घरफिचर्सरा. स्व. संघाचे हिंदुपण

रा. स्व. संघाचे हिंदुपण

Subscribe

रष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिनांक १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान नवी दिल्लीत विज्ञान भवन विविध क्षेत्रातील मान्यवरांशी जाहीर संवाद केला. संघाची कार्यपद्धती, विचार आणि दृष्टिकोन यावर भाष्य केले. प्रश्नांची उत्तरे मोकळेपणाने दिली. त्या पार्श्वभूमीवर हिंदुपण आणि संघ याविषयी

रा.स्व.संघाच्या विचारांचा हिंदुपण (Hinduness) गाभा आहे. व्यक्ति निर्माण या वैशिष्ठ्यपूर्ण कामाला संघाचे प्राधान्य आहे. भारताला आपली मातृभूमी मानणारा समस्त हिंदू समाज हा संघ विचारांचा आणि कृतीचा केंद्रबिंदू आहे. संघटनेच्या आधारे राष्ट्रीय पुनर्निर्माण आणि युगानुकूल परिवर्तन याची प्रचिती संघाच्या कामातून येत आहे. स्वयंपूर्ण समाजासाठी व्यापक हिंदू संघटन संघ सातत्याने करत आहे. या अशा संघटित मानवी सामर्थ्याच्या आधारे विशाल भारतीय समाजाचे विविध प्रश्न सोडविण्याची व्यवस्था संघाच्या माध्यमातून निर्माण होत आहे. संघाचे तत्त्वज्ञान हे भारतीय तत्वज्ञान आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या उपयोजित आणि अंत्योदयाच्या हिंदू जीवन पद्धतीचा अवलंब संघाने आपल्या कामात केला आहे.

हिंदू संघटन निरंतर प्रक्रिया

समाजाचे संघटन, त्याचे राष्ट्रीय भावनेने पोषण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मानवाच्या परिपूर्ण विकासासाठी हे आवश्यक आहे. सशक्त समाज हे राष्ट्राचे शक्तीस्थान असते. हिंदूंना संघटित करण्याचे प्रयत्न भारतात पूर्वापार झाले आहेत. शंकराचार्य, चाणक्य -चंद्रगुप्त, संत मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद अशा अनेकांनी समाज संघटनेचे हे अत्यावश्यक कार्य जाणीवपूर्वक केले आहे. तेच कार्य आधार मानून काम रा. स्व. संघ कार्यरत आहे.

- Advertisement -

…आणि म्हणून संघ

ब्रिटीश आणि मुघल अशा परकीय हिंदू विरोधी आक्रमकांनी हिंदू समाजावर दिर्घकाळ राज्य केले. हिंदू समाज संघटितपणा, एकात्मता यापासून दूर गेल्याने विदेशी आक्रमण स्थिरावले होते. किंबहुना, हिंदू समाजात कालौघात निर्माण झालेल्या दोषांनी आक्रमकांचे काम काहीसे सोपे केले होते. समाजाला आपल्या पराक्रमाचे, परंपरेचे, इतिहासाचे विस्मरण झाले होते. संस्कृतीविषयी उदासिनता वाढली होती. आपल्या हिंदू असण्याचा अपराध गंड निर्माण झाला होता. हिंदू आहोत हे सांगण्याची भिती वाटत होती. एकरस, एकात्म रहाण्यापेक्षा भेदांच्या भिंती हव्याहव्याशा वाटू लागल्या होत्या. अंधानुकरण करण्याकडे वाटचाल होत होती. जेत्यांचे योग्य-उच्च आणि आपले हीन-कनिष्ठ असा भाव निर्माण झाला होता. इंग्रजांनी प्लासीची लढाई जिंकली होती. १८५७ चे स्वातंत्र्य समर मोडून काढले होते. इंग्रजी राजवट स्थिरावली होती. १९२० नंतर नेशन इन मेकिंग असा वेगळा सूर लावला गेला. इंग्रज येण्यापूर्वी भारत अस्तित्वात नव्हताच, असे चित्र रंगवले गेले होते. मुस्लीम समाजाच्या अस्मितेला फुंकर घालून हिंदू विरोधी द्रोहाची बीज पेरली जात होती. त्याचवेळी स्वातंत्र्य लढा सुरू होता. जागतिक संदर्भही बदलत होते. जगात निरनिराळ्या ठिकाणी मार्क्सवाद-समाजवाद-भांडवलवाद आपसात लढत होते. देशात हिंदुपण आकुंचन पावत होते. मूळ ओळख पुसून टाकण्याचे प्रयत्न धूर्तपणे होत होते. या मातीत न रुजणारे विचार चतुराईने पेरले जात होते. या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाला संघटित करून भेद विरहित समाज निर्मिती करण्यासाठी, ऐक्य-बंधुभाव पुन्हा रुजविण्यासाठी आणि आपली ओळख अधोरेखित करण्यासाठी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सुरू केले.

संघावर बंदी

आकस, द्वेष बाळगून तीन वेळा संघावर बंदी घातली गेली. संघ विचार-कार्य उद्वस्त करण्यासाठी प्रयत्न झाला. बळाचा वापर केला गेला. वैचारिक असहिष्णुतेचा बडगा संघावर उगारला गेला. मात्र,संघ विपरित परिस्थितीतही स्थिर राहिला. संघाच्या आपुलकीच्या व्यवहारात फरक पडला नाही. संघाने कटुता बाळगली नाही. संघ आपल्या उद्दिष्ठांपासून ढळलेला नाही.

- Advertisement -

हिंदू : परिपूर्ण विचार

हिंदू हा विचार आहे. तो विचार परिपूर्ण आहे. तो इझम नाही. त्यामुळेच संघाची मांडणी-कार्यशैली आणि दैनंदिन व्यवहार इझमच्यापेक्षा सर्वस्वी भिन्न आहेत. हिंदुवादाला नव्हे, तर, हिंदुपणाला (Hinduness) संघाचे प्राधान्य आहे. हिंदुपण सर्वसमावेशक, शाश्वत आहे. हिंदुपण मानवी समूहाच्या विविध टप्प्यांवर ‘सर्वेपि सुखिनः सन्तु’ असे विकसित होत आहे. संघाने त्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. हिंदुपण हे या देशाचे प्राण तत्व आहे, यावर संघाचा दृढ विश्वास आहे. वैविध्य टिकवून एकात्मता साधता येते ही संघाची ठोस भूमिका आहे.

संघावर टीका हिंदुपणाला पराभूत करण्यासाठी

संघाला वारंवार विचारले जाणारे प्रश्न हे समाजाकडून विचारले जात नाहीत. ते प्रश्न हिंदुपणाला (Hinduness) पराभूत करण्यासाठी संघाचा विरोध करायचा या हेतूने कार्यरत असणार्‍या आणि विदेशी विचार योग्य मानणार्‍या गटाकडून विचारले जातात. त्यामुळे ते ‘फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन’ नसून, ती ‘फ्रीक्वेंट अँलीगेशन’ आहेत. हे असे धादांत खोटे आरोप द्वेष भावनेतून होतात. संघाविषयी गैरसमज, अपप्रचार समाजाला संभ्रमित करण्यासाठी होतो. हिंदूसमाजाच्या नीतीधैर्याचे खच्चीकरण करण्यासाठी संघावर टीका केली जाते. मात्र, संघाची पारदर्शी आणि प्रामाणिक कार्यसंस्कृती समाजाला सलगी देणारी आहे. त्यामुळेच हिंदू मानस संघाशी जोडले गेले आहे. संघाची त्र्याण्णव वर्षांची वाटचाल हिंदू समाजाच्या विजीगिषु वृत्तीचा कृतीशील अध्याय आहे. संघाने राष्ट्रीयतेची धारणा केंद्रस्थानी आणली आहे. राष्ट्रीय जाणिवेविषयी जागरुकता आणि सामाजिक जाणिवेविषयी सक्रियता ही भावना देशव्यापी केली आहे. पुनर्निमाणाच्या एका महत्वपूर्ण टप्प्यापर्यंत देशाची वाटचाल होत असताना संघाने सुरू केलेला संवाद सामाजिक अभिसरणाला विधायक दिशा देणारा ठरेल.

मकरंद मुळे

(लेखक सामाजिक विश्लेषक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -