सर्वांना सुबुद्धी दे रे बाप्पा

ठाण्यातील खोपट येथील पंचशील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी करून असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गणपतीची मूर्ती मोठी असते मात्र या वर्षी फक्त दोन फुटाची मूर्ती तसेच सोशल डिस्टन्स ठेवून, तोंडाला मास्क लावून आरती करण्यात आली (छाया - गणेश कुरकुंडे)

देशात कोरोना मुक्तांचा आकडाही मोठा असल्याने लोक निश्चिंत झाले आहे. कोरोना मृत्यदरही कमी आहे. पण याचा अर्थ कोरोना घातक नाही असा होत नाही. तर प्रत्येकासाठी कोरोना वेगळा आहे. हे लक्षात घ्यायला हवं. कोरोनाबरोबरच सणउत्सव नक्कीच साजरे करायचेत. पण सोशल डिस्टन्सिंगच तंत्र सांभाळून. नाहीतर पुन्हा त्याचा उद्रेक होईल. पुढे आलेला काळ, परत एकदा मागे रेटेल. नको असलेला लॉकडाऊन पुन्हा लादला जाईल. यात सरकारला दोष द्यायचे काम नाही. चूका आपण करायच्या, गावभर आपण हुंदडायचं, संसर्ग वाढवायचा आणि करुनही घ्यायचा आणि सरकारच्या नावाने खडे फोडणे योग्य नाही. म्हणूनच सजग व्हा, शहाणे व्हा .सगळ्यांना सुबुध्दी दे रे बाप्पा हीच तुझ्या चरणी प्रार्थना.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गणपती बाप्पा घराघरात, मंडळांमध्ये विराजमान झाले आहेत. बाप्पाच्या आगमनामुळे वातावरणात नवचैतन्य जरी आलं असलं तरी त्यावर असलेलं कोरोनाचं सावट कुठेतरी जाणवतयं. दरवर्षी पहिल्याच दिवसांपासून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी खच्चून भरलेले मंडळाचे मंडप यावेळी रिकामेच आहेत. तर गणरायाच्या पूजेसाठी एकत्र येणाऱ्या कुटुंबांनीही यावेळी बाप्पाचं व्हर्च्युअल दर्शन घेण्यावर भर दिला आहे. कोरोनाचं संकट संपवण्यासाठी तोंडाला मास्क लावणंच पुरेसे नसून सोशल डिस्टन्सिंगही किती आवश्यक आहे हेच यावेळच्या गणेशोत्सवात पाहावयास मिळत आहे. मात्र लोकांमध्ये झालेली ही जनजागृती फक्त गणेशोत्सवापुरतीच मर्यादित न राहता अजून काही महिने तरी राहावयास हवी. तरच कोरोनाचे संकट संपेल आणि थांबलेलं आयुष्य पुन्हा एकदा वेग घेईल. हेच यावर्षी बाप्पाकडे मागणे आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाला पृथ्वीवर येऊन सहा महिन्याच्या कालावधीहून अधिक काळ झाला आहे. कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी तब्बल दोनशेहून अधिक देशाचे संशोधक कोरोनावरील लसींचे संशोधन करत आहेत. रशियाने यात बाजी मारल्याचा दावा केला असला तरी त्यावर इतर संशोधकांनी इतक्या कमी काळात रशियाने तयार केलेल्या लसीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. यामुळे कोरोनाला जन्माला घालणाऱ्या चीनने लगेचच आपल्या लसीचं घोडं पुढे दामटवलं आहे. पण चीनवरून अख्ख्या जगाचा विश्वास उडाल्याने सध्या तरी चीनी लसीला फारस कोणी गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही. भारतातही सिरम कंपनी व इतर कंपन्या कोरोना लसींवर काम करत आहेत. लसीच्या या प्रक्रियेला वेळ लागणं अपेक्षित असल्याने कोरोनाबरोबर जगायला सगळेचजण शिकले आहेत. याची झलक आता प्रत्येक सणात पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या काळात रक्षाबंधन. गोपाळकाला व इतर सण आले. पण पहिला मोठा सण आला तो म्हणजे गणेशोत्सव. यामुळे यावेळचा गणेशोत्सव कसा असेल याची कुतुहलता सगळ्यांनाच होती. कारण गणपती म्हणजे बु्ध्दीबरोबरच आनंदाची देवता.

तिचे आगमन जल्लोषातच व्हायला हवं. पण यावेळी या परंपरेला मुरड घालावी लागली. बाप्पाच आगमन शांततेत झालं. घरात पाहुण्यांची सरबराई नाही, पोराबाळांचा गोंधळ नाही, नैवेद्य दाखवल्यानंतर मोदकांवर डल्ला मारणारी लहानांबरोबरच नणंद दिरांची धडपड नाही. सगळच शांत. प्रतिष्ठापणेपासून मंत्रपुष्पांजली आणि मोदकांचाही आस्वाद अनेक कुटुंबांनी झूमवर घेतला. कोटी कोटी आभार त्या झूमची निर्मिती करणाऱ्याचे. नाहीतर सगळेच मुकले असते या सुंदर क्षणांना. झूमच्या माध्यमाने प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्षपणे कुटुंबानी गणेशोत्सवात लावलेली उपस्थिती यावेळी फार महत्वाची वाटली. कोरोनाने सगळ्यांनाच दूर केलं खरं पण नात्यांच महत्वही समजलं. नाहीतर प्रत्येक सणात घरातील मोठ्यांमध्ये मानापमानावरून रंगणार नाट्य म्हणजे आनंदावर विरजण. पण यावेळी तसा काही प्रश्नच नव्हता. प्रत्येकजण कोरोनाबरोबरच वास्तवाचे भान ठेवून होता. त्यामुळे शांततेत का असेना पण बाप्पाचं आगमन आनंदात झालं.
कोरोना महामारीमुळे वातावरणातच नाही तर मनातही तयार झालेली नकारात्मकता बाप्पाच्या लांबूनच का असेना पण दर्शनाने नष्ट झाली. हे ही नसे थोडके. पण यावेळी जनतेने सोशल डिस्टन्सिंगसाठी दाखवलेली सबुरी येणाऱ्या सणांवेळीही दाखवणे अपेक्षित आहे. आपले बहुतेक सगळेच सण कुटुंबाबरोबर साजरे केले जातात. त्याला वेगळंच महत्वही आहे. सणाच्या निमित्ताने कुटुंब एकत्र येतं. पण यावेळच चित्र वेगळंच आहे. जे सर्वाच्या सुरक्षेसाठी गरजेचेच आहे. कुटुंबानी एकमेकांचा विचार करतच हे सगळे सण सोशल डिस्टन्सिंग सांभाळत साजरे करायचे आहेत. कोरोनाचे संकट संपवण्यासाठी सध्या नातेवाईकांना शारिरिक अंतर द्यायचे आहे. मानसिक नाही. नाहीतर आज ना उद्या कोरोना जाईल. पण नात्यात कायमच अंतर येईल. ते सांभाळायला हवे. कारण कोरोनाचा हा काळ तसा कसोटीचाच आहे. नात्यांबरोबरच आरोग्याचीही कसोटी सुरू आहे.

दिवसागणिक कोरोना रुग्णांचा आकडाही वाढतोय. सध्या देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३१ लाखावर पोहचला आहे. अजून काही दिवसात हा आकडा अमेरिकेलाही मागे टाकेल अशी परिस्थिती आहे. हा आकडा कमी करणे खरं तर प्रत्येकाच्या हातात आहे. त्यासाठी सध्या गणेशोत्सवात दाखवलेली सबुरी येत्या काही काळात बाळगावी लागणार आहे. देशात कोरोना मुक्तांचा आकडाही मोठा असल्याने लोक निश्चिंत झाले आहे. कोरोना मृत्यदरही कमी आहे. पण याचा अर्थ कोरोना घातक नाही असा होत नाही. तर प्रत्येकासाठी कोरोना वेगळा आहे. हे लक्षात घ्यायला हवं. कोरोनाबरोबरच सणउत्सव नक्कीच साजरे करायचेत. पण सोशल डिस्टन्सिंगच तंत्र सांभाळून. नाहीतर पुन्हा त्याचा उद्रेक होईल. पुढे आलेला काळ, परत एकदा मागे रेटेल. नको असलेला लॉकडाऊन पुन्हा लादला जाईल. यात सरकारला दोष द्यायचे काम नाही. चूका आपण करायच्या, गावभर आपण हुंदडायचं, संसर्ग वाढवायचा आणि करुनही घ्यायचा आणि सरकारच्या नावाने खडे फोडणे योग्य नाही. म्हणूनच सजग व्हा, शहाणे व्हा .सगळ्यांना सुबुध्दी दे रे बाप्पा हीच तुझ्या चरणी प्रार्थना.