फटाके मार्केटवर सरकारी निर्णयाचा बॉम्ब

दिवाळी हा प्रकाशाचा सण. अंध:कारमय दुनियेवर प्रकाशाचा विजय दर्शविणारा हा सण आहे. पण गेल्या काही वर्षांपासून कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांचा आवाज आणि त्यातून बाहेर पडणार्‍या विषारी धुरामुळे होणारे वायूप्रदूषण यामुळे हा सण केवळ आतषबाजीपुरता सीमित राहिला. मात्र, यंदा या फटाक्यांवरच राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद समितीने याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना नोटीस बजावल्यानंतर अनेक राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातली. फटाके बंदीचा हा निर्णय पर्यावरणाच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. परंतु हा निर्णय घ्यायला शासनाने उशीर केल्यासारखे वाटते.

दिवाळीच्या 20 दिवस आधी किरकोळ फटाके विक्रेत्यांनी फटाके खरेदी केले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे यंदा फटाके वाजवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आटोक्यात आलेल्या कोरोना संसर्गवाढीला चालना मिळू नये यासाठी फटाके वाजवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपल्या पातळीवर बंदी घातली आहे. विक्रेत्यांनी फटाके मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणले असून, या फटाक्यांचे करायचे काय याची चिंता विक्रेत्यांना सतावत आहे. फटाके बंदीचा निर्णय हा15-20 दिवसांपूर्वी घ्यायला हवा होता, असे विक्रेत्यांना नक्कीच वाटले असेल. दरम्यान सोमवारी मुंबई महापालिकेने दिवाळीसंदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठे फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच फटाके फोडण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील किरकोळ फटाके विक्रेत्यांना मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

महाराष्ट्रात दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे कोरोना वाढल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदूषणामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. त्यातून कोरोनाचा धोका वाढतो. शक्यतो दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडू नका. प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात येतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसांत जे कमावलंय ते चार दिवसांच्या धुरात उडून जाऊ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. एकंदरीत आपण पाहिले तर यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाकेमुक्त दिवाळीची संकल्पना मांडण्यात येत आहे. परंतु ही संकल्पना मांडताना फटाका व्यापार्‍यांचा विचार करायला हवा होता. फटाकेबंदी करायची होती तर आधीच सरकारने नियोजन करायला हवे होते, असे फटाका व्यापारी असोसिएशनचे म्हणणे आहे.

सरकारने बंदीबाबत आधीच निर्णय घ्यायला हवा होता. दिवाळीच्या तोंडावर बंदी घातल्याने व्यापार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थितीशी झुंज देताना सरकारच्या या निर्णयाचा आर्थिक फटका विक्रेत्यांना बसणार आहे. अनेक व्यावसायिक कर्जबाजारी होतील. शिवाय, दिवाळीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयाने बेकायदेशीर विक्री होण्याचा धोका वाढणार आहे. जरी फटाके वाजवण्यावर बंदी घातली असली तरी लोक फटाके वाजविण्यापासून थांबणार नाहीत.सरकारला जर फटाक्यांवर बंदीच घालायची होती तर त्यांनी एक महिना आधीच हे पाऊल उचलले पाहिजे होते. त्यामुळे सरकारचा हा निर्णय सर्व बाजूंचा विचार करुन घेतल्याचे वाटत नाही.