घरफिचर्सभिऊन रहा, मी तुझ्या पाठीशी आहे !

भिऊन रहा, मी तुझ्या पाठीशी आहे !

Subscribe

‘कानून के हाथ बडे लंबे होते है’ पण व्यक्तीच्या हॉलपासून ते बेडरूमपर्यंत लक्ष ठेवणार्‍या राज्यसंस्थेने आपली मर्यादा सोडली आहे. सर्वांवर आपली पकड अधिक घट्ट व्हावी म्हणून डिजिटल पहारेकरी नेमण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका क्लिकवर तुम्हाला नियंत्रित करता यावं आणि तुम्ही निव्वळ एक डाटा पॉइंट व्हावं, याचं नेपथ्य आकाराला येतं आहे. या नेपथ्याला घाबरुन पळून जायचं की या परिस्थितीला भिडायचं, हे आपल्या हातात आहे.

चेन्नईहून मैत्रीण आली. तिच्यासोबत मनसोक्त गप्पा मारण्यासाठी बागेत गेलो. थंडगार वारा. शांतता. त्यामुळे जरासं हायसं वाटत होतं. तोच एकजण टपकला- ‘सर, ओळखलंत?’ मी म्हटलं हा कोण विद्यार्थी, ‘ओळखलंत का सर मला, बागेत आला कोणी’ असं म्हणणारा. एकदम गडबडून गेलेलो मी. पटकन होकारार्थी मान डोलावली. ‘सर, तुम्ही कसे काय इकडे?’ हा त्याहून महाकठीण प्रश्न. जणू काहीतरी अवैध ठिकाणी बेकायदेशीर काम करताना पकडावं आपल्याला, तसं काहीसं. शेवटी कसाबसा सावरत सुरेख विषयांतर करत ‘पाठीवरती हात ठेवून फक्त जा’ म्हणत विषय संपवला आणि पुन्हा मैत्रिणीकडे वळलो. या गमतीदार प्रसंगामुळे ती गालातल्या गालात हसत होती.

ती म्हणाली, तुझ्यावर विद्यार्थ्यांची पण पाळत आहे का? मी म्हटले, आपण कुठेही पळत सुटलो तरी पाळत सुटत नाही! पुढे तिचा नवरा कसा तिच्या मोबाइलमधल्या चॅटिंगवर लक्ष ठेवतो, हे ती सांगत राहिली. बाहेर पडायची सोय नाही वगैरे. मागे एक डिटेक्टिव एजन्सी चालवणारे गृहस्थ खाजगीत मला म्हणाले, आमच्याकडे येणा-या एकूण केसेसपैकी 80 टक्के केसेस नवरा-बायकोच्या आहेत. नव-याचा बायकोवर संशय, बायकोचा नव-यावर संशय, म्हणून ‘लक्ष’ ठेवायला सांगतात. मी ते ऐकून थक्क झालो. एकमेकांविषयी प्रचंड संशय आणि स्वतःमध्ये असुरक्षितता यातून असे पाळत ठेवण्याचे प्रकार सर्रास घडतात.

- Advertisement -

काहीजण आवडणार्‍या कन्येचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत पोहोचतात तर काहीजण साहेबांच्या बंगल्यावर कोण ये-जा करतात, याची खबरबात ठेवतात. ब-याच ठिकाणी सीसीटीव्हीच्या कॅमे-याशेजारी ‘सावधान, तुम्ही सीसीटीव्हीच्या कक्षेत आहात’ असा सज्जड दमच भरलेला असतो. काही सोसायट्यांचे वॉचमन तर प्रत्येक घरातील घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. तुझ्याकडे पाहताच आमदार झाल्याची जाणीव होणा-या गीतातील बोल इथे फार महत्त्वाचे आहेत- ‘तुझ्यावरी लक्ष हाच माझा पक्ष ग’ बाई आपली मालकीच असल्याने हाच पक्ष असणे स्वाभाविक. असो. आत्यंतिक दक्ष असणारे लोक सतत लक्ष ठेवून असतात. सध्या अगदी ‘वर्षा’, ‘मातोश्री’ आणि ‘गोविंदबाग’ इथे होणा-या हालचालींवरही सर्वांचं लक्ष आहे. हजार डोळ्यांनी किती काय काय टिपलं जात असतं. प्रत्येक ठिकाणी लक्ष, पाळत ठेवण्याचे मार्ग निरनिराळे आणि कारणंही वेगवेगळी.

देशाच्या सुरक्षेकरिता इंटलिजन्स ब्युरोकडून गोपनीय माहिती मिळवणं ही बाब महत्त्वाचीच आहे, पण उद्या तुमच्या इनबॉक्समधील चॅटिंग कोणी डोकावून पाहत असेल आणि त्याची तुम्हाला कल्पनाही नसेल तर कसं वाटेल! अगदी अशीच धक्कादायक बाब अलीकडेच प्रसिद्ध झाली. भारतातील हजारो कार्यकर्ते, पत्रकार यांच्या पर्सनल व्हॉट्सअ‍ॅपवरील माहितीवर पाळत ठेवण्यात येत असल्याचे व्हॉट्सअ‍ॅपच्या लक्षात आले. इस्रायली स्पायवेअरचा वापर करून हा गैरप्रकार होत होता. हे सारे कार्यकर्ते उदारमतवादी आणि संविधानवादी. मोदी सरकारच्या ध्येयधोरणांवर सातत्याने टीका करणा-या या लोकांवर बारीक नजर ठेवल्याचे समोर आले. यामध्ये मोदी सरकारचा हात आहे, असा संशय व्यक्त केला गेला.

- Advertisement -

या साध्या पत्रकारांची, कार्यकर्त्यांची सरकारला का भीती वाटत असावी ? त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा कोणताही हक्क सरकारला किंवा कुठल्या इस्त्रायली एजन्सीला नाही; पण असुरक्षिततेच्या भावनेने घेरलेल्या व्यक्तीला, संस्थांना, पक्षाला कोण काय सांगणार ! अगदी बड्या बड्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरातच छुपे कॅमेरे आणि रेकॉर्डर लावल्याच्या बातम्या तर 2014-15 पासून आपण वाचतोच आहोत. त्यामुळे बाकी लोक सोडा, अगदी स्वतःच्या घरातल्याच स्वयंसेवकांवरही ‘कडी नजर’ आहे.

‘1984’ या जॉर्ज ऑरवेलच्या सुप्रसिद्ध कादंबरीतील ‘बिग ब्रदर इज वाचिंग यू’ हे वाक्य अनेकदा वापरलं गेलं आहे. याचं गुजराती भाषांतर झालं आहे का, ते माहीत नाही; पण ‘बडे भाई सब देख रहे है’ असं आपण आगामी राष्ट्रभाषा हिंदीमध्ये म्हणू शकतोच ना. सर्वांवर ‘सुपरव्हिजन’ करणारा असा हा ब्रदर भासतो सर्वशक्तिमान; पण आतून असतो पोकळ. आपल्याला लोकांनी घाबरलं पाहिजे आणि आपण लोकांना कोणत्याही गोष्टीत अडकवू शकतो, हे सांगण्यासाठी हा ‘लक्ष’ ठेवण्याचा प्रकार. अ‍ॅन्ड्रॉइड फोनवर सारं काही डाउनलोड करत असताना आपण अशा अनेक अ‍ॅप्सना आपल्यावर ‘लक्ष’ ठेवण्यासाठी खुला परवाना देत असतो. आपल्या गॅलरीपासून ते इमेल्सपर्यंत सारं ‘ओपन बुक’ धुंडाळून आणि त्या डाटाचा हवा तसा वापर केला जातो. केंब्रिज अ‍ॅनलिटिकापासून ते नमो अ‍ॅपपर्यंत सारे हेच तर करत असतात. या गडबडी करुन तर ट्रम्प 2016 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकू शकले. (किमान आपण परदेशातल्या उदाहरणांवर बोलायला काय हरकत आहे !)

‘कानून के हाथ बडे लंबे होते है’ पण व्यक्तीच्या हॉलपासून ते बेडरूमपर्यंत लक्ष ठेवणार्‍या राज्यसंस्थेने आपली मर्यादा सोडली आहे. सर्वांवर आपली पकड अधिक घट्ट व्हावी म्हणून असे डिजिटल पहारेकरी नेमण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका क्लिकवर तुम्हाला नियंत्रित करता यावं आणि तुम्ही निव्वळ एक डाटा पॉइंट व्हावं, याचं नेपथ्य आकाराला येतं आहे. या नेपथ्याला घाबरुन पळून जायचं की या परिस्थितीला भिडायचं, हे आपल्या हातात आहे. प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष, पाळत तर असणारच आहे. आपण सावधानता बाळगत त्यातून मार्ग कसा काढतो, हे महत्त्वाचं. अंतर्बाह्य पारदर्शक असलेल्यांनी आणि मूल्यांवर निष्ठा असलेल्यांनी बिग ब्रदरच्या सुपरव्हिजनला कधी भीक घातली नाही.

श्री स्वामी समर्थांच्या फोटोखाली ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हे वाक्य हमखास लिहिलेलं असतं. आजच्या राजकीय समर्थांच्या पोस्टरखाली ‘भिऊन रहा, मी तुझ्या पाठीशी आहे’ असंच लिहिलेलं दिसतंय. तुम्ही पाहताय ना?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -