घरफिचर्सगीत गाता चल!

गीत गाता चल!

Subscribe

जसपाल सिंग याचा एका बाजूला वकिलीचा व्यवसाय सुरू असला तरी त्याचं खरं लक्ष गाण्यावर होतं. याचदरम्यान त्याची संगीतकार रवींद्र जैन यांच्याशी ओळख झाली. त्यांचाही तसा स्ट्रगलच सुरू होता. त्यांच्याकडे राजश्री प्रॉडक्शनच्या ‘गीत गाता चल’, या सिनेमाचं काम आलं होतं. त्या सिनेमाचा हिरो होता सचिन पिळगावकर. याच सचिनसाठी त्यांना नवा कोरा, पण सचिनच्या आवाजाला साजेसा आवाज हवा होता. रवींद्र जैननी त्यासाठी धरती मेरी माता, पिता आसमान, मुझ को तो अपना सा लगे सारा जहाँ, हे गाणं गाण्याचा प्रस्ताव जसपाल सिंगसमोर ठेवला.

आपण पार्श्वगायकच व्हायचं हे अमृतसरमधल्या त्या तरुणाने ठरवूनच टाकलं, पण आपलं हे स्वप्न सत्यात उतरवायचं तर आपला अमृतसरमधला मुक्काम हलवावा लागणार हे त्याने मनात नोंदवायला सुरुवात केली होती. मुंबई नावाची मायानगरी म्हणूनच त्याला त्याच्या त्या उमेदीच्या वयात खुणावू लागली होती. वय तसं विशीबावीशीतलं होतं. वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय होता. अमृतसरमधल्या सुवर्णमंदिरासमोरच त्यांचं हॉटेल होतं. वडिलांना वाटायचं की मुलाने आपल्या हॉटेल व्यवसायात लक्ष घालावं, पण मुलाचं लक्ष गाणं बजावण्यात होतं. पुढे बहिणीचं लग्न झालं. ती मुंबईत राहायला आली…आणि अमृतसरमध्ये अख्खं आयुष्य घालवलेल्या या तरूणाला मुंबईत येण्याचं एक निमित्तही मिळालं आणि एक आश्रयही. अशाच एके दिवशी त्याने गाण्यात नशीब काढण्यासाठी थेट मुंबई गाठली. बहिणीच्या घराचा सहारा घेतला. त्याच्या मेहुण्यानेही त्याची आणि त्याच्यातल्या ध्येयवादाची कदर केली. संगीतकार उषा खन्नांशी त्यांची ओळख निघाली. त्यांनी आपल्या त्या मेहुण्याला उषा खन्नांकडे नेलं. त्या तरुणाचंही नशीब असं की उषा खन्नांनी त्याचं गाणं ऐकून त्याला सिनेमासाठी गाणं गाण्याची तयारी दाखवली. त्या तेव्हा बंदिश नावाच्या सिनेमाला संगीत देणार होत्या. देखो लोगो, ये कैसा जमाना; संभालो, संभालो, हुवा मैं दिवाना हे गाणं त्यांनी चालीसकट तयार करून ठेवलं होतं. त्यांनी ते त्या तरुणाकडून गाऊन घेतलं…आणि त्या तरुणाच्या अमृतसरहून मुंबईत येण्याचं सार्थक झालं.

…त्या तरूणाचं नाव होतं, जसपाल सिंग…हो तोच तो, जो पुढे गीत गाता चल, श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम, सावन को आने दो वगैरे गाणी गायला आणि लोकांपर्यंत आपलं नाव आणि गाणं पोहोचवण्यात यशस्वी झाला. पार्श्वगायक बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करू शकला. अर्थात, त्या पहिल्या गाण्यानंतर त्याच्यासाठी सगळं काही आलबेल नव्हतं. कारण त्याने ज्या सिनेमासाठी ते आपलं पहिलंवाहिलं गाणं गायलं होतं तो सिनेमा प्रेक्षकांचा आश्रय मिळवू शकला नाही. साहजिकच, तो सिनेमाही आपटला आणि ते गाणंही आपटलं. जसपाल सिंगच्या आनंदावर तो घाला होता, पण त्याचे संगीताचे शिक्षक त्याला धीर देत राहिले, म्हणाले, तुझा आवाज छान आहे, तू गातोस छान, एखाद्या अपयशाने खचून जाऊ नकोस. गात राहा.

- Advertisement -

मधल्या काळात जसपाल सिंग आपल्याला पार्श्वगायनाची पुन्हा एक नवी संधी मिळावी म्हणून वाट पाहत राहिला, पण वाट पाहण्याशिवाय त्याच्या नशिबी फारसं काही आलं नाही. मुंबईत त्याच्यासाठी फारसं काही घडत नसल्यामुळे हॉटेल व्यवसायातल्या वडिलांनी त्याच्याकडे अमृतसरला येण्याचा तगादा लावला. त्याप्रमाणे जसपाल सिंग अमृतसरला गेलाही, पण वडिलांच्या व्यवसायात त्याचं मन रमलं नाही. त्याचं सगळं मन गाण्यात गुंतलं होतं. त्यासाठी अधेमधे तो मुंबईची वारी करून यायचा. याचदरम्यान त्याला उषा खन्नांनी पुन्हा एका गाण्यासाठी बोलावलं. त्याने धावतपळत मुंबई गाठली. बेटा खेल मत मटका, असे त्या गाण्याचे शब्द होते. महेन्द्र कपूरसोबत त्याने हे गाणं गायलं. महेन्द्र कपूर हे तेव्हा फिल्मी जगतातलं प्रस्थापित नाव होतं. त्यांच्याबरोबर गाणं गायला मिळतं आहे याचा त्याला आनंद झाला. ते गाणं त्यातल्या थोड्या गंमतीजमतीमुळे कानोकानी झालं आणि लोकांना जसपाल सिंग हे नाव थोडंफार माहीत झालं, पण त्या नाव माहीत होण्याचा फायदा जसपाल सिंगला होऊ शकला नाही. त्यामुळे कुणाचंही गाणं गाण्यासाठी बोलावणं आलं नाही.

फक्त एकच झालं की जसपाल सिंगने मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला. त्यादरम्यान कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि वडिलांना आपण इथे काहीतरी करतो आहोत हे दाखवण्यासाठी वकिलीचा व्यवसाय सुरू केला, पण एका बाजूला वकिलीचा व्यवसाय सुरू असला तरी त्याचं खरं लक्ष गाण्यावर होतं. याचदरम्यान त्याची संगीतकार रवींद्र जैन यांच्याशी ओळख झाली. त्यांचाही तसा स्ट्रगलच सुरू होता. त्यांच्याकडे राजश्री प्रॉडक्शनच्या ‘गीत गाता चल’, या सिनेमाचं काम आलं होतं. त्या सिनेमाचा हिरो होता सचिन पिळगावकर. याच सचिनसाठी त्यांना नवा कोरा, पण सचिनच्या आवाजाला साजेसा आवाज हवा होता. रवींद्र जैननी त्यासाठी धरती मेरी माता, पिता आसमान, मुझ को तो अपना सा लगे सारा जहाँ, हे गाणं गाण्याचा प्रस्ताव जसपाल सिंगसमोर ठेवला.

- Advertisement -

रवींद्र जैन त्याला म्हणाले, ‘आधी हे गाणं गा. तुझ्या आवाजातलं हे गाणं जर सगळ्यांना पसंत पडलं तर ‘गीत गाता चल’मधली पुढची गाणी तू गायची की नाही ते ठरवता येईल!’ जसपाल सिंगने त्यांचा तो प्रस्ताव मान्य केला. पार्श्वगायनाच्या संधीच्या शोधात असणार्‍या त्याच्यासारख्या कलाकारापुढे दुसरा पर्याय तरी काय होता!…पण तोपर्यंत ‘गीत गाता चल’ या शीर्षकगीताची रवींद्र जैननी केलेली चाल जसपाल सिंगने ऐकलेली होती. ती त्याला बेहद्द आवडलेली होती. ती आपल्याला गायला मिळावी अशी त्याची इच्छा होती, पण रवींद्र जैन यांचं एकच पालुपद होतं की आधी तुला दिलेलं गाणं गाऊन दाखव, मगच आपण पुढचा विचार करू. जसपाल सिंगने तोपर्यंत स्वत:ला सिद्ध केलेलं नव्हतं. त्यामुळेच सिनेमाच्या शीर्षकगीतासारखं महत्त्वाचं गाणं ते जसपाल सिंगला द्यायला राजी नव्हते, पण दाने दाने पे लिखा हैं खानेवाले का नाम, असं म्हणतात त्याप्रमाणे त्या गाण्यावर ते गाणं गाणारा गायक म्हणून जसपाल सिंगचंच नाव नियतीने लिहिलेलं होतं.

झालं असं की ‘गीत गाता चल’मधलं ‘धरती मेरी माता, पिता आसमान’ हे गाणं जसपाल सिंगच्या आवाजात रेकॉर्ड झाल्यावर जेव्हा सगळ्यांनी ऐकलं तेव्हा सिनेमाचा हिरो सचिनशी हा आवाज तंतोतंत जुळत असल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. मग बाकीच्या गाण्यांसाठी इतर कुणाचा आवाज कशाला वापरायचा, असं सगळ्यांचंच मत पडलं. जसपाल सिंगच्याच आवाजात सगळी गाणी गाऊन घ्यायचा नंतर रवींद्र जैनना आदेशच आला. यावेळी मात्र जसपाल सिंगचं हे गाणं अल्पजिवी ठरलं नाही. ते सर्वदूर पोहोचलं. सिनेमासुद्धाा तुफान चालला.

सिनेमातलं ‘श्याम अभिमानी’ हे गाणं आधी महंमद रफींसारख्या तगड्या गायकाकडून गाऊन घेतलं होतं, पण सचिनसाठी सगळीच गाणी जसपाल सिंगकडून गाऊन घ्यायची असतील तर ते एक गाणं वेगळ्या गायकाकडून का गाऊन घ्यायचं हा विचार पुढे आला आणि तेही गाणं जसपाल सिंगकडून गाऊन घेण्यात आलं. त्यानंतर त्या एका काळात जसपाल सिंगचं नाव झालं. दूरदर्शनच्या त्या जमान्यात तो टीव्हीच्या पडद्यावर दिसू लागला. त्याला त्याच्या गाण्यासाठी फार मोठे बॅनर्स मिळाले नाहीत, पण अमृतसरमधून मुंबईत खास पार्श्वगायक बनण्यासाठी आलेल्या एका तरुणाची धडपड संपली आणि तो खरंच पार्श्वगायक बनला!…आणि पडद्यावरचा सचिनचा आवाज बनला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -