Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स पती-पत्नीमध्ये विश्वासालाच महत्त्व!

पती-पत्नीमध्ये विश्वासालाच महत्त्व!

नात्यात तोचतोचपणा येण्याला दोघेही जबाबदार असतात. दोघांना एकमेकांना सतत दोष देण्याची सवय लागलेली असते. वारंवार दोष दिल्याने एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होऊ लागतो. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम दोष देणे थांबवले पाहिजे. आपली चूक असेल तर ती मान्य करायला काय हरकत आहे? नात्यामध्ये कोणीही उच्च किंवा नीच नसल्याने मोकळेपणाने आपला दोष स्वीकारला तर जोडीदाराला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

Related Story

- Advertisement -

आजकाल कोणतेही नाते घ्या, ते टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. सध्या समाजाच्या नीतिमत्तेची बंधने गळून पडली आहेत; पण कोणतेही नाते तुटताना त्याचे फार वाईट वाटून घेतले जात नाही हे विशेष. नाती तुटण्याचा दूरगामी परिणाम काय होणार आहे, याचा विचार करायलाही कुणाकडे सोशल मीडियाच्या जगात वेळ नाही. पण नाती ही मनासाठी टॉनिकचे काम करत असतात. त्यामुळेच नाती जपणे हे फार गरजेचे झाले आहे. मला कुणाशी काही देेणेघेणे नाही असं म्हणणार्‍या लोकांनाच नात्यांची, माणसांची फार गरज असते हे नाकारुन चालणार नाही.

पती-पत्नी संसाराचा सारीपाट असला तरी पण दोघांचेही हिशोब नात्यासंबंधी वेगवेगळेच असतात. नाती जपताना जीवन हे भूमितीप्रमाणे असते; पण काटकोन, त्रिकोणाच्या अंशाची बेरीज मात्र काही केल्या सापडत नाही. पती-पत्नीमध्ये अनेकदा दोघेही आपापल्या ठिकाणी योग्य असले तरी परस्परांसाठी अयोग्य ठरतात. रोज एका घरात वावरत असूनही एकमेकांबद्दल त्यांच्या मनात अजिबात आदर नव्हता आणि विश्वास तर अजिबातच नव्हता. केवळ आपापसातील विरोधाभासांमुळे शेकडो नाती तुटल्याची उदाहरणे आहेत. क्षुल्लक कारणांवरुन काडीमोड घेण्यापेक्षा विरोधाभासाची ही दरी भरून काढणे गरजेचे आहे. पती-पत्नीचे नाते सर्वस्वी विश्वास आणि प्रेम यावर अवलंबून असते. वेळोवेळी कसोटीचे क्षण असतात. कुठल्या क्षणी कसे वागावे हे नीट कळायलाच हवे. संसाराच्या वाटेवर चालताना प्रत्येक पाऊल सांभाळून पडायला हवे. नाहीतर एकमेकाची उणीदुणी काढण्यातच आयुष्य संपेल. त्यामुळेच या नात्यामध्ये विश्वासालाच जास्त महत्त्व आहे. प्रसंग, वेळ, क्षण दोघांनाही माणुसकीचे धडे शिकवत असतात.

- Advertisement -

नाती टिकवताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, हा एकतर्फी मामला नाही. कुणाला तरी एकाला वाटते म्हणून नाते टिकत नाही तर पती-पत्नीची मंजुरी असावी लागते. मात्र ही आत्मियता निर्माण करणे आपल्या हातात असू शकते. नात्यात ते बंध निर्माण करताना विश्वासाचा, प्रेमाचा एक धागा गुंफला जाऊ शकतो. त्यासाठी दोन गोष्टींची पथ्ये मात्र पाळायला हवीत. एक तर अवास्तव अपेक्षांना फाटा दिला पाहिजे आणि अधिकारापेक्षा प्रेमाची भाषा वापरायला शिकले पाहिजे. कोणत्याही नात्यांमध्ये विश्वासाला खूप महत्त्व आहे. एकमेकांवर लक्ष ठेवून, त्यांच्यावर अविश्वास दाखवून काही मिळणार नाही. आजच्या धकाधकीच्या युगात माणूस एकटा पडत चालला आहे. त्यामुळेच दोघांनीही एकमेकांना स्पेस दिला पाहिजे. तो किंवा ती कुणाला व काय मॅसेज करतात यावर लक्ष ठेवण्याची अनेकांची प्रवृत्ती असते. नेमकी हीच प्रवृत्ती नात्यातला विश्वास गमावण्यास पुरेशी ठरते. कारण बरेचदा आपली शंका निव्वळ आपला भ्रम असतो. त्यामुळे प्रेमाच्या नादात आपण आपल्या साथीदाराचे स्वातंत्र्य तर हिसकावून घेत नाही ना हे पडताळून पहावे. अन्यथा नाते घुसमटून संपण्याची शक्यता असते.

संसार करताना मतभेद होणारच. मात्र या मतभेदांचे रूपांतर वादात होता कामा नये. शक्य तितक्या लवकर सुवर्णमध्य निवडण्याचा प्रयत्न करावा. त्याला किंवा तिला जर एखादे काम एखाद्या विशिष्ट पद्धतीनेच करायला आवडत असेल व तुम्हाला तसे करणे शक्य नसेल तर मधला मार्ग निवडा. यामुळे कुणाचे मन दुखावणार नाही व फारशी तडजोडही करावी लागणार नाही. दोन भिन्न व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेक गोष्टी नव्याने कळतात. त्याचा किंवा तिचा छंद हा त्यातीलच एक भाग असतो. अशावेळी परस्परांच्या आवडी-निवडी व कला गुणांचा आदर करा.

- Advertisement -

घरातल्या मोठ्या माणसांविषयी आदर बाळगल्याने पती-पत्नीमधील नाती फुलतील. सासू-सासरे यांच्या जागी आपल्या घरातील मोठी माणसे असतील तर हा विचार मनाच्या एका कोपर्‍यात जागा ठेवला की संघर्षाच्या वेळा आपोआप कमी होत जातात. एकमेकांच्या विचारस्वातंत्र्याचा आदर केला तर हे नातेही वेगळाच आदर्श बनून जाईल. आपल्या जोडीदाराचा विचार करताना हे आयुष्यभराचे नाते आहे हे विसरायला नको. ते रक्ताचे नाते नाही; पण तेवढेच महत्त्वाचे आहे याचा विसर दोघांनाही पडायला नको. लाइफपार्टनरमध्ये विश्वासाला आणि संयमाला फार महत्त्व असते. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा बाळगल्या तरी त्या वास्तव असाव्यात, याचे भान दोघांनाही हवे. एकमेकांबद्दल फार ‘पझेसिव्ह’ राहणे या नात्यासाठी रेड सिग्नल ठरू शकते, मात्र चांगल्या गोष्टी केल्या तर प्रोत्साहन देेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही पार्टनरला जेवढे स्वातंत्र्य द्याल तेवढेच तुम्हालाही मिळेल, याची खात्री बाळगा.

स्त्रीला (पत्नी)कायम वाटते की, मी घरासाठी, घरातल्या लोकांसाठी इतके करते तर मी सांगते तसेच इतरांनी वागायला हवे. त्यात मायेची भावनाही असते; पण समोरच्या माणसाला(पती)ते बंधन वाटू शकते. स्त्री एकाच वेळी अनेक नात्यांमध्ये गुरफटलेली असते. ती सगळी नाती जपताना तिला तारेवरची कसरत करावी लागते; पण प्रत्येक नात्याचे महत्त्व ओळखून तिच्याशी ‘डील’ करायचे ठरवले तर बर्‍याच गोष्टी सोप्या होतात. अशा सगळ्या कसरती पार करूनही नातीही टिकवावी लागतातच. कारण नात्यांशिवाय जगण्याला अर्थ नाही. हे नात्यांचे मॅनेजमेंट जमले तर आयुष्यात सुखाचे फिक्स डिपॉझिटमध्ये वाढ होईल यात शंका नाही!

आजकालची लग्ने लवकर मोडतात, टिकत नाहीत. लग्नानंतर वर्षभरातच घटस्फोट होतात. लग्नाला किती वर्षे झाली आहेत यापेक्षा त्यांनी एकमेकांचा किती विश्वास संपादन केला आहे, हा निकष आजकाल जास्त महत्त्वाचा ठरू लागला आहे. ही नाती टिकवायची कशी, हा आजच्या जमान्यातला मोठा प्रश्न आहे. नाती टिकवताना आपण टोकाची भूमिका तर घेत नाही ना, हे पाहणे फार गरजेचे झाले आहे. पूर्वीसारखे अमूक एका नात्याकडून विशिष्ट अपेक्षा करणे आता रास्त नाही. दोघांनीही एकमेकांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करून त्या गुणांच्या मदतीनेच संसाराचा गाडा सुरळीत चालवावा. केवळ कौतुकच नाही तर ते गुण आत्मसात करण्याचाही प्रयत्न करावा.

नात्यात तोचतोचपणा येण्याला दोघेही जबाबदार असतात. दोघांना एकमेकांना सतत दोष देण्याची सवय लागलेली असते. वारंवार दोष दिल्याने एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होऊ लागतो. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम दोष देणे थांबवले पाहिजे. आपली चूक असेल तर ती मान्य करायला काय हरकत आहे? नात्यामध्ये कोणीही उच्च किंवा नीच नसल्याने मोकळेपणाने आपला दोष स्वीकारला तर जोडीदाराला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याने माझ्यासाठी अमूक केले पाहिजे, ती माझी जबाबदारी नाही असे म्हणण्यापेक्षा प्रत्येक बाबीमध्ये दोघांनी समान वाटा उचलावा, म्हणजे एकावर दडपण येणार नाही आणि एकमेकांच्या साथीने काम पूर्णही होईल.स्त्रियांना खूप बोलण्याची सवय असते. त्या स्वत:ची गाडी पुढे दामटवण्यात इतक्या रमतात की समोरच्याला काही बोलायचे आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही. यामुळेही नात्यात दरी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपले म्हणणे पुढे रेटण्यापेक्षा जोडीदाराचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करावा.

- Advertisement -