घरफिचर्सआ फिर से मुझे छोडके जाने के लिये आ!

आ फिर से मुझे छोडके जाने के लिये आ!

Subscribe

गझल गायक मेहदी हसन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी काही सुप्रसिद्ध गझल गायकांशी साधलेला हा संवाद...

‘अबके हम बिछड़े तो शायद, कभी ख्वाबों में मिलें
जिस तरह सूखे हुए फूल किताबोंमें मिलें…’

गझल गायकीचे सम्राट, शहेनशाह-ए-गझल अशा वेगवेगळ्या उपाधींनी ओळखल्या जाणार्‍या दिवंगत गझलगायक मेहदी हसन यांची काल १८ जुलै २०१८ रोजी ९१ वी जयंती झाली. पाकिस्तानी गझलगायक आणि लॉलीवूडचे पार्श्वगायक एवढीच त्यांची ओळख नसून अनेक गझल गायकांची पिढी त्यांनी घडवली असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. मेहदी हसन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी काही सुप्रसिद्ध गझल गायकांशी साधलेला हा संवाद…

- Advertisement -

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्याच्या लुणा गावात १८ जुलै १९२७ साली जन्मलेल्या जनाब मेहदी हसन यांनी आपले वडील उस्ताद अझिज खान आणि काका उस्ताद इस्माइल खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. अगदी कमी वयात त्यांनी मैफलींमधून गायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी आपल्या मोठ्या भावासोबत शास्त्रीय गायनातील ध्रुपद आणि खयाल सादर केला. पुढे वयाच्या विसाव्या वर्षी, १९४७ साली, देशाची फाळणी झाल्यानंतर ते पाकिस्तानात गेले. पाकिस्तानी गायक असले तरी अखेरपर्यंत त्यांचे भारतात अनेक कार्यक्रम सादर झाले. अनेक प्रसिद्ध गझला त्यांच्या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. १३ जून २०१२ साली पाकिस्तानातील कराची येथे त्यांचं निधन झालं. ‘गझल सम्राट’ अशी उपाधी मिळालेल्या मेहदी हसन यांच्याकडून प्रेरणा घेऊन कित्येक मातब्बर कलाकार गझल गायकीकडे वळले. जगजीत सिंग आणि हरिहरन हे त्यापैकीच. त्यांचा अमूल्य सहवास लाभलेल्या गझल गायक पंकज उदास यांनी मेहदी हसन यांच्या खास आठवणी ‘आपलं महानगर’साठी जागवल्या.

 

- Advertisement -
ghazal-singer-pankaj-udhas
गझल गायक पंकज उदास

‘भारतातून मी पहिला गायक होतो जो मेहदी साहेबांना भेटला. ते १९७७ साल होतं.तेव्हापासून आमची ओळख झाली ती पुढे त्यांच्या निधनापर्यंत कायम राहिली. कार्यक्रमानिमित्त ते ज्या-ज्या वेळी मुंबईत येत त्यावेळी मी आवर्जून त्यांची भेट घ्यायचो. साधारण १९९७-९८ ची गोष्ट असेल मेहदीसाहेब एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. मात्र त्यांचा हार्मोनिअम एअरलाइन्सवाल्यांनी तोडला होता. डी. एस. रामसिंग या ठरलेल्या ब्रँडचा हार्मोनिअम ते वापरत होते. त्यांना समजलं की माझ्याकडे रामसिंगचा हार्मोनिअम आहे. त्यांनी माझ्याकडे तो काही दिवसांसाठी मागितला आणि मी तो त्यांना दिला. त्यांचे काही कार्यक्रम होते भारतात. मी त्यांना मजेत म्हणालो की, मी तुम्हाला बाजा नक्कीच देईन; पण तुम्हाला माझ्या घरी चहासाठी यावं लागेल. तसे ते घरी आलेसुद्धा. त्यांची टूर आणि कार्यक्रम संपला आणि ते पाकिस्तानला परत जाऊ लागले. तेव्हा त्यांनी मला फोन करून सांगितले, की ’तुझा बाजा परत करण्याची इच्छा होत नाहीय. तो इतका चांगला आहे आणि माझा हात त्यावर बसलाय. तुझी हरकत नसेल तर मी तो घेऊन जातो.आणि त्यावर होकार भरत मी तो बाजा त्यांना कायमचा दिला! गझल गायकीचा विषय असेल तर मेहदीसाहेब एक विद्यापीठ आहेत. ते महान कलाकार होते. त्यांची आठवण नेहमीच येते, त्यांची कमतरता नेहमीच जाणवते. असे कलाकार दुर्मिळ असतात.’

असा कलाकार पुन्हा होणे नाही!

मेहदी हसनसाहेब माझे उस्ताद होते. मी त्यांच्या खुपच जवळ होतो. त्यांची दररोज आठवण येते. फक्त त्यांची गझलाच नाही तर त्यांचा सहवास, त्यांच्या कित्येक गोष्टी आठवतात. असा कलाकार पुन्हा होणे नाही, एवढंच म्हणू शकतो.

– तलत अझीज, ज्येष्ठ गझलगायक

मेहदी हसन हे बादशाह होते

अकबरच्या दरबारात असे नवरत्न होते. पण बादशाह तर एकच होता. मेहदी हसन बादशाह आहेत. बाकी सगळे नवरत्न आहेत. त्यांच्यानंतर अनेक पिढ्या गझल गायकीच्या क्षेत्रात आले आणि हा संगीताचा वारसा पुढे नेत आहेत. त्यांना आदरांजली देताना त्यांची ‘रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ, आ फिर से मुझे छोड के जाने के लिए आ’ या गझलेच्या ओळी ओठावर येताहेत.
– अनुप जलोटा, ज्येष्ठ गझलगायक

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -