गरिबांचे आरोग्यसेवक अभय बंग

अभय बंग हे महाराष्ट्रातील सामाजिक आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व

अभय बंग हे महाराष्ट्रातील सामाजिक आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक आरोग्यासाठी ते चार दशकांपासून कार्यरत आहेत. त्यांनी सोसायटी फॉर एज्युकेशन, अ‍ॅक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) या संस्थेची स्थापना केली. अभय बंग यांचा जन्म 23 सप्टेंबरला महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. त्यांचे वडील अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी अमेरिकेला जाण्यापूर्वी गांधीजींचे आशीर्वाद घ्यायला गेले तेव्हा गांधीजींनी ‘तुला अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर भारतातील खेड्यात जा’ असा सल्ला दिला आणि ठाकूरदासांनी खरोखरच अमेरिकेला जायचे रद्द करून भारतातच खेड्यांमध्ये अभ्यास केला.

अभय बंग यांचे बालपण वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमात गांधीजींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांच्यासोबत गेले. लहानपणापासूनच अभय आणि अशोक बंग या भावंडांमध्ये आपण आयुष्यात काय करावे याविषयी चर्चा चाले. अशोकने शेतकी क्षेत्रात काम करायचे ठरवले तर अभयने खेड्यातील रहिवाशांचे आरोग्य या क्षेत्रात काम करायचे ठरवले. अभय बंग यांनी नागपूर विद्यापीठातून एम.बी.बी.एस. आणि एम.डी. (वैद्यकशास्त्र) या पदव्या संपादन केल्या. त्यांच्या सहचारिणी राणी बंग यांनीही एम. डी. (स्त्रीरोगतज्ज्ञ) ही पदवी मिळवली. दोघांनीही आपापल्या विषयांत सुवर्णपदक मिळवले. अभय आणि राणी बंग या दोघांनाही सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करण्यात आवड होती.

या दिशेने परिणामकारकरीत्या काम करण्यासाठी या विषयामध्ये अभ्यास करण्याची गरज लक्षात घेऊन १९८४ मध्ये दोघांनीही बाल्टिमोर येथील हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतून ‘सामाजिक आरोग्य’ या विषयात पदव्युत्तर अभ्यास केला. अमेरिकेतून परत आल्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे कामाला सुरुवात केली. त्यांनी सर्च या संस्थेची स्थापना डिसेंबर १९८५ मध्ये केली. आदिवासी आणि खेड्यापाड्यातील आरोग्यविषयक अडचणींवर तोडगा काढायच्या कामाला सुरुवात झाली. त्यांनी या कामामध्ये तेथील रहिवाशांना सोबत घेतले. त्यांच्या गरजेनुसार क्लिनिक्स आणि दवाखान्याची स्थापना केली. या भागांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते. खोलवर अभ्यास केल्यावर गरिबी, संक्रमक रोग, हगवण, न्यूमोनिया, दवाखान्यांचा अभाव इत्यादी १८ कारणे त्यांना सापडली.

बंग यांच्यापासून प्रेरणा घेऊन खेड्यातील सुमारे एक लाख महिलांना भारत सरकारने ‘आशा’ या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले आहे. बंग यांच्या या कृतीने जगाला पटवून दिले की नवजात शिशुंच्या उपचारासाठी मोठमोठ्या दवाखान्यांची आणि उच्च तंत्रज्ञानाची गरज असतेच असे नाही. किंबहुना, साध्या, व्यवहारिक उपायांनी खेड्यांमध्येही उपचार दिले जाऊ शकतात. गडचिरोली जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण त्यांनी दर हजारी १२१ वरून (लाईव्ह बर्थस्) ३० वर आणले. या व्यतिरिक्त दारूबंदीसाठीदेखील बंग यांनी परिश्रम घेतले. १९९२ मध्ये लोकाग्रहास्तव दारूबंदी जारी केलेला गडचिरोली भारतातील पहिला जिल्हा ठरला. दारू आणि तंबाखू / धूम्रपान बंदीसाठी डॉ. बंग झटत आहेत, कारण भारतामध्ये रोग आणि मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पहिल्या दहा घटकांपैकी हे दोन प्रमुख आहेत.