घरफिचर्स‘मी’ च्या वेलांटीचा सुटो सुटो फास

‘मी’ च्या वेलांटीचा सुटो सुटो फास

Subscribe

आपल्या आतमध्ये दडलेला अहंकार पुन्हा पुन्हा उसळी मारतो आणि इवल्याशा नाजूक इगोमुळे महाभारत घडत राहतं आणि नव्या नव्या ‘संजयां’कडून त्याचा ‘आंखो देखा हाल’ समजू लागतो. ‘गर्वाचे घर खाली’ असे सुविचार आणि तात्पर्य असलेल्या गोष्टी आपण ऐकतो, पण आपल्या मनात हे मीपण घट्ट रुजलेलं असतं. इतर लोक कनिष्ठ आणि आपण श्रेष्ठ, ही भावना आपल्या मनाच्या तळाशी असते.

कपलमध्ये भांडण झालं आणि तिला त्याने कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकेना. (जागतिक प्रश्न !) ती तशीच चिडून वैतागून गेली. लाडीगोडी लावून झाली, पण तिला काही पटेचना. अखेरीस ती चिडून घरी आली. तो तिच्या पाठोपाठ. (दुसरं काय करणार.) तिने दरवाजा लावून घेतला. हा डोअरबेल वाजवू लागला. दरवाजा काही उघडला जाईना. संवादाची दारं बंद झाल्यावर काय करणार !

शेवटी न राहवून आतून तिने प्रश्न विचारला, कोण आहे ?
त्याचं उत्तर ः मी आहे.
तिने पुन्हा विचारलं- कोण आहे?
तो म्हणाला, मी आहे.
ही प्रश्नोत्तराची मालिका होत राहिली. आणि काही वेळाने तिने जेव्हा विचारलं, कोण आहे?
थकलाभागला, अगतिक झालेला तो म्हणाला, तू आहे
मी ‘मी’ राहिलेलोच नाही मुळी.आणि दरवाजा उघडला गेला !

- Advertisement -

‘मी’ आणि ‘तू’ यातल्या सीमारेषा गळून पडल्या की प्रेमाचा दरवाजा उघडतो, असा आशय असणारी गोष्ट माझ्या एका सरांनी सांगितली होती. ही गोष्ट मला नेहमी आठवत राहते.

आपल्या आतमध्ये दडलेला अहंकार पुन्हा पुन्हा उसळी मारतो आणि इवल्याशा नाजूक इगोमुळे महाभारत घडत राहतं आणि नव्या नव्या ‘संजयां’कडून त्याचा ‘आंखो देखा हाल’ समजू लागतो. ‘गर्वाचे घर खाली’ असे सुविचार आणि तात्पर्य असलेल्या गोष्टी आपण ऐकतो, पण आपल्या मनात हे मीपण घट्ट रुजलेलं असतं. इतर लोक कनिष्ठ आणि आपण श्रेष्ठ, ही भावना आपल्या मनाच्या तळाशी असते. आपण इतरांपेक्षा वेगळं असणं ही भावना छान आहे, सुंदर आहे; पण श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना मनात असणं काही बरं नाही.

- Advertisement -

संतसाहित्यात अनेक ठिकाणी विठ्ठलापाशी पोचताना स्वतः विरघळून जाण्याची भाषा आहे. स्वतःचं अस्तित्व विसरुन गेल्याविना आणि सारं देहभान हरपून गेल्याशिवाय विठ्ठल गवसत नाही म्हणूनच तर संत नामदेव म्हणतात- देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो जडत्वाच्या पाशातून मुक्त होण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले गेले आहेत. त्या मुक्तीची आस आहे; पण त्या मार्गावरून चालणं कठीण.

स्वतःच्याच प्रेमात पडावं, असं वातावरण भवताली असताना तर हा मार्ग आणखी खडतर. त्यामुळे नार्सिससला ज्या प्रमाणे स्वतःचं प्रतिबिंब पाहूनच वेड लागलं तसंच काहीसं होत राहतं आणि मग ‘सीझरला स्तुती आवडत नाही’ हे वाक्य मात्र सीझरला आवडायचं, तशी आपली गत होते. सेल्फी हा जणू राष्ट्रीय छंद बनतो आणि आपण आपल्याच प्रेमात आकंठ बुडत जातो. एकदा असं झालं की इतरांचं अस्तित्व दिसत नाही. राष्ट्रीय नेतेसुध्दा केवळ स्वतःचे फोटो यावेत म्हणून इतरांना बाजूला ढकलतात तेव्हा या स्वप्रेमात बुडण्याची खोली सहज समजते. काहीही झालं की ‘मैं हू ना’ अशा थाटात असलेल्या अनेकांना ‘मी’पणाचं ओझं समजत नाही. ते स्वतःच ‘मी’पणाच्या ओझ्यात दबलेले असतात.

त्यामुळे हे मीपणाचं ओझं कसं हलकं करायचं हा मोठा प्रश्न आहे. मग ती गोष्ट प्रेमाची असो वा विठ्ठलाला भेटण्याची असो किंवा राजकीय सुसंवादाची. इतर कुणाशी चर्चा न करता. केवळ मीच तारणहार आहे, असं समजून ‘मी पुन्हा येईन’ अविर्भावात म्हणण-या कुण्या गर्विष्ठ नेत्याला सामूहिक नेतृत्वावर विश्वासच नसतो. आपलं स्वतःचं असणंच त्याला अधिक महत्त्वाचं वाटतं. उपनिषदांमध्ये जे ‘अहं ब्रम्हास्मी’ म्हटलंय त्याचा अर्थच मी निरंकुश, सर्वंकष आहे, असा आहे. जणू हे ब्रीदवाक्यच घोकणा-या व्यक्ती कोहं अर्थात ‘मी कोण आहे’, असा रास्त प्रश्न विचारत नाहीत. व्यक्तीला जेव्हा आपण सर्वश्रेष्ठ असल्याचं वाटू लागतं तेव्हा ती व्यक्ती स्वतःच रचलेल्या एका मनोरम विश्वात असते. त्यामुळेच स्वतःच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमेच्या प्रेमात पडलेले हे नेते सत्ता निसटून जाते तेव्हा अगदी केविलवाणे भेसूर भासू लागतात.

स्वभान असणं वेगळं, स्वतःविषयी छान वाटणं वेगळं आणि स्वमग्न असण्यातून इतरांना तुच्छ लेखणं वेगळं. आत्मविश्वास आणि अहंकार यातील भेदरेषा गळून पडली की ‘मी पुन्हा येईन’ची गर्विष्ठ दर्पोक्ती कानी पडते आणि अशा गर्वाला संपविण्याची ‘हीच ती वेळ’ येतेच. या आत्यंतिक अहंकारातून स्वतःला शोधण्याच्या वाटा संपतातच; पण त्याशिवाय इतरांसोबत संवादाच्या शक्यता संपतात. प्रश्न केवळ संसारातील ‘फिफ्टी-फिफ्टी’ पदाचा आणि जबाबदा-यांच्या वाटपाचा नसतो तर स्मॉल लिपीतलं अक्षर कॅपिटल आय होत जाऊन भिंत तयार करते, हा खरा मुद्दा असतो. मग आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतात; पण गाडी पुढं काही सरकत नाही. वाद-प्रतिवाद-संवादाची अवघी प्रक्रिया केवळ अहंकारामुळे बंद होते. एकदा ही प्रक्रिया बंद झाली की साचलेपण येतं आणि जगणं प्रवाही असतं. त्यामुळे मोठा लोच्या होतो. जगणं कळण्यासाठी स्वतःच्या आतील डायनॅमिक्सही शोधावं लागतं. ते नक्की आहे असं, संपूर्ण हाती गवसत नाही; पण त्या शोधाच्या दिशेने पावलं टाकावी लागतात.

जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो

असं सांगणारे बा.भ.बोरकर असोत की ‘ ‘मी’ च्या वेलांटीचा सुटो सुटो फास’ असं सांगणारे विंदा असोत; सारेचजण या प्रसरण पावणा-या भव्य दिव्य ‘स्व’ला रोखण्याविषयी सांगत असतात आणि तिथूनच तर जगण्याची सुंदर वाट प्रशस्त होते, याची पुन्हा पुन्हा आठवण करून देतात. आपण ‘मी’च्या वेलांटीच्या फासातून स्वतःला मुक्त करणार की या वेलांटीचा फास स्वतःभोवती आवळणार, हा प्रश्न हरघडी असतोच. तो प्रश्न केवळ कुठल्या एक-दोन नेत्यांसमोरचा नाही; तर प्रत्येकासमोरच उभा ठाकतो. आपण समाजामध्ये संमिलीत होऊन स्वतःला विरघळवून समष्टीसोबत तल्लीन कसं व्हायचं, हे ठरवायला हवं. नाहीतर जे झाडं आपण तोडत असतो त्या झाडाच्या फांदीवर आपणच बसलेलो असतो, अशी शेखचिल्लीसारखी आपली गत होऊ नये, एवढीच अपेक्षा.

-श्रीरंजन आवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -