पण त्यानंतर डीजेवर नाचणारं पब्लिक लक्षात घेऊन गणपतीची गाणी तशीच होऊ लागली. ‘देवा हो देवा, गणपती देवा, तुम से बढ कर कौन?’ अशी पहिली ओळ आल्यानंतर, ‘और तुम्हारे भक्त जनों में हम से बढ कर कौन?’ अशी ओळ पाठोपाठ येणं साहजिकच होतं.

- Advertisement -

इथेच कुठेतरी अशी चिकमोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं, हे गाणं जिकडेतिकडे वाजू लागलं आणि त्या गाण्याने बरीच लोकप्रियता मिळवली. अरविंद-निर्मल नावाच्या संगीतकार द्वयीने हे गाणं केलं, ज्यातल्या निर्मल मुखर्जींची आजी त्यांना झोपवताना अशी चिकमोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची या गाण्याचा मुखडा त्यांना लहानपणी झोपवताना अंगाई म्हणून गायची, हाच मुखडा कायम ठेवून त्यांनी विलास जैतापकर या गीतकाराकडून त्याचे अंतरे लिहून घेतले आणि हे गाणं नावारूपाला आलं. या गाण्याची लोकप्रियता त्या काळात इतकी होती की ते गाणं गुजराती भाषेतही डेरेदाखल झालं. हे कमी म्हणून की काय त्या गाण्याची चाल वापरून ‘बदमाश’ नावाच्या हिंदी चित्रपटातही गाणं केलं गेलं. फक्त त्यावर शब्द आले ते असे- एक रेशम की डोरी से प्यार बंधा है बहना से रे. अर्थात, गणपतीवरची गाणी यापुढेही होत राहतील, येत राहतील, त्यातली काही राहतील, काही कधीतरी वाजतील, पण तशीच काही गाणी अशी असतील की जी लतादीदींच्या ‘गणराज रंगी नाचतो’ किंवा प्रल्हाद शिंदेंच्या ‘तुच सुखकर्ता, तुच दु:खहर्ता’सारखी कायम गणपतीच्या मंडपातून वाजतगाजत राहतील…गणपतीचा महिमा म्हणूनही आणि काळाचा महिमा म्हणूनही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -