Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स द्राक्ष, थंडी अन् कोरोना

द्राक्ष, थंडी अन् कोरोना

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटांशी संघर्ष करतोय. एकीकडे कोरोनाची लाट ब्रिटनकडून येण्याची भीती आणि दुसरीकडे थंडीची लाट आल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी कोड्यात सापडला आहे. ब्रिटनमधील कोरोनाची लाट सगळ्यांनाच धडकी भरवणारी आहे. पण द्राक्ष उत्पादक या लाटेकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत.

Related Story

- Advertisement -

कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात नवीन सहा फळबाग समूह तयार करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयाची एजन्सी अपेडाने घेतला आहे. या समूहात राज्य आणि केंद्र स्तरावरील यंत्रणांचे प्रतिनिधी प्रथमच संयुक्तपणे काम करतील. या सहा समूहांमध्ये नाशिक आणि पुण्यातील द्राक्ष, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील आंबा, जळगाव, सोलापूर आणि कोल्हापूरमधील केळ, नगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील डाळिंब, अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील संत्रा तर नाशिक जिल्ह्यातील कांदा या पिकांचा समावेश आहे. यामुळे संबंधित पीक उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असला तरी हा दिलासा सध्याच्या वातावरणामुळे फिका पडला आहे. विशेषत: द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटांशी संघर्ष करतोय. एकीकडे कोरोनाची लाट ब्रिटनकडून येण्याची भीती आणि दुसरीकडे थंडीची लाट आल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी कोड्यात सापडला आहे. ब्रिटनमधील कोरोनाची लाट सगळ्यांनाच धडकी भरवणारी आहे. पण द्राक्ष उत्पादक या लाटेकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत. इंग्लंडच्या लाटेमुळे थंड हवेच्या सर्वच प्रदेशांनी आता सावध भूमिका घेतली आहे. बाहेरची माणसे आणि पिके आपल्या देशात या काळात येऊ द्यायची नाही, असे धोरण अवलंबण्याच्या तयारीत हे देश आहेत. अशा काळात द्राक्ष खाल्ली नाहीत तरी चालतील, पण रोगाला निमंत्रण नको अशाच मानसिकतेत विश्वभरातील जनता आहे. त्याचा थेट परिणाम नाशिकमधील द्राक्ष निर्यातीवर होण्याची भीती आहे. अर्थात याचा परिणाम परकीय चलनावरही होईल. देशात द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र अव्वल आहे. राज्यातील एकूण द्राक्ष निर्यातीपैकी नाशिक जिल्ह्याचा ९१ टक्के वाटा आहे. जिल्ह्यात द्राक्षाचे एकूण ५८ हजार ३६७.४३ हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात द्राक्ष लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ६० टक्के क्षेत्रावरील द्राक्ष निर्यातीसाठी पूर्वनोंदणी झाली आहे. परंतु, आता ही नोंदणी किती कामी येते याची चिंता शेतकर्‍यांना लागून आहे. द्राक्ष निर्यातीतून केवळ शेतकर्‍यांनाच फायदा होतो असेही नाही. आज द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे ‘फळ’ आहे. सन २०१८-१९ हंगामात तब्बल २ लाख ४६ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून २३३५ कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले होते. गेल्या मार्च-एप्रिलच्या हंगामात द्राक्ष बागा परतीच्या आणि अवकाळी पाऊस आणि कोरोना या संकटात सापडल्यामुळे द्राक्ष निर्यातीत ३० टक्के घट झाल्याने याचा फटका देशाच्या परकीय चलनावरही जाणवतो आहे. कोरोनामुळे यंदा एका नव्या समस्येत भर पडली आहे. कोरोना महामारीचा फटका वृत्तपत्र व्यवसायालाही बसल्याने त्याचा थेट परिणाम वृत्तपत्रांच्या रद्दीवर झाला आहे. वृत्तपत्र रद्दीच्या दरात तिपटीने वाढ होऊनही रद्दी उपलब्ध होत नाही. त्यामुळे द्राक्ष निर्यातदार हतबल झाले आहेत. गेल्या वर्षी द्राक्ष हंगामामध्ये १८० ते २०० रुपये प्रति दहा किलो विक्री होणारी रद्दी ४५० ते ५०० रुपये प्रति दहा किलोने विक्री होत आहे. रद्दीच्या भावात तिप्पट वाढ झाली असून, पैसे देऊनही रद्दी मिळत नसल्याने ‘रद्दी देता का रद्दी’ असे म्हणण्याची वेळ प्रथमच आली आहे. कोरोनामुळे अनेक दिवस वृत्तपत्र छपाई झाली नव्हती. त्याचा थेट परिणाम रद्दीवर झाला आहे. त्यामुळे एकीकडे ब्रिटनमधील कोरोनाची लाट आणि थंडीची चिंता वाहताना दुसरीकडे शेतकर्‍यांना रद्दीचाही शोध घेण्याची वेळ आली आहे.

दिवाळीच्या काळात कोरोनाची लाट आटोक्यात येत असल्याचे बघून शेतकरीवर्ग सुखावला होता. परंतु दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचे आकडे वाढू लागले. त्यात काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने जगभर खळबळ उडाली आहे. या विषाणूच्या लाटेची तीव्रता बघता अजून तीन-चार महिने तरी या संकटातून सुटका नाही, असे तज्ज्ञांचे मत झाले आहे. सावधगिरीची उपाययोजना म्हणून सर्वच थंड हवेच्या प्रदेशांनी आता विमानसेवा बंद करण्याचे धोरण अवलंबले आहे. याशिवाय थंड प्रदेशातील लोकांसाठी अन्य देशांमध्ये आता एका अर्थाने ‘लॉकडाऊन’ सुरू झाले आहे. त्याचा परिणाम आता तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेल्या द्राक्षांवर होणार आहे. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात द्राक्षासाठी मजूर मिळणे कठीण झाले होते. द्राक्ष बागायतदारांकडे असलेले मजूर भीतीपोटी निघून गेले होते. द्राक्ष काढण्याबरोबरच पॅकेजिंगसाठीदेखील कामगार लागतात. मात्र, संचारबंदीमुळे पाचपेक्षा अधिक कामगार जमण्यास परवानगी नसल्याने त्याचीदेखील अडचण निर्माण झाली याचाच परिणाम द्राक्ष बागेवर बसला. ही परिस्थिती थोडीफार निवळते तोच आता कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने शेतकर्‍यांना चिंतेत टाकले आहे. दुसरीकडे वाढती थंडी शेतकर्‍यांची डोकेदुखी झाली आहे. मध्यंतरी अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, धुक्याची दुलई यामध्ये गायब झालेल्या थंडीचे जोरदार पुनरागमन झाले आहे. काही दिवसांपासून तापमान सातत्याने कमी होत असल्याने नाशिक जिल्ह्यात थंडीची लाट आल्याची स्थिती आहे. केवळ रात्रीच नव्हे तर, दिवसाही कमालीचा गारवा जाणवतो. द्राक्षाचे माहेरघर असलेल्या निफाड तालुक्यात उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे किमान तापमानाचा पारा सहा अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरला आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेच. शिवाय काढणीला आलेल्या द्राक्षांना तडे जात आहेत. हाती आलेली द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेतकरी शेतात ऊब निर्माण करण्यासाठी शेकोट्या पेटवताना दिसत आहेत, द्राक्ष हे वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक आहे, शिवाय इतर सर्व पिकांपेक्षा जास्त खर्च होते, भांडवल जास्त लागते. त्यामुळे पीक चांगले यावे आणि आर्थिक लाभ व्हावा यासाठी शेतकरी मोठी कसरत करत असतात. द्राक्षाचे पीक हे ऐन थंडीच्या हंगामात बहरण्यास सुरुवात होते आणि अशात दक्षिणेकडील अरबी समुद्रात तसेच हिंदी महासागरातील चक्रीवादळाचा जोर असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात दाखल होत असल्याने आता द्राक्ष उत्पादकांना खर्‍या अर्थाने हुडहुडी भरली आहे. या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे जाणे, वाढ खुंटणे, द्राक्ष कुजणे, द्राक्ष झाडाची मुळे चोकअप होणे, द्राक्ष झाडात साखर उतरण्याची प्रक्रिया पूर्णत: थांबणे अशा समस्यांना शेतकर्‍यांना तोंड द्यावे लागत आहे. या थंडीपासून बचावासाठी द्राक्ष बागांवर अतिरिक्त औषधांची फवारणी केल्यास द्राक्षे निर्यातीला नाकारली जाण्याची भीती असते. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षांना ठिबकद्वारे पाणी देणे, द्राक्ष बागेत विशिष्ट अंतरावर शेकोट्या पेटवून द्राक्षे घडांसाठी उबदार वातावरण तयार करताना दिसतात. खरे तर, तापमानातील घसरणीने द्राक्षवेलीच्या अंतर्गत पेशींचे कार्य मंदावते. त्यामुळे मण्यांची फुगवण थांबते. तसेच परिपक्व अवस्थेतील द्राक्षांना तडेही जाण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांनी पहाटेच्या वेळी जागरुकतेने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. थंडीच्या कडाक्यात ऊब मिळवण्यासाठी सहारा शोधणार्‍या मानवाला झाडांनाही ऊब द्यावी लागत असल्याचे चित्र सध्या द्राक्षपंढरीत दिसत आहे. हे चित्र निश्चितच दिलासा देणारे नाही. अस्मानी आणि सुलतानी संटकांशी नेहमीच सामना करणारा बळीराजा या नव्या संकटालाही पुरुन उरेल. पण अशावेळी त्याला शासनाच्या आधाराची गरज आहे इतकेच.

- Advertisement -