घरफिचर्सबने बने, चल मुंबईचा गणेशोत्सव पाहू या!

बने बने, चल मुंबईचा गणेशोत्सव पाहू या!

Subscribe

चल, इथेच गप्पा मारत बसू नकोस, बाहेर पड लवकर. हा पाहा ट्रॅफिक जॅम. काय म्हणतेस? तो मुंबईत कायमच असतो? त्यात काय कौतुक? अगं किती गं अश्रद्ध तू. तुला साधा ट्रॅफिक जॅम आणि बाप्पांचा ट्रॅफिक जॅम यांच्यातला फरक कळत नाही?... अशाने डोंबिवलीचा नवरा मिळेल बरं का तुला! अगं इथेही तुमच्या पुण्यातल्यासारखेच रस्त्यांवर मांडव घातले जातात. त्याने ट्रॅफिकचा खोळंबा होतो. काही ठिकाणी तर आग लागल्यावर आगीचा बंबही शिरू शकणार नाही, कुणी मरायला टेकला तर अ‍ॅम्ब्युलन्स हलू शकणार नाही.

चल बने, चल आटप लवकर… उशीर होईल ना आपल्याला. मुंबईचे गणपती पाहायचे आहेत ना तुला?

काय म्हणतेस? गणेशोत्सवाची खरी मजा तुमच्या पुण्यात? अगं काय तुझ्या त्या पुण्याची कौतुकं सांगतेस! चिंटुकली बोळं, बालमित्र मंडळं आणि त्यांचे पिंटुकले गणपती. आमच्या मुंबईत मुंबईचं क्षेत्रफळ आणि आमच्या घरांचं क्षेत्रफळ सोडून सगळंच मोठं… आमचे गणपतीही मोठे, भव्य 18 फुटी, 20 फुटी… शिवाय इथे कोणा हलवायाच्या नावाने गणपती ओळखला जात नाही, इथे प्रत्येकजण असतो राजा, महाराजा. घाटकोपरचा महाराजा, चेंबूरचा महाराजा, अंधेरीचा राजा, गल्ली क्र. 27 चा राजा… असं सगळं जंगी काम असतं… इथे साधा गणपती नाहीच, सगळे महागणपती.

- Advertisement -

चल, इथेच गप्पा मारत बसू नकोस, बाहेर पड लवकर. हा पाहा ट्रॅफिक जॅम. काय म्हणतेस? तो मुंबईत कायमच असतो? त्यात काय कौतुक? अगं किती गं अश्रद्ध तू. तुला साधा ट्रॅफिक जॅम आणि बाप्पांचा ट्रॅफिक जॅम यांच्यातला फरक कळत नाही?… अशाने डोंबिवलीचा नवरा मिळेल बरं का तुला! अगं इथेही तुमच्या पुण्यातल्यासारखेच रस्त्यांवर मांडव घातले जातात. त्याने ट्रॅफिकचा खोळंबा होतो. काही ठिकाणी तर आग लागल्यावर आगीचा बंबही शिरू शकणार नाही, कुणी मरायला टेकला तर अ‍ॅम्ब्युलन्स हलू शकणार नाही. पण, आपल्या धर्माचा प्रज्वलंत अभिमान बाळगायचा, तर एवढी जोखीम पत्करायलाच पाहिजे, नाही का?

काय म्हणतेस? तो पलीकडचा ट्रॅफिक जॅमही गणपतीचाच आहे का, असं विचारतेस? हो हो, पण तो वेगळा जॅम आहे. चल जवळून जाऊन पाहू. आलीस का? हा पाहा विसर्जन मिरवणुकीचा ट्रॅफिक जॅम. काय म्हणतेस? दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाचीही मिरवणूक. अगं, नाहीतर मग गणपती बसवायचा कशाला असतो? मिरवणुकीत नाचायलाच ना? आम्ही पाच दिवसांच्या गणपतीचंही वाजत गाजत विसर्जन करतो आणि सात दिवसांच्या गणपतींचंही. त्यामुळे शहाणी माणसं या दिवसांत मुंबईबाहेर जाऊन राहतात. अर्धी शहाणी आणि नाईलाजच असलेली माणसं मुंबईत राहतात आणि प्रवास टाळतात. ते ज्यांना शक्य नसेल ती माणसं शक्यतो पायी, ट्रेनने फिरतात, रस्त्यांचा प्रवास टाळतात. ठार वेडी माणसंच या काळात वाहनं बाहेर काढतात. तुमच्या पुण्यात होते का एवढी पंचाईत?… वर मला कौतुक सांगतेस तिथल्या गणेशोत्सवाचं.

- Advertisement -

ही बघ भिंत… अगं, तिकडे ती गलिच्छ भिंत नको पाहूस, स्पीकर्सची भिंत पाहा. आहे ना दणदणीत डीजेचा आवाज. अरे आवाज कुणाचा? हिंदू आणि मराठींचा… काय म्हणालीस? ‘फुटणारे कान कुणाचे? हिंदू आणि मराठीजनांचे?’… अरे कानाचे डॉक्टर कोण? हिंदू आणि मराठीच ना? त्यांच्या व्यवसायाला गणरायांचा आशीर्वाद लाभत असेल, तर इतरांना कशाला त्रास व्हायला हवा… अगं, आमच्याकडचे डीजे इतके भारी आहेत की आता महापालिकेने इमारतींना, पुलांना, कोणत्याही बांधकामाला परवानगी देताना डीजेंच्या आवाजाने कोसळणार नाही, याचीही हमी घ्यायला सुरुवात केली आहे. बाकी सगळं सोड, आकाशातून विमानंही उडत नाहीत जिथे डीजे चालू असेल तिथून… विमानातल्या प्रवाशांचे कान किटतीलच, शिवाय इंजिनला हादरा बसून ते कुठे कोसळलं तर?… तुमच्या पुण्यात आहे का असा दणदणाट?

काय म्हणतेस? डीजे नसला तरी ढोललेझीम पथकं आहेत… ठीक आहे, अगदी मुंबईची बरोबरी नसली तरी आपल्या धर्माचा आवाज आपण करतोय, हे महत्त्वाचं आहे, अरे बोला, आवाज कुणाचा?… या गदारोळात माझेही कान फुटून माझाच आवाज माझ्या कानांपर्यंत पोहोचेनासा झालाय खरा, पण हीच तर आमच्या गणेशोत्सवाची गंमत आहे आणि उत्सवांमध्ये माणसं गंमत करणार नसतील, तर एरवी कधी करणार, सांग बरं बने?

काय म्हणतेस?… त्यापेक्षा सगळीकडे डिस्को पब उभे करून ज्याने त्याने आपल्या जबाबदारीवर कान फोडून घेतलेले बरे? अगं, पण सणाचा खरा आनंद इतरांच्या अडवणुकीत आहे… रंगपंचमीला अनोळखी इसमाला केमिकल लावण्यात, मांडवांनी इतरांच्या घरांची दारं बंद करण्यात, मिरवणुकांमध्ये डीजेच्या आवाजाने थरथरवून झोपडपट्टीतल्या तकलादू भिंती पाडण्यात जो धार्मिक आनंद मिळतो, त्याची बरोबरी इतर कोणताही आनंद करू शकत नाही बने.

अगं, अगं, जरा सांभाळून, त्या कार्यकर्त्याचा गुद्दा बसेल तुझ्या पाठीत. हे लोक काय करतायत म्हणून विचारतेयस? अगं हे राजाचे कार्यकर्ते, ते भाविकांना शिस्त लावतायत. काय म्हणतेस? स्त्रियांशी दुर्वर्तन करतायत? महिला आयोगाकडे तक्रार होईल? अगं बाई, राजाची पॉवर तुला माहिती नाही. इथे देशातले सगळ्यात धनाढ्य लोक येतात राजाच्या पायावर डोकं टेकून त्याला काही कमी तर पडत नाहीये ना, हे विचारायला. इथले कार्यकर्ते साक्षात पोलिसांना शिस्त लावतात, तुझं माझं काय घेऊन बसलीस. त्यांच्या चेहर्‍यावरचं सात्विक तेज पाहते आहेस ना?

पाहिलास ना आमचा उत्सव कसा दणकेबाज आहे ते. आता घरी निघायचं का?

काय म्हणतेस? गणपती नाही पाहिला एकही?

अगं, कमालच करतेस? गणपतीत काय असतं पाहायला? आपल्या घरी आहेच की तो. जो इथे तोच तिथे. तो आपल्या घरीच पाहायचा. बाहेर पडायचं ते गणेशोत्सव पाहायला!

अं काय म्हणालीस? तुला काही ऐकायला नाही आलं… अगं मला तरी कुठे ऐकायला येतंय?… हीच तर आमच्या उत्सवाची खरी मजा आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -