‘स्वाइन फ्लू’ आजाराचेही ३ प्रकार; घ्या काळजी

स्वाइन फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीला त्यावर लवकरात लवकर उपचार घेणं सोपं जावं यासाठी सरकारने 'हेल्थ ऑर्गनायझेशन'च्या मदतीने आजाराचे ३ प्रकार पाडले आहेत.

how to take care from 3 types of swine flu
प्रातिनिधिक फोटो

स्वाइन फ्लू सारखा जीवघेणा आजार सध्या देशभरात वेगाने पसरतो आहे. घसा खराब होणं,  ताप आणि खोकला,  सतत नाक वाहणं किंवा बंद होणं, थंडी वाजणं, उलट्या होणं, कफ पडणं तसंच श्वसनाचे विकार, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा जाणवणं ही सगळी स्वाइन फ्लूची प्रमुख लक्षणं आहेत. मात्र,  स्वाइन फ्लू या आजाराविषयी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तज्ज्ञांच्या रिपोर्टनुसार, स्वाइन फ्लूमध्येही ३ वेगवेगळे प्रकार आहे. या आजाराचं वैद्यकीय तज्ज्ञांकडून ३ भिन्न गटांमध्ये विभाजन करण्यात आलं आहे. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीला त्यावर लवकरात लवकर उपचार घेणं सोपं जावं यासाठी सरकारने ‘हेल्थ ऑर्गनायझेशन’ मधील तज्ज्ञांच्या मदतीने हे विभाजन केलं आहे. स्वाईन फ्लूच्या या तीन प्रकारांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया…

गट A

स्वाइन फ्लूमध्ये करण्यात येणारे उपचार हे त्याच्या लक्षणांवर अवलंबून असतात. सध्याचे ‘कधी थंडी तर कधी गरमी’ असे संमीश्र वातावरण स्वाइन फ्लूची साथ पसरण्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे दरवर्षी या काळात स्वाइन फ्लूच्या रूग्णांमध्ये वाढ झालेली हमखास दिसून येते. सहसा स्वाइन फ्लूचा संसर्ग हा श्वासामार्फत होतो. घरातील एका व्यक्तीला या आजाराची लागण झाली असेल, तर काही कालावधीतच तो घरातील इतरांना होऊ शकतो. मात्र, या गटातील लक्षणं जर तुमच्यामध्ये किंवा तुमच्या घरात कुणामध्ये जाणवत असतील तर लगेच घाबरुन जाऊ नका. त्याबाबत तपासणी करुन घ्या. काही घरगुती उपाय किंवा साध्यासाध्या औषधांच्या साहाय्याने तुम्ही त्यावर मात करु शकता.

गट B 

या गटात मोडणाऱ्यांमध्ये स्वाइन फ्लूच्या सर्वसाधारण लक्षणांव्यतिरिक्त खूप जास्त प्रमाणात ताप येणं, घशामध्ये सतत वेदना होणं ही लक्षणंही दिसून येतात. तसंच या गटातील रुग्णांची ‘हाय रिस्क कंडीशन’ कॅटिगरी असेल, तर त्यांना स्वाइन फ्ल्यूसाठी असलेलं औषध टॅमीफ्ल्यू देण्यात येते. अशाप्रकारच्या ‘हाय रिस्क कॅटगरि’मध्ये गर्भवती महिला, लहान मुलं, ६५ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या प्रौढ व्यक्ती त्याचबरोबर फुफ्फुसांच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती, हृदय विकार,किडनीचे आजार, डायबिटीज किंवा कॅन्सर सारख्या आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तींचा समावेश होतो.

गट C

‘गट C’मध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये गट A आणि गट B च्या तुलनेत आजाराबाबत अन्य गंभीर लक्षणंही आढळून येतात. यामध्ये श्वास घ्यायला खूपच त्रास होणं, छातीत कळा येणं, ब्लड प्रेशर कमी-जास्त होणं तसंच नखं पिवळी पडणं अशा लक्षणांचा समावेश होतो. ही लक्षणं आढळणाऱ्यांचा गट C मध्ये समावेश होतो. अशा रुग्णांना त्वरित हॉस्पिटलमध्ये भरती करणं आवश्यक असतं. हे रुग्ण स्वाइन फ्लूच्या गंभीर पातळीत मोडले जात असल्यामुळे त्यांना वेगळ्या खोलीत ठेवलं जातं. त्यांना योग्य प्रमाणात मात्र सतत ‘टॅमिफ्लू’ हे औषध दिलं जातं. त्यांच्या रक्ताचीही वेळोवेळी तपासाणी करुन, गरज पडल्यास ते बदललं जातं.