घरफिचर्सनिसर्गाला न्याय मिळेल कसा?

निसर्गाला न्याय मिळेल कसा?

Subscribe

निसर्गातला प्रत्येक घटक मानवी हस्तक्षेपामुळे बाधित होतोय. विकासाच्या अधिकाधिक हव्यासापायी जंगल, डोंगर, गौणखनिजावर थेट आक्रमण होतंय. अनेक ठिकाणी तर त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न उभा राहिलाय. वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत होणारा शिरकाव, वाढलेले हल्ले आणि थेट एन्काऊंटर पाहता या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा निघण्याची गरज आहे. मात्र, अशाही परिस्थितीत न्याय मागणारा माणूस, युक्तिवाद करणारा माणूस आणि न्याय देणाराही माणूस... मग माणसांच्या या व्यवस्थेत निसर्गाला न्याय मिळेल तरी कसा?

मोठमोठ्या शहरांखाली दडपल्या गेलेल्या जंगलांचे अवशेषसुद्धा आज सापडणार नाहीत. हजारो वृक्षांची कत्तल झालीय, काहींचा कोळसा झाला तर काहींचा थेट धूर… हे सर्व कटकारस्थानामागे कधीकाळी निसर्गाचाच घटक असलेल्या मानवाचा हात आहे, हे वेगळं सांगायला नको. निसर्गाच्या अधिपत्याखाली प्रत्येक जीवाला जगण्याचा मानवाएवढाच अधिकार आहे. मात्र, बुद्धीच्या जोरावर वर्षांनुवर्षांपासनं निसर्गावर जे आक्रमण होतंय, त्याचा वेग पाहता येत्या काही वर्षांत संरक्षित अभयारण्यांसारखंच संरक्षित निसर्ग अर्थात उद्यानांसारखी निसर्गाच्या घटकांची बेटं राहतील.

झपाट्यानं कमी होत चाललेलं जंगल क्षेत्र आणि त्यातली असंतुलित झालेली जैवविविधता या कारणांमुळे अलिकडच्या काळात मानवी वस्तीतील बिबट्यांचा शिरकाव आणि हल्लेही वाढले आहेत. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच भागांत बिबट्या आणि मानव संघर्ष सुरू झालाय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्राबाहेरही बिबट्यांचा वावर वाढू लागलाय. याचं मोठं कारण म्हणजे मानवी वस्तीलगत पाळीव प्राण्यांची वाढलेली संख्या. कधीकाळी मानवासोबत पाळीव पशूंचं मूळ स्थान हे जंगलांमध्येच होतं. मात्र, सुरक्षितता, आधुनिकता आणि वस्त्यांमध्ये राहण्याला जशी सुरुवात झाली, तशी गरजेनुसार पाळीव प्राण्यांनाही मानवाने आपलंसं केलं. सध्याची परिस्थिती पाहता प्राण्यावर होणारे हल्ले आणि मानवावर होणार्‍या हल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. लॉकडाऊनमुळे अनेक भाग हे निर्मनुष्य झाले होते. पर्यावरणाच्या दृष्टीने पोषक वातावरण तयार झाल्यानं बिबट्यांच्या संचारासाठी ही परिस्थिती अनुकूल झाली आणि ठिकठिकाणी बिबट्याचं दर्शन होऊ लागलं. पाळीव प्राणी हे अगदी सहज सावज होऊ शकतात, त्यामुळे बिबट्यांची वस्तीही मानवी वस्तीच्या जवळपास दिसू लागलीय. उसाच्या मळ्यांमध्ये बिबट्याच्या मादीने पिलांना जन्म दिल्याच्या घटना तर नित्याच्याच झाल्यात. त्यामुळेच या पिलांना जंगल काय असतं हेच माहीत होत नाही. मानवी वस्तीच्या जवळपास घाबरून राहायचं आणि संधी मिळाली की भक्ष्य फस्त करायचं, हीच शिकवण त्यांना मिळत जाते.
जंगलामध्ये अनेक किलोमीटरचा पाठलाग करून मिळणारी शिकार बिबट्याला मानवी वस्तीत दमछाक न होताच मिळते. कुत्रे हे बिबट्यांचं प्रमुख आवडतं खाद्य आहे. ही शिकार त्याला मानवी वस्तीत सहज मिळू लागल्यानं कुत्र्यांच्या शोधात बिबटे गावागावांत शिरू लागलेत. या शिकारीदरम्यान माणूस आडवा आला की, प्रतिस्पर्धी किंवा शिकारीतला अडथळा म्हणून त्याच्यावर हल्ले होतात.

- Advertisement -

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणार्‍या चांदोली व कोयना अभयारण्य परिसरामध्ये सुमारे ४५ ते ५० बिबटे आहेत. त्यापेक्षा अधिक बिबटे हे प्रकल्प क्षेत्राबाहेर असण्याची शक्यता आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात तर दररोज कुठे ना कुठे तरी बिबट्याचं दर्शन होतं. वाघ आणि बिबट्याची विष्ठा, पाऊलखुणा, झाडांवरील ओरखडे याद्वारे त्यांची संख्या निश्चित केली जाते. जंगलांमध्ये जशी याची गणना केली जाते तशीच अभयारण्याच्या क्षेत्राबाहेरही झाली पाहिजे. जेणेकरून प्रकल्पात, तसेच प्रकल्पाबाहेर नेमके किती बिबटे आहेत, याची निश्चित आकडेवारी समजेल. भारतात १९८६ मध्ये पट्टेरी वाघांची मोजणी करायला सुरुवात झाली होती. त्यानंतर १० वर्षांनी पट्टेरी वाघांबरोबरच बिबट्यांची मोजणी करण्याचं ठरलं. आता दर चार वर्षांनी ही मोजणी केली जाते. २०१४ च्या मोजणीत राज्यात बिबट्यांची संख्या ७०० होती. २०१८ च्या मोजणीत ती ९०० होती. म्हणजे केवळ चार वर्षांत बिबट्यांच्या संख्येत २८ टक्क्यांनी वाढ झाली. या काळात दरवर्षी सरासरी ५० बिबट्यांचा विविध कारणांमुळे बळी जात होता. ही संख्या विचारात घेतली, तर बिबट्यांच्या संख्येच्या वाढीचा दर दुप्पट अर्थात ५७ टक्के होता. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने भारतात गेल्या चार वर्षांत बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढल्याचं जाहीर केलं. या संशोधनानुसार महाराष्ट्रातील बिबट्यांची संख्या १ हजार ६९० झाली. बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र हा देशात तिसर्‍या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे ही संख्या केवळ व्याघ्र प्रकल्पांच्या परिसरातली आहे. इतर ठिकाणी आणखी किती बिबटे उसाच्या शेतात जगत आहेत, हे कुणालाही माहीत नाही.

बिबटे नेहमीच मानवी वस्तीजवळ राहत आले आहेत. पूर्वी गावाला लागून जंगल असायचे. तेथे दिवसभर लपून राहण्यासाठी बिबट्यांना भरपूर जागा होती. अन्न, पाणी, निवारा, प्रजनन आणि पिलांचं संरक्षण या प्राथमिक गरजा तिथेच भागत होत्या. थोडंफार अन्न कमी पडलंच तर गावातली डुकरं, कुत्री, कोंबड्या, छोटी पाळीव जनावरं मारून त्याचं जीवनचक्र सुरू होतं. हा त्याचा नैसर्गिक अधिवास होता. मात्र, पुढे पुढे त्यावर मानवी अतिक्रमण झालं. स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी मानवाने निसर्ग हवा तसा ओरबाडला आणि आता संघर्ष सुरू झालाय.

- Advertisement -

अस्वल, बिबटे, लांडगे असे मांसाहारी वन्यजीव जिथं पुरेसं खाद्य असेल त्या ठिकाणाकडे आकर्षित होतात. बिबट्या, तरस हे कचरा असलेल्या जागी कुत्रे, डुकरांसारख्या प्राण्यांची शिकार करून गुजराण करतात. जेव्हा अन्नाचे संसाधने वाढतात तेव्हा लहान वयातच मादी प्रजनन करण्यास सुरूवात करते आणि बरीच पिल्लं जगतात. पण दुसरीकडे अन्न कमी प्रमाणात उपलब्ध असेल तर त्यांची उत्पत्ती उशिरानं सुरू होते  त्यांची पिल्लं नैसर्गिकरित्या रोगराईमुळे मरण पावतात. म्हणून कुत्रे, डुकरं आणि बिबट्यांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या अन्नाची संसाधनं कमी करणं हा एक चांगला उपाय ठरू शकतो. यामुळं बिबटे अन्नाच्या शोधात जास्त मोठ्या विभागात भटकंतीला सुरूवात करतात आणि त्यांची संख्या नैसर्गिकपणे नियंत्रणात राहते.

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा

देशात कुठल्याही इतर मोठ्या मांसाहारी प्राण्याची संख्या बिबट्याएवढ्या वेगाने वाढताना कधीच आढळलेली नाही. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे. गेल्या वर्षभरात राज्यात १७३ बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे वन विभागाने घोषित केले आहे. जुन्नर वनक्षेत्रातल्या बिबट्यांची संख्या १९९६ ते २००१ दरम्यान दुप्पट झालीय. ही परिस्थिती चिंताजनक आहे. नगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यांत बिबट्याने १२ लोकांचा बळी घेत धुमाकूळ घातला आहे. भविष्यात आपला बिबट्याबरोबर होणारा संघर्ष किती तीव्र असेल, याचे हे संकेत मानावे लागतील.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -