घरफिचर्सथोर विचारवंत स्वामी विवेकानंद

थोर विचारवंत स्वामी विवेकानंद

Subscribe

स्वामी विवेकानंद हे जगद्विख्यात भारतीय विचारवंत होते. त्यांचे मूळ नाव वीरेश्वर नंतर रूढ झालेले नरेंद्रनाथ होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी उत्तर कोलकातामधील सिमलापल्ली येथे झाला. नरेंद्रांवर बालवयात आईकडून धार्मिक, तर मोठे झाल्यावर वडिलांकडून आधुनिक बुद्धिवादी विचारसरणीचे संस्कार झाले. मेट्रपॉलिटन इन्स्टिट्यूट, प्रेसिडेन्सी कॉलेज आणि जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूशन येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण होऊन नरेंद्रनाथ १८८४ साली बी. ए. ची परीक्षा दुसर्‍या वर्गात उत्तीर्ण झाले.

नंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला पण परीक्षा दिली नाही. महाविद्यालयीन जीवनात जगाचा इतिहास आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांचा विशेष अभ्यास झाला. मिल आणि स्पेन्सर यांच्या ग्रंथांचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला. बंकिमचंद्र चटर्जींच्या आनंदमठ या कादंबरीमुळे देशभक्तीची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. १८८१ च्या नोव्हेंबरमध्ये सुरेंद्रनाथ नित्र यांच्या घरी काही भक्तिगीते म्हणण्याच्या निमित्ताने नरेंद्रांची श्रीरामकृष्णांशी पहिली दृष्टिभेट झाली. श्रीरामकृष्णांचे विशुद्ध मन आणि संपूर्ण ईश्वरशरणता यांमुळे नरेंद्र त्यांच्याकडे आकृष्ट झाले. त्यानंतर त्यांनी संन्यास घेतला.

- Advertisement -

विवेकानंद हे एक द्रष्टे महापुरुष होते. धर्म हा भारतीय जीवनाचा मूलाधार आहे आणि विज्ञानयुगात होरपळणार्‍या सार्‍या जगाला भारतातील अध्यात्मविचारामुळे शांती लाभणार आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांनी भारताला स्वतःच्या अस्मितेची जाणीव उत्पन्न करून दिली आणि पाश्चात्य जगाला भारताचा परिचय करून दिला. धर्माबरोबरच शिक्षण, राजकारण, समाजकारण, स्त्रियांची उन्नती, जनसामान्यांचा विकास अशा अनेक विषयांवर त्यांनी मूलगामी विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी त्यागाला सेवेची जोड दिली आणि भारतात आजवर चालत आलेल्या संन्यासाच्या संकल्पनेत मूलभूत क्रांती केली. भारतातील अध्यात्म आणि पाश्चात्यांचे आधुनिक विज्ञान यांच्या समन्वयातून उद्याची आदर्श मानवसंस्कृती उदयाला येणार आहे, असे त्यांनी म्हटले होते. अशा या महान विचारवंताने ४ जुलै १९०२ रोजी समाधी घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -