घरफिचर्सउष्णतेची जागतिक लाट आणि आपण

उष्णतेची जागतिक लाट आणि आपण

Subscribe

मागील आठवड्यात जागतिक बँकेने दक्षिण आशिया खंडातील बदलत्या वातावरणामुळे होणारे परिणाम, यामुळे लोकांच्या जीवनमानावर पडलेला फरक या संदर्भाने दहा संवेदनशील क्षेत्रांचा अभ्यास केला. दक्षिण आशिया खंडातील देशामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशांचा अभ्यास करण्यात आला. भारतातील १० जिल्ह्यांचा अभ्यास करण्यात आला.

विदर्भात उन्हाळा तीव्र असतो, प्रत्येक नागरिकाला नकोसा असतो, पाऊस केव्हा पडणार याची वाट हरेकजण बघत असतो. परंतु वातावरणातल्या अनियमिततेबाबत कुणीही सांगू शकत नाही.पाऊस अनियमित झाला, की त्याचा गंभीर परिणाम शेती उत्पादन आणि आरोग्यावर होतो.उन्हाळा, पावसाळा आणि थंडी असे तीन ऋतू आपल्याकडे असतात. या ऋतुंचं वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेलं सुंदर विश्लेषण दुर्गा भागवतांच्या ‘ऋतुचक्र’ पुस्तकात वाचायला मिळतं.

गेल्या १ ते २४ जुलै २०१८ या काळात जगभरातल्या अनेक देशांत उष्णतेची लाट पसरलेली आहे.जपानमध्ये उष्माघातामुळे ६५ लोकांचा जीव गेला. २२ हजारपेक्षा जास्त संख्येने लोक इस्पितळात आजारी पडले. आणि सरकारने आणीबाणी घोषित केली. जपानच्या कुमाग्या शहरात आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ४१.१ डिग्री सेंटीग्रेड नोंदवले गेले. प्रथमच टोकियो शहरात ४० डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. या सगळ्या उष्णतेच्या लाटेत अनेक लहान मुले आजारी पडली. तर युरोपातील ग्रीक देशात थेट आग लागली आणि ८० लोक मृत्युमुखी पडले. स्वीडन, नॉर्वे, ब्रिटन या देशात उष्णतेची लाट तीव्रतेने जाणवली. उष्माघाताने २ मृत्यू आणि काही जंगलात आगीच्या घटना नोंदवल्या गेल्या. आफ्रिका खंडातील अल्जेरिया इथल्या उआरग्ला शहरात ५१ डिग्री इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद घेण्यात आली. कॅनडामध्ये मागील आठवड्यात उष्णतेने ५४ लोक मरण पावले, जेव्हा तिथले तापमान ३० डिग्री होते; पण उष्णतेची तीव्रता ४५ डिग्री सारखी होती. आज वातावरणातील बदल मोठ्या प्रमाणात दिसून येताहेत.त्याचे कारण म्हणजे वातावरणात होणार्‍या कार्बन उत्सर्जन होय. प्रदूषण, वनातील घट, दुषित नदी-नाले असंख्य गोष्टी याला कारणीभूत आहेत.

- Advertisement -

मागील आठवड्यात जागतिक बँकेने दक्षिण आशिया खंडातील बदलत्या वातावरणामुळे होणारे परिणाम, यामुळे लोकांच्या जीवनमानावर पडलेला फरक या संदर्भाने दहा संवेदनशील क्षेत्रांचा अभ्यास केला. दक्षिण आशिया खंडातील देशामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशांचा अभ्यास करण्यात आला. भारतातील १० जिल्ह्यांचा अभ्यास करण्यात आला. या दहा जिल्ह्यांतील लोकांचा जीवनमानाच्या निर्देशांकात ९ टक्के घसरण दिसून आली. या अभ्यासात सरासरी तापमान आणि पर्जन्यमानाचा अभ्यास करण्यात आला. त्यामुळे शेती उत्पादन, आरोग्य, वीज उपलब्धता, पलायन, उत्पादकता आणि सकस आहार यावर कसा परिणाम होतो याचे विश्लेषण करण्यात आले. त्यात उष्णतेची तीव्रता आणि त्यामुळे झालेले परिणाम आणि बदलते वातावरण सामान्य माणसांवर कसा परिणाम करतो याची कारणमीमांसा करण्यात आलीय. सगळ्यात मोठ्या प्रमाणावर परिणाम झालाय मध्य भारतावर.तिथले १० जिल्हे संवेदनशील घोषित करण्यात आलेत. प्रथम महाराष्ट्रातील चंद्रपूर, दुसरा भंडारा, तिसरा गोंदिया, चौथा वर्धा, पाचवा नागपूर, सहावा छत्तीसगड राज्यातील राज नांदगाव, सातवा छत्तीसगड राज्यातील दुर्ग, आठवा मध्य प्रदेशातील होशंगाबाद, नववा विदर्भातील यवतमाळ आणि दहावा विदर्भातला गडचिरोली जिल्हा नोंदवण्यात आला. येथील उष्णतेमुळे जनसामान्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम होताना दिसतो.देशातील सकल घरेलू उत्पादन (GDP) घटले आहे व आर्थिक वृद्धी दर कमी झालाय.

८०० दशलक्ष जनता या उष्ण तीव्रतेच्या संवेदनशील क्षेत्रात राहते. म्हणजे जवळपास अर्ध्या दक्षिण आशिया खंडाचे वर्गीकरण केले गेले आहे.हा विषय गंभीर असूनही आपले शासन मात्र गंभीर नाही. कृती आराखडा केवळ कागदावर आहे. त्यावर चर्चा तसूभरसुद्धा झाली नाही. २००९ साली महाराष्ट्र सरकारने आराखडा तयार केलाय तो अद्याप शासनदरबारी आहे. आज अनेक जिल्ह्यांत पर्जन्यमान कमी होते आहे. तिथल्या शेती क्षेत्रात कोणती पिके घ्यावी आणि पिण्याचे पाणी कुठून आणायचे याचे नियोजन नाही. महाराष्ट्रात राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग (RGSTC) राज्य सरकार व भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (IISER PUNE) यांच्या संयुक्त प्रयत्नाने महाराष्ट्र जनुकीय कोश (बँक) प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यात पीक विविधता, देशी जनावरे, जंगल, मासे, पक्षी, समुद्री जीव-जंतू या सगळ्या जैवविविधतेवर होणारे परिणाम, संरक्षण आणि संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत आहे.
आज या सगळ्या क्षेत्रात भरीव संशोधन करण्याची गरज आहे. येथील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी जनतेचा सहभाग आणि शासनाची मदत घेणे आवश्यक आहे. वातावरणावर होणार्‍या परिणामाचा अभ्यास करून कृती आराखडा बनवत त्याची अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा.

- Advertisement -

– प्रवीण मोते
(लेखक पर्यावरण धोरणाचे अभ्यासक आहेत)
———————

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -